“आपणाला आजच्या जर्मनीत काय काय कमतरता जाणवतात”? कृपया सोबतची प्रश्नावली भरून पाठवाल काय? ‘जर्मनीतल्या एका प्रख्यात नियतकालिकाने अशी प्रश्नावली काही सुप्रसिद्ध विचारवंतांना पाठविली’. प्रश्नावली अशी –
तुम्हाला जर्मनीविषयी बांधिलकी का वाटते? काही खास वैयक्तिक स्नेहरज्जू? जर्मनीच्या इतिहासातील कोणत्या कालखंडात तुम्हाला राहावयाला आवडले असते ? जर्मनीच्या इतिहासातील कोणते पराक्रम, यश ही तुम्हाला सर्वोत्तम वाटतात ? कोणती जर्मन इतिहासकालीन व्यक्ती तुम्हाला आवडते ? वाङ्मय, संगीत, कला, विज्ञान ह्या क्षेत्रांत कोणत्या जर्मन व्यक्ती तुम्हाला महान वाटतात ? जर्मन इतिहासातील सर्वांत पराक्रमी (अर्थात् लष्करी) पुरुष कोण ? कोणते जर्मन (प्रशंसा) गीत तुम्हाला सर्वात जास्त आवडते ? (उ. भारताच्या संदर्भात वंदे मातरम्, जनगणमन…., प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, शिवरायांचा पोवाडा….. वगैरे), जर कोणी जर्मन म्हणाला, “मला जर्मन म्हणवून घ्यायची लाज वाटते तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ? जर कोणी जर्मन म्हणाला, “मला अभिमान वाटतो की मी जर्मन आहे तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ? आजच्या जर्मनपिढीला तुम्ही काय संदेश द्याल ?’
८९ वर्षांचे प्रा. लिओनार्ड हे आजचे जगातील नामवंत अभियंते. पूलबांधणी, उत्तुंग मिनार बांधणीचे तज्ज्ञ (कलकत्त्याच्या नवीन हुगळी पुलाचे सल्लागार) इ. इ. वयाच्या ३० व्या वर्षी हिटलरला व्यक्तिगत पत्र पाठवून त्याचा त्यांनी निषेध केला होता. परिणामी ब्लॅक फॉरेस्टच्या जंगलात युद्धकाळात दडून बसावे लागले. तेथे सुतारकाम करून उदरनिर्वाह केला. उत्तम चित्रकार. गांधींचे आणि विवेकानंदांचे सर्व लिखाण वाचलेले, सध्या पर्यावरण संरक्षण-संवर्धनाचा, ऊर्जासाठे जतन करण्याचा हिरिरीने पुरस्कार करतात व अजूनही माफक (दिवसाकाठी ६/८ तास) सल्लागार म्हणून काम करतात. त्यांची वरील प्रश्नावलीवरची प्रतिक्रिया उद्बोधक आहे.
प्रतिक्रिया पहिली-“ह्या असल्या प्रश्नांची म्हणे मी उत्तरे द्यावीत !” त्यांनी संपादकांना पत्र लिहिले ‘‘अशी प्रश्नांना धरून उत्तरे मी देणार नाही. पण माझे विचार लिहून पाठवीत आहे. सर्वेक्षण वगैरे बाजूला ठेवा आणि हे विचार तुमच्या नियतकालिकात छापा.” संपादकांनी ते विचार छापले ! ते असे –
मी एक जाणिवा जागृत असलेला जर्मन आहे. जगभर मी सेतू बांधत आलो आहे. सध्या जर्मनीत अहंकार, सतत–खास करून सरकारकडे मागण्या करणे, जबाबदारीची वाण, समष्टीची जाणीव नसणे याकडे कल दिसतो. पुटे चढलेला तात्त्विक ध्येयवाद उराशी बाळगणाच्या कामगार संघटनांच्या अवास्तव व सतत वाढणाच्या मागण्यांमुळे कारखानदारी देशाच्या बाहेर जात आहे. लाखो लोक बेरोजगार होताहेत. सामाजिक बांधिलकीचा वाढता बोजा (अनुदाने, कर्जमाफी, शिक्षण, आरोग्यसेवा…..) आणि बेरोजगारी (बेकारभत्ता) यांनी देशाला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. कर्जावरील व्याजाचेच इतके अक्राळविक्राळ स्वरूप झाले आहे की नवीन गुंतवणूक, त्यातून रोजगारनिर्मिती, महसुलातील, आयकरातील वाद हे चक्र खंडित झाले आहे. बँकांचे मात्र छान चालले आहे. खरे तर त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाण दाखवायला हवी, पण—पैसा माणसाला भ्रष्ट करतो.
