“… प्रत्येक देशांत त्या देशाच्या उच्च संस्कृतीची वाहक अशी जी अॅरिस्टॉक्रसी पाहिजे, तशी तयार होण्यास त्या समाजामध्ये स्त्री-पुरुषसंबंध देखील खुला पाहिजे. कारण ज्या समाजांत हा खुला संबंध असतो तो समाज अधिक आकर्षक होतो आणि त्यामुळे त्या समाजांत शिरावे अशी इतरांस इच्छा उत्पन्न होते. “अॅरिस्टाक्रसी’ होऊ इच्छिणा-या समाजाने केवळ लखोटबंद राहून उपयोगी नाहीं तर इतरांना आपणांत समाविष्ट होण्याची संधि दिली पाहिजे आणि आपल्या वर्गात समाविष्ट होण्याची इतरांची इच्छा जिवंत ठेविली पाहिजे. ब्राह्मणांत शिरावे अशी ब्राह्मणेतरांची इच्छा असल्यास त्यांस संधि द्यावी. ब्राह्मण समाज अधिकाधिक आकर्षक करावा व त्या समाजामध्ये इतर जातींतील चांगल्या व्यक्तींना येण्यास संधि मिळावी. असे केल्याने ब्राह्मण जात ही केवळ जात न राहतां समाजाचा उच्च वर्ग होईल; म्हणजे देशामध्ये इंग्रजांस उच्च जात बनू द्यावयाचें नाहीं, तो मान राखण्याचा ब्राह्मणांनी प्रयत्न करावयाचा व देशामध्ये इंग्रजांना प्रामुख्य मिळू नये म्हणून देशी भाषेचेच प्रामुख्य देशांत राखावयाचे आणि ते देखील इतकें कीं प्रत्येक भागांत जे परके लोक येतील त्यांना देखील देश्य लोकांशी सादृश्य उत्पन्न व्हावे ही आवश्यकता वाटावी.