भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासूनच ते शिक्षणपद्धतीत किंवा त्याच्या आशयात फरक करणार अशी चिह्न दिसत होती. उत्तर प्रदेशात कल्याणसिंग यांच्या सरकारने त्या दिशेने काही पावले पूर्वी टाकली होती. शिक्षणविषयक धोरण ठरविणे हे कोणत्याही एका पक्षाचे कामच नव्हे. राजकीय पक्षांचा अधिकार ज्यावर चालणार नाही अशा एखाद्या स्वायत्त मंडळाकडे हा विषय सोपविण्यात आला पाहिजे. राज्य कोणत्याही पक्षाचे असो, शिक्षणाच्या धोरणात बदल करून चालणार नाही असे देशाने ठरविले पाहिजे. नाहीतर दहा-पंधरा दिवसांसाठी एखाद्या पक्षाचे सरकार येणार आणि ते धोरण बदलणार ! भाषेतील व्याकरणाचे नियम जसे पुन्हा पुन्हा बदलता येत नाहीत, त्याप्रमाणे शिक्षणाचे धोरणसुद्धा राज्यकर्त्या पक्षाच्या लहरीवर सोडता येत नाही.
अलिकडे सरस्वतीवंदना म्हणण्याच्या प्रश्नावर आणि आध्यात्मिक शिक्षण देण्यासंबंधी जे वादळ झाले त्यामुळे ह्या प्रश्नाची दखल घेणे गरजेचे झाले आहे.
अध्यात्मशिक्षण किंवा राष्ट्राची अस्मिता व एकात्मता जागवणारे ‘राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज डॉ. मुरली मनोहर जोशी यांना का जाणवली हे एक कोडेच आहे. स्वातंत्र्याच्या गेल्या ४८-४९ वर्षांच्या काळात कुठल्याही प्रकारचे राष्ट्रीय शिक्षण जनतेला मिळाले नसताना भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष इतक्या मोठ्या संख्येने निवडून येतो ह्याचा अर्थ वेगळ्या ‘राष्ट्रीय शिक्षणाची गरज नाही असा होत नाही काय ? पण ते असो. मुळात नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण हा शाळेमध्ये शिकविण्याचा एक विषय होणे हे कितपत योग्य आहे?
नैतिक शिक्षण वा मूल्यशिक्षण हा भाग भाषाविषयातून, त्यासाठी नेमलेल्या वेगवेगळ्या धड्यांतून, सुचवला जात असतो. सगळ्या साहित्यामध्ये, निदान पाठ्यपुस्तकात अंतर्भूत झालेल्या साहित्यामध्ये, तो अनुस्यूत असतोच.
प्रत्येक धड्यापासून विद्यार्थ्यांनी काहीतरी धडा घ्यावा ह्यासाठीच तर त्याचा अंतर्भाव पुस्तकात केलेला असतो. वेगळे नैतिक शिक्षण देण्याची गरज शिक्षणसमित्यांना का वाटावी हे कळायला मार्ग नाही. कोणत्याही विषयाची सक्ती विद्यार्थ्यांना केल्यामुळे तो विषय नीरस होतो. परीक्षेपुरताच शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल होतो, किंबहुना त्या-त्या विषयामध्ये पास कसे व्हावे इतकाच विचार विद्यार्थ्यांच्या मनांत शिरतो हे शिक्षकांना इतके चांगले माहीत असते, तरीही अशा पद्धतीचा अवलंब शिक्षणक्षेत्रातील मंडळी का करतात हे समजूच शकत नाही. नीतितत्त्वांची ओळख करून देण्यापलीकडचे काही छुपे हेतू मनात असल्याशिवाय अशा आध्यात्मिक शिक्षणाचा आग्रह धरण्याचे कारण काय असू शकते ते स्पष्ट झाल्यास फार बरे होईल,
सत्य बोलावे, परस्वापहरण करू नये असे नीतिनियम सर्व धर्मांना समान आहेत आणि ते तर लहानपणापासून घरी-दारी विद्यार्थ्यांना शिकविले जात असतात. म्हणून शाळांमधून मूल्यशिक्षण, नैतिक शिक्षण व आध्यात्मिक शिक्षण हे प्रयोग शासकीय पातळीवर सर्वथा वर्ज करावे.
