‘मी नथुराम गोडसे बोलतोय्…’ ह्या नाटकावर बंदी घालणा-यांवर सध्या टीकेची झोड उठली आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची बाजू बळकट करण्यासाठी चढाओढ लागली आहे. प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावयालाच हवे असे मानणारे आम्हीही आहोत, पण तेवढ्यामुळेच आम्हाला नथुरामची बाजू घेता येत नाही.
नथुरामने दोन गुन्हे केले आहेत असे आमचे मत आहे. त्याने गांधीजींचे प्राण घेतले म्हणजे गांधीजींचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतले हा पहिला गुन्हा आणि त्यासाठी कायदा हातांत घेतला हा दुसरा गुन्हा. गांधींचे बोलणे बंद करणे ह्या एकमेव हेतूने त्याने त्यांना मारून टाकले. गांधींनी त्याचे एकट्याचे कोठलेही नुकसान केलेले नव्हते. ते जे विचार मांडत होते त्या विचारांमुळे देशातल्या हिंदूंचे अपरिमित नुकसान होत आहे अशी त्याची खात्री पटल्यामुळे ते नुकसान टाळण्यासाठी त्याने ते हीन कृत्य केले अशी आमची माहिती आहे. एखाद्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेणे हेच त्याच्या कृत्याला हीन म्हणण्याचे कारण
आहे. नाटककार दळवींना अभिव्यक्ती नाकारून शासनाने वासरू मारले आहे. मुळात गाय मारण्याचे काम नथुरामने केलेले आहे.
अशा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे हनन करण्यासाठी एका व्यक्तीचे हनन करणा-याची म्हणजे त्याचे प्राण घेणारयाची बाजू सक्षम कोर्टाने ऐकून घेतलेली आहे, आणि प्रचलित कायद्यानुसार त्याला त्याने कायदा हातात घेतला ह्यासाठी शिक्षा झालेली आहे. आपली बाजू मांडावयाला संधी देणे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य देणे. ते कार्य कोर्टाने पूर्ण केलेले आहे
आणि नथुरामचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. त्यामुळे आता नथुरामच्या वतीने त्याचे म्हणणे पुन्हा नाटकातून मांडणे हे नथुरामने गांधींना अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाकारण्याच्या त्याच्या
गुन्ह्याचे उदात्तीकरण होऊ शकते.
‘शिवसेना-भाजप सरकारने नाटकाला परवानगी देणे आणि काँग्रेस पक्षाने त्यावर बंदी घालण्याला विद्यमान शासनाला भाग पाडणे ह्या साच्या घटना आपण पक्षहिताच्या पलीकडे जाऊन कोणताच विचार करू शकत नाही हे दाखवितात. सगळेच पक्ष त्या गुंत्यात अडकले आहेत आणि प्रत्येक पक्ष देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अडचणी निर्माण करण्यात भूषण मानीत आहेत. संसदेमध्येसुद्धा सुव्यता राखणे, प्रतिपक्षाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य देणे त्यांनी अशक्य करून टाकले आहे. सगळेच प्रश्न कायद्याचे आणि सुव्यवस्थेचे झाले की मूळ मुद्दा मागे पडतो, जसा येथे गांधींच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा!
पाळणाघरांची वाढ–एक अपप्रवृत्ति
मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये स्त्रिया नोक-या करावयाला लागल्यापासून शहरांमध्ये पाळणाघरांची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आणि मागणी तसा पुरवठा ह्या न्यायाने त्यांची उपलब्धताही वाढली. पन्नास वर्षांपूर्वी पाळणाघर (Creche) फक्त मोठमोठ्या गिरण्यांमध्ये असे. आज ते गल्लोगल्ली दिसू लागले आहे. अशा पाळणाघरांची गरज आपल्या समाजाने कमी करीत नेली पाहिजे आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे आम्हाला वाटते.
