सर्व समाज परप्रज्ञ व रूढिबद्ध बनल्यामुळे फार दिवसांच्या वहिवाटीने जातीजातींच्या गैरसोयी व दोष सर्वांच्या अंगवळणी पडत जाऊन त्यांचे त्याज्य स्वरूप कोणालाही दिसेनासे झाले आहे. रुपयाला दोन मणांची धारण होती अशा काळांत जन्मास आलेल्या तेहतीस कोटी देव-देवतांचे सण-उत्सव व कुलधर्म आणि अठरा पगड स्वधर्मी व परधर्मी भिक्षुकांचे हक्क सध्यांच्या काळीं चालविण्यांत आपण विनाकारण खोरीस येतों, आणि ऋण करून सण केल्याने पुण्य लाभत नाही, असे कोणाही हिंदूला वाटेनासे झाले आहे. जातिधर्म, कुलधर्म ह्यांनी निर्माण केलेल्या व अजूनही निर्माण करीत असलेल्या प्रतिषेधांनी तर एकंदर हिंदू समाजाला भंडावून सोडले आहे. त्यामुळे अनेक अडचणी सोसाव्या लागतात, आद्याची* तोंडबंदी होते, आणि ढोंगीपणा व लपंडाव वाढतात, हे . बहुजनसमाजाच्या मनांत सुद्धा येत नाही. महारमांगाखेरीज कोणत्याही जातीने वड, पिंपळ जाळता कामा नये, त्यामुळे वसवा* एकाला व सरपण दुस-याला अशी स्थिति होऊन महार, मांग, मुसलमान ह्यांना फुकटफाकट सरपण मिळते. ब्राह्मणाने स्नेह विकू नये ह्या आडकाठीमुळे घरीं खिल्लार असले तरी हा कोरडा राहतो.