‘राष्ट्रीय शिक्षण’ हे सर्व धर्मांना समान असू शकते तसेच आध्यात्मिक शिक्षणसुद्धा, असा एक विचार मांडला जात आहे. आध्यात्मिक शिक्षणाची रूपरेषाच तरुणभारतच्या ८ नोव्हेंबरच्या अंकात प्रा. अ.स. जोशी यांनी मांडली आहे. त्या लेखात अध्यात्म-शिक्षणाचे पंचशील त्यांनी विशद केले आहे.
ते म्हणतात : ‘अध्यात्मशिक्षण म्हणजे नेमके काय, असा प्रांजळ प्रश्न शिक्षक, पालक, वाचक यांच्या मनात येणे मी समजू शकतो. त्यांचे संपूर्ण समाधान करणे शक्य नसले तरी स्थूलमानाने त्यांचे पंचशील सर्वांच्या विचारासाठी खालीलप्रमाणे मांडता येईल.
१) सर्वांतर्यामी-सर्वव्यापी व सर्वशक्तिमान असलेली जगचालक अशी शक्ती वा ईश्वर, यावर अविचल श्रद्धा उत्पन्न होणे!
२) सर्वगुणसंपन्न अशा ईश्वराचे प्रेषित, अवतार वा भक्त यांचे असामान्य चरित्र व अलौकिक गुण यांचे प्रेरक ज्ञान प्राप्त होणे!
३) सत्पुरुष व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महापुरुष यांच्या सच्चरित्राचे व सद्गुणांचे अनुसरण करण्याची प्रवृत्ती अंत:करणात निर्माण होणे!
४) ईश्वरप्राप्तीच्या हेतूने आचरणात आणलेल्या सद्गुणोत्कर्षाचा कुटुंब, समाज, राष्ट्र व विश्व यातील सर्व घटकांना लाभ होणे!
५) अध्यात्म व विज्ञान यांमध्ये कोणताही विरोध नसून, या दोहोत परस्परपूरकता व सामंजस्य आहे, हे सत्य मनावर बिंबवणे!’
(१) ईश्वरावर अविचल श्रद्धा निर्माण करण्याचा पहिला मुद्दा आहे तोच मुळात आक्षेपार्ह आहे. कारण तो मानवी जिज्ञासेला बंधन घालणारा आहे. मानवी जिज्ञासेचा प्रारंभ ईश्वर आहे की नाही ह्या टप्प्यापासून सुरू व्हायला पाहिजे त्याऐवजी ईश्वराचे स्वरूप कसे असेल ह्या टप्प्यापासून विचाराला सुरुवात झाल्यामुळे ह्या जगतातल्या सगळ्या मानवी व्यवहारांचे स्वरूप बदलते. त्यांचे आकलनच वेगळे होते. ईश्वर जर असेल आणि तो आहे अशी पिढ्यानुपिढ्यांची श्रद्धा असेल तर पुन्हा नव्या पिढीत ती श्रद्धा निर्माण करण्याची, त्यासाठी नव्या पिढीची मैदधुलाई करण्याची आणि हे काम शाळांनी अंगीकारण्याची गरज काय ? ईश्वराचे अस्तित्व कोणत्याही प्रकारे सिद्ध होत नसल्यामुळेच ह्या भानगडीत कोणी पडू नये, वयात येणा-या सर्व माणसांचे मन मोकळे ठेवावे याची गरज आहे. ईश्वराच्या अस्तित्वाचा आणि पाप-पुण्याचा संबंध पुढे अपरिहार्यपणे निर्माण होतो. ईश्वरप्राप्तीच्या हेतूने पुण्यकार्य आणि धर्मकार्य केले पाहिजे असे प्रत्येकाला वाटू लागते आणि त्याचा उल्लेख श्री. जोशींनी त्यांच्या चौथ्या मुद्द्यामध्ये केलाच आहे. ईश्वराच्या प्राप्तीसाठी पुण्यकार्य करणे आवश्यक आहे असे ठरल्याबरोबर व्रतपालन हे सुद्धा गरजेचे होऊन बसते. आणि निरनिराळ्या धर्मामध्ये व्रतांचे स्वरूप भिन्न असल्यामुळे (उदा. मुसलमानांसाठी रमजान महिन्यांतले रोजे आणि शैवांसाठी सोमवारचे उपास !) आध्यात्मिक शिक्षण हे धार्मिक शिक्षण (दीनी तालीम) होऊन बसते आणि आध्यात्मिक शिक्षण हे धार्मिक शिक्षण नव्हे हा दावा फोल ठरतो.