राजकारणी कुचकामाचे आणि भेकड आहेत. त्यांना चांगले माहीत आहे की गेली अनेक वर्षे आपण आपल्या कुवतीपलीकडे चैन करीत आहोत. पण आपल्या लोकांना कळ सोसायला सांगण्याचे, त्याग करायला सांगण्याचे धैर्य त्यांच्यात नाही. काटकसरीला आता पर्याय नाही. सर्वच राजकीय पक्ष यांबाबत सारखे आहेत. पण कोणीतरी लोकांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिलीच पाहिजे –
‘सामाजिक पातळीवर संशयखोरीचे वातावरण, करबुडवेपणा, भांडवलाचे देशाबाहेर पलायन, आर्थिक गुन्हेगारीला सौम्य, माफक शिक्षा (अगदी दरवडेखोरांना देखील) अशी परिस्थिती आहे’.
‘जर्मन तरुणाला आता कुठचेही कष्टाचे काम नको आहे’. त्यांना हवी सुखासीनता. त्यामुळे बांधकाम, शेतीकाम, सफाईकाम अशी कामे परदेशी कामगारांना द्यावी लागतात. आणि वर बेकारीचे नाव घेऊन परदेशी लोकांच्या हकालपट्टीची मागणी, त्यांचा द्वेष. तरी बरे की मादक पदार्थ, वगैरेंचा उल्लेख मी करीतच नाही.
“गर्वसे कहो हम जर्मन हैं’ या म्हणण्याला काय अर्थ आहे ? भूतकाळातील मोठमोठी नावे घेऊन काय सांगणार ? आज आपल्याला हिंमतवान, जबाबदार स्त्रीपुरुष हवे आहेत. इथे तिथे एखादा काजवा चमकतो, नाही असे नाही. गरजच शेवटी बदल घडवून आणेल. ज्या दिवशी जर्मन नागरिक आपले डोळे उघडतील, आपल्या चुका एकएक करून सुधारतील त्या दिवशी मी अभिमानाने जर्मन असल्याचे सांगेन.’
[वरील मजकुरात योग्य ठिकाणी भारत, भूमिपुत्र, बाहेरले, महाराष्ट्र, हरहर महादेव, इ. किती चपखल बसतात! अतिशय संपन्न, कष्टाळू राष्ट्रापैकी जर्मनी एक. तेथील विचारवंत असे सतत परखड विचार समाजापुढे ठेवत असतात, विचारवंतांची लाचारी ही खरी चिंतेची बाब. त्यांच्याकडून अपेक्षा असतात. राजकीय पुढारी, गुंड ज्यांना ज्यांना काही साधायचे, मिळवायचे आहे, त्यांच्याकडून का अपेक्षा करा? ]
आईन्स्टाईनने ज्यूंविषयी, इस्राईलविषयी लिहिताना म्हटले आहे “ते (आजच्या इस्राईलचे पाईक) काही कष्टक-यांच्या बाजारात आपले कष्ट जास्तीत जास्त भावाला विकणारे अनाडी मजूर नव्हते. ते सुशिक्षित, तल्लख बुद्धीचे, धडाडीचे स्वतंत्र लोक आहेत. आपल्या उजाड ओसाड माळरानांशी शांतपणे, निर्धाराने झुंज घेऊन तिला त्यांनी सुजलसुफल केले आहे. सर्व ज्यूंना त्याचा परोक्ष अपरोक्ष फायदाच झाला आहे. फाळणीच्या वेळी लाखो लोक इथे आले. पण त्यांच्या अशात-हेच्या (settlers) वसाहतींचे प्रयोग फसले.]