पत्रव्यवहार

मी नथुराम…..वर बंदी नको
संपादक, आजचा सुधारक,
मी नथुराम गोडसे बोलतोय… या नाटकावरील बंदीच्या संदर्भात झालेली चर्चा वाचली. नाटकावर बंदी घालणे चूक आहे असे मला वाटते व या विषयावर अधिक व्यापक चर्चा होणे अगत्याचे आहे. माझ्या भावना दुखावतात म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल वा कलाकृतीबद्दल ‘फतवा काढण्यासारखे काही कृत्य करून आपण त्याचे समर्थन करीत आहोत काय?
व्यक्तिगत दृष्ट्या एक गोष्ट मला प्रथमच स्पष्ट करावी वाटते. मी व्यक्तिशः आजपर्यंत तरी गांधीजी हे महात्मा आहेत व नथुरामने केलेले कृत्य चुकीचे व वाईट आहे असे मानत आलो आहे. पण गांधीजींचा खुन ही एक ऐतिहासिक घटना आहे. आणि ऐतिहासिक घटनांचे संदर्भ व म्हणून मूल्यमापन हे बदलते असते. शिवाजीने अफजलखानाचा केला तो वध होता व तो बरोबर होता असे मला वाटते. त्यावेळी विजापूरच्या दरबारात अनेकांना याच्या उलट वाटले असणार. किंवा जर नंतर औरंगजेबाने शिवाजीला आग्रा येथेच संपवले असते व नंतर तो आपणा सर्वांना मुसलमान करण्यात यशस्वी झाला असता–जे आक्रमक काश्मिरमध्ये करू शकले. — तर त्यानंतरच्या तीनशे वर्षांत माझे संदर्भ व मानसिकता बदलली असती व अफजुलखान चांगला होता व शिवाजीने त्याचा खून केला असे मला वाटले असते. अशावेळी आज कोणी ‘मी शिवाजी बोलतोय. म्हणून नाटक लिहिले असते तर त्यावर बंदी घालणे मग न्याय्य ठरले असते का?
हा केवळ वाद उकरून काढण्याचा प्रकार नाही. या देशात ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात असे कायम घडत आले आहे. मला अल्लाउद्दीन खिलजी हा खलनायक वाटतो. पण डॉ. गुलाम सरवार खान नियाझी यांनी लिहिलेले द लाइफ अॅन्ड वक्र्स ऑफ सुलतान अल्लाउद्दीन खिलजी हे पुस्तक वाचताना तो एक महानायक होता हे जाणवते. आता ते पुस्तक वाचून वा न वाचूनही एखाद्याने मी अल्लाउद्दीन खिलजी बोलतोय… म्हणून नाटक लिहिले तर त्यावरही बंदी घालावयाची काय ?
गांधीजींचा खून ही ऐतिहासिक घटना होती व नथुराम एक ऐतिहासिक व्यक्ती होती. हैद्राबाद सत्याग्रहात हिंदु महासभेचा स्वयंसेवक म्हणून त्याने एक वर्ष निझामाचा कारावास भोगला होता. १९४८ साली पराभूत वाटणारी पण एक तर्कसंगत विचारधारा तो प्रभावीपणे पुढे मांडत होता. आपण करीत असलेल्या कृत्यामुळे आपले कुटुंबीय, ब्राह्मण समाज, आपली विचारधारा यांना त्यावेळी केवढ्या प्रचंड यातना दिल्या जातील याची त्याला कल्पना होती, – पण देशाला स्वतंत्र करावयाचे असेल तर फाळणी आणि त्यामुळे होणारा विध्वंस व रक्तपात आपण स्वीकारला पाहिजे हे जेवढ्या कणखरपणे व निष्ठरपणे नेहरू पटेल यांनी स्वीकारले होते तसेच काहीसे त्याचे होते. शत्रूवर वा आपल्यावर अन्याय करणा-यांवर प्रेम करीत त्याला मदत करणे हा आत्मघात आहे व हे थांबण्यासाठी व या राष्ट्राला हे पटवून देण्यासाठी कोणतीही किंमत ह्या क्षणी दिली तरी ती कमीच आहे असे त्याला प्रामाणिकपणे वाटत होते.
