ऊर्जा म्हणजे निसर्गातल्या शक्तीचेच एक रूप आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये. उष्णता, वीज, पाण्याचा साठा हे ऊर्जेचे अविष्कार आहेत. ऊर्जेचा संचय (concentration) जर प्रमाणाबाहेर होऊ लागला तर ती विध्वंसक आणि प्रलयकारी होऊ शकते. त्यासाठी तिचे विरेचन किंवा नियमन होणे आवश्यक असते. उष्णता प्रमाणाबाहेर वाढली तर तिच्या भक्ष्यस्थानी काय काय पडेल ते सांगता येत नाही. नद्यांना पूर आले किंवा धरणे फुटेपर्यंत पाणी साठले तर हाहाकार होतो. तसाच प्रकार विजेच्या लोळाचा! ऊर्जेचे विरेचन (वाटप) होऊन प्रलय टळण्यासाठी जी प्रक्रिया होते तिचाही काही निसर्गनियम आहे. जास्त उष्णतेच्या ठिकाणाहून कमी उष्णतेच्या ठिकाणी, विजेच्या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे किंवा उच्च पातळीवरील पाण्याच्या साठ्याकडून कमी पातळीकडे त्या त्या ऊर्जेच्या प्रवाह चालू होऊन ऊर्जेचे नियमन होते. याला मानवानेच काही अनैसर्गिकरीत्या अडथळे आणले तर तो आपल्या हातानेच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतो.
असाच नियम समाजाच्या धारणेच्या संबंधातही लागू होतो असे आपल्याला दिसते. संपत्ती ही एक प्रकारची शक्ती किंवा ऊर्जाच आहे. तिचा प्रमाणाबाहेर संचय झाला तर ती अनेक मार्गाने हाहाकार माजवू शकते. प्रथमतः तिच्यामुळे हव्यास वाढू लागतो. तिच्या शक्तीची जाणीव झाली की बुद्धी फिरते, नीती-अनीतीचा विवेक सुटतो, तारतम्य लोप पावते, समाजाच्याच नव्हे तर स्वत:च्या हिताकडेही दुर्लक्ष होते. काही व्यक्तींच्याकडील संपत्तीच्या संचयामुळे आलेली सुखासीनता पाहून इतरांना लोभ सुटतो व ते भल्या बुच्या मार्गाने संपत्ती मिळवण्याच्या उद्योगाला लागतात. अखेरीस अशा लोकांची संख्या वेगाने वाढते आणि समाजाचे व राष्ट्राचे हित समोर ठेवून वागणारांची संख्या नगण्य होते. हीच समाजाला कीड लागण्याची प्रक्रिया पूर्ण होत आल्याची स्थिती आहे. मला वाटते भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात आम्ही ह्याच मार्गाने चालत आलो आहोत. त्याला कोणते नेते, कोणत्या व्यक्ती, कोणते पक्ष जबाबदार आहेत याचा खल करणे म्हणजे आणखी वेळ दवडणे आहे.
यासाठी निसर्गनियमानुसार “संपत्तीच्या ऊर्जेचे समाजात विरेचन कसे होईल त्याचा शोध घ्यावा लागेल. समाजातील व्यक्तींना देण्याची सवय व्हायला हवी. आपल्या आधी दुसन्याचा विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागायला हवी. हे सर्व आज हवेतील आणि व्यासपीठावरील शब्द वाटतील. पण माणूस घडविण्याची प्रक्रिया स्वातंत्र्यपूर्वकाळातील नेत्यांनी चालू ठेवली होती. महात्मा गांधींनी ती बरयाच प्रमाणात प्रगत अवस्थेत नेली. त्यांनी आपले सहकारी, देशांतील विविध प्रांतातील नेते आणि त्यांच्याद्वारा मोठ्या प्रमाणात सामान्यजनक अशा सर्वांना नैतिकतेची आणि उच्च चारित्र्याची शिकवण दिली.
गांधीजी स्वतः अकिंचन होते. पण त्यांनी उगाच पैसा आणि संपत्ती याबद्दल घृणा आणि तिरस्कार कधीही दर्शविला नाही. समाजाचे भरणपोषण पैशामुळेच होते यांची पुरी जाण त्यांना होती. एखादे पत्र लिहूनसुद्धा बिलँकडून ते एखाद्या सामाजिक कार्यासाठी हजारो रुपये उभे करीत असत. दिल्यामुळेच त्यांची संपत्तीचे विश्वस्त म्हणून तिचा विनियोग करण्याची कल्पना रुजली. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मात्र स्वतःच्या उदाहरणाने समाजापुढे आदर्श निर्माण करणारे आणि प्रभाव पाडणारे नेते कमी होत गेले. त्याचाच परिपाक म्हणून की काय संपत्तीचा संचय करण्याची प्रवृत्ती वाढत गेली, आणि त्यातूनच अनाचार आणि समाजाची आजची दुःखद आणि हताश अवस्था निर्माण झाली आहे. आणि सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे “संपत्तीच्या ऊर्जेची अनियंत्रित वाढ होत राहिली, समाजाच्या उपयोगासाठी तिचा विनियोग होणे कमी झाले (म्हणजेच तिचे नियमन कमी झाले) आणि त्यांचे प्रलयंकर परिणाम आज सर्वदूर दिसत आहेत.
त्यातल्या त्यात आशेचा किरण म्हणजे आजही लहान-लहान गटांपासून काही मोठ्या संघटनांपर्यंत अनेक वाटांनी समाजघटकांचे चारित्र्य घडवण्याचे आणि समाजाच्या वर देशाच्या हिताचे सतत भान ठेवण्याचे शिक्षण देणारे कार्य चालू आहे आणि ते वाढत असल्याचे व त्याला यश येत असल्याचे दिसत आहे. विविध प्रकारच्या तत्त्वज्ञानांचा खल, वादविवाद, चर्चा आणि सभा हे सर्व वरवरचे उपाय आहेत. त्यांच्या बरोबरीने आम समाजाचे मानस घडविण्याचे काम एकास एक, एकास दहा अशा ठोस प्रमाणावर सातत्याने चालू राहणेच परिणामी यशोदायक ठरणार आहे. त्यातून व्यक्तीपेक्षा समाज मोठा ही भावना रुजावी आणि समाज जगण्यावरच व्यक्तीचे अस्तित्व पूर्णपणे अवलंबून आहे हे लोकमानसात ठसावे. यात जेवढे यश मिळत जाईल तेवढे लोककार्याला यश येत जाईल.