‘स्वतोमूल्य’ या विषयावरील माझे मत बदलले आहे हे वाचकांना कळविण्यासाठी मुद्दाम हे टिपण लिहिले आहे. चार-सहा महिन्यांपूर्वी स्वतोमूल्य विषयनिष्ठ, म्हणजे objective आहे, ते जाणणारी सारी मने, सर्व ज्ञाते, नाहीसे झाले तरी ते अबाधित राहणार आहे, असे मी मानीत असे. थोडक्यात स्वतोमूल्याविषयी मी G.E. Moore चे मत स्वीकारीत असे. मूर म्हणतो की स्वतोमूल्यवान वस्तू म्हणजे आपल्याला केवळ तिच्याखातर अभिलषणीय वाटावी अशी वस्तू, तिच्यामुळे आपल्याला हवे असलेले अन्य काही प्राप्त होते म्हणून नव्हे. आता मूरचे म्हणणे असे होते की जगातले सर्व विषयी (किंवा ज्ञाते) नाहीसे झाले तरी स्वतोमूल्यवान वस्तूचे स्वतोमूल्य अबाधित राहते. ते विषयनिष्ठ किंवा विषयिनिरपेक्ष असते.
मला स्वतःला स्वतोमूल्याची संकल्पना आजही मान्य आहे, पण त्याचे विषयनिष्ठत्व नाही. मला अनेक गोष्टी केवळ त्यांच्याकरिता हव्याशा, म्हणजे स्वतोमूल्यवान वाटतात. त्या कदाचित् किंचित्कालच स्वतोमूल्ये वाटतील, पण निदान तेवढ्यापुरती ती स्वतोमूल्ये असतील. अन्य वेळी त्यांना परतोमूल्य असू शकेल. उदा. भूक लागली असताना अन्न मला स्वतोमूल्य, म्हणजे केवळ त्यांच्या स्वतःकरिता, अभिलषणीय वाटते. पण पोट भरल्यानंतर नाही. तसेच मला जे स्वतोमूल्य वाटते ते इतरांना कदाचित् स्वतोमूल्य वाटणार नाही.
बरर्त्रड रसेल म्हणतो की आरंभी सुमारे १९१० पर्यंत आपणही good विषयी मूरच्याच मताचे होतो. पण त्या सुमारास अमेरिकन तत्त्वज्ञ सँटायना यांनी त्या मताचे खंडन करणारा एक निबंध लिहिला, आणि त्या निबंधामुळे रसेलने मूरचे मत टाकून दिले.
माझे मतांतर होण्यास प्रा. मे. पुं. रेगे यांचा एक प्रश्न कारणीभूत झाला. तो प्रश्न म्हणजे ‘अनुभववादी स्वतोमूल्याची कल्पना कशी स्वीकारू शकतो?’ सहा महिन्यांपूर्वी माझे मत मूरसारखे होते. आजचा सुधारकमध्ये अनेक लेखांतून मी ते मत मांडले होते. पण अलीकडे विषयनिष्ठ स्वतोमूल्य असू शकत नाही, स्वतोमूल्य विषयिनिष्ठच असू शकते, अशी माझी खात्री झाली आहे. आजचा सुधारकमधील गेल्या दोन-तीन महिन्यांतील लेखांत मी माझी नवी भूमिका मांडली आहे. त्यावरून माझे मत बदलले आहे हे वाचकांना कळेल असे । मी धरून चाललो होते. पण ते एकदा स्पष्टपणे सांगून टाकणे अवश्य आहे असे मला आज वाटते. स्वतोमूल्याविषयी मत बदलल्यामुळे अन्य मतांत काय फरक पडतो ते मी गेल्या दोन लेखांत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.