(२) ईश्वराच्या अस्तित्वाचा कोठलाही पुरावा उपलब्ध नाही आणि सर्वगुणसंपन्न अशी कोणीही मानवी व्यक्ती नाही तरी तिच्या ठिकाणी तसे आरोप करून त्यांना अवतार कल्पिणे ह्याची गरज काय ? सद्गुण आणि दुर्गुण यांतला फरक ओळखणे, सद्भुण जोपासणे आणि दुर्गुण टाळणे एवढ्याने नैतिक शिक्षण पूर्ण का होऊ शकत नाही?
(३) सत्पुरुष म्हणजे जर धर्मनिष्ठ पुरुष नसतील आणि केवळ सदाचरणी पुरुष असतील तर त्यांची चरित्रे आजच सगळ्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. राष्ट्रीय शिक्षणात किंवा आध्यात्मिक शिक्षणात त्यांचा अंतर्भाव कशाला?
(४) सण वा सदाचार यांचा अवलंब ईश्वरप्राप्तीच्या हेतूने करण्याची गरज काय ? नीतिनियम हे सर्व समाजाचे हित ध्यानात घेऊन अनुसरावयाचे असतात हेच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे. त्यांच्याप्रमाणे आचरण केल्यामुळे प्रत्येकाला जर ईश्वरप्राप्ती झाली असती तर ईश्वरावर अविचल श्रद्धा निर्माण करण्याची गरजच पडली नसती. सद्भुणोत्कर्षाचा लाभ कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या सर्वांना होणारच.
(५) अध्यात्म आणि विज्ञान या दोहोंत परस्परपूरकता आहे आणि सामंजस्य आहे हे डॉ. जोशी यांचे विधान संदिग्ध आहे आणि श्रद्धा ही विज्ञानाला मारक आहे. ह्या विषयावर आपल्या मासिकातून पुष्कळ चर्चा पूर्वी घडून चुकली आहे म्हणून त्याचा वेगळा परामर्श येथे घेण्याची गरज नाही.
डॉ. जोशी सांगतात की त्यांच्या या योजनेला नागपूर विद्यापीठातील मुस्लिम, खिश्चन, शीख, जैन या सर्व धर्मीयांनी पाठिंबा दिला. पण यात नवल ते काय ? एक तर जैन हे स्वतःला निरीश्वरवादी तत्त्वतः म्हणवत असले तरी वास्तवात ते तसे आहेत की नाहीत हा विवाद्य प्रश्न होतो, आणि मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, यांना प्रच्छन्नपणे आपल्या धर्माचे घोडे दामटता येते.
शिक्षणाचे उद्दिष्ट श्रद्धाळू माणूस तयार करावयाचा असे असू शकत नाही. ते विवेकी माणूस घडवावयाचा असेच असावयास हवे.