ब्राह्मणेतर समाजवर्ग व आजचा सुधारक – एक प्रतिक्रिया
आजचा सुधारकच्या ऑगस्ट १९९८ च्या अंकात प्रभाकर नानावटी व टी.बी. खिलारे ह्या दोघांनी मिळून लिहिलेला पत्रस्वरूपाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. आजचा सुधारकची एक वाचक म्हणून (संपादक मंडळातील एक म्हणून नव्हे !) मला ह्या लेखकद्वयासमोर काही मुद्दे विचारार्थ मांडावेसे वाटतात म्हणून हा पत्रप्रपंच!
आजचा सुधारकचे वाचक ‘ह्या’ दृष्टिकोनातून अंक वाचतात ह्याचा खेद झाला. एकीकडे आठ वर्षांची वाटचाल पूर्ण केली ह्याबद्दल अभिनंदन करून तसेच त्यातील लेखन ‘रूढ अर्थाने ब्राह्मणीवृत्तीला पोषक आहे असा आरोप कोणीही करण्यास धजवणार नाही’ असा निर्वाळा देऊन दुसरीकडे मात्र आजचा सुधारक ह्या मासिकात लिहिणारे व ते वाचणारे केवळ उच्चजातीय आहेत’ हा अर्थ काढायचा ह्या वृत्तीचे आश्चर्य वाटले.
मला विचारार्थ मांडावयाचे मुद्दे असे –
(१) आडनावावरून जात ओळखण्याची प्रवृत्ती कितपत योग्य आहे? खिलारे सारख्या पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणा-या व्यक्तींच्या बाबतीत तर ती खासच चुकीची आहे असे म्हटले पाहिजे. हे रूढ़ पायंडे आम्ही मोडणार आहोत की आणखी पक्के करणार आहोत? (‘कळू न शकलेले’ या वर्गात आडनावावरून जात लक्षात न आलेल्यांचा समावेश आहे. यावरून तरी ही प्रवृत्ती घातक आहे हे लक्षात घ्यायला हवे होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करतानाच अशा त-हेच्या प्रवृत्तींचे स्वतःमधून तसेच इतरांमधून उच्चाटन करायला हवे.)
(२) आगरकरांवर आजही शंभर वर्षे उलटून गेली तरी ते ‘ब्राह्मणी सुधारक’ होते हा ठपका ठेवला जातो. उण्यापुच्या एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सुधारणेचा जो असामान्य पल्ला गाठला त्याकडे लक्ष न देता ते ब्राह्मणी सुधारक होते हे म्हणणे कृतघ्नपणाचे नाही का? आणि आपण हा विचार का नाही करीत की ते ज्या वर्गाचे होते त्याच्या अडचणी त्यांना तीव्रतेने जाणवल्या असतील व त्या दूर करण्यासाठी त्यांनी तळमळीने प्रयत्न केले असतील. त्यामुळे ते लगेच ब्राह्मणी सुधारक ठरतात का?
महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचे सुधारक, आंबेडकर दलित समाजाचे सुधारक, अशी समाजसुधारकांची जातीनिहाय वर्गवारी करण्यात आपण कुठेतरी मुळात चूक करीत आहोत असे नाही का वाटत? समाजसुधारक हा कोणत्याही एका समाजाची संपत्ती नसतो. तो समाज ‘व्यापक’ अर्थाने डोळ्यांसमोर ठेवूनच काम करतो.
(३) ‘ब्राह्मणेतर समाजातील’ (हा शब्द पत्रलेखकांचा) बुद्धिवंत, वैचारिक लेखन करणा-यांच्या लेखांचे आजचा सुधारक मध्ये स्वागतच आहे. परंतु त्यांनी असे लेखन करायला हवे व आजचा सुधारक कडे पाठवायला हवे. सुरुवातीपासून आजचा सुधारक ह्या उपक्रमाशी जोडलेल्या ह्या पत्रलेखकांची जर त्याकडे पाहण्याची ‘ही’ दृष्टी असेल तर इतरांबद्दल काय बोलावे? इतर व्यक्ती अनुभव न घेताच ह्या प्रकल्पापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा संभव नाही का?
