श्री. श्याम कुलकर्णी ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने निसर्गावर विजय मिळविणे हा विज्ञानाचा हेतु नाही

आमचे मित्र श्री. श्याम कुलकर्णी ह्यांचे अनेक दिवसांनतर एक पत्र आले आहे. ते शब्दशः खाली देत आहोत. त्यांच्या पत्राच्या निमित्ताने विवेकवादाच्या काही पैलूंवर पुन्हा
आणि थोडा अधिक स्पष्ट प्रकाश आम्हाला टाकता येईल अशी आशा आहे.]
नियति नव्हे तर दैवगती
‘पुन्हा एकदा नियतिवाद’ या सप्टेंबर १९९८ च्या ‘आजचा सुधारक’ मधील लेखात नियति हा शब्द अयोग्य आहे असे लेखकाचे मत असल्यास त्यास दैवगती हा शब्द वापरता येईल परंतु विश्वातील सर्व घटना नियमबद्ध आहेत असेही म्हणता येत नाही. विज्ञान हे पूर्णपणे नियमबद्ध आहे असे आपण समजतो तरी सर्व वैज्ञानिक सिद्धान्त आदर्श अटी पूर्ण झाल्यासच सिद्ध होतात व त्या आदर्श अटी पूर्ण करणे बरेच वेळा अशक्य कोटीतील असते. त्यामुळे सापेक्षतेविषयीचा आइन्स्टाइनचा सिद्धान्त प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होण्यास अनेक वर्षे जाऊ द्यावी लागली. Heisenberg’s Principle of Uncertainity अनुसार तर अणूची स्थिति पाहावयाच्या सूक्ष्मदर्शकामुळेच ती (स्थिती) बदलण्याची शक्यता असते त्यामुळे अणूची खरी जागा शोधणेही कठीण असते. त्यातही माणूस वा इतर प्राणी यांच्या वागण्यात नियमबद्धता नसल्यामुळे त्यामुळे होणा-या घटना नियमबद्ध असण्यापेक्षा दैवगतिबद्धच असण्याची शक्यता अधिक.
कर्णासारख्या ‘मदायत्तं तु पौरुष’ म्हणणान्यास ‘दैवायत्तं कुले जन्म’ हे मान्यच करावे लागले.
प्रत्येक घटना ही कार्यकारणसंबंधानुसार घडते हे जरी मान्य केले तरी विश्वातील घटनांवर अनंत कारणे कार्य करीत असतात. त्यांपैकी ९९% कारणांची मानवी बुद्धीस कल्पनाच नसते त्यामुळे त्यांवर नियंत्रण करून होणारा परिणाम टाळणे किंवा बदलणे माणसाच्या कुवतीच्या बाहेरचे असते. त्यामुळे ब-याच गोष्टी घडण्यास दैव वा नशीब हे उत्तर द्यावे लागते व ‘पराधीन आहे जगती…’ हे मान्य करावे लागते.
माणूस केव्हातरी मरणार आहे हे निसर्गनियमांनी ठरते हे ठीक. तरीहि फ्लो ज्यो सारखी अॅथलेट वयाच्या तिशीत तर आगरकर, विवेकानंदांसारखे सुधारक वयाची चाळिशी उलटण्यापूर्वीच किंवा अॅन फ्रैंकसारखी कळी वयाच्या १४-१५ व्या वर्षीच मरण पावावी किंवा एखादे मूल जन्मताक्षणी किंवा अर्धमृतच जन्मास यावे हे दैवगतीचेच उदाहरण! एखादे पीक सहा महिन्यांत तरारून येऊन त्याची कापणी करणे हा निसर्गक्रम पण त्यापूर्वीच टोळधाडीने वा गारपिटीने ते नष्ट व्हावे हा दैवयोगच. चौपाटीवर हवा छान आहे म्हणून फिरावयास गेलेल्या बापलेकांचा वीज अंगावर कोसळून मृत्यू याला काय निसर्गनियम म्हणायचे? हा दैवयोगच!
नियति या कल्पनेस लेखकाचा मुख्य आक्षेप मला वाटते त्या कल्पनेमुळे माणसाचे कर्तृत्व नाकारले जाते किंवा त्याची भूमिका अकरणात्मक होण्याची शक्यता असते हा आहे. पण बहुतेक लोकांना व डॉक्टरांनाही नियति ही कल्पना मान्य असली तरी डॉक्टर काय किंवा रोग्याचे नातेवाईक काय, असेल त्याच्या नशीबात तर जगेल म्हणून हातावर हात धरून स्वस्थ बसलेले मी तरी पाहिलेले नाहीत.
