सध्यां जातिधर्माप्रमाणे कुणबिकीच्या आउतापैकी एक एक जातीचा कारू करतो, दुसरें दुसरीचा एवढेच नव्हे तर सनगाचे वेगवेगळाले भाग वेगवेगळाले कारू बनवितात. तेव्हां हत्यारे किंवा त्यांचे भाग बनविणारा एक, जोडणारा दुसरा आणि वापरणारा कुणबी तिसरा असली तन्हा होते. त्यामुळे त्यांतली व एकमेकांच्या ध्यानात येत नाहींत व सर्वच आउते अगदी निकृष्ट अवस्थेत पोहचली आहेत. परस्परावलंबी धंदे शाळेत शिकविले तर हत्यारें एकाच्या देखरेखीखाली तयार होऊन ती सुधारतील, आणि सध्यां नजरेस पडणारे तुटपुंजे कारखाने बघून त्यांच्या जागी मोठ्या प्रमाणावर धंदे काढण्याची व चालविण्याची अनुकूलता कारागिरांना येईल. जोडा कोठे लागतो हे वापरणाराला तेव्हांच कळते ह्या न्यायाने आऊते वापरणाच्या कुणब्याला जर त्यांतील नजर आली तर तो त्यांतले दोष काढून टाकण्यासाठी शक्य तितके प्रयोग करून पाहील, आणि सुधारलेली हत्यारें तयार करील. जातिबाह्य धंद्यांचे शिक्षण सर्व जातींच्या मुलांना सर्रास प्राथमिक शाळांतून मिळू लागले तर जातिधर्माची अथवा जातधंद्याची कांटेरी कुपाटी नाहीशी होईल, हा सर्वात मोठा फायदा आहे.