चर्चा -श्री. महाजन ह्यांच्या लेखाच्या निमित्ताने

(१)’सत्य’ स्थलकालनिरपेक्ष असते काय?
माणसांना विज्ञानाच्या अभ्यासातून जाणवणारे सत्याचे स्वरूप बदलत जाणारे आहे. पण ह्यावरून खुद्द ‘सत्य’ बदलत जाणारे आहे किंवा नाही यावर काहीच प्रकाश पडत नाही. अखेर माणसे त्यांना जाणवणारी सत्ये सांगतात, ती केवळ वेगवेगळ्या रूपकांच्याद्वारे — models किंवा allegories च्या माध्यमातून. अशी रूपके बदलतात, असे विज्ञानाच्या इतिहासातून दिसते.
विज्ञानातील रूपके मान्य होण्यासाठी त्या रूपकांनी काही क्षेत्रांतल्या काही घटनांचा सुसंगत अर्थ लावायला हवा. जर या रूपकांच्या वापराने काही भाकिते वर्तवता आली, तर उत्तमच. श्री. महाजन अशा तीन रूपकांची उदाहरणे तपासतात (न्यूटनीय भौतिकी, सापेक्षतावाद आणि पुंजवाद). ह्यांतले प्रत्येक रूपक आधीच्या रूपकांपेक्षा जास्त विस्तृत क्षेत्रातल्या जास्त नैसर्गिक घटनांना सार्थ ठरवणारे आहे. त्यांच्या वापरातून जास्त भाकितेही वर्तवता आली आहेत. – पण बदलत आहेत ती रूपके, किंवा माणसांच्या जाणिवा. ज्या ‘सत्याची जाणीव येथे अभिप्रेत आहे, त्या सत्यात बदल होतात की नाही, हे कळत नाही.
(२)ह्या जाणिवा किंवा ही रूपके आता जास्तजास्त तांत्रिक, जास्तजास्त गणिती रूपात मांडली जातात. अर्थातच ही रूपके समजायला तंत्राचे गणिताचे ज्ञान लागते. ‘कोणीही ती रूपके समजावून घेईल’, हे आजच्या रूपकांबद्दल शक्य नाही.
पण कोणते रूपक समजायला कोणते आणि किती ज्ञान हवे, हे विज्ञानाच्या क्षेत्रात स्पष्ट करता येते – जसे, न्यूटनीय रूपक समजावयाला ‘अमुक’ गणित शाखा आवश्यक असतात; सापेक्षतावाद समजावयाला वेगळ्याही ‘तमुक’ गणित-शाखा लागतात – वगैरे. बरे, कोणत्या क्षेत्रांत या दोन रूपकांच्या भाकितांमध्ये फारसा फरक नसतो, हेही सांगता येते. (मी पेशाने ‘अभियंता’ आहे. माझ्या क्षेत्रात न्यूटन पुरेसा आहे – सापेक्षतावादाची गरज नाही).
येथे व्यवहाराचे क्षेत्र (domain) आणि त्यासाठी पुरेशा’ रूपकाचे क्षेत्र या दोन्ही बाबी ठरवता येतात. कोणते जास्त नेमके रूपक गरजेचे नाही, हेही ठरवता येते. व्यवहारी वागण्यात हा मोठाच ‘दिलासा’ आहे.
(३)काही रूपके एकमेकांना ‘काट मारत’ जातात – जसे इलेक्ट्रॉनला कण मानणारे एक रूपक आहे, आणि तरंग मानणारे दुसरे एक रूपक आहे. दोन्ही रूपके काही प्रयोगांच्या उत्तरांना सार्थ ठरवतात. दोन्ही रूपके काही भाकिते बिनचूकपणे वर्तवतात. पण इलेक्ट्रॉन कणही आहे आणि त्याचवेळी तरंगही आहे, हे शक्य नाही. निसर्गनियमातच व्याघात आहे
काय?
एक म्हणजे एखादी प्रायोगिक रचना जर इलेक्ट्रॉनला कण ठरवीत असेल, तर तीच रचना त्याला तरंग ‘ठरवीत नाही. (हे मी वाचलेलेच फक्त आहे. मी या विषयात तज्ज्ञ नाही. पण “कणतरंगद्वैताबद्दल अनेक ढगळ आणि चुकीची विधाने केली जातात – जसे, निरीक्षक कोण आहे त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन कण आहे की तरंग हे बदलू शकते !” असे शेरे । अधिकारी व्यक्तींच्या लेखनात मी वाचलेले आहेत.)
येथे कण-रूपक आणि तरंग-रूपक ह्यांची क्षेत्रे नीटशी ठरलेली नसावी, असे मला वाटते. जरा पोरकट उदाहरणाने हे स्पष्ट करायचा प्रयत्न करतो. ‘रुपयाचे नाणे’ हे आर्थिक दृष्टीने चलन’ (currency) आहे. स्वयंचलित’ टेलिफोन किंवा वजन करायचे यंत्र, यांच्या दृष्टीने मात्र रुपयाचे नाणे हे विद्युद्वहनाचे वलय पूर्ण करणारा धातूचा तुकडाच केवळ आहे. म्हणून अशा यंत्रांमध्ये रुपयाची नोट चालत नाही. उलट नाण्याच्याच मापांचा’ धातूचा तुकडा या यंत्रांमध्ये चालतो’ – पण अशा तुकड्यांनी मिरची-कोथिंबीर विकत घेता येत नाही.