डॉ. जयंत नारळीकर यांच्या मातोश्रींची मुलाखत दूरदर्शनने घेतली त्यात कौटुंबिक प्रश्नांत जयंतरावांच्या भावंडांचा उल्लेख होता. त्यांचे एक बंधु PRL मध्ये नोकरी करतात त्यांचेविषयी बोलताना त्यांच्या आईने तोही जयंताइतकाच बुद्धिमान आहे हे आवर्जून सांगितले. यात श्री जयंतरावांचे कर्तृत्व नाकारण्याचा प्रश्न नाही पण त्यांच्याइतकाच हुशार भाऊ मात्र त्याच्यासारखा जगप्रसिद्ध झाला नाही ही केवळ दैवगती. बेदी व पद्माकर शिवलकर, एकाच तोडीचे गोलंदाज असताना शिवलकरला कसोटीत संधीही मिळाली नाही. अमेरिकेचा शोध कोलंबसाने लावला पण नाव मात्र अमेरिगोचे लागले. रेडिओलहरींचा शोध मार्कोनी व जगदीशचंद्र बोस यांनी एकाच वेळी लावला पण श्रेय मात्र मार्कोनीस मिळाले. Hanged in Error या नावाच्या पुस्तकात अनेक व्यक्ती कशा चुकीने (त्यानी काहीही गुन्हा केला नसताना) फाशी दिल्या गेल्या आहेत याच्या कथा आहेत. अशा गोष्टी कार्यकारणपरंपरेने होत नाहीत तर केवळ दुर्दैवाने किंवा दैवगतीने होतात हे मान्य करणे भागच आहे. त्यामुळे गडक-यांनी “काही गोड फुले सदा विहरती स्वर्गागनांच्या शिरी” पण “एखादे फुटके नशीब म्हणुनि प्रेतास शृंगारते’ असे उद्गार काढले.
– श्याम कुलकर्णी
‘यमाई’, टिळकनगर
औरंगाबाद

श्री. श्याम कुळकर्णी ह्यांच्या विधानांचा आता आपण थोडा परामर्श घेऊ. ते म्हणतात, ‘विश्वातील सर्व घटना नियमबद्ध आहेत असे म्हणता येत नाही. विज्ञान हे पूर्ण नियमबद्ध आहे असे आपण समजतो, तरी सर्व वैज्ञानिक सिद्धान्त आदर्श अटी पूर्ण झाल्यासच सिद्ध होतात व आदर्श अटी पूर्ण करणे ब-याच वेळा अशक्य कोटीतील असते’ वगैरे.
विश्वातील सर्व घटना नियमबद्ध आहेत हे खरे आहे. पण हे विश्वाचे स्थूल नियम निरपवाद नाहीत – विश्व बदलते असल्यामुळे नियमांना अपवाद असणे हा नियमच आहे, निदान सचेतन सृष्टीच्या बाबतींत तरी. नियमांचे असे बदलते स्वरूप एकदा माहीत झाले की त्या नियमांमध्ये कोणीच ढवळाढवळ करू शकत नाही – ‘साक्षात् परमेश्वरसुद्ध’ असे विवेकवादी मानतो. त्याला नियम तेवढे प्रत्ययाला येतात – परमेश्वराचा प्रत्यय त्याला येत नाही. एक दोन उदाहरणे देऊन हा मुद्दा स्पष्ट करतो. प्रत्येक माणसाला दोन हात, दोन पाय, नाक, कान, डोळे, तोंड हे सर्व अवयव असणे हा नियम आहे. पण प्रत्येक माणसाला असे सर्व अवयव असतातच असे नाही. एखादे मूल कान नसलेले जन्मू शकते. कोणाच्या तोंडाच्या रचनेमध्ये दोष असतो, कोणी जन्मान्ध असतो. पुष्कळ मुले जन्मतः व्यंग घेऊन जन्मू शकतात. कोठल्यातरी अवयवाने एकमेकांना जोडलेल्या जुळ्यांबरोबर पांढरा मोर, पांढरा वाघ, पांढरा हत्ती, पांढरा कावळा असे प्राणीही क्वचित् आढळात येतात. म्हणून सृष्टीचे सर्व व्यापार समजून घेताना अश्या अपवादात्मक घटनांना सामावून घेणारे नियम इहवाद्यांना किंवा विवेकवाद्यांना करावे लागतात. इहवाद्यांचे सृष्टीचे, त्यातल्या त्यात प्राणिसृष्टीचे म्हणजे चेतनसृष्टीचे नियम असे लवचीक असतात. अचेतनसृष्टीचे नियमसुद्धा तिच्याविषयीचे ज्ञान वाढत गेल्यानंतर थोडेफार बदलावे लागतील ह्यासाठी त्यांच्या मनाची तयारी असते. ईश्वरवादी आणि विवेकवादी/इहवादी ह्यांच्या ह्या सृष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातला फरक पुन्हा स्पष्ट करण्याचा यत्न पुढे करतो.
