मासिक संग्रह: एप्रिल, १९९९

संपादकीया

श्री. ढाकुलकरांनी स्वामी विवेकानंदांच्या वचनांचा उल्लेख करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् आणि स्टालिन ह्यांच्यातील संवादाचा आधार घेतला आहे. भाकरी ही परमेश्वराची शक्ती आहे आणि ती त्याच्या कृपेने ह्या जन्मात मिळते असे त्यांनी सूचित केले आहे. परमेश्वराच्या कृपेने मोक्ष मिळतो किंवा भाकरी त्याच्या कृपेशिवाय लाभत नाही असे स्वामी विवेकानंदांना वाटत होते. आम्हाला तसे वाटत नाही. ईश्वर नाही, मोक्ष नाही, आपले सर्व व्यवहार ह्या पृथ्वीतलावर घडतात; त्यांचा जमाखर्च परलोकात कोणीही ठेवत नाहीत असे आम्ही मानतो. मानवाच्या मनावर संस्कार करणा-या अनेक घटना त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत घडत असतात.

पुढे वाचा

संपादकीय

सारेच श्रद्धालु!
गेल्या महिन्याचे संपादकीय आणि स्फुट लेख वाचून दोन चांगली पत्रे आली. त्यांपैकी ज्या एका पत्रलेखकाला आपले नाव प्रकट करावयाचे नाही त्यांचे पत्र अन्यत्र प्रकाशित करीत आहोत. दुसरे पत्र ह्याच संपादकीयामध्ये पुढे येणार आहे. ह्या दुस-या पत्राच्या निमित्ताने आम्ही आमचे विचार मांडणार आहोत.
आम्ही वेळोवेळी जी संपादकीये आणि स्फुटलेख लिहितो त्यांतून आम्ही आम्हाला कळलेल्या विवेकवादाच्या दृष्टिकोनातून काही घटनांचा परामर्श घेत असतो. अशा आमच्या लेखनावर आमच्या वाचकांपैकी सगळ्यांनी आपली काही ना काही प्रतिक्रिया द्यावी अशी आमची इच्छा असते पण ती नेहमीच पूर्ण होत नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

जातिधर्म निरपेक्ष समुदाय निर्माण व्हावा
संपादक, आजचा सुधारक यांस,
मार्च ९९ च्या अंकातील चिंतामणी गद्रे लिखित जाति-धर्म-निरपेक्ष-विवाह-निर्धारदिन’ त्यातील विचार वाचले. त्यांच्या काही मुद्दयांशी मी सहमत आहे. मी १९७७ साली ग्रॅज्युएट झाले. माझ्या School Leaving Certificate मध्ये जातीचा कॉलम कोरा आहे. त्या जागी छोटी रेघ आहे. (अर्थात् आडनाव हा फॅक्टर जात ओळखण्यास आपल्याकडे फार मोठा आहे.)
हुंडा न देता साधेपणाने लग्न करीन एवढीच प्रथम इच्छा होती. नंतर नोकरी लागल्यावर जातपात कधीच न मानल्याने आंतरजातीय (अर्थात हाच वाक्प्रचार प्रचलित असल्याने) लग्न करीन. त्याची जात विचारण्याचा प्रश्नच झाला नाही.

पुढे वाचा

चर्चा

सत्य, विज्ञान आणि अध्यात्म
संपादक, आजचा सुधारक
आजचा सुधारक (फे. ९९) च्या अंकामध्ये डॉ. अनंत महाजन यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावरून खालील विचार सुचले.
‘सत्य’ म्हणजे खरे विधान असा अर्थ घेण्यास हरकत असू नये. अर्थात् ‘सत्य’ एकच नसून अनेक असू शकतात. संत्र्याचा आकार गोल आहे; त्याचा रंग पिवळा आहे, त्याची चव गोड आहे, त्यामध्ये फोडी असतात इ. अनेक ‘सत्ये’ संत्र्याशी निगडित आहेत. परंतु यांमध्ये संत्र्याला साल असते, ते खडबडीत असते इ. सत्याचा अंतर्भाव होत नाही. याच प्रकारे यांत्रिकीमध्ये कोणत्याही वस्तूचे वस्तुमान एका बिंदूत सामावलेले आहे, त्याला बिंदु-वस्तूमान म्हणतो त्यावेळी आपण abstraction करतो.

पुढे वाचा

स्फुट लेख : महागाई नाही – स्वस्ताई!

मागच्या अंकामध्ये महागाईवर एक लेख आम्ही प्रसिद्ध केला आहे. त्या लेखाच्या लेखिकेने प्रगट केलेल्या मतांशी आमचा काही बाबतीत मतभेद आहे. परंतु त्याविषयी आता जास्त न लिहिता एका निराळ्या नजरेने आर्थिक व्यवहारांकडे बघितल्यास वस्तु स्वस्त कश्या होत जातात ते सांगण्याचा इरादा आहे.
कोणतीही वस्तु प्राप्त करण्यासाठी माणसाला काही ना काही श्रम करावे लागतात. मागच्या अंकात सायकलचे उदाहरण दिले आहे. आणि कोणाचे किती उत्पादक श्रम सायकल विकत घेण्यासाठी खर्ची पडतात त्याचे कोष्टक पृ. ३६३ वर दिलेले आहे. पैशाच्या स्वरूपात सायकलची किंमत चुकती करण्यासाठी प्रत्येक माणसाला कमी-अधिक श्रम करावे लागतात हे खरे असले तरी सायकल विकत घेण्यासाठी कोणालाही पूर्वीपेक्षा अधिक श्रम करावे लागत नाहीत, हा मुद्दा आम्हाला आज स्पष्ट करावयाचा आहे.