येथे चलन–धातूचा तुकडा ह्या अर्थाची क्षेत्रे स्पष्टपणे वेगळी आहेत. तसे (आज) इलेक्ट्रॉन कण आहे असे मानण्याचे क्षेत्र ह्यांना ‘सोडवता आलेले नाही. (हे सारेच fools rush in where angels fear to tread ह्यांतले विचार असतील. श्री. महाजनांना मी ही ‘डिफिकल्टी’ विचारत आहे, असे समजावे.)
पण विज्ञानात आज व्याघाती वाटणारी रूपके पुढे सुसंगत होतील, अशी आशा नेहेमीच असते. नवे, व्याघात टाळणारे रूपक सापडेल, अशीही आशा असते. आजवर (आणि अमुक क्षेत्रात) उपयुक्त ठरलेले रूपक’ एवढेच स्थान (status) निसर्गनियमांना देता येते. हा तात्पुरतेपणा विज्ञानात नेहेमीच असतो.
(४)पण यावर उतारा म्हणून प्रत्येक सुचलेल्या निसर्गनियमाला (रूपकाला) सतत तपासले जात असते. आणि या तपासाला आवश्यक असलेले ज्ञान बाळगणा-या कोणालाही असा तपास करून रूपकाची ग्राह्याग्राह्यता ठरवायची मुभा असते – नव्हे, हे अपेक्षितच असते. या तपासातून रूपके व ती कुठे लागू पडतात याची क्षेत्रे सतत रेखली जात असतात.
वरील सर्व श्री. महाजनांच्याच लेखाचे पुनर्लेखन (paraphrase) आहे, पण कोणते अंग ‘ठसवून’ मांडायचे यात फरक पडलेला आहे.
आता प्रश्न आहे समाजधारणेसाठी पूर्वीच्या विचारवंतांनी घालून दिलेल्या नियमांचा ज्यांच्या रूपांमध्ये कधीकधी व्याघातही असतात, अशा नियमांच्या वापराचा.
ह्या नियमांपर्यंत पोचायला कोणत्या ज्ञानाच्या वाटा चोखाळाव्या लागतात, हे बहुतेक वेळा स्पष्ट केले जात नाही. जेथे अशा वाटा (योगासने, नामस्मरण) आखून दिल्या जातात. तेथे त्या वाटांवर चालायला गुरू लागतात. कोठेकोठे तर त्या वाटांवर शरीराला, मनाला ताण देऊन आत्मसंमोहनासारख्या स्थितीही ‘आणल्या जाताना दिसतात. विवेक-तर्क यांना जाणूनबुजून निलंबित (suspension of reason and logic) करायची आवश्यकता असते. शिष्याने गुरूचे म्हणणे न तपासता मानावे लागते. जर या ज्ञानाबद्दल शंका व्यक्त केल्या, तर ‘तुझी अजून पुरेशी तयारी झालेली नाही’ (मडके अजून कच्चेच आहे), हे उत्तर तेथे चालते.
या ज्ञानाबाबतची रूपके तपासली जाताना, अनुभवाशी फटकून वागणारी असली तर बदलली जाताना दिसत नाहीत.
व्याघात पचवताही येतील, जर मूळ रूपकांची मांडणी स्वच्छ, आकलनीय रूपात केली गेली तर. अगदी कर्मविपाक-पुनर्जन्म आणि कयामत-का-दिन, यांनाही पचवता येईल- जर दोन्हींमधले विवेकाचे निलंबन टाळता आले, तर, ‘विवेकवादी’ हे बिरूद बाळगणारे विवेकाचा आग्रह धरणारच.
अखेर विवेकातून घडलेले विज्ञान जर दैनंदिन आयुष्य सुखकर करणारे तंत्रज्ञान पुरवते, तर विवेकावर भर देणेच योग्य ठरणार. आणि याचाच व्यत्यास म्हणजे विवेकाचे निलंबन अनिष्ट वाटणार.
असे आजवर श्रद्धेवर आधारलेल्या मानवी मनाच्या पापुद्याआडच्या तत्त्वांनी काही ‘दिले आहे का? जर ते तत्त्व समजायला प्रत्येकालाच बहुतांश आयुष्य गुरूचा हात धरून साधनेची वाट चालतच घालवायचे असेल तर हा सौदा’ फार महागाचा आहे.
निखळ वैज्ञानिक दृष्टीने हा प्रयोग करावा, हा मनाच्या खुलेपणाला (token) मुजरा झाला. खरेच ते करणारे संख्येने नगण्यच असणार.
इतरांसाठी विवेकाला पर्याय काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.