आपण हे कृत्य केलेले नाही वा आपणाला फासावर चढवू नका असे तो कधीही म्हणाला नाही. या देशातल्या न्यायसंस्थेने (व जनतेने पण) त्याला फासावर चढविला यात त्याच्या दृष्टीने एक ‘पोएटिक जस्टिस’ होता. – ज्याने आपल्यावर अन्याय केला असेल, आपल्या मते वाईट कृत्य केले असेल त्याला शिक्षा करा त्याच्यावर प्रेम करून त्याला मदत करू नका म्हणून तो सांगत होता. या उलट आपणावर अन्याय करणा-या माणसालाही क्षमा करा, प्रेमाने, आत्मक्लेशाने जिंका असे काही गांधीजी सांगत होते – त्याला मृत्युदंड देऊन या देशातील न्यायसंस्थेने (व जनतेने पण, त्याचे तत्त्वज्ञान बरोबर आहे, गांधीजींचे चूक आहे असे काही सांगितले होते काय?
त्याचे न्यायालयासमोरचे अखेरचे निवेदन अजून बाहेर आलेले नाही. ते प्रकाशित व्हावे म्हणूनही आपल्यापैकी कोणी चळवळ, सत्याग्रह वा साधी मागणीसुद्धा केलेली नाही. विचारांचा सामना विचारांच्या जोरावर करावयाचा असतो. विचार दडपून, दाबून ठेवू नये हे आपण विसरून गेलो आहोत का? त्याचे ते ऐतिहासिक निवेदन दडपले गेले आहे. आपण आता त्याची बाजू त्याच्या पद्धतीने मांडणाच्या नाटकावर बंदी आणत आहोत. आम्हाला जे आवडत नाही, प्रक्षोभक वाटते, चुकीचे वाटते, आमच्या भावनांवर वा श्रद्धास्थानांच्यावर जे आघात करते ते आम्ही मांडावयासच देणार नाही ही लोकशाही की ठोकशाही ? हे तत्त्वज्ञान अहिंसेचे की हिंसेचे?
न्याचे हे नाटक व त्याचे न्यायालयासमोरचे ते निवेदन लोकांसमोर मांडले गेले पाहिजे असा आपण आग्रह धरला पाहिजे. त्यामुळे तो व त्याचे तत्त्वज्ञान कसे चुकीचे होते हे जनतेला समजेल–वा जनतेला तसे समजावून देणे गांधीजींना महात्मा व त्याला वाट चुकलेला देशभक्त म्हणणाच्या मंडळींना सोपे होईल.
दत्तप्रसाद दाभोलकर
श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रिअल रिसर्च
१२युनिव्हर्सिटी रोड दिल्ली-११० ००७

पाळणाघरांची वाढ : एक अपप्रवृत्ति
आजचा सुधारक (सप्टें. १२२८) च्या अंकात “पाळणाघराची वाढ : एक अपप्रवृत्ति” ह्या शीर्षकाखाली एक स्फुटलेख प्रसिद्ध झाला आहे. स्फुटलेख वाचनीय व विचारप्रवर्तक आहे.
महिला नोकऱ्या करायला लागल्यापासून पाळणाघरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे, हे स्फुटाचे विधान वादातीत आहे. पण अशा पाळणाघरांची गरज आपल्या समाजाने कमी करीत नेली पाहिजे आणि जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे विधान विचार करण्यासारखे आहे.
