औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाची प्रगती, भांडवली अर्थव्यवस्थेचा रेटा यांमुळे उत्पादनांच्या साधनांचे ध्रुवीकरण झाले असून या आर्थिक चक्रात माणसे अधिकाधिक गुरफटत आहेत, त्यांची कुटुंबे भरडली जात आहेत असे मानून त्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांचे जीवनमान कसे आहे, जगण्याची पद्धत कशी आहे, हे शोधण्याचा प्रयत्न चिं. मो. पंडित यांनी केला आहे.
त्यासाठी त्यांनी एक सर्वेक्षण करावयाचे ठरवले असून त्यासाठीची प्रश्नावली खाली देण्यात आली आहे. वाचकांनी सर्वेक्षणाची ही प्रश्नावली भरून चिं. मो. पंडित यांना पाठवावी ही विनंती. – सं.
दुस-या महायुद्धानंतर जगभर स्वातंत्र्याची आणि समाजवादी लोकशाहीची एक लाटच आली. अनेक देश राष्ट्रीयदृष्ट्या स्वतंत्र झाले किंवा साम्यवादाच्या (समाजसत्तावादाच्या) एकछत्री अंमलाखाली आले. (उदा. रशिया व त्याची अंकित राष्ट्रे) राजकीय विचारप्रणाली काहीही असली तरी उत्पादनाची पद्धत आणि जीवनाच्या संकल्पना एकच राहिल्या. त्या अशा
१. यांत्रिकीकरणातून प्रचंड प्रमाणावर उत्पादन करणे. यात शेतीचाही अंतर्भाव आला.
२. सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणच्या निसर्गसाधनांचा उपभोगासाठी वापर करणे, (मुंबईने शहापूर तालुक्याचे पाणी वापरणे, अमेरिकेने मलेशियाची जंगले तोडणे, उत्तर प्रदेशाने मध्यपूर्वेचे तेल आणणे, इंग्लंडने आसामचा चहा पिणे…)
या सर्वांचे दोन परिणाम झाले. माणसाच्या फावल्या वेळात आणि फुरसतीत वाढ झाली. समाजात अनेक लोक वेळच वेळ असलेले निर्माण झाले. तसेच बेकारही निर्माण झाले. त्यातून रोजगार निर्मितीच्या आघाडीवर ‘सेवा-विभाग’ निर्माण झाला. पूर्वी राजेरजवाडे, सरदारदरकदार, सावकार सोडले तर ९० टक्के जनता शेतीकामात गुंतलेली असे. माणसे बरीचशी कामे आपली आपणच करत. आज अमेरिकेत फक्त ६-७ टक्के लोकसंख्या शेतीकामात व्यस्त आहे आणि तरीही अमेरिका अन्नधान्य आणि शेतीमाल मोठ्या प्रमाणावर निर्यात करते. मात्र सेवा-विभागात त्यांची १८ ते २० टक्के जनता गुंतलेली आहे.
प्रचंड उत्पादनाचा एक विशेष म्हणजे ते भांडवली गुंतवणुकीवर आधारित असते. मग ही गुंतवणूक खाजगी असो नाहीतर सरकारी असो. मोठेमोठे कारखाने, प्रचंड यंत्रसामुग्री, पाणी आणि ऊर्जा यांचा सढळ वापर, व्यवस्थापक वर्ग–यंत्रावर काम करणारा मजूर-विक्री करणारा विक्रेतावर्ग तसेच सर्वदूर पसरलेली वितरणव्यवस्था (यात वाहतुकीचा अंतर्भाव आला) आणि खेळते भांडवल ही याची प्रमुख लक्षणे आहेत.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच उत्पादन जास्त जास्त प्रमाणावर स्वयंचलित यंत्रांकडून व्हायला लागले. माणसे उत्पादक रोजंदारीतून बाहेर फेकली जाऊ लागली. ‘नफा’ हा एकमेव निकष या व्यवस्थेत आला. अर्थव्यवस्था मुद्राभिमुख व्हायला लागली. ज्याच्या हातात चार टिकल्या असतील तोच काही खरेदी करणार, काही कसब शिकून घेतले असेल तोच रोजगार मिळवणार. म्हणजे त्याच्याच हातात खरेदीचे साधन असलेला पैसा असणार. यातून माणूस हा ‘विकाऊ वस्तू बनला. त्याला चढाओढीच्या बाजारात उभे राहून आपले मोल ठरवून घ्यावे लागले. प्रत्येक सक्षमाला काम (जगण्याचा हक्क) मिळालेच पाहिजे हा मूलभूत हक्क कागदावरच राहिला. प्रत्यक्षात मजुरांच्या बाजारपेठाच परिणामकारक ठरू लागल्या. आता तर या मुद्रांचा, चलनांचाही मोठा व्यापार होतो.
