गुणवत्ता – यादीचे कौतुक पुरे !
संपादक, आजचा सुधारक यांस,
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या म्हणीप्रमाणे १० वी, १२ वी, चे निकाल लागले की, शिक्षण आणि परीक्षा या संबंधातील चर्चा वर्तमानपत्रांतून एखादा महिना चालते व नंतर शिक्षणक्षेत्रात आणि शासनाच्या शिक्षण-खात्यात पुन्हा सामसूम होते.
लॉर्ड मेकॉलेने, भारतात शिक्षण-पद्धती सुरू केल्यावर ‘ही शिक्षण-पद्धती केवळ आज्ञाधारक सेवकवर्ग तयार करणारी आहे’ – अशी तीवर टीका झाली. परंतु दुर्दैवाने या पद्धतीत अजूनहि फारशी सुधारणा झालेली नाही.
वास्तविकरीत्या ‘परीक्षा’ याचा अर्थ परि+ईक्षण म्हणजे सर्व बाजूंनी पाहणे. बौद्धिक विकासामध्ये कार्यकारणभाव समजणे, तरतम-भाव समजणे, साम्यविरोध समजणे या सगळ्या प्रक्रिया येतात आणि याची परीक्षा घेतली गेली पाहिजे. भारतात पूर्वीच्या काळी तक्षशिला आणि नालंदा अशी विद्यापीठे होती व तेथे परदेशातूनसुद्धा लोक शिक्षणासाठी येत असत. तेथे अनेक विषयांवर चर्चा होत असे. वाद होत, ‘शिष्यादिच्छेत् पराजयम्’ या म्हणीचा प्रभाव होता.
इ. सनाच्या ६ व्या शतकापासून मात्र ‘बाबावाक्यं प्रमाणम्’ ही प्रवृत्ती निर्माण झाली. आणि मग भारतातील नवनिर्मिती थांबली. नवीन शोध, नवीन विचार, स्वतंत्र धर्मशास्त्र, बुद्धिप्रामाण्य, विचारस्वातंत्र्य लोप पावले. आणि आजच्या परीक्षापद्धतीमुळे हेच होत आहे. त्यात केवळ पाठांतरावर भर देऊन श्रेष्ठत्व ठरविले जाते.
खरे तर स्कॉलरशिपच्या परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, फिजिक्स किंवा मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड यांमध्ये आकलनावर भर दिलेला असतो. परंतु या परीक्षांमध्ये प्रावीण्य मिळविणा-यांचे समाजाकडून कौतुक केले जात नाही वा वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा अशा बातम्या कोप-यात छापल्या जातात.
‘इंडिया टुडे’ च्या ६ जुलैच्या अंकात श्रीमती तवलीन सिंग यांचा लेख आला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “पाश्चात्त्य देशांत मुलांना धडा वाचावयास देतात आणि त्यांनाच शंका विचारण्यास सांगून शिक्षक त्या शंकांचे निरसन करतात. आपल्याकडील उत्तम दर्जाचे शिक्षण हे जागतिक स्तराशी त्याची तुलना केल्यास निम्म्याहूनही कमी दर्जाचे आहे असे त्या लिहितात. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या तयारीसाठी जे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाने निवडले त्यांनाही तेथील तज्ज्ञ शिक्षकांनी हेच सांगितले की, “तुम्हाला पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान ७० वर्षांपूर्वीचे आहे, आणि आम्ही जे शिकवीत आहोत ते ३५ वर्षापूर्वीचे आहे. प्रचलित ज्ञान पाश्चात्त्य विद्यापीठांमधून मिळते.” म्हणून आपल्या बड्या नोकरशहांची मुले पाश्चात्त्य देशांमध्ये शिकावयास जातात.
भरमसाठ हुंडा घेणारा नवरदेव, जबरदस्त फी आकारणारे वकील, डॉक्टर्स, घरभाडे घेणारा घरमालक, टॅक्सी व रिक्षा ड्रायव्हर्स यांच्याविरोधी संताप व्यक्त करणारा समाज, ४०-५० हजार फी घेणा-या ‘क्लास’ चालकांविरुद्ध ब्रही उच्चारत कसा नाही?
आज समाजात गुणवत्ता-यादीचे फारच आकर्षण निर्माण झाले आहे. परंतु अशी भरमसाठ फी देणारा विद्यार्थी त्याच्या पुढील आयुष्यात, व्यक्तिगत अनियंत्रित संपत्तीच्या मागे लागून स्वतःचा विकास करण्याऐवजी मानसिक गुलामगिरीच्या बंधनात जखडून राहील. समाजाला या धोक्यापासून वाचविण्यासाठी एखाद्या संस्थेने या परीक्षाबाबतचे संशोधनाचे काम हाती घ्यावे.
सुमारे २५ वर्षांपासून या गुणवत्ता-यादीचे प्राबल्य वाढत आहे. ही गुणवत्ता-यादीत चमकलेली मुले कोणती नेत्रदीपक कामगिरी पुढील आयुष्यात करतात ते जाहीर करावे. तसेच आज महाराष्ट्रात जे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा वन-अधिकारी, आजचे प्रसिद्ध विचारवंत यांच्याबाबत माहिती गोळा करावी व यापैकी कितीजण गुणवत्ता-यादीत क्रमांक मिळवलेले होते ते जाहीर करावे म्हणजे पालकांचा भ्रमनिरास होईल.
ग्रामीण विभागातील काही मुलांना वनस्पतींचे अचूक ज्ञान असते. किंवा काहीजण चित्रकला, हस्तकला यांचे उत्कृष्ट नमुने करतात परंतु महागड्या क्लासमध्ये ते जाऊ शकत नाहीत–गुणवत्ता-यादीत येऊ शकत नाहीत त्यामुळे उच्चशिक्षणाची दारे त्यांना बंद होतात.
त्यामुळे खरे तर इयत्ता ७ वी नंतर मुलांचा नैसर्गिक कल पाहून त्या त्या व्यवसायांचे शिक्षण त्यांना मिळविता येईल अशा योजना शासनाने आखाव्यात व ५० टक्के नापास होणा-या विद्याथ्र्यांवर शासनाला ८ वी ते १० पर्यंत करावा लागणारा खर्च वाचवावा.
‘तत्त्वबोध’ केशवराव जोशी
हायवे चेक नाक्याजवळ, नेरळ, ४१०१०१ (रायगड)