पाळणाघरे निर्माण होण्याची प्रमुख कारणे ढासळलेल्या संयुक्त कुटुंबाची समाजरचना, स्त्रियांच्या नोक-या, राहण्याच्या अपुल्या जागा आणि व्यवसायाच्या निमित्ताने घरापासून दूर जाणारा नोकरवर्ग ही आहेत. संयुक्त कुटुंबाचे विभाजन आणि विभक्त कुटुंबांची निर्मिती ह्या गोष्टी जरी आपल्या मनाविरुद्ध असल्या तरी अपरिहार्यतेने त्या आपल्याला आता स्वीकारल्याच पाहिजेत. औद्योगिकीकरणाचे हे असले दुष्परिणाम जगातल्या बहुसंख्य देशांना भोगावे लागलेच आहेत. आणि कितीही इच्छा असली तरी हे चक्र आता उलटे फिरवण्याची ताकद आपल्यामध्ये नाही, हेहि एक कटुसत्य आहे. कुटुंबातील मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी, त्यांची प्रेमाने देखभाल करणारे आजी-आजोबा कधी कधी मामा-मामी ह्यांसारखे आवश्यक कौटुंबिक घटक आता विभक्त कुटुंबांमुळे नाहीसे होत आहेत. आपल्याला परवडणाच्या पगारात सुसंस्कृत, प्रेमळ आणि विश्वासू बायका घरात मुलांना सांभाळण्यासाठी मिळणेही अशक्य होत चालले आहे. मुलांसाठी ठेवलेले दुध पिणे, मुलाच्या पायाला ब्लेडने चिरा पाडणे. त्यांना अमली पदार्थ देऊन झोपून ठेवणे असे किस्से आपण अश्या बायकांच्या बाबतीत वाचलेले असतात. अशा परिस्थितीत पाळणाघरामध्ये मुलाला ठेवून कामाला जाणे हा एक आवश्यक पर्याय होऊन बसतो. पाळणाघरांचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे बंद घरांमधून राहणारी मुले ही एकलकोंडी होतात. आणि आजूबाजूला माणसे, मित्र किंवा मैत्रिणी असलेली मुले ही आनंदी राहतात हा अनुभव आहे.
दुसऱ्या महायुद्धात परिस्थितीमुळे स्त्रिया रेशनिंगच्या कचेयांमधून बहुसंख्येने नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडू लागल्या. खरे तर युद्धाच्या आधीहि उच्चशिक्षित स्त्रियांचा एक वर्ग त्यावेळेपर्यंत निर्माण झाला होता आणि शिक्षक व परिचारिका ह्या पेशांमध्ये त्यांनी पाऊल घराबाहेर टाकलेले होते. २५-३० सालापर्यंत उच्चवर्गीय अनाथ महिलेच्या हातातले लाटणे जाऊन तिच्या हातात पुस्तक व इंजेक्शनच्या सिरिंजेस दिसायला सुरुवात झालीच होती – इतकेच नव्हे तर महायुद्धाच्या काळात युरोपमध्ये देशाचा पुरुषवर्ग युद्ध आघाडीवर गेला असताना कित्येक देशांतील महिलांनी आपल्या देशाची गृह आघाडी मोठ्या समर्थपणे सांभाळली होती. आता तर महिला अनेक विषयांच्या पदवीधर होत आहेत. त्यांच्या व्यवसायात त्या कुठेहि कमी न पडता त्या समाजाला उपयोगी आणि ललामभूत होत आहेत.
आता अशा सुशिक्षित स्त्रिया फक्त घरातच राहतील अथवा त्यांनी तसे रहावे अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे आणि अव्यवहार्य पण आहे. मध्यमवर्गीय स्त्रिया नोक-यांसाठी घराबाहेर पडत आहेत, त्या केवळ त्याच्या मनाची हौस भागवण्यासाठी हेहि एक विधान साधारणपणे केले जाते. तेहि बरोबर नाही. हल्लीच्या काळात स्वतःच्या गरजा कितीहि कमी केल्या तरी मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च, आकाशाला भिडलेली महागाई, वैद्यकीय उपचारासाठी करावा लागणारा अवाढव्य खर्च ह्यांची अर्थार्जनाशी तोंडमिळवणी करता करता कुटुंबाच्या नाकी नऊ येतात. अशावेळी केवळ एका माणसाच्या कमाईवर कुटुंबाचा खर्च चालवणे अशक्य झाले आहे. म्हणूनच त्याच्या घरांतील महिलांना नोक-या धराव्या लागत आहेत. तेव्हा कोणतीहि कर्तृत्ववान अथवा गरजू महिला ही अर्थार्जनासाठी घराबाहेर पडली तर त्यात नवल नाहीं.
अर्थार्जनामुळे स्त्रियांना मुक्ति मिळते हे जरी खरे नसले तरी त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. आणि कोणत्याही संभाव्य परिस्थितीशी टक्कर देण्याची मानसिक ताकद त्यांच्यात येते. अशा परिस्थितीत विभक्त कुटुंबात आपल्या मुलाला सांभाळण्याचा प्रश्न अपरिहार्यपणे आईवडिलांसमोर उभा राहतो. तो तसा राहू नये असे आपणास मनापासून वाटत असले तरी तो आता तसा राहणारच.