आजचा सुधारक हे ‘विशिष्ट वर्गाची मक्तेदारी व त्यांची बौद्धिक निकड भागवणारे नियतकालिक होऊ नये’ ही जर ह्या पत्रलेखकांची खरी तळमळ असेल तर त्यांनीही त्या दिशेने प्रयत्न करायला हवेत.
(४) लेखांचा दर्जा, गुणवत्ता, नेमकेपणा, सूत्रबद्धता’ ह्याचा आग्रह टोकाचा होणार नाही ही काळजी घ्यायला हवी, पण तो टाकून देता येणार नाही. आजचा सुधारकने तो सुरुवातीपासून घेतलेला वसा आहे. कसोटीला उतरणाच्या कोणत्याही लेखांचे, कोणीही लिहिलेल्या लेखांचे आजचा सुधारक मध्ये स्वागतच आहे.
सरतेशेवटी एकच महत्त्वाची गोष्ट ह्या पत्रलेखकांना सांगावीशी वाटते ती ही की आज शंभर वर्षे उलटल्यावरही आगरकरांवरील ब्राह्मणी सुधारक हा ठपका धुऊन निघाला नाही त्याप्रमाणे यदाकदाचित् जर आजचा सुधारक इतिहासजमा झाला (तो तसा होणार नाही ह्याची काळजी आपण सर्वजण घेऊच) तर ह्या वैचारिक नियतकालिकावर ते ब्राह्मणी समाजासाठी होते हा ठपका कोणी ठेवू नये व तो ठेवण्यास कारणीभूत होईल असे लेखन कोणी करू नये.
सुनीती नी. देव
कर्मयोग, बलराज मार्ग, नागपूर-१२
[लेखकद्वयाच्या सद्धेतूविषयी आमची पूर्ण खात्री असल्यामुळे हा विषय ह्या एका उत्स्फूर्त प्रतिक्रियेनंतर थांबविण्यात येत आहे. – संपादक
संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन नको
संपादक, आजचा सुधारक यांस
श्रीमती ललिता गंडभीर यांचे जून १९९८ च्या आजचा सुधारक मधील पत्र वाचले. माझ्या एका मित्राने यु.पी. मधील सांगितलेल्या किश्शाची आठवण झाली –
एक ठाकूरसाहेब झोपाळ्यावर मजेत बसले आहेत. दोनचार नोकर त्यांची सेवा करताहेत–पाय दाबणे, डोक्याला तेलमालीश इ. इतक्यात त्यांचा माळी ताजी भाजी लगबगीने घेऊन येतो. ठाकूर आश्चर्यचकित होतात. इतक्या लवकर ताजी भाजी आणि तीसुद्धा आपला माळी आणतोय? ते त्याला हटकतात. “भाजी कुणी दिली”? माळी मान खाली घालून सांगतो “जी साहेब ही तर आपल्या नव्या सूनबाईंनी स्वतः मेहनत करून आपल्या परसात लावलीय’ “काय? बोलाव सुनबाईंना. आणि भाजी इथेच ठेव.” सुनबाई येतात त्यांना ठाकूर बजावतात–“सुनबाई, असा दुस-याच्या पोटावर पाय आणायचा उद्योग पुन्हा करू नका. चार लोक भाजी विकून आपलं पोट भरतात त्यांच्या तोंडचा घास का काढता? वेळ जात नसला तर बाजारहाट करा, चार दागिने घडवून घ्या, कितीतरी उद्योग आहेत, माळी ती भाजी फेकून दे.”
१९५० च्या सुमारास माझे चुलते कामानिमित्त राजस्तानात गेले होते, एका बड्या पूर्वीच्या सरदाराकडे व हल्लीच्या उद्योगपतीकडेच मुक्काम होता. जेवणाची पद्धत अशी
एका मोठ्या तीनफूट व्यासाच्या-चांदीच्या ताटात पदार्थ वाढून घ्यायचे आणि जेवायचे. काकांनी पाहिलं अती आग्रहाने वाढण होत होते आणि लोकही वाढून घेत होते. पाहिजे तर खात होते आणि प्रचंड प्रमाणात टाकून देत होते. पानात काहीही टाकायचे नाही या संस्कारात वाढल्यामुळे काको निग्रहाने कमी वाढून घ्यायचे. दोन तीन जेवणानंतर काकांना एकटे गाठून वाढपी गयावया करू लागला, “साहेब, गरिबाला उपाशी ठेवू नका. तुम्ही ताटात जे टाकता त्यावर तर आम्ही जगतो. कृपा करून भरपूर वाढून घ्या, नाही म्हणू नका, काका भरपूर वाढून घ्यायला लागले पण संकोचून पदार्थ उष्टे होणार नाहीत याची काळजी घेत मोठ्या ताटाच्या एका कोप-यात कसेबसे जेवत. मला वाटतं हा प्रश्न संवेदनशीलतेचा आहे, अर्थशास्त्राचा नाही. पंचतारांकित हॉटेलमधे १० कोर्सचे जेवण घेत जगातील उपासमारीवरही लोक चर्चा करतातच. माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे तो त्याच्या संवेदनशीलतेमुळे. एक अळी दुसन्या मेलेल्या अळीच्या प्रेतावर बसून यथेच्छ अन्न ग्रहण करते. माणूस असे करत नाही.