पुढे वाचा

एकोणविसाव्या शतकातले एक विलोभनीय अद्भुत: डॉ. आनंदीबाई जोशी

काळ: एकोणिसाव्या शतकाचा तिसरा चरण. १८६५ च्या मार्च महिन्याची ३१ तारीख. त्यादिवशी कल्याण येथे एका मुलीचा जन्म झाला. नऊ वर्षांनी, १८७४ च्या मार्च महिन्याची पुन्हा तीच ३१ तारीख. त्या मुलीचा, नऊ वर्षांच्या घोडनवरीचा विवाह झाला. वर वधूपेक्षा फक्त २० वर्षांनी मोठा. बिजवर. आणखी नऊ वर्षांनी वयाच्या १८ व्या वर्षी ही ‘मुलगी उच्च शिक्षणासाठी, तेही वैद्यकीय, अमेरिकेच्या आगबोटीत बसली. एकटी. सोबतीला आप्त-स्वकीयच काय कोणी मराठी माणूसही नाही. ही घटना इ.स. १८८३ ची. तारीख ७ एप्रिल. त्या काळी नव्याने गुरु बनून बायकोला शिकविणे हा प्रकार दुर्मिळ असला तरी अद्भुत नव्हता.

पुढे वाचा

राजकारण – पाण्याचे

“राजकारण पाण्याचे” हा डॉ. सुधीर भोंगळे यांचा ग्रंथ हा त्या लेखकाच्या राज्यशास्त्रातील पीएचडी पदवीसाठी सादर केलेला प्रबंध आहे. या प्रबंधासाठी लेखकाने अनेक आधार वापरले आहेत. शासकीय व बिगरशासकीय कागदपत्रे, नियतकालिकांमधील लेख व वृत्ते, मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्तींशी झालेल्या चर्चा, असे अनेकविध आधार लेखक वापरतो. मुळात लेखक शिक्षणाने अर्थशास्त्रज्ञ व राज्यशास्त्रज्ञ आहे, आणि पेशाने शेतीविषयावर दृष्टी रोखणारा बहुपुरस्कृत पत्रकार आहे. म्हणजे उपलब्ध माहितीचा अन्वयार्थ लावण्यासाठीची सर्व सामग्री लेखकाजवळ आहे-न्यून असलेच तर थोडेसे स्थापत्यशास्त्राचे, त्यातही नदीविषयक यांत्रिकीचे ज्ञान जरा कमी आहे. पण यामुळे लेखनात फारसा कमकुवतपणा आलेला नाही.

पुढे वाचा

बाजारपेठ आणि लोकशाही

ए. डी. गोरवाला हे एक आज विसरले गेलेले पण आदरणीय मानावे असे नाव आहे. ते गेल्याला आता चौदा-पंधरा वर्षे झाली. आय.सी.एस. मधली उच्च पदे विभूषित करून निवृत्त झाल्यावर गोरवालांनी राजकीय-सामाजिक भाष्यकार म्हणून आपला काळ व्यतीत केला. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता निर्भीडपणे विश्लेषण आणि टीका करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
त्यांच्या टीकेचे एक महत्त्वाचे लक्ष्य अर्थातच शासन आणि शासनव्यवहार हे होते. सरकारी खाती व सरकारी औद्योगिक उपक्रम यांवर ते विशेष झणझणीत टीका करीत. प्रारंभी त्यांचे लेख टाइम्स ऑफ इंडियासारख्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत.

पुढे वाचा

जातीचे त्याज्य स्वरूप

सर्व समाज परप्रज्ञ व रूढिबद्ध बनल्यामुळे फार दिवसांच्या वहिवाटीने जातीजातींच्या गैरसोयी व दोष सर्वांच्या अंगवळणी पडत जाऊन त्यांचे त्याज्य स्वरूप कोणालाही दिसेनासे झाले आहे. रुपयाला दोन मणांची धारण होती अशा काळांत जन्मास आलेल्या तेहतीस कोटी देव-देवतांचे सण-उत्सव व कुलधर्म आणि अठरा पगड स्वधर्मी व परधर्मी भिक्षुकांचे हक्क सध्यांच्या काळीं चालविण्यांत आपण विनाकारण खोरीस येतों, आणि ऋण करून सण केल्याने पुण्य लाभत नाही, असे कोणाही हिंदूला वाटेनासे झाले आहे. जातिधर्म, कुलधर्म ह्यांनी निर्माण केलेल्या व अजूनही निर्माण करीत असलेल्या प्रतिषेधांनी तर एकंदर हिंदू समाजाला भंडावून सोडले आहे.

पुढे वाचा