[आ. सु. च्या ऑगस्ट ९८ च्या अंकात एका जर्मन विचारवंताने स्वतःच्या देशबांधवांना कसे खडसावले त्याचे वर्णन आहे. डेव्हिड हॅल्बरस्टॅम या अमेरिकन वार्ताहर-साहित्यिकाच्या “द नेक्स्ट सेंचुरी” (विल्यम मॉरो, १९९१) या ग्रंथातील जर्मनीसंबंधी एक उतारा या देशाबाबत आणखीही काही माहिती पुरवतो त्याचा हा अनुवाद. संदर्भ आहे, ‘सोविएत युनियनच्या फुटीनंतरचे जग’.]
या सगळ्या बदलांचा, सोविएत युनियन फुटल्याने निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा जर कोणत्या देशाला मिळायचाच असेल, तर तो जर्मनीला मिळेल. इतरांप्रमाणे मलाही वाटते की जर्मनांची शिस्त, त्यांची आर्थिक ‘ऊर्जा’, त्यांच्या अर्थव्यवहाराचे अग्रक्रम, या सा-यांमुळे ते शक्तीची आणि गतिमानतेची नवी उंची गाठतील. आजवर पश्चिम जर्मनीच्या बाजारपेठेला मर्यादा होती, जी आता ‘उठेल’. लोकसंख्यावाढीचा दर कमी असणे, (त्यामुळे) समाजात तरुणांची संख्या कमी असणे, यानेही एक मर्यादा पडत होती, जी पूर्व जर्मनीशी एकीकरण झाल्याने हटेल, पूर्व युरोप आणि जर्मनी यांच्या आर्थिक संबंधांना मोठा इतिहास आहे. गेली पंचविसावर वर्षे जर्मनी या देशांमध्ये आपले आर्थिक आणि सांस्कृतिक बीजारोपण करीत आहे. पूर्व यूरोपीय तरुणांना अमेरिकन वस्तू आवडतही असतील – स्वेटर्ज, जीन्स, रॉक संगीत, ‘प्लेबॉय’ मासिक–पण त्यांच्या देशात आर्थिक शिष्टमंडळे येतात ती जर्मन असतात कर्जे देणारी; पोलिश, झेक आणि हंगेरियन लेखकांच्या कृती प्रकाशित करणारी. सध्याच्या स्थितीसाठी जर्मनी खूप वर्षे तयारी करीत आहे.
गेली अनेक वर्षे पश्चिम युरोपीय अर्थव्यवस्था चालवणारे ‘एंजिन’ जर्मनी हे आहे. एका ब्रिटिश अर्थव्यावसायिकाला विचारले, “जर्मनीच्या वाढत्या प्रभावाची भीती नाही का वाटत? सोवियत युनियनची जागा ते घेतील अशी?” तो जरा गोंधळला, पण विचार करत म्हणाला, “भीती? नाही. त्यांची आपल्या सर्वांना किती गरज आहे, हे मात्र जाणवते.’
काही जण जर्मनीची आणि जपानची तुलना करतात. जपान्यांसारखी जर्मनांची संस्कृतीही आर्थिक दृष्टिकोन असलेली आहे. त्याहीपेक्षा ती निर्यातीसाठी उत्पादन करण्याचा दृष्टिकोन बाळगणारी आहे. जर्मन आर्थिक बाजारपेठा सशक्त, शिस्तबद्ध आणि सत्यस्थितीत रुजलेल्या आहेत. त्यांचे माणशी उत्पादन (GNP) फक्त अमेरिकेच्याच भागे आहे-याणि त्यांचे माणशी उत्पादन वाढते आहे, तर आपले (अमेरिकेचे) स्थिरावते आहे. जर जपानी ही इलेक्ट्रॉनिक जमात असेल, तर जर्मनी ही धुराड्याची जमात आहे. त्यांचे नेते जपान्यांसारखे एकविसाव्या शतकात जगाला नेण्याची भाषा बोलत नाहीत – खरे तर ते विसाव्या शतकातच सुखी-समाधानी वाटतात. त्यांच्या कंपन्या संशोधनावर (Research & Development) पैशाचा महापूर वाहवत नाहीत. शुद्ध विज्ञान जपान्यांना किंवा फ्रेंचांना वाटते तितके जर्मनांना महत्त्वाचे वाटत नाही. ते संगणकांची नवी पिढी घडवायला दौडत नाहीत.