सारांश : प्रचंड उत्पादन आणि सर्वंकष उपभोग हीच आजच्या मानवसमाजाची विकासाची व्याख्या झाली आहे. आणि प्रत्येकाची आकांक्षा ठरली आहे. जसजसा काळ जाऊ लागला तसतसे लक्षात येऊ लागले की या व्यवस्थेतून समाजांतर्गत विषमता फार वाढते. जास्तीत जास्त आणि कमीत कमी व्यक्तिगत उत्पन्नाचे प्रमाण ५००:१ असेसुद्धा होऊ लागले. यात अर्थातच अंबानी, मार्कोस, किंवा बेरोजगार यांचा समावेश नाही. नाहीतर प्रमाण अगणित : शून्य असे होईल. एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढू लागली तर दुसरीकडे उत्पादनांच्या साधनांचे ध्रुवीकरण होऊ लागले. दोघांचा एकत्रित परिणाम म्हणजे माणसे जगण्याच्या मूलभूत हक्कापासूनच वंचित व्हावयाला लागली. यातून विकासाच्या या प्रतिमानाविषयीचा पहिला उत्साह ओसरू लागला. ‘पर्यायी विकासाची चर्चा पुढे येऊ लागली. राजकीय, आर्थिक तोडग्यांचा शोध सुरू झाला.
मात्र या पार्श्वभूमीवर वैयक्तिक जीवनशैली, जीवनमान याविषयी कोणी फारसे बोलत नाही. आपण हे सर्व जाणताच. एकदा प्रामाणिकपणे आपणच आपली तपासणी करू या का? समाजातील आघाडीचे लोक जे करतात, आचरतात (बोलतात नव्हे) तेच सामान्यजन करू पाहतात.
कृपया पुढील प्रश्नावली निःसंदिग्धपणे, प्रामाणिकपणे भरून पाठवावी.
प्रश्नावली
१. स्वयंपाकघरात अनुक्रमे कशाला प्राधान्य द्याल? (या प्रश्नाची उत्तरे घरातल्या स्त्रियांनीही द्यावीत.)
अ. निर्धूर कार्यक्षम चूल
कोळशाची किंवा भुशाची शेगडी
रॉकेलचा स्टोव
गॅसची शेगडी, बायोगॅस.
ब. पाटा वरवंटा
विळी सुन्या
मिक्सर, ग्राईंडर
मायक्रोवेव्ह
क. अॅल्युमिनियमची, स्टेनलेस स्टीलची, नॉनस्टिक भांडी
ड. साधा कुकर, प्रेशर कुकर, सोलर कुकर
इ. खाद्य पदार्थ तयार की घरी केलेले? (मसाले, पापड, लोणची)
– मधल्या वेळचे खाणे घरचे की विकतचे? (चिवडा, लाडू)
– फळे व भाज्या स्थानिक पिकणा-या की बाहेरून आलेल्या, मोसमाप्रमाणे की मोसम सोडून देखील?
२.घरात काय काय हवे?
टेबल, खुर्त्या : लाकडी, लोखंडी/संदिग्ध
दारे खिडक्या : लाकडी, लोखंडी, अॅल्युमिनियम,
सिंटेक्ससारखी/संदिग्ध
३.यापैकी काय नसेल तर चालेल?
