स्फुट लेख -आजचा सुधारक हा आपला सुधारक कसा वाटेल? (२)

श्री. खिलारे आणि श्री. नानावटी यांची मागच्या म्हणजे नोव्हेंबर १८ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली पत्रे वाचून मनात काही विचार आले ते सगळ्या वाचकांपुढे ठेवीत आहोत.
लेख कोणी लिहिला आहे ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे आणि केवळ त्यातील विधानांचा, मतांचा आणि सूचनांचा परामर्श घेणेच योग्य होईल असे जे आम्ही पूर्वी म्हटले होते त्या आमच्या मतांत फरक झालेला नाही. पत्रलेखकांनी पाषाणच्या डॉ. कांबळे ह्यांच्या दवाखान्याचे उदाहरण दिले आहे. डॉ. कांबळे ह्यांच्या ठिकाणी आवश्यक ते वैद्यकीय कौशल्य असेल तर त्यांचा दवाखाना कोणत्याही वस्तीत नीट कसा चालेल हे आम्ही सर्वांनी बघितलेच पाहिजे. त्यांच्या वैद्यकीय कौशल्याच्या संदर्भात त्यांचे वजन वा त्यांची उंची अथवा त्यांचा रोडपणा वा लठ्ठपणा या बाबी जशा पूर्णपणे गैरलागू आहेत तसेच त्यांचे आडनावही गैरलागू असायला पाहिजे हे जसे खरे तसेच आमच्या मासिकात लिहिणाल्याचे वजन, उंची, ते स्त्री की पुरुष, जन्म किती तारखेचा, शिक्षण किती, व्यवसाय काय हे प्रश्न जसे गैरलागू तसेच त्याचा जन्म कोणत्या जातीत झाला हा प्रश्नही गैरलागू आहे. डॉ. कांबळे यांच्याकडे जाणाच्या रोग्यांनी जसे त्यांच्या आडनावाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यायला हवा तसाच आजचा सुधारकच्या वाचकांनी त्यामध्ये लिहिणाच्या लेखकाच्या नावाकडे दुर्लक्ष करावे आणि प्रत्येक लेखाचा आशय समजून घ्यावा असे आमचे आमच्या वाचकांना सांगणे आहे.
आणखीही एक गोष्ट करून पाहण्याजोगी आहे ती म्हणजे आमच्या मासिकात लिहिणा-या कोणत्याच लेखकाचे नाव आणि पत्ता न लिहिणे आणि वर्षाअखेर किंवा आणखी काही कालावधीनंतर त्या त्या लेखाचे श्रेय लेखकाला देणे, दैनिक वर्तमानपत्रात कोणता अग्रलेख कोणी लिहिला हे जसे वाचकांना समजत नाही आणि मागाहून त्या-त्या लेखकाची पुस्तके प्रकाशित झाल्यानंतर त्या लेखकाचे नाव प्रगट होते त्याचप्रमाणे येथेही करणे.
श्री. खिलारे म्हणतात, की आजचे वास्तव बघा, त्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल ? त्यासंबंधी आम्हाला त्यांना असे सांगावयाचे आहे की वास्तव म्हणजेच परिस्थिती, वास्तव आणि परिस्थिती या दोन गोष्टी एकच आहेत. वास्तवाप्रमाणे आपण आपल्याला घडवायचे (म्हणजे परिस्थितिशरणता स्वीकारायची) की आपल्या विवेकबुद्धीला पटेल अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी झटत राहावयाचे ? प्राप्त परिस्थितीत डॉ. कांबळे यांनी आपले आडनाव बदलायचे की डॉ. कांबळे यांना त्यांच्या आडनावासकट सर्वांनी स्वीकारायचे ? आजचा सुधारक हा नंतर दिलेल्या पर्यायाच्या पक्षाचा आहे. हाच मुद्दा निराळ्या शब्दांत विशद करण्याचा पुन्हा एकदा यत्न करतो. परिस्थितीप्रमाणे आम्ही एकएकट्याने बदलायचे की समूहशः विवेकाचा स्वीकार करायचा ? परिस्थितीप्रमाणे स्वतःला घडविल्याप्रमाणे थोडा बदल घडून येतो खरा परंतु त्यामुळे परिस्थितीत फारसा फरक घडत नाही. ह्यालाच आम्ही परिस्थितिशरणता असे म्हणत आलो आहोत.
