बहुतेक शाळांमध्ये विज्ञान हा विषय फक्त व्याख्यानांच्या रूपात शिकविला जातो. शिक्षकांनी व्याख्यान द्यावे आणि मुलांनी ते ऐकावे हीच पद्धत वापरली जाते. प्रयोगातून विज्ञान क्वचितच शिकविले जाते. आणि ज्या थोड्या शाळांत प्रयोग केले जातात तेही फक्त शिक्षकाने तीस चाळीस (किंवा जास्तच) मुलांना एकदा करून दाखवायचे आणि सर्वांनी ते पाहायचे असा प्रकार असतो. विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करून पहाता येत नाहीत. वर्गातील विद्यार्थी संख्या, विज्ञान-तासिकेत असणारा वेळ, वर्षातील सुट्यांची संख्या हे सर्व पाहता उत्साही शिक्षकालाही फारसे वेगळे करता येत असेल असे वाटत नाही. अशा नीरस पद्धतीमुळे मुलांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होणे कठीणच. प्रयोगातून मिळणाच्या आनंदापासून विद्यार्थी वंचित राहतात. त्यांना विषय अवघड वाटतो व ते विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे अधिक खरे आहे – विज्ञान विषयापासून ते दूर राहतात.
पुणे येथील विज्ञानवाहिनी या सेवाभावी संस्थेने या समस्येवरील एक उपाय म्हणून एका फिरत्या प्रयोगशाळेचा सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी उपक्रम सुरू केला. पाच ते सहा शिक्षक रोज एका ग्रामीण (शक्य तर लहान, विनाअनुदानित, जिला स्वतःची प्रयोगशाळा नाही अशा) शाळेस आपली फिरती प्रयोगशाळा घेऊन जातात. मुले काही प्रयोग शिक्षकांनी केलेले पाहतात तर काही स्वतः करून पाहतात. याखेरीज वर्षातून एक हुशार मुलांसाठी शिबीर आणि दोन किंवा तीन शिक्षक शिबिरे आयोजित केली जातात.
सुरुवातीस शाळेत पोचताच इयत्ता नववी व दहावीमधील १५ ते २० हुशार व सभाधीट विद्यार्थी निवडले जातात. शक्य तो निम्मी मुले व निम्म्या मुली असे प्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न असतो. शाळेतील मोठ्या अशा दोन किंवा तीन खोल्यांमध्ये प्रत्येकी पाचसहा अशी एकूण बारा ते पंधरा टेबले ठेवली जातात. दोन टेबलांमध्ये पुरेसे अंतर ठेवले जाते. प्रत्येक टेबलावर एकच प्रयोग ठेवला जातो. आवश्यक तेथे टेबलावर प्रयोग कसा करावा या विषयीचा माहितीपर तक्ता ठेवलेला असतो. प्रत्येक टेबलाशी निवडलेल्यापैकी दोन मुले उभी केलेली असतात. सुरुवातीच्या दीड तासात इतर विद्यार्थ्यांसाठी एक विज्ञानासंबंधी भाषण दिले जाते व त्या वेळात निवडलेल्या मुलांचे प्रयोगासंबंधी प्रशिक्षण, प्रयोगाचे स्वरूप, उपकरणे, निष्कर्ष, इ. दिले जाते. मुले स्वतः प्रयोग करून दाखवितात. पुढच्या कालखंडात ही तयार झालेली मुले शिक्षकाचे काम करतात. इतर मुलांचे दोन किंवा तीन असे गट बनवण्यात येतात. प्रत्येक टेबलाशी एक गट जातो व तेथे असलेले ‘विद्यार्थी-शिक्षक’ या गटास प्रयोगामागील तत्त्व शिकवून प्रत्यक्ष प्रयोग दाखवितात, त्यांच्याकडून प्रयोग करवून घेतात. जमेल तसे शंकासमाधानही केले जाते. या नंतर साखळी पद्धतीने गट हलतात व पुढील टेबलाशी जातात. असा कार्यक्रम एकूण दोन विभागांत सहा तास चालतो. दुस-या विभागात विद्यार्थी-शिक्षकांनासुद्धा आळीपाळीने इतर टेबलांवरील प्रयोग पहायला मिळतात. टेबलावरील दोघापैकी एक टेबल सांभाळतो व दुसरा इतर टेबलावर विद्यार्थी म्हणून जातो. सुमारे सत्तर-ऐंशी मुलांना प्रत्येकी वीस-पंचवीस प्रयोग पहायला अगर हाताळायला मिळतात. या दोन तीन खोल्यांमध्ये विज्ञानवाहिनीचे एक किंवा दोन शिक्षक कार्यकर्ते विद्यार्थी-शिक्षकांना मदतीस उपलब्ध असतात.
प्रयोगांची निवड करताना काही अभ्यासक्रमातले तर काही बाहेरचे घेऊन मुलांच्या चौकस बुद्धीला चालना देणारे असावेत असा विचार केला जातो. उदाहरणादाखल खाली काही प्रयोग दिले आहेत.
* ओहमचा नियम (R=VII) प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे पडताळून पाहणे.
* ओरस्टेडचा प्रयोग स्वतः करून निष्कर्ष काढणे.
* काचेच्या चिपेतून जाणा-या प्रकाशकिरणांचा मार्ग तपासून निष्कर्ष काढणे.
* स्थायु पदार्थांची घनता काढणे.
* न्यूटनचे गतिविषयक नियम विशद करणारे प्रयोग करून पाहणे.
* कोणत्याही वस्तूचा गुरुत्वमध्य शोधणे.
* उपलब्ध साहित्यातून घरगुती विद्युत-चुंबक बनविणे.
* लोखंडाची पूड एका पाण्याने भरलेल्या बाटलीत घेऊन त्रिमितीत चुंबकीय क्षेत्र दाखविणे.
* विद्युत्-धारा व चुंबक यांचा परस्परसंबंध अभ्यासणे.
* हवेचा दाब निरनिराळ्या प्रयोगांतून तपासून पाहणे.
* प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे ध्वनितरंगांचा अभ्यास करणे.
गेली दोन वर्षे मला या संस्थेबरोबर काम करण्याचा अनमोल असा अनुभव मिळालेला आहे. १९९५ साली मी श्रीरामपूर येथे बी.एड. चा विद्यार्थी होतो तेव्हा ही फिरती प्रयोगशाळा तेथे आली व आम्ही विद्यार्थी तिचे काम पाहण्यासाठी आमच्या प्राचार्यांबरोबर कमालपूर येथील शाळेस गेलो होतो. मला अशा प्रकारचे काम करण्याची संधी मिळाली तर किती बरे होईल’ असा विचार ती प्रयोगशाळा पाहून माझ्या मनात आला. बी.एड. संपल्यावर मी संस्थेच्या चालकांना जाऊन भेटलो व माझे स्वप्न साकार झाले. विशेष म्हणजे केवळ एका शाळेस चिकटून राहण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अनेक (आतापर्यंत सुमारे दोनशे) शाळांपर्यंत पोचण्याचा व सर्व स्तरातील विद्यार्थ्यांशी (आतापर्यंत तीस हजारांहून अधिक) संवाद साधण्याचा मला मिळत असलेला अनुभव, विज्ञानाचे प्रयोग कसे करावे याबद्दल सतत प्रयोगशील राहण्याची मिळालेली संधी व स्वातंत्र्य हा भाग मला विशेष आवडला.
गेल्या काही महिन्यांपासून माझ्या मनात चालू असलेल्या विचारांतून नुकताच एक नवा प्रयोग मला फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सध्या मला करायला मिळत आहे. त्या प्रयोगाविषयी लिहिण्यासाठी या टिपणीचा प्रपंच.
विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून पाहणे ठीक आहे, पण एकदा करून पाहण्याने त्यामागील वैज्ञानिक तत्त्व समजेल व लक्षात राहीलच असे नाही. म्हणून प्रयोग करून इतरांना दाखविणे व समजावून सांगणे असा उपक्रम वर सांगितलेला उपक्रम ‘करा, शिकवा आणि शिका’ या पद्धतीने नुकताच सुरू केला.
आतापर्यंत केवळ तीन-चार वेळाच “करा आणि शिका’ हा प्रयोग करून पाहिला पण त्याचे फायदे लगेच दिसून आले. पारंपारिक व कंटाळवाण्या व्याख्यानपद्धतीला फाटा देऊन मुले स्वतःच प्रयोग करून पाहतात व विज्ञानाचे तत्त्व शिकतात हा तर फायदा आहेच. पण प्रयोग करताना काही वेगळे केले तर काय फरक पडतो व का? या प्रश्नाचे उत्तर काढायला मुले आपोआप शिकतात. प्रयोग बरेच वेळा करून प्रयोग कौशल्य वाढते आणि तो करून दाखवीत असताना द्याव्या लागणाच्या स्पष्टीकरणात दर वेळी नेटका बदल झालेला व विद्याथ्र्यांची समज पक्की व्हायला मदत होते. प्रयोग करण्याबद्दलची भीती नाहीशी होणे, सभाधीटपणा वाढणे, आयत्या वेळी विचार करण्याची क्षमता वाढणे व स्वतःविषयी आत्मविश्वास निर्माण होणे हेही फायदे दिसून आले. आपल्या मित्रांशी हसतखेळत विज्ञान शिकणे व त्यातून आनंद मिळविणे मुलांना छान जमले असे आढळून आले.