मासिक संग्रह: मे, १९९९

संपादकीय

देशनिष्ठा म्हणजे शेजारधर्म
आमचे आजचा सुधारक हे मासिक विवेकवादाचा प्रसार करण्यासाठी जन्माला आलेले आहे हे आपण जाणताच. ते कोणत्याही विषयाचा किंवा मताचा प्रचार करीत नाही. प्रचारक मोठमोठ्याने ओरडतो आणि दुसरी बाजू, विरुद्ध मताचा आवाज, श्रोत्यांपर्यंत पोहचणार नाही असा यत्न करीत असतो आणि प्रसारक शांतपणे आपली बाजू मांडतो, दुसरी बाजू ऐकून घेतो, लोकांना ऐकू देतो. असो.
विवेकवाद म्हणजे काय हे स्पष्ट करण्याची प्रत्येक संधी घेण्याचे आणि त्या निमित्ताने आमच्या प्रतिपादनात पुनरुक्तीचा दोष आला तरी तो स्वीकारण्याचे आम्ही ठरविले आहे. ते करण्यासाठी काही टोकाची अतिरेकी मते मांडून लोकांना डिचवण्याचाही क्रम आम्ही चालविला आहे.

पुढे वाचा

धर्मान्तरणाने राष्ट्रनिष्ठा बदलेल कशी?

संपादक आजचा सुधारक यांस
गेली चार वर्षे मी आपल्या मासिकाची वर्गणीदार आहे. पुणे मुंबई प्रवासात विद्या बाळ यांच्याकडे हे मासिक मी पाहिले अन् लगेच वर्गणीदार झाले.
आपल्या मासिकात सद्य:परिस्थितीवरील लेख वाचायला मिळतात, विचारमंथन होते आणि मतांना बहुधा योग्य दिशा मिळते असा माझा अनुभव आहे.
ओरिसातल्या एका मिशन-याची दोन मुलांसमवेत केलेली निघृण हत्या ह्या विषयाच्या अनुषंगाने मार्चच्या अंकातील ‘धर्मान्तर व राष्ट्रनिष्ठा’ हे स्फुट–स्पष्ट आणि परखडपणे लिहिलेले असून मनाला अंतर्मुख करणारे ठरले. या हत्येच्या बातमीने संपूर्ण जग हादरून गेले. त्यानंतर काही आठवड्यांनीच इंडोनेशिया येथे धार्मिक प्रश्नावरून निर्माण झालेले दंगे आणि अत्याचार याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.

पुढे वाचा

अर्थव्यवस्थेच्या सुसूत्रीकरणासाठी बाजारपेठ उपयोगी नाही

बाजारपेठ म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्यात मेळ घालून सर्व वस्तूंच्या योग्य किमती ठरून त्याप्रमाणे वस्तू आणि श्रम यांचा विनिमय होणे. या क्रियेला काही जण अर्थव्यवहाराचे सुसूत्रीकरण मानतात. श्री. स.ह. देशपांडे (एप्रिल ९९) हे या बाजारपेठेचे दोन प्रकार सांगतात. खाजगी मालकीच्या आधारे उभी राहणारी (म्हणजे भांडवलशाही किंवा ‘मुक्त) बाजारपेठ; आणि सामुदायिक मालकीच्या आधारावर (संकुचित) उभी असलेली ‘सोशलिस्ट मार्केट इकॉनमी’ उर्फ समाजवादी बाजारपेठ.
देशपांडे असेही सांगतात की सो.मा.इ. मध्ये केवळ आर्थिक यंत्रणा अभिप्रेत आहे, तर भांडवलशाही बाजारपेठेत लोकशाहीचा आत्माही आहे. सोईसाठी आपण ‘जुनी’ भांडवलशाही ती बाजारपेठ आणि नवे कृत्रिम समाजवादी ते ‘मार्केट’ असे शब्द वापरू.