‘सृष्टीचे सर्व व्यापार नियमबद्ध आहेत हे खरे परंतु ही सृष्टि त्या सर्वशक्तिमान, अचिन्त्यसामर्थ्यवान् ईश्वरानेच निर्माण केलेली असल्यामुळे ईश्वर त्यामध्ये दखल देऊ शकतो आणि त्याच्या मर्जीप्रमाणे किंवा मानवाच्या बाबतीत त्यांच्या पूर्वकर्माप्रमाणे म्हणजे पूर्वसुकृताप्रमाणे वा पूर्वजन्मीच्या पापाप्रमाणे तो प्रत्येकाला फल देतो. हे जे काय प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडावयाचे ते सर्व पूर्वीपासून ठरलेले असल्यामुळे ते तसे घडणारच किंवा ते तसेच घडणार, त्यात माणसाला कोणताही बदल घडविता येत नाही, येणार नाही, आम्ही सारे दैवाधीन किंवा ईश्वराधीन आहोत; सारा नशिबाचा खेळ’ असे ईश्वरवादी किंवा नियतिवादी मानतो. पण ते तसेच घडणार, ईश्वरेच्छा बलीयसी असे म्हणत तो ईश्वराला वश करण्याचा म्हणजे आपली नियति, दैवगति किंवा नशीब बदलविण्याचा यत्न चालू ठेवतो. हा जो ईश्वरवादी आहे तो जर फलज्योतिषावर विश्वास ठेवणारा असेल तर दुर्लभ अशी रत्ने शरीरावर धारण करून आणि कर्मकांडावर विश्वास ठेवणारा असेल तर यज्ञजपतपादींचे आचरण करून तो दैवाला किंवा नियतीला ह्याच जन्मात आपल्याला अनुकूल करून घेण्याचा यत्न करतो. हा यत्न बहुतेक वेळा साधत नाही. अशा वेळी तो आपल्याच साधनेत । काही दोष राहिला, न्यून राहिले असे म्हणून गप्प राहतो. क्वचित् त्यास अनुकूल अशा घटना घडल्यास त्यांची वास्तव कारणमीमांसा न करता, खोलात न शिरता त्याच्या साधने’ला श्रेय देऊन मोकळा होतो. कर्मसिद्धान्तावर ज्याची अढळ श्रद्धा आहे तो पुढल्या कोठल्या तरी जन्मात आपले नशीब फळफळावे ह्यासाठी पुण्यसंचय करतो.
