चालू महिन्यात जिची दखल घ्यावयालाच पाहिजे अशी जी एक घटना आहे ती ओरिसातल्या एका मिशनन्याच्या क्रूर हत्येची. दोन निरागस, ‘मासूम बच्च्यांसोबत केलेल्या एका शुद्धाशयाच्या निघृण वधाची. हा वध कोणी आणि कशासाठी केला हे नक्की माहीत नसले तरी तो धर्मज्वरातून झाला असण्याची शक्यता आहे.
धर्म एकीकडे मानवाची श्रेष्ठ कर्तव्ये कोणती हे सांगणारा असला तरी दुसरीकडे त्याचाच उपयोग पापभीरूंकडून अमानुष कृत्ये घडवून घेण्यासाठी करता येतो; एकदा का धर्मज्वर चढला, माणूस धर्ममदाने उन्मत्त झाला, की त्यांच्या भरात त्याची नृशंस कृत्यांची लाज नाहीशी होते हे धर्माचार्यांना चांगले माहीत आहे आणि धर्माचा तसा उपयोग करून घेण्यात त्यांना संकोच वाटत नाही. ह्याचे दाखले इतिहासात हवे तितके आहेत. पण ह्या महिन्यात, १९९९ च्या आरंभी पुन्हा त्या सत्याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे की काय अशी शंका घ्यावयाला जागा आहे. एखाद्या भेकड माणसाने सुपारी देऊन आपल्या प्रतिस्पध्र्यांचा खून करावा तसाच हा प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी केलेला धर्मज्वर वाढविण्याचा प्रकार आहे. कोणाला सुपारी देणे आणि धर्मज्वर चढविणे ह्यांत आम्हाला तत्त्वतः काही अंतर दिसत नाही. पण ते असो. मुद्दा तेवढाच नाही. मुद्दा धर्मान्तरामुळेच माणूस राष्ट्रनिष्ठेला मुकतो काय हा आहे.
आपल्या प्रजेचे धर्मान्तर का होऊ द्यावयाचे नाही, हिंदुत्वनिष्ठा कशासाठी तर आमच्या आर्यावर्ताच्या ठिकाणी आमची भक्ती कायम राहावी म्हणून. अन्यथा हिंदुधर्म फार उदार आहे. तो इतका विशाल आहे, इतका सहिष्णु आहे की त्याच्या अनुयायांच्या आचारांत कितीही फरक पडला, परस्परविरोध असला तरी त्याचे काहीच बिघडत नाही. एकाच निर्गुण निराकार देवाची इबादत मान्य असण्यासाठी तो काय एखादा किताबी मजहब आहे ? मुळीच नाही. आपल्या ह्या पवित्र पितृभूमीमध्ये जन्मलेल्यांनी ह्या भूमीच्या पलीकडे, म्हणजे त्या दुर्लंघनीय अशा समुद्राच्या वा पर्वतरांगांच्या पलीकडे आपली दैवते, आपले मसीहा, आपले पैगंबर आहेत अथवा होऊन गेले असे समजू नये, त्यांच्या मनांचे परकीयीकरण (alienation) होऊ नये एवढ्यासाठी हिंदुत्वाचा संस्कार येथल्या आबालवृद्धांवर करण्याची गरज हिंदुत्वनिष्ठांना वाटते! पण आम्हाला प्रश्न पडतो तो ह्याच ठिकाणी.
आमच्या परिचयाचे एक कुटुंब आहे. कुटुंबात एखादी चांगली घटना घडली की त्या कुटुंबाचे तरुण सदस्य तिरुपतीला जाऊन, श्रीबालाजीच्या कृपाप्रसादाचे ते लक्षण आहे असे समजून, तेथे क्षौर करून येत असत. अशा त्या कुटुंबातली ती तरूण धार्मिक मुले आता परदेशवासी झाली आहेत. आपले सर्व बुद्धिकौशल्य त्या मुलांनी अमेरिकेच्या चरणी वाहिले आहे. ती मुले पुन्हा भारतात परतण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांचे आईबाप अधूनमधून मुलांच्याकडे जाऊन राहून येतात आणि आल्यानंतर त्या देशाचे गुणगान करीत असतात.
आणखी एक वृत्तीने धार्मिक असलेले आमच्या परिचयाचे कुटुंब तिकडेच स्थायिक झाले आहे. मुळात धनवान् असलेले आता धनाढ्य झाले आहे. आपल्या मुलांचे जन्म ह्या आपल्या दरिद्री देशात होऊ न देता त्या संपन्न भूमीवर व्हावेत असा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे आम्हाला माहीत आहे. वर्षातून एकदा तरी भारतीय भूप्रदेशात असलेल्या आपल्या उपास्यदेवतेचा उत्सव करून पुन्हा परदेशी परतण्याचा त्यांचा प्रघात आहे.