पुढे वाचा

चर्चा – धर्मान्तर आणि राष्ट्रान्तर

धर्मान्तर आणि राष्ट्रान्तर त्या विषयावरचा वाद फलदायी व्हायला हवा असेल तर त्यातला मुळातला मुद्दा काय आहे हे पाहिले पाहिजे.
‘धर्मान्तर म्हणजे राष्ट्रान्तर’ हे विधान मला वाटते प्रथम सावरकरांनी केले. त्याचा नेमका अर्थ काय?
हे विधान करताना सावरकर एक त्रिकालाबाधित समाजशास्त्रीय नियम सांगत नव्हते. म्हणजे कोणत्याही काळी, कोणत्याही राष्ट्रातील लोकांनी आपला धर्म बदलला तर त्यांची राष्ट्रनिष्ठा ढळते असे त्यांना सांगायचे नव्हते. असे विधान कुणी केले तर ते असिद्ध ठरवणे
अगदीच सोपे आहे. पण प्रचलित प्रश्नांवर प्रकाश पाडण्याच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग नाही.

पुढे वाचा

वाचक मेळाव्याचा वृत्तान्त

आजचा सुधारक या मासिकाच्या वाचकांचा मेळावा रविवारी दिनांक २४ एप्रिलला भरला. निमित्त होते, मासिकाचे दहाव्या वर्षात पाऊल टाकण्याचे. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने आपले दालन या मेळाव्यासाठी उपलब्ध करून दिले, ज्याबद्दल आजचा सुधारक परिवार त्यांचा अपार आभारी आहे.
हा या मासिकाच्या वाचकांचा तिसरा मेळावा. आधीच्या दोन मेळाव्यांपेक्षा हा काही बाबतींत वेगळा होता. मुख्य म्हणजे मासिकाचे संस्थापक संपादक श्री. दि. य. देशपांडे प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाहीत त्यांच्या अनुपस्थितीतले हे मासिकाचे पहिलेच ‘कार्य’! दुसरे म्हणजे हा वाचक-मेळावा पूर्णपणे अनौपचारिक होता – ना अध्यक्ष, ना प्रमुख पाहुणे.

पुढे वाचा

स्वदेशीची चळवळ

अलीकडे विदेशी आणि स्वदेशी यांमधील द्वंद्व फार प्रकर्षाने खेळले जाऊ लागले आहे. आन्तर्राष्ट्रीय दबावामुळे जागतिकीकरणाचा १९९० च्या दशकात सर्वत्र बोलबाला होऊ लागला त्यामुळे भारतात काहीशा सुस्त पडलेल्या स्वदेशीच्या चळवळ्यांना चेव आला. स्वदेशीची चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामधील एक महत्त्वाचा घटक होती आणि स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय विकास धोरणाच्या पायातील एक वीट (plank in the platform) म्हणून काँग्रेस सरकारने या ना त्या प्रकारे स्वदेशीचे तत्त्व मान्य केले. भारतीयांना खरोखरच स्वातंत्र्य मिळाल्याची जाणीव व्हावी म्हणून जवाहरलाल नेहरूंनी स्वदेशीला महत्त्वाचे स्थान दिले. म्हणूनच पोलादाचे, खतांचे, अवजड यंत्रसामुग्रीचे व अणुऊर्जेचे प्रचंड प्रकल्प सरकारने राबविले.

पुढे वाचा

अर्थ-व्यवस्था व राज्य-व्यवस्था

समाजवाद, बाजारपेठा व लोकशाही’ या अमर्त्य सेन यांच्या निबंधाचा विद्यागौरी खरे यांनी केलेला अनुवाद मार्च ९९ च्या आ.सु. मध्ये वाचला. तो वाचून काही स्पष्टीकरण करणे व काही विचार मांडणे आवश्यक वाटले म्हणून हा लेख.

अर्थव्यवस्थेच्या दोन प्रमुख पद्धती आहेत –
(१) भांडवलशाहीः – खाजगी उत्पादन, खाजगी व्यापार, मुक्त बाजारपेठेमध्ये मागणी व पुरवठा यांवर आधारित विनिमयाचा दर, खाजगी सेवा, उत्पादनक्षमतेचा विकास करून, कमी कमी किमतीत जास्तीत जास्त चांगली वस्तू किंवा सेवा पुरवण्याचा प्रयत्न करून, जास्तीत जास्त नफा किंवा पगार मिळवण्याची स्पर्धा करणे ही भांडवलशाहीची प्रमुख लक्षणे म्हणता येतील.

