अलीकडेच मी नथुराम बोलतोय ह्या नाटकाच्या निमित्ताने उठलेले वादळ, झालेला गदारोळ व त्यावर बंदी घालून ते शमविण्याचा झालेला प्रयत्न ह्यासंबंधी वृत्तपत्रातून वृत्त, प्रतिक्रिया वाचताना एक विचार सतत मनाला भेडसावत होता. हे सत्यान्वेषण की विकृती?
गांधींवर एकामागून एक तीन नाटके आली. पैकी गांधी विरुद्ध गांधी, गांधी आणि आंबेडकर ह्या नाटकांचे प्रयोग झाले आहेत. गांधी विरुद्ध गांधी ह्यावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रियाही प्रसिद्ध झाल्या. ‘नथुराम’ च्या वेळी सहनशक्तीचा अंत झाला आणि गांधीवादी किंवा गांधीवादी नसले तरी ते राष्ट्रपिता आहेत हे मानणारे ह्यांनी कडाडून विरोध केला अन् तो सफल झाला.
मनात आले, ‘गांधी’च्या ऐवजी दुसऱ्या कोणत्याही महापुