पत्रव्यवहार

राजेंद्र व्होरा यांच्या आगरकरांविषयीच्या टीकेस आपण प्रत्युत्तर देणे आवश्यक होतेच का? व्होरा यांचे आगरकरांच्या लिखाणाविषयीचे निरीक्षण आपण अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे, त्यांचा निष्कर्ष आपणास मान्य नाही. पण आगरकर हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असले तरी त्यालाही मर्यादा असल्यास हरकत नसावी.
– मधुकर देशपांडे
३ राज अपार्टमेंटस्, ४४/१
शिवदर्शन चौक, विद्यानगरी, पुणे ४११००९

संपादक,
आजचा सुधारक
आपल्या मासिकाचा मी नुकताच वर्गणीदार झालो आहे. मागील १०-१५ अंक मागून घेतले होते तेही माझ्याजवळ आहेत. सहज अंक चाळून पहात असता मला काही विचार सुचले ते आपल्यापुढे मांडत आहे. आपण जाहिरातीच्या विरोधात आहात आणि देणग्याही स्वीकारणार नाही असे धोरण ठेवणार. मग ज्यांना “आजचा सुधारक’ समाजापुढे जास्ती यावा असे वाटते त्यांनी प्रचार कसा करावा? या मासिकाचा वर्गणीदार म्हणजे कोणी नगण्य, क्षुद्र गबाळ्या नाही. तो नवा विचार करणारा, धिटाईने समाजापुढे मांडणारा एक माणूस आहे. निदान एवढे तरी त्याला सांगू द्या. यालाही एक धाष्ट्र्य लागते अशी आज परिस्थिती आहे. तेव्हा मी आपणास सुचवितो की आपण एक प्रकारचे बिल्ले (medals badges) करावे की ते कोटावर, बाहीवर अगर टोपीवर लावता येतील. त्यावर ‘‘आजचा सुधारक – Rationalist’ असे कोरलेले असावे. आपल्या सर्व वर्गणीदारांस असे बिल्ले पुरवावे. सहानुभूतिदार, समविचारी, साहाय्यक, जो कोणी सहकार्य करू इच्छितो त्याने नेहमी हा बिल्ला लावून हिंडले पाहिजे. – पहा तरी काय परिणाम होतो तो!
श्री. वा. किर्लोस्कर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.