रोजगारी निर्माण करण्याचे किंवा काळा पैसा बाहेर काढण्याचे अनेक मार्ग आहेत. संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन करून थाटामाटाची लग्ने लावणे हा त्यावर उपाय नव्हे.
चिं. मो. पंडित
६ ‘सुरुचि संत जनाबाई पथ विलेपार्ले (पूर्व)
मुंबई ४०० ०५७
आगरकरांची चूक नाही कशी?
संपादक आजचा सुधारक
स.न.वि.वि.
कालच आपला अंक मिळाला. पृष्ठ १४३ वर आपण म्हणता ‘जातिभेदाच्या बाबतीत त्यांची (आगरकरांची) काही चूक झाली होती असे आम्हाला वाटत नाही. त्यांच्या डोळ्यांपुढील समाज वेगळा होता. आगरकरांच्या अल्पायुष्यात जातिभेदाच्या पलीकडे जाणारा समाज निर्माण करण्याची निकड त्यांना जाणवली नसावी.’
माझ्या मते ही निकड जाणवू नये हीच आगरकरांची मर्यादा आहे. त्यांच्या आधी फुले होऊन गेले होते. आणि फुले आगरकरांना अज्ञात असावेत असे वाटत नाही.
इतकेच नव्हे तर ज्या हरि नारायण आपटे यांच्या साहित्याला आज सदाशिवपेठी साहित्य म्हणून संबोधले जाते त्यांनाही यासंबंधीची किती निकड जाणवत होती हे गांधीजींच्या पुढील उता-यावरून दिसेल.
गांधीजी म्हणतात, “दलित वर्ग ज्या दुःस्थितीत आकंठ बुडत चालला होता, त्या दुःस्थितीच्या महासागराचा स्व. हरी नारायण आपटे यांनी जसा खोलात जाऊन अनुभव घेतला होता तसा मी घेतला नव्हता, दडपणाच्या वर्गांनी दडपल्या गेलेल्या वर्गावर जे अन्यायाचे ढीग रचले होते. त्या अन्यायाच्या लज्जेने जळणा-या या सुधारकाग्रणीला मी तत्त्वज्ञाच्या शहाणपणाने प्रश्न केला की तुम्ही दलित वर्गांना आमच्या विरुद्ध उठविणार आहात की काय? तत्क्षणी चिडून उत्तर आले, ‘होय, मला जर शक्य झाले तर मी त्यांना आमच्याविरुद्ध आजच उठून बंड करायला प्रवृत्त करीन. आणि जे आम्ही राजीखुषीने आणि कर्तव्यकर्म म्हणून त्यांना देऊ इच्छित नाही ते आमच्या हातून हिसकावून घ्यायला सांगेन.’
यावरून त्या मर्यादा काळाच्या नसून व्यक्तीवल्लीच्या आकलनाच्या होत्या. माणूस मोठा होतो तो तो आपल्या काळाच्या किती पुढे होता यावरूनही. ही मर्यादा आगरकरांची होती. आपण आगरकरांच्या बाबतीत सश्रद्ध असल्याने ही मर्यादा बघू शकत नाही असे विधान केले तर ते चूक होईल का? विवेकवादीही सश्रद्ध असू शकतो एवढाच याचा अर्थ.
ब्रिजमोहन हेडा
दोन व्यक्तिमधिल पत्रमैत्रीत संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन या विषयावर चर्चा करणारी चार पत्रे लिहा