परिस्थिती सतत एकसारखी राहत नाही. तिच्यामध्ये हळूहळू फरक पडत असतो. परंतु हा असा घडणारा बदल जाणीवपूर्वक अथवा विवेकपूर्वक घडलेला नसल्यामुळे तो पुन्हा तपासून घ्यावाच लागतो. म्हणजेच त्याची इष्टानिष्टता विवेकाच्या कसोटीवर सतत घासून पाहावी लागते.
आडनाव वाचून कोणत्याही व्यक्तीबद्दल दुरावा वा आपलेपणा वाटू नये असे म्हणता म्हणताच आज तो तसा वाटतो, ते वास्तव आहे आणि ते वास्तव जाणून घेऊन आपली धोरणे बदलायला हवी, असे उभयता पत्रलेखक जेव्हा म्हणतात तेव्हा आम्हाला त्यांच्या विधानांत एक प्रकारचा अंतर्विरोध दिसतो. त्यात अंतर्विरोधी नाही अशी खात्री होईपर्यंत आम्हाला त्यांच्या सूचना स्वीकारता येत नाहीत.
आजचा सुधारक अधिक दूर दूरपर्यंत जावा तो सगळ्यांना आपला वाटावा ह्यासाठी आपल्याला आणखी काही निराळे उपाय योजावे लागतील असे तूर्त तरी आमचे मत आहे.

पाळणाघरांची वाढ : एक अपप्रवृत्ती (२)
पाळणाघरांची वाढ एक अपप्रवृत्ती ह्या शीर्षकाचा एक स्फुटलेख आम्ही सप्टेंबर १८ च्या अंकात लिहिला. त्या आमच्या लेखात आम्ही सगळ्या स्त्रियांच्या नोक-यांना विरोध केलेला नाही. फक्त ज्या तरुण स्त्रियांना पैशाची निकड जाणवल्यामुळे आपल्या प्राणप्रिय नवजात अपत्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या इच्छेविरुद्ध नोकरया कराव्या लागतात अशा स्त्रियांचा कैवार घेण्याचा आमचा हेतू होता. तो आमचा हेतू आम्हाला बहुतेक चांगला मांडता आला नसेल. परिणाम असा झाला की आम्हाला दोन पत्रे आली. त्यापैकी एक नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित झाले आहे आणि दुसरे प्रस्तुत अंकात अन्यत्र छापले आहे. पाळणाघरात ठेवली जाणारी मुले अडीच-तीन महिन्यांच्या वयापासून अडीच वर्षांपर्यंतची असतात. मूल अडीच पावणे तीन वर्षांचे झाले की ते बालवाडीत जाऊ लागते. ह्या सुरुवातीच्या काळामध्ये मुलाला आईची अत्यंत गरज असते. इतकेच नाही तर आईलाही मुलापासून वेगळे राहण्यात मनावर सतत ताण असतो. शारीरिक त्रास वेगळेच. अंगावर पिणाच्या तान्ह्या बाळाची आणि आईची ताटातूट करून, त्या अर्भकांच्या मनामध्ये असुरक्षिततेची बीजे कायमची रोवून, आपल्या समाजाला काय मिळते हे खरोखरच एकदा पडताळून पाहण्याची गरज आहे.
महागाई फार झाली आहे त्यामुळे नवरा-बायकोला दोघांनाही नोक-या करणे गरजेचे झाले आहे असेही एक कारण ह्या संदर्भात आम्ही ऐकतो. पण हे कारण खोटे आहे, स्वतःची समूहशः फसवणूक करणारे आहे, असे आमचे असलेले मत अजूनही बदललेले नाही. देव आहेच असे मानून आम्ही जशी आमची समूहशः फसवणूक करतो, तसाच हा प्रकार! आमचा समाज परिस्थितिशरण असल्यामुळेच आम्हाला ह्या समस्या सोडविता येत नाहीत. संपूर्ण समाजाने एक निर्णय केल्यानंतर त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. निदान ह्या विसाव्या शतकाच्या अखेरीला अथवा एकविसाव्या शतकाच्या प्रारंभाला तरी ती अजिबातच अशक्य नाही असे आम्हाला येथे सांगावयाचे आहे, ठामपणे आणि निःसंदिग्धपणे सांगायचे आहे. (स्वीडनमध्ये आपल्या तान्ह्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी स्त्रियांना किंवा पतिपत्नींना मिळून किमान ७ महिन्यांची भरपगारी रजा देण्यात येते.)
ज्या महागाईला तोंड देण्यासाठी तान्ह्या बाळांच्या आया धडपडत नोकरीवर जातात त्या महागाईची कारणे चार असू शकतात.