अशा परिस्थितीत त्यावर पाळणाघर हा एकच पर्याय आईवडिलांसमोर उरतो. एकदा पाळणाघरे ही आपणास नको वाटत असलेली पण गरजेपोटी स्वीकारलेली प्रवृत्ति समजली की मग ती पाळणाघरे कशी असावीत हा चर्चेचा विषय ठरू शकतो. आणि तो तसा जरूर झालाच पाहिजे. पण ती पाळणाघरे ही अपप्रवृत्ति समजून ती आपण कमी मात्र करू शकत नाही हे सत्य मात्र आपण स्वीकारलेच पाहिजे.
लीला पटेल
बी-११. स्नेहसदन
शीतलादेवी टेंपल रोड, माहीम, मुंबई ४०० ०१६.

आर्थिक उलाढाल ही उत्पादनवाढ नव्हे
संपादक, आजचा सुधारक यांस,
सप्टेंबर १९९८ च्या आजचा सुधारक मध्ये श्री. मोहन हिराबाई हिरालाल यांचा ‘ग्लोबलाझेशनवर उतारा’ नावाचा लेख आला आहे. त्यावरील माझ्या प्रतिक्रिया –
१. जागतिकीकरण जे होत आहे ते मुख्यतः खेळत्या भांडवलाचे. हे भांडवल फार चपळ आहे आणि ते क्षणात जगभर कोठेही हालविले जाऊ शकते, जात आहे. त्याच्यावर हुकूमत काही फार थोड्या बड्यांची आहे. अगदी भारताचे अर्थमंत्रीदेखील या बड्यांपुढे हलक्या वजनाचे आहेत. रस्ते, कारखाने, यंत्रसामुग्री ही स्थायी स्वरूपाची असतात. ती इकडून तिकडे हलविता येत नाहीत. पण खेळत्या भांडवलाच्या नाड्या आवळून त्यांची ससेहोलपट करता येते. ती ओस पाडता येतात. जाता जाता हेही नमूद करावेसे वाटते की अर्थव्यवहार, आर्थिक उलाढाल आणि उत्पादनवाढ यांत फरक आहे. एकच मोटारगाडी १० वेळा विकून दसपट उलाढाल होऊ शकते. त्यासाठी १० मोटारगाड्यांचे उत्पादनाची जरूर नाही. Empty calories प्रमाणे याला empty आर्थिक उलाढाल म्हणू या.
२. मोहन हिराबाई हिरालाल यांचा प्रयोग कितीही उत्कृष्ट असला आणि तो तसा आहे—तरी स्थानिक पातळीवरील वाढत्या आशा-आकांक्षा आणि राष्ट्रिय पातळीवरील वास्तव यांची सांगड घालणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. (micro aspirations & macro realities, micro motives & macro behaviour हे प्रश्न आहेतच.) आमच्या गावात आम्ही राजे, दिल्लीत आमचा राजा’ ही घोषणा कितीही वेधक असली तरी प्रत्यक्षात ती दुर्बलांचा आक्रोशच ठरण्याची शक्यता आहे.
मोहन हि.हि. यांचा प्रयत्न हा मूलतः राज्य चालविण्याचा, शासकीय व्यवस्थापनाचा (governance) आहे. ८०० ते १००० लोकवस्तीच्या समूहाला जो सर्वसहभाग शक्य आहे तो एक लाख वस्तीला जमेलसे वाटत नाही. म्हणजे १००० वस्तीचा ग्रामसमूह, मग या ५० समूहांचे गटग्राम, अशा ५० गटग्रामांचा जिल्हा अशी उतरंड बांधावीच लागेल. फारतर ती तर्कशुद्ध होण्यासाठी भाषिक, धार्मिक वगैरे निकषांवर न ठरविता पर्यावर्णीय भौगोलिक निकषांवर ठेवता येईल. तरी परंतु micro-macro द्वैत टाळता येणार नाही. व्यक्ती आणि समाज हे द्वैत तरी कुठे टाळता येते?