पाळणाघरांची गरज भासण्याची कारणे दोन, पहिले कारण स्त्रियांनी घराबाहेर नोक-या करणे आणि दुसरे—संयुक्त कुटुंबपद्धती ढासळणे. पूर्ण देशाचा विचार केला असता स्त्रियांच्या आणि बालमजुरांच्या श्रमांमुळे देशाच्या संपत्तीत कितपत भर पडते हा एक विवाद्य मुद्दा आहे. ग्रामीण स्त्रियांच्या श्रमांना अजून तरी पर्याय नाही. त्यांच्या निंदणाखुरपणाची कामे त्यांच्यावाचून दुसरे कोणी करू शकणार नाहीत. पण त्यांच्या मुलांसाठी पाळणाघरेही नाहीत. ह्या उलट शहरी स्त्रियांच्या वाट्याला येणारी कामे कोणत्याही पुरुषाला जमण्यासारखी आहेत. किंवा संगणित्राचा वापर जर नीट करण्याचे आम्ही शिकलो तर आज स्त्रियांचे व्यर्थ जाणारे श्रम वाचविता येतील. जे काम कोणालाच करण्याची गरज नाही त्यासाठी आपला समाज स्त्रियांना निष्कारण श्रम करावयाला लावत आहे.
कालपर्यंत स्त्रियांना जी शरीरश्रमाची कामे करावी लागत होती ती आज टळली आहेत. दळणे, कांडणे आणि पाणी भरणे ही ती कामे होत. पाणी भरण्याचे काम अजून पुष्कळ ठिकाणी शिल्लक आहे पण दळण्याकांडण्याचे काम त्यांनी करण्याची गरज आज नष्ट होऊन गेली आहे. समाजामध्ये त्या पद्धतीने बदल झाल्यामुळेच बहुसंख्य स्त्रियांची ही कामे टळली आहेत. आणखी काही वर्षांत पाणी भरण्याचे काम देखील नाहीसे होऊन जाईल. ही कामे यन्त्रांकडून करून घेतल्यामुळे स्त्रियांचा रोजगार काढून घेतला असे आज कोणी समजत
नाहीत. उलट त्या आता आपापल्या आवडीचे काम करण्यास मोकळ्या झाल्या असे मानले जाते. उद्या संगणित्रांच्या वापरामुळे आपल्या मुलांकडे जास्त लक्ष द्यावयास त्या मोकळ्या झाल्या असे चित्र समाजात दिसावे अशी आमची इच्छा आहे.
आज मुंबईसारख्या गावात लाखो मध्यमवर्गीय स्त्रिया दिवसातले अकराबारा तास घराबाहेर घालवितात आणि त्याच्या मोबदल्यात पगाराचे पाकीट घरी आणतात हे खरे असले तरी त्यामुळे त्यांना आपल्या स्वतःच्या प्रकृतीची आणि आपल्या मुलांची सर्वतोपरी हेळसांड करावी लागते. मुलांना आपल्या आईचा सहवास न घडल्यामुळे त्यांच्यामध्ये वर्तनाच्या समस्या निर्माण होतात. राष्ट्राचे चारित्र्य खालावते ही गोष्ट दुर्लक्षिता येतच नाही.
दुःख ह्याचे आहे की त्यांच्यापैकी पुष्कळांच्या–ऐशीनव्वद टक्के स्त्रियांच्या श्रमांवाचून देशाचे आता काहीच अडलेले नाही. महिलांच्या नोक-यांना मुख्यतः रेशनिंग सुरू झाल्यापासून सुरुवात झाली आणि त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आज देशामध्ये अन्नधान्य विपुल आहे. धान्याची कोठारे तुडुंब भरली आहेत. रेशनिंग चालू ठेवण्याची अजिबात गरज नाही पण ते चालूच आहे. त्याचप्रमाणे आणखीही अनेक कामे, पूर्ण देशाच्या हिताचा विचार केल्यास अनावश्यक ठरतील हे सहज लक्षात येईल. अशा कामांमधून आपल्या मुलांकडे पुरेसे लक्ष देण्यासाठी महिलांना मोकळे ठेवावे अशी गरज आहे.
बालश्रमिकांना आणि ज्यांना आपली मुले पाळणाघरांत ठेवून कामावर जावे लागते अश्या मातांना कोणत्याही परिस्थितीत कामापासून वाचविले पाहिजे.