१) बाजारात मालच नसतो आणि जो माल आहे तो आपल्याचकडे यावा अशा विचाराने जेव्हा ज्यांच्याजवळ पैसा आहे असे लोक स्पर्धा करतात तेव्हा त्या वस्तू महाग होतात. अशी टंचाई बहुधा अस्मानी आपत्तीमुळे खाद्यपदार्थांची होते. (उदा. सध्याचे कांद्याचे भाव) बाकीच्या महागाईची कारणे मानवनिर्मित आहेत.
२) बाजारात पैसा फार जास्त झाला आणि त्या बेताने आम्ही उत्पादन (सुखसोयींच्या वस्तूंचे) वाढू दिले नाही तर (म्हणजे साठेबाजी न करता कृत्रिम टंचाई करून ही महागाई होते.). अधिक उत्पादन करणे शक्य असून नफ्याचे प्रमाण कायम अथवा वाढते ठेवण्यासाठी ते मुद्दाम कमी ठेवलेले असते. पंधरावीस वर्षांपूर्वीची स्कूटर्सची परिस्थिती येथे आठवावी. स्कूटर्सचे उत्पादन महागाईच्या ह्या प्रकारात मोडते.
३) तिसरा प्रकार साठेबाजीचा. बाजारात माल भरपूर परंतु तो विकताना व्यापायाने हात आखडता ठेवून निर्माण केलेली (उत्तर भारतातल्या सध्याच्या मिठासारखी) महागाई.
४) आणि चौथा महागाईचा प्रकार असा की त्यात मालाची कमतरता असण्याचे कारण नाही परंतु आपल्या मनावरच्या पूर्वसंस्कारांमुळे घडलेला, अधिक श्रमांना कमी मोबदला देण्याचा आमचा प्रघात हा ह्या प्रकारच्या महागाईला कारणीभूत होतो. ह्यामध्ये घरबांधणीचा आणि इतर अनेक सुखसोयीच्या वस्तूंचा समावेश होतो. म्हणजे घरामधल्या, मुख्यतः स्त्रियांचे श्रम वाचविणा-या आणि गेल्या वीस-पंचवीस वर्षांतच सहजपणे उपलब्ध झालेल्या साधनांचा समावेश ह्यात होत असतो. (त्यांची नामावली येथे देण्याचे कारण नाही तरी उदाहरणादाखल कपडे धुण्याचे यंत्र, रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन वगैरे.) ह्या वस्तूंच्या किमती आणि मध्यम वर्गातल्या पुरुषांना मिळणारे पगार ह्यांचे काही प्रमाण, त्या संबंधीचे ‘काही ठोकताळे, आमच्या डोक्यांत पक्के बसलेले आहेत. म्हणून जी कामे आपल्या देशातल्या पुरुषांना सहज करता येतील ती करण्यासाठी इतकेच नव्हे तर पुरुषांच्या श्रमांच्या मोबदल्यात दिलेल्या पारिश्रमिकांमध्ये संपूर्ण घरखर्च सहज भागू शकेल इतके (पुरेसे) पारिश्रमिक देणे आम्हाला शक्य असताना आम्ही त्यांच्या स्त्रियांनाही त्यांच्या तान्ह्या मुलाला पाळणाघरात ठेवावयाला लावून व्यर्थ शिणवीत आहोत, हा मुद्दा आम्हाला त्या स्फुटामधून स्पष्ट करावयाचा होता.
आपल्या संपूर्ण समाजाने देशामध्ये निर्माण होत असलेल्या आणि होऊ शकणाच्या सगळ्या संपत्तीचे हिस्से किती आणि कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावयाचे ? त्या संपत्तीमध्ये सगळ्यांचा हिस्सा आहे हे आम्ही मान्य करायचे की नाही, आणि प्रत्येकाला त्याचा हिस्सा तो जितकी मेहनत करू शकत असेल त्याच्याच मोबदल्यात मिळणार की नाही हे आपण पाहिले पाहिजे, ह्याकडे आम्हाला त्या स्फुटाच्या आधारे आमच्या वाचकाचे लक्ष वेधावयाचे होते. ते आमचे कार्य सिद्धीस गेले नाही. निदान आमचा हा मुद्दा स्त्रियांच्या लक्षात आणून देण्यात आम्ही कमी पडलो हे आम्हास मान्य केले पाहिजे. लहान मुलांना जसे कामाला लावणे गैर तसेच तान्ह्या बाळांच्या आयांना कामाला लावणे गैर. आम्ही कोण्या दुस-या। देशाचे गुलाम नाही. आम्ही परिस्थितीचे गुलाम आहोत. आणि ही परिस्थितिशरणता आम्हाला शक्य तितक्या लवकर हटवायची आहे. त्यांनी केलेल्या उत्पादनांवाचून देशाला आपला गाडा हाकता आलाच पाहिजे!