त्याऐवजी त्यांची खरी क्षमता दिसते ती गोष्टी जुन्याच वळणाच्या तंत्रांनी करण्यात – चांगल्या प्रकारे गोष्टी करण्यात. जर्मनीत तंत्रज्ञ असणे अमेरिकेतल्यापेक्षा जास्त मानाचे आहे. वस्तू घडवणान्यांना वैयक्तिक आनंद तर मिळतोच, पण इथल्यापेक्षा (अमेरिकेपेक्षा) त्याला समाजात मानही जास्त आहे इथे तो नाहीच. जर्मन लोक परदेशी वस्तूंबद्दल तुच्छतेचा भाव बाळगतात. उदाहरणार्थ, मर्सिडीज स्वदेशाबाहेर गाड्या बनवत नाही कारण त्यांना बाहेर पुरेसे कुशल कामगार मिळतील ह्यावर विश्वास नाही. आजही जर्मनीत कारागिरीला महत्त्व आहे, ज्यामुळे जर्मन तरुण अनेक वर्षे उमेदवारीत घालवायला तयार असतात. पण जर्मनी आधुनिक अर्थव्यवस्थेत रुळली आहे. जुन्या तंत्रांमध्ये नव्या तंत्रांचा–उदा. संगणक ‘चिप्स’—समावेश करून घेण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले आहे. त्यांनी पद्धतशीरपणे आपला पारंपारिक औद्योगिक ढांचा (infrastructure) सतत ‘नवा राखला आहे. १९५० किंवा १९६० च्या दशकातल्या अमेरिकेसारखे ते सशक्त आणि सक्षम वाटतात.
जुन्याच व्यवहारांमध्ये ते आपली ऊर्जा घालतात, दरवर्षी जरा अधिक चांगले काम करत. ते व्यवस्थापन विद्यालयांवर अवलंबून राहत नाहीत. कंपन्यांचे प्रमुख बहुधा आपली उत्पादने जाणणारे, आपल्या कामगारांशी निष्ठा राखणारे, आपल्या शेजाराशी (community) निष्ठा राखणारे तंत्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असतात. आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि आपला बाजारपेठेतला वाटा (Market Share) यांवर ते काळजीपूर्वक विचार करतात. जुन्या गि-हाइकांशी असलेले संबंध खूपच गांभीर्याने सांभाळले जातात. ते ‘फास्ट ट्रॅक’ची चर्चा करत नाहीत. सल्लागार कंपन्यांना फोन करून दोनचार ‘ताजे व्यवस्थापनतज्ज्ञ बोलावून घेऊन त्यांना आपली कंपनी कशी चालवावी असे विचारले जात नाही. कोणी म्हणेल की जर्मन अर्थव्यवस्था जुन्या पठडीतली, जुनाट स्थैर्याकडे झुकणारी आहे पण ती ‘मजबूत’ आहे, हे नाकारता येत नाही.
****
[आपल्या ताकदी ओळखणे, त्यांच्यात नवी तंत्रे सामावून त्यांना वाढवणे, एकदम उंच उडी मारायचा प्रयत्न न करणे—एका गर्भश्रीमंत देशापेक्षा ही पथ्ये पाळणे एका गरीब देशासाठी जास्त आवश्यक असायला हवे.
शेजारी-मग ते कंपनी आणि गाव असे असोत की एक देश आणि दुसरा देश असे असोत यांच्याशी अतूट संबंध जोडणे. त्यांना आपल्यावर अवलंबून राहायला भाग पाडणे. सर्वच बाबी उघडपणे ‘परंपरा’ आणि ‘व्यवहार्यता’ यांची सांगड घालणा-या आहेत.
आत्मतुष्टता तर नाहीच, हे डॉ. लिओनार्ड यांच्या लेखावरून उघडच आहे.
आणि जे जर्मनी करीत आहे त्यात अमेरिकन वार्ताहर रस घेतात. या वार्ताहरांचे, वार्ता-विश्लेषकांचे लिखाण सामान्य सजग अमेरिकन वाचतो, असे लिखाण टिकाऊपणाच्या दृष्टीतून आवर्जून ‘आम्लरहित’ कागदावर छापले जाते.
हे सारे आपण भारतीयांनी जर्मनी-अमेरिकेकडून घ्यावे, की…..
व्यवस्थापनातल्या पदवीला ‘परीस’ आणि कृषि विज्ञानातल्या पदवीला ‘बैल’ म्हणावे?
अमेरिकेचा ‘उपग्रह’ असलेल्या सॉफ्टवेअर’ उद्योगाला दिवसाआड सवलती द्याव्या, पण विदर्भ ते पंजाब इथल्या शेतक-यांना आत्महत्या करू देत राहावे?
शेजारी राष्ट्रांना लोखंड-पोलाद अमेरिकेपेक्षा स्वस्तात विकावे की ‘एनिमी नंबर वन कोण ह्यावर मंत्र्यामंत्र्यांनी जाहीर कुस्त्या खेळाव्या?
शिवशाही रामराज्य–दरिद्री नारायण या उदात्त कल्पनांचे अवमूल्यन करत, नाणी घासून गुळगुळीत-बुळबुळीत करत राहावे?
सामान्य माणसांनी यावर विचार केला, तरच राजकारण्यांवर वचक राहीलअन्यथा नाही.]