कलियुग म्हणजे मानवी अधःपाताची शेवटची पायरी असा प्रचार करण्यात पुराणांचा हेतु स्पष्टच आहे. पुरोहित ब्राह्मणांना अनुकूल असलेली समाजव्यवस्था सुवर्णयुगाची असे निश्चित झाले म्हणजे त्यात प्रत्यक्षात दिसून येणारी सर्व स्थित्यंतरे कलियुगातील अवनतिसूचक आहेत असे ओघानेच ठरते. विशेषतः जैन, बौद्ध वगैरे पाखंडांनी नवे आचारविचार, नव्या ईर्षा समाजात उत्पन्न केल्या. त्यांचा निराळा निषेध करण्याचे प्रयोजनच उरत नाही. ज्या पातकांच्या भारामुळे पृथ्वी कलियुगात दबून जाते ती पातके व्यासाची भविष्यवाणी म्हणून पुराणांत वर्णिलेली आहेत. त्या पातकांचे निरीक्षण केले म्हणजे पुरोहितवर्गास विशेष भय कसले वाटत होते ते स्पष्ट होते. व्यासाची भविष्यवाणी जी संकटे येणार म्हणून इषारा देते ती अशी आहेत : वर्ण आणि आश्रम ह्या समाजव्यवस्थेचा त्याग होईल. ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाचा इतर जाती इन्कार करतील. शूद्र वेद, अर्थशास्त्रे ह्यांचे अध्ययन सुरू करतील. स्त्रियांचे लैंगिक पावित्र्य बिघडेल. भोजन, व्यवसाय, विवाह ह्यासंबंधीची बंधने पाळली जाणार नाहीत. सर्व वर्ण किंबहुना स्त्रियादेखील संन्यासाची दीक्षा बळकावतील. सारांश, शूद्रप्रायास्तथा वर्णा भविष्यन्ति कलौ युगे.’ कलियुगात घडून येणा-या अनन्वित पापांच्या याद्या मूळ पुराणांतच वाचून पाहणे योग्य होईल.