ह्या सा-यांच्या उलट विवेकवादी वा इहवादी. हा त्याच्या आयुष्यातली कोणतीही घटना एकएकटी, एकशः पाहत नाही. त्याचा कल अशा घटनांची सरासरी काढण्याकडे असतो. उदा. श्वेतकुष्ठ (पांढरे कोड) शेकडा किती लोकांत आढळते, जन्मतः बहिरेपणा, आंधळेपणा, वांझपणा आणि इतर शारीरिक दोष किती टक्के लोकांत आढळतात त्याची गणना करून, सगळ्यापैकी मी एक आहे ह्याचे भान न गमावता तद्विषयक नियम करतानाच अपवादांची टक्केवारी पाहतो. समस्त समाजामध्ये ही अपवादात्मक परिस्थिती कोणाच्या ना कोणाच्या वाट्याला येतच असते. ती माझ्या वाट्याला आली ती यदृच्छेने आली असे तो समजतो. हे संकट माझ्याच वाट्याला का ? मी पूर्वजन्मी कोणते पाप केले होते म्हणून माझ्या पोराच्या ठिकाणी असे मतिमंदत्व आले असा विचार करीत नाही. अशा घटनांमध्ये त्याला यदृच्छा (accident, chance) दिसते—ईश्वरेच्छा दिसत नाही. आपल्या समस्यांमधून वाट काढण्यासाठी ईश्वराला व्यक्तिशः शरण जाण्याऐवजी तो मानवांचे संघटन करून समूहशः त्या समस्येला तोंड देतो, त्यांचे जमेल तेवढे निराकरण करतो. ह्या सृष्टीमध्ये प्राणिजगताची सतत उत्क्रान्ति घडत असल्यामुळे उत्परिवर्तन (mutation) आणि संवरण (selection) गृहीत धरूनच तो सृष्टीचे नियम बसवितो. विज्ञान हे सृष्टीचे आणि अर्थात् सृष्टिनियमांचे आकलन आहे. सृष्टीवर (वा निसर्गावर) विजय प्राप्त करण्याचे ते साधन नाही. सृष्टि आणि सृष्टिनियम यांत फरक नाही. नियमांशिवाय सृष्टि नाही, सृष्टीशिवाय नियम असू शकत नाहीत, त्यामुळे, सृष्टि आणि सृष्टिनियम ह्यांत असे अभिन्नत्व असल्यामुळे, विवेकवाद्याला सृष्टिनियमांचा कर्ता वेगळा मानण्याची गरज वाटत नाही. तो हे विश्व (आणि अर्थात् तद्विषयक नियम) सनातन आहे असे मानतो. सृष्टीचे काही नियम विश्वासार्ह आहेत हे तो जाणतो म्हणूनच विजेची निर्मिती, उपग्रहांचे प्रक्षेपण, अणुस्फोट ही कामे करता आलेली आहेत.
विश्वोत्पत्तीच्या कल्पना काही मानवी मनांत उद्भूत झाल्या आणि इतरांत प्रसृत झाल्या त्यावेळी माणसाच्या बुद्धीच्या आवाक्यात पुष्कळ गोष्टी यावयाच्या होत्या. त्याने पृथ्वीचा, सृष्टीचा, विश्वाचा इतिहास समजून घेण्याची साधने निर्माण केली नव्हती. पंचक्रोशीच्या बाहेरच्या मंडळींशी त्याचा फारसा संपर्क नव्हता. त्याच्या कल्पनेची धावच फार दूरपर्यंत जाऊ शकत नव्हती. जिज्ञासा पुष्कळ आणि जिज्ञासापूर्तीच्या साधनांचा अभाव त्यामुळे त्याने काही तर्क, वितर्क, कुतर्क (speculation) केले, आणि सगळ्या घटनांचे कर्तृत्व ईश्वराकडे सोपविले गेले. आम्ही आज तसे करण्याचे कारण नाही.
प्रगत औषधोपचारांच्या योगाने माणसाचे आयुर्मान सरासरीने वाढले आहे एवढेच इहवादी सांगतो. नवीन औषधोपचारांमुळे सुद्धा जन्मणारी प्रत्येक व्यक्ती ही अव्यंग उपजत नाही, तिचे आयुर्मान ठरावीक नाही किंवा सगळ्यांचे आयुष्य समान नाही ह्यासाठी परमेश्वराला किंवा नियतीला जबाबदार धरण्याची त्याला गरज वाटत नाही. हा साधा सृष्टिक्रम आहे हे तो जाणून आहे.
श्री. श्याम कुळकर्णी ह्यांनी नारळीकर बंधूंच्या विभिन्न दैवाचा उल्लेख केला आहे. कीर्ति, प्रसिद्धी हे योग सर्वस्वी मानवी वर्तनावर अवलंबून असतात. आवडनिवड, स्वभावविशेष (प्रसिद्धिपराङ्खता) वगैरे अनेक बाबी त्यात गुंतलेल्या असतात. आणि स्वभाव आनुवंशिकतेमुळे त्याचप्रमाणे पुष्कळ प्रमाणात त्यावर होणाच्या संस्कारांमुळे (conditioning of mind) ठरत असतो असे तो मानत असल्यामुळे त्यात विभेद (variation) असणारच असे समजून विवेकवादी देव, दैव आणि नियति ह्यांच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवतो.
श्री. कुलकर्णी ह्यांचे एवढ्याने समाधान होणार नाही. तेव्हा ही चर्चा पुढेही चालू ठेवू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.