फ्रिज, रेडिओ, टी. व्ही., टेप रेकॉर्डर, साऊंड सिस्टिम, व्ही. सी. आर. / की सर्व हवे ? सार्वजनिक चालतील? कपाळावर अठी.
४.प्रवास व वाहनप्रकार कोणता आवडेल?
* रोजचा प्रवास : स्वतःचे वाहन—सायकल, स्कूटर, मोटार, सार्वजनिक वाहतूक मोटार. शक्यतो नको.
* नैमित्तिक प्रवास : स्वतःचे वाहन, सार्वजनिक वाहतूक, (बस, रेल्वे, विमान) सार्वजनिकला पर्याय नाही म्हणून?
५.संपर्कासाठी काय काय हवे? खाजगी, सार्वजनिक
* टपाल सेवा, कुरिअर सेवा.
* टेलिफोन : साधा, I.S.D., S.T.D., Fax, Telex, E-Mail? सर्व काही?
६. मुलांच्या शिक्षणावर वार्षिक खर्च किती होतो ? शाळा कॉलेजची फिया, पुस्तके,
युनिफॉर्म सोडून.
उदा. खेळ, व्यायामशाळा, पुस्तके, कला (संगीत, ड्रॉईंग) सहली, कपडालत्ता.
७. घरात –
* कपडालत्ता, सौंदर्यप्रसाधने, दंतमंजन, साबण… किती खर्च होतो.
* वाचनीय पुस्तके, वर्तमानपत्रे मासिके….किती खर्च होतो?
८.पर्यावरणाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन –
* पाठकोरे कागद वापरता का? होय /नाही/कधीतरी
* जुनी पाकिटे वापरता का? होय/नाही/कधीतरी
* Back to Back Xerox घेता का? होय/नाही
* प्लास्टिक कॅरी बॅग्ज, पॅकिंग्ज इ. चा वापर टाळता का/मुद्दाम नाही
* दैनिक वृत्तपत्राऐवजी फक्त साप्ताहिक आवृत्ती चालेल का? होय/नाही/कधीतरी
(बातम्या आकाशवाणी, दूरदर्शनवर मिळतातच.)
९.. अ. सर्वोच्च वेतन व किमान वेतन यांचे कोणते प्रमाण समाजात असावे?
१०:१, १५:१, २०:१, ५०:१, १००:१ / विचारच केला नाही.
(वेतनात LTA, सदनिकाभाडे, दूरध्वनी, हॉटेलखर्च अशा सर्व सोयीसवलतींचा बाजारभावाने समावेश करावा.)
ब. वेतनाच्या किती टक्के निवृत्तिवेतन असावे?
३५% ते ९५% / विचारच केला नाही.
• हे निवृत्तिवेतन किती वर्षे मिळावे?
आजीव, २० वर्षे, १५ वर्षे, नोकरीच्या वर्षाच्या ५० टक्के वर्षे/शेवटपर्यंत.
क. स्वतंत्र व्यवसाय करणारांना (हातगाडीवाले, छोटी वर्कशॉप्स, वकील, डॉक्टर्स,
अभियंते, भाजी विक्रेते,) निवृत्तिवेतन मिळावे का? किती मिळावे ? की नुसताच महागाई भत्ता, प्रवास भत्ता, औषधाचा भत्ता मिळावा-त्यांनी शिल्लक टाकलेल्या पैशाची क्रयशक्ती कमी होत जाणार म्हणून. शेतमजूर, बांधकाममजूर
यांचे काय? खुद्द शेतक-यांचे काय ? की विचारच डोक्यात आला नाही?
१०. आजचेच विकासाचे प्रतिमान असो अथवा बदलून पर्यायी विकासाचे प्रतिमान असो
आपले आजचे राहणीमान ५ वर्षांसाठी गोठवून घ्यायला तयार व्हाल का? म्हणजे पैसा, साधन संपत्तीचा ओघ गरिबांकडे वळविता येईल? १ ते ५ सध्या काय वापरता तेही लिहावे.
(ही प्रश्नावली खालील पत्त्यावर पाठवावी.)