अगदी साध्या गोष्टीतसुद्धा खरे काय आहे, हे लोकांच्या तोंडून काढून घेण्यास यातायात पडते. लौकर दाद मिळविण्याच्या आशेने ते नेहमी राईचा पर्वत करितात. लांचलुचपती व एकमेकांशी अन्यायाचे वर्तन ह्यांचे प्रमाण इतके वाढले होते की ते सांगू गेल्यास कोणी खरेसुद्धा मानणार नाही. धाकटे घराण्यात अवश्य तितकी धूर्तता आणि रोकड मात्र पाहिजे, की त्याने वडील घराण्याच्या तोंडाला पाने पुसून त्याची मालमत्ता सरकारांतून आपल्याकडे ओढलीच समजा. ह्यामुळे जिकडे-तिकडे गृहकलहाचा वणवा पेटून सरकारी दसरांतसुद्धा बनावट दस्तैवज घुसले, आणि अस्सल खरे दस्तैवज मिळविण्यासाठी मारामारी व ठोकाठोकी माजून राहिली. शेतक-यांच्या अनाथ स्थितीला तोंड उरली नाही, असे झाले. मामलेदार, लष्करी लोक, सावकार, पाटील-कुळकर्णी, देशमुख-देशपांड्ये ह्यांना मात्र अकरावा आला.* दुर्बल-प्रबलांच्या झगड्यांत लबाडी आणि कावेबाजपणा हीच काय ती हत्यारे दुर्बलाला कामास येतात. लोक जात्या लुच्चे किंवा पापपुण्याला न मानणारे असतात असे नाही. पण जुलमांतून कसेबसे निसटून जाण्याला त्यांना असत्याचा अवलंब करणे प्राप्त होते.”
क्याप्टन ब्रिज, ह्यांनी १८१८ साली खानदेशचा ताबा घेताना तेथील लोकस्थितीचे केलेले निरूपण. (त्रिं. ना. आत्रेकृत गांव-गाडावरून)