३. आपल्याकडे २००० ते १०००० वस्तींची गावे पुष्कळ आहेत, त्यांतील सुशिक्षित- अर्धशिक्षित बेकारांची संख्या स्फोटक होण्याइतकी मोठी आहे. वरील प्रयोगात याचे उत्तर कुठे दिसत नाही. हे सगळे बेकार बहुसंख्येने निरुपयोगी शिक्षण घेतलेले भूमिहीन किंवा अल्पभूधारक आहेत. त्यांच्याकडे आणि तसल्या शिक्षणाकडे फारसे कोणी लक्ष देताना दिसत नाही. फक्त office-filing साठीच उपयोगी पडणारे हे मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या संगणकीकरणाकडे नुसते हताशपणे पहात बसणार, त्याला टक्कर देऊ शकणार नाही.
आदिवासीतील मोहन हि. हि. यांच्या अभिनव प्रयोगाविषयी पूर्ण आदर ठेवूनच मला
जाणवलेल्या मर्यादा लिहिल्या आहेत. कळावे.
चिं. मो. पंडित
६, ‘सुरुचि, संत जनाबाई पथ,
विलेपार्ले पूर्व. मुंबई – ४०० ०५७

इदं न मम
भूतपूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे (प्रिव्ही पर्सेस) बंद केल्या तेव्हा ब-याच लोकांना आनंद झाला असेल. त्यांचे वडील कंपनी सरकारशी एकनिष्ठ राहिले ह्यासाठी हे तनखे त्यांस मिळत होते. इंदिरा गांधींच्या पूर्वीच्या पंतप्रधानांनी ते कायम । ठेवले होते. सामान्य लोकांना श्रीमंत किंवा बलशाली लोकांची फजिती झाली की आनंद होतो. एखादा पहिलवान रस्त्यावर केळीच्या सालीवर पाय पडून घसरून आपटला म्हणजे त्याला दिसणार नाही अशा बेताने प्रेक्षक हसून घेतात. तशाच प्रकारचा आनंद संस्थानिकांचे तनखे बंद झाल्यावर सामान्य लोकांना झाला. “बरे झाले, ह्यांची बापकमाई बंद झाली अशी लोकांची भावना होती. प्रख्यात विनोदी लेखन डॉ. वर्टी हे व्यवसायाने डॉक्टर होते परंतु त्यांनी डॉक्टरी व्यवसाय जवळजवळ केलाच नाही. लेखन हाच त्यांचा आवडता व्यवसाय होता. कारण त्यांची बापकमाई भरपूर असल्याने त्यांना ‘आपकमाई’ ची आवश्यकता भासली नाही. त्यांचे काही लेखकमित्र त्यांना म्हणते, “तुमचे बरे आहे – बापकमाई आहे. डॉक्टरी करण्याची गरज नाही. त्यावर ते आपल्या खास शैलीत म्हणत असत, “तुम्ही स्वतःच्या बापाची नालायकी का सांगत आहात ?’ सांगण्याचा मुद्दा म्हणजे ज्यांची ब्रापकमाई आहे त्यांनी त्या कमाईचा उपयोग थोडा का होईना, पण समाजासाठी केला पाहिजे. आजकाल शहरांतून जुनी वडिलोपार्जित घरे किंवा वाडे पाडून त्या जागी ‘बिल्डर लोक टोलेजंग इमारती बांधत आहेत. त्यासाठी ‘बिल्डर’ मूळ मालकांच्या मुलांना नवीन दोन किंवा तीन प्रशस्त फ्लॅटस् व त्याशिवाय बिनहिशेबी रुपये (काळा पैसा) लाखांच्या संख्येने देतो. पूर्वी फक्त व्यापारी, कंत्राटदार किंवा उद्योगपती ह्यांच्या जवळच काळा पैसा असे. आज अनेक मध्यमवर्गीयांकडे सुद्धा वडिलोपार्जित घरे बिल्डरना विकल्यामुळे काळा पैसा आला आहे. ही सुद्धा त्यांची ‘आपकमाई’ नसून ‘बापकमाई’ आहे. नैतिक दृष्ट्या त्या पैशावर त्यांचा अधिकार राहत नाही. त्यांनी वास्तविक हा सर्व पैसा समाजाच्या उपयोगी लावला पाहिजे. ही अपेक्षा आजच्या काळात फारच मोठी वाटेल. परंतु त्यांनी त्या रकमेवरील व्याजाची रक्कम तरी स्वतःसाठी खर्च न करता समाजासाठी करावी एवढी माफक अपेक्षा ठेवण्यास प्रत्यवाय नसावा. हल्लीची कुटुंबेसुद्धा ‘दो या तीन बस्स ह्या धर्तीवर लहान असतात. तेव्हा वडिलोपार्जित रकमेचे वाटे सुद्धा कमी पडतात. तेव्हा अशा ‘बापकमाई मिळालेल्या मंडळींनी ही कमाई माझी नव्हे. (इदं न मम) ह्या वृत्तीने कमीत कमी त्या रकमेच्या व्याजाचा विनियोग सामाजिक कार्यासाठी करावा अशी लेखकाची इच्छा आहे. वाचकांसाठी मी एवढेच सांगू इच्छितो की मी स्वतः गेली अनेक वर्षे मला वडिलांकडून मिळालेल्या रकमेवरील व्याजाची रक्कम सामाजिक कार्याला देणगी म्हणून देत आहे. माझ्या मुलांनी सुद्धा ही प्रथा पुढे चालवावी असे मी त्यांना सांगत असतो.
मधुसूदन मराठे
आशीर्वाद, ७४ रामबाग, नागपूर-३

आगरकरी सुधारणांची मर्यादा
संपादक, आजचा सुधारक
आ.सु. (२३ : ६ – १९१-९२) मध्ये श्री. ब्रिजमोहन हेडा यांचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. श्री. हेडांचे मत अतिशय सयुक्तिक असून, त्या मतास दुजोरा देणे हा या पत्राचा उद्देश आहे.
गोपाळ गणेश आगरकर यांचे बहुतेक सर्व लेखन व सामाजिक कार्य (काही असल्यास) पुणे शहरातील त्यांच्या अल्प वास्तव्यात झालेले आहे. तो काळ पेशवाईनंतरच्या ब्रिटिश राजवटीची पकड घट्ट होत असलेला होता. पुणे शहरात ब्राह्मण समाजाचेच सार्वजनिक जीवनात वर्चस्व होते व याच ब्राह्मण समाजातही पारंपरिक मागासलेल्या चालीरीतींचा पगडा होता (इतर समाजांची स्थिती तर भयानकच होती). त्यामुळे स्वातंत्र्याच्या व स्वराज्याच्या आकांक्षेबरोबरच सामाजिक सुधारणांचाही ध्यास विचारवंतानी घेतला होता. बाळ गंगाधर टिळक हे स्वराज्याचे द्रष्टे होते. त्यांनी वृत्तपत्रे चालवून तसेच सभासंमेलनातून ओजस्वी भाषणे देऊन पुण्याच्याच नव्हे तर, मुंबई प्रांतात व संपूर्ण हिंदुस्थानातच एक बळकट राजकीय चळवळ उभी केली. त्यांचेच प्रारंभीचे स्नेही, गोपाळ गणेश आगरकर यांचे व्यक्तिमत्त्व टिळकांच्या मानाने सौम्य व मवाळ होते. त्यामुळे राजकारणाच्या धकाधकीत पडणे त्यांना भावले नाही, म्हणून आणि समाजातील अनिष्ट चालीरीतींचा मनस्वी तिटकारा उत्पन्न झाल्याने त्यांनी त्यांच्या शारीरिक शक्तीनिशी व उपलब्ध आर्थिक साधनांच्या मर्यादित समाजसुधारणा घडविण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ‘‘सुधारक’ हे पत्र सुरू करून प्रामुख्याने याच माध्यमातून प्रयत्न केले. प्रत्यक्ष सभासंमेलने गाजवून अथवा समाजात प्रत्यक्ष काम करण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. केवळ सुधारका’मध्ये लेख लिहूनच, सुधारक वाचणाच्या प्रामुख्याने ब्राह्मण समाजाचेच प्रबोधन करण्यात त्यांनी आपली सर्व शक्ती व जीवन खर्ची घातले.
आगरकरांचा रोख प्रामुख्याने पुण्यातील ब्राह्मण समाजाकडे असला तरी ब्राह्मणेतर बहुजन व अंत्यज समाजातील विदारक व दारूण परिस्थितीचा त्यांना विचार करावासा वाटला नाही हे कटु सत्य आहे. मागासलेले बहुजन व दलित आगरकरांना दिसलेच नाहीत असे म्हणावेसे वाटते. अन्यथा या समाजजीवनात मूलभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या जिवाचा प्रचंड आटापिटा करणारे पुणे शहरातीलच जोतिराव फुले त्यांना कसे दिसले नाहीत हे एक गूढच आहे. याचा अर्थच पुण्यातील ब्राह्मण समाज आपल्या परिसराबद्दल पूर्णपणे उदासीन होता असा होतो. आणि याच ब्राह्मणी समाजाचा विचार आगरकर करीत होते, हे स्पष्ट आहे. फुल्यांच्या सभा उधळून लावणे अथवा त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचे उपद्व्याप टिळकांनी करून फुल्यांची निदान दखल घेतली पण तेवढेही आगरकराचे लक्ष फुले यांच्या कार्याकडे नव्हते. बहुजन व दलित या समाजातील बहुसंख्य घटकांकडे आगरकरांनी संपूर्ण दुर्लक्ष केले व हीच आगरकरांच्या कार्यातील फार मोठी त्रुटी आहे. त्यामुळे आगरकरांना द्रष्टा अथा युगुपुरुष मानणे सर्वस्वी अयोग्य आहे. गोपाळ गणेश आगरकर हे एका विशिष्ट अल्पसमुदायाचे सुधारक असले तरी अखिल मानवजातीचे सुधारक ते निश्चितच नव्हते.
९०-१०० वर्षांपूर्वी हे जे घडले ते काहीसे समजून घेता येईल परंतु आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. सुमारे ४०-४५ वर्षापूर्वी प्रस्तुत लेखक पुण्याच्या सदाशिवपेठेतील गोरेवाड्यात आपल्या आजोळी दरवर्षी सुटीसाठी मुक्कामाला असे. त्या वाड्याला लागूनच “तुपे-वाडा’ नामक ४०-४५ बि-हाडांत राहणा-या ३-४ शे बहुजन मंडळींची वसाहत होती. परंतु गोरेवाड्यातील ब्राह्मण मंडळी तुपे-वाड्यातील रहिवाश्याकडे निर्विकार व तुच्छतेच्या वृत्तीने पाहत असत हे चांगले स्मरते. जणूकाय तुपेवाडा हा ब्राह्मणी सदाशिव पेठेतील एक “अंदमान बेट’च होते. आजही नागपूरच्या पाचपावली व इंदोरा या भागांबद्दल धंतोली, रामदासपेठ, लक्ष्मीनगरमधील मंडळीची भावना फारशी वेगळी नाही!
टिळकांना त्यांच्या राजकारणामुळे ब्राह्मणांखेरीज इतर समाजांशीही सम्पर्क ठेवावा लागत असे. त्यामुळे पुण्याच्या ब्राह्मणांनी टिळकांना ‘‘तेल्यातांबोळ्याचे पुढारी’ असे बिरूद लावले होते. ते टिळकांना गौरवास्पद नसून ब्राह्मणी वृत्तीने केलेली ती टिळकांची निंदाच होती. आजही जातिवंत ब्राह्मणांची व शैक्षणिक, आर्थिक प्रगतीमुळे या ब्राह्मणी संस्कृतीत प्रवेश मिळविलेल्या पूर्वाश्रमीच्या ब्राह्मणेतर मंडळीची मनोवृत्ती, अशिक्षित गरीब बहुजन व दलित समाजाविषयी कायम निर्विकार अलिप्ततेचीच आहे हे दारुण सत्य आहे.
तेव्हा, “आजचा सुधारक” हे ही आद्य ‘सुधारक’ सारखी आपल्या भोवती मर्यादा घालून घेऊन, केवळ सुस्थितीतील सुशिक्षितांपर्यंतच पोचणारे लेख प्रसिद्ध करण्यासोबतच अडाणी, निष्कांचन: बहुजन व दलित समाजाच्या दुःखांना तोंड फोडणारे साहित्य प्रकाशित करण्याबद्दल ठोस योजना आखणे आवश्यक आहे. तसेच आजचा सुधारक या दुर्लक्षित समाजापर्यंत पोचविण्याचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी आ.सु. चा अंक शक्य तेवढ्या मोफत वाचनालयांकडे निःशुल्क पाठविण्याची व्यवस्था करणे उपयुक्त होईल.
र, वि. पंडित
३०४. अंबर इमारत
इस्कॉनजवळ, जुहू. मुंबई-४०० ०४२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.