पुढे वाचा

अमेरिकेत आजचा सुधारक – (२)

बारा सप्टेंबरच्या त्या वाचकमेळ्यात सुधारक कसा वाढवता येईल याच्या अनेक सूचना पुढे आल्या. त्यांतली एक अशी की येथून आपण भारतातले वर्गणीदार प्रायोजित (स्पॉन्सर) करावे. फडणिसांच्या या सूचनेला डॉ. नरेन् तांबे (नॉर्थ कॅरोलिना) यांनी पुस्ती जोडली की व्यक्तीपेक्षा वाचनालयांना आजचा सुधारक प्रायोजित करा. सुनील देशमुखांनी कॉलेजची ग्रंथालये घ्या म्हटले – एक वर्षभर अंक प्रायोजित करून तेथे जावा. त्यातून संस्था, महाविद्यालये, व्यक्तिगत वाचक-ग्राहक मिळतील. मुळात प्रायोजित करण्याची योजना आजीव सदस्यतेची वर्गणी भरून करायची पण लाभार्थी संस्था दरवर्षी बदलत जायच्या अशी कल्पना.
ही कल्पना इतकी अफलातून ठरली की एकूण मिळालेल्या एक्याऐंशीपैकी तीस अमेरिकेतले आणि एक्कावन्न भारतातले प्रायोजित अशी विभागणी आज झाली आहे.

पुढे वाचा

अध्यात्म : एक प्रचंड गोंधळ

‘अध्यात्म’ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे ‘आत्मानं अधिकृत्य’, म्हणजे आत्म्याविषयी. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयी विचार.
‘आत्मा’ म्हणजे काय हा प्रश्न लगेच उद्भवतो.
पण ‘आत्मा’ या शब्दाची स्थिती मोठी चमत्कारिक आहे. तो सामान्य, दैनंदिन व्यवहारातील शब्द नाही. तो तत्त्वज्ञानातील शब्द आहे. सामान्य माणसे, विशेषतः खेड्यातील अशिक्षित माणसे आत्म्याविषयी कधी आपसात बोलत असतील असे म्हणता येत नाही. ‘आत्मा’ या शब्दाचा जवळजवळ संपूर्ण अर्थ त्याला अतिभौतिकीने (metaphysics) दिलेला आहे असे दिसते. एका अर्थी आत्मा म्हणजे ज्याला आपण ‘मी’ किंवा ‘अहं म्हणतो तो पदार्थ हे खरे आहे.

पुढे वाचा

भारतीयांची परदेशाकडे ओढ

….कोणाच्या अमेरिकेस जाण्याला आक्षेप घ्यायचे काहीच कारण नाही. योगक्षेमासाठी माणसे कोठेही जातात. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत सगळीकडे कोकण झाले आहे, ते आपल्याला अभिमान वाटावा असेच आहे. देशांच्या सीमा निरर्थक होत जाण्याच्या ह्या काळात आपल्या बौद्धिक बळाच्या जोरावर ही मराठी माणसे तेथे पराक्रमच गाजवत आहेत. पण मग विदेशी लोकांच्या सुरांत सूर मिसळून हिंदुस्थानाविषयी गैर बोलणे समजावून घेणे अवघड आहे. आपल्या सगळ्या भांडणा-तंटणासकट, वादविवादासकट, भ्रष्टाचार, झुंडीसकट आपला देश मला सुंदर वाटतो. पृथ्वीतलावर माणसाने वस्ती करण्यासाठी सगळ्यांत आदर्श असाच तो आहे. विदेशांत गेलेली आपली माणसे ह्या ना त्या प्रकारे ह्या देशाविषयी, लोकांविषयी प्रेमभावनाच प्रकट करीत असतात.

पुढे वाचा