स्त्रियांची आज होते तशी फरफट जन्मोजन्मी व्हावी असे आमच्या उभय पत्रलेखिकांना वाटत नसावे. आपल्या तान्ह्या बाळाला घरी टाकून किंवा कोण्या तिन्हाईताच्या हाती सोपवून दिवसातील अकरा-बारा तास दूर राहण्याचे त्यांना भूषण वाटत असावे असेही आम्हाला वाटत नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना तसे करणे भाग पडते असेच त्यांचे म्हणणे असावे. फक्त प्राप्त परिस्थिती कोणत्या दिशेने बदलावी ह्याविषयी त्यांचा आमचा मतभेद कोठे-कोठे जाणवतो तो देखील ह्या आमच्या खुलाश्यानंतर आता नष्ट झाला असेल अशी आम्हाला आशा वाटते. आणखी काही खुलासा हवा असल्यास तो अवश्य मागावा.
आणखी काही म्हणजे २५-५० वर्षांनंतरची स्त्री डोळ्यापुढे आणल्यानंतर तिच्या सुखसोयींमध्ये कोणती भर पडावी आणि त्यापैकी काही तिला आजच मिळू शकतील काय असा काहीसा विचार ते स्फुट लिहिताना आमच्या मनात होता आणि आम्हाला हवा तसा भाविकाळ आम्हालाच सर्वांना मिळून घडवायचा आहे असेही आम्हाला त्यातून सुचवावयाचे
होते.

पुन्हा एकदा बेरोजगारी
‘प्रवाही’ ह्या मासिकाचा ऑक्टोबर ९८ चा अंक ‘बेरोजगार विशेषांक’ म्हणून प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये गरिबी आणि बेरोजगारी या दोन गोष्टी एकत्र नांदतात इतकेच नव्हे तर बेरोजगारी हटली की गरिबी हटेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. हा त्यांचा विश्वास अनाठायीं तर नाही ना अशी आम्हाला शंका येते म्हणून गरिबी म्हणजे काय ? बेरोजगारी म्हणजे काय? त्यांचा एकमेकांशी संबंध काय? ह्या गोष्टी आपल्याला तपासून पाहायच्या आहेत.
समाज सर्वांना रोजगारी देण्याचा प्रयत्न करतो तो अशासाठी की कोणी आयते बसून खाऊ नये आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या उत्पन्नामध्ये भर पडावी.
हा विचार कितीही चांगला असला तरी औद्योगिक क्रांतीनंतर ह्या बेरोजगारीच्या प्रश्नाचे सगळे संदर्भ बदलले आहेत, हे आपण कोणीच लक्षात घेत नाही.
औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनाच्या पद्धतीमध्ये जो विलक्षण फरक पडला आहे त्यामुळे गरिबीचा आणि रोजगारीचा संबंधच राहिलेला नाही. आज रोजगार देण्यासाठी जी कामे काढली जातात. उदा. खडी फोडणे, रस्ते वा नहर बांधणे ही उन्हातली आणि अंबर चरख्यावर सूत काढण्यासारखी सावलीतली, त्यांच्या योगाने आपल्या देशाच्या उत्पादनात भर पडत असलीच तर ती अतिशय नाममात्र आहे. नगण्य आहे. जे उत्पादन यंत्रांना सहजपणे करता येईल, जी कामे थोड्याश्या मानवी हातांनी करता येऊ शकतील ती करण्यासाठी पुष्कळ मोठे हात गुंतवून ठेवण्यापलीकडे अशा प्रकारच्या रोजगारांना अर्थ नाही.