दोनही कुटुंबांमध्ये देवाविषयीची आस्था जशी मुलांमध्ये निर्माण केली गेली आहे, त्यांच्या मनांत रुजविली आहे तशीच ती त्या परक्या भूमीविषयीसुद्धा. लहानपणापासून ‘तुम्हाला पुढे अमेरिकेचे नागरिक व्हावयाचे आहे’ अथवा ‘तुम्ही भारताचे नागरिक नाही, अमेरिकेचे आहात’ असे संस्कार त्या मुलांच्या मनांवर होतील अशी खबरदारी घेण्यात आली आहे असे आम्हा त्रयस्थांना वाटते.
आम्ही, सहिष्णुतेचा टेंभा मिरविणारे हिंदु-‘धर्मबाह्य वर्तन करणा-यांचा छळ करणा-यांच्या, काळ्यागोत्यांमध्ये भेदभाव करणान्यांच्या, त्यांनी पादाक्रान्त केलेल्या भूमीवरच्या मूळ रहिवाशांवर अनन्वित अत्याचार ज्यांनी केले त्यांच्या देशात जाऊन राहतो, त्यांच्या संस्कृतीशी एकरूप होतो तेव्हा आम्हाला आमच्या स्वतःच्या स्वभावतः सहिष्णु असलेल्या धर्माविषयी कितपत आस्था आहे असा प्रश्न प्रस्तुत लेखकाला पडतो. अशा अमेरिकेकडे डोळे लावून बसलेल्यांच्या (केवळ मुलांच्या नव्हे तर आईबापांच्या सुद्धा) मनाचे परकीयीकरण पूर्णत्वास गेले आहे आणि ते सुद्धा धर्मान्तरण न करता असे आमच्या लक्षात येते. मनाचे परकीयीकरण होण्यासाठी धर्मान्तरणाची गरज नाही, उलट स्वतःला धार्मिक म्हणवत राहून परदेशनिष्ठा बाणविता येते हेच उपर्युक्त उदाहरणांवरून सिद्ध होते. येथल्या देवदेवतांवरची श्रद्धा त्यांचे परकीयीकरण रोखू शकलेली नाही. धर्माभिमानही नाही.
येथे फक्त दोन उदाहरणांचा उल्लेख केला आहे. पण गुजरातमधून, पंजाबमधून जे लक्षावधी हिंदू हलकीसलकी म्हणविणारी कामे करण्यासाठी परदेशांत गेले आहेत ते वेगळे नाहीत. त्यांनी धर्मान्तरण केलेले नाही. आपल्या जन्मभूमीपेक्षा तो ‘परदेश त्यांना निकटचा वाटतो ह्यामध्ये संशय नाही.
आमचा अशा मंडळींच्या पदेशगमनाला विरोध नाही. धर्मान्तराला विरोध करण्यासाठी अशी कारणे जे सांगतात त्या कारणांचा फोलपणा आम्हाला त्यांच्या पदरात घालावयाचा आहे. कोणत्याही धर्माच्या अनुयायाला आपल्या जन्मभूमीवर प्रेम करता येते किंवा धर्म बदलल्यामुळेच प्रेम ताबडतोब उडते असे नाही; धर्माचा आणि देशप्रेमाचा, देशभक्तीचा संबंध असलाच तर अत्यन्त क्षीण आहे एवढाच मुद्दा आम्हाला मांडावयाचा आहे.
कोणालाच धर्मान्तरण करण्याची गरज वाटू नये ह्यासाठी आपल्या देशाची आर्थिक आणि सामाजिक घडी बदलण्याची आवश्यकता आहे. सहिष्णुतेचे आणि समरसतेचे नुसते पवाडे गाण्याऐवजी समानतेकडे, सामाजिक न्यायाकडे सत्वर वाटचाल करण्याची गरज आहे. आध्यात्मिक गरजेसाठी कोणी धर्मांतरण करतो म्हटले तर ते कोणालाच रोखता येणार नाही. कोणा परदेशी माणसाने आपल्या मनाच्या शान्तीसाठी मी हिंद होतो’ असे म्हटले तर ‘आपले सरकार त्याला आज नाही म्हणू शकणार नाही. ज्या कारणांसाठी अहिंदूला हिंदु होण्याला हरकत घेता येणार नाही त्याच कारणांसाठी हिंदूला अहिंदु होण्यास हरकत घेता येणार नाही. मात्र कोणत्याही धर्माविषयीचा गर्व पुढेमागे धर्मज्वराला आमंत्रण देत असल्यामुळे तो त्याज्यच आहे, किंबहुना धर्मच नको.