आज रोजगाराने गरिबी मिटेल अशी खात्री नाही. गरिबी नसणे म्हणजे कसाबसा निर्वाह चालविणे (subsistence) नव्हे तर निर्वाह होऊन राहणीमानात थोडी भर पडणे. ही जी सगळ्यांच्या राहणीमानात वाढ होऊ शकते ती उपभोग्य वस्तूंच्या वाढत्या प्रमाणातल्या उत्पादनामुळेच. हे उत्पादन वाढते ठेवण्यासाठी पूर्वी असलेली वाढत्या मानवी श्रमांची गरज औद्योगिक क्रांतीनंतर अजिबात नष्ट झाली आहे हे जसे एका बाजूला खरे आहे तसे दुस-या बाजूला ज्यांना पूर्वी पुरेसे मिळत नव्हते त्यांना ते देण्याच्या आड मानवी मत्सर येतो हेही अगदी खरे आहे. अभावाकडून संपन्नतेकडे जाण्याची प्रत्येकाची इच्छा असली तरी दुस-यांचे वाढते राहणीमान आम्हाला बघवत नाही. त्यातल्या त्यात जे देश नुकतेच असुरक्षिततेतून सुरक्षितता प्राप्त करीत आहेत अथवा त्या दिशेने वाटचाल करीत आहेत त्यामध्ये ह्या मत्सराचे प्रमाण फारच जास्त दिसते. ज्या देशांनी एखाद्या शतकापूर्वीच ही सुरक्षितता प्राप्त केली आहे त्या देशांमध्ये असुरक्षितताजन्य मत्सर कमी दिसतो इतकेच नव्हे तर त्या निर्मत्सर किंवा अनसूयवृत्तीमुळे तेथे भांडवलशाही समाजरचना असली तरी समानता अधिक
आढळते.
मांडावयाचा मुख्य मुद्दा असा की आपल्यासारख्यांच्या देशांत रोजगार कितीही वाढविला तरी त्यासोबत जर पुरेसे वेतन मिळणार नसेल आणि वेतन मिळाले तरी देखील उत्पादनाची साधने जुनी पुराणी असतील, उदा. हातांनी खड़ी फोडणे, हातांनी चरखा फिरविणे तर गरिबी हटण्याची म्हणजेच निर्वाहरेषेच्या वर दरिद्री लोक उठण्याची सुतराम शक्यता नाही.
समाजाच्या सर्व थरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. ती भावना निर्माण करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून सर्वांचा अन्नप्राप्तीवरचा हक्क आपण मान्य केला पाहिजे. इतकेच नव्हे तर कुठल्याही कष्टांशिवाय, काम न करता सुद्धा, प्रत्येकाला अन्न मिळेल अशी व्यवस्था केली पाहिजे. सुरक्षितता-भावनेचा पुढचा टप्पा म्हणून प्रत्येकाला चांगले घर देण्याची जबाबदारीही आपल्या संपूर्ण समाजाने उचलली पाहिजे. संपूर्ण समाजाचे न्यूनतम राहणीमान ठरविणे आणि प्रत्येकाला ते प्राप्त होईल ह्यासाठी तितके उत्पादन करून त्याचे चोख वाटप करणे म्हणजे गरिबी हटविणे होय. ह्या अशा प्रकारे गरिबी हटविण्यात कोणाला रोजगार आहे वा नाही ह्याकडे दुर्लक्ष करणेच इष्ट होईल. किंबहुना गरिबी हटविण्यासाठी रोजगाराची आणि गरिबीची फारकतच करावी लागेल.
एक मुद्दा राहिला. आज कोणत्या रोजगाराला किती मोबदला मिळणार हे आम्ही आमच्या मनाशी पक्के ठरवून टाकले आहे. ते आम्ही परिस्थितीतून शिकलो आहोत आणि ही स्थिती जोवर कायम आहे तोपर्यंत सेवाक्षेत्राकडे लोकांचा ओढा कमीच राहणार आहे. आजवर सेवाक्षेत्राला कमी मोबदला देण्याचा आणि जे अनन्यगतिक आहेत त्यांनाच त्यामध्ये प्रवेश देण्याचा आपला प्रघात आहे. त्यामुळे शाळेतले शिक्षक आणि दवाखान्यातले कर्मचारी बनण्याची कोणा लायक माणसाला इच्छा नसते. स्वेच्छेने त्या क्षेत्रात प्रवेश करणा-यांची संख्या हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी असावी. प्रत्येकाला अगदीच समान जरी नाही तरी एकमेकांच्या जवळपासचे वेतन मिळाल्याशिवाय लायक मंडळी आपापल्या आवडीच्या कार्यक्षेत्रात स्वेच्छेने प्रवेश करणार नाहीत. आणि असे जोवर होत नाही तोवर आपल्या सेवांचा दर्जा सुधारणार नाही.
ह्या बाबतीत आणखी एक पथ्य पाळणे जरूर आहे. ते म्हणजे ही जी सुरक्षिततेची जाणीव करून द्यावयाची ती एखाद्या राजकीय पक्षाचे धोरण (उदा. तेलुगुदेशमने केलेली तांदळाची भावघट) म्हणून करण्यात येऊ नये. त्याबाबतीत सभा घेऊन, लोकजागरण करून पूर्ण देशाचे धोरण म्हणून – देशात सर्वत्र ती केली पाहिजे. नाहीतर अशा कृतीचे परिणाम इष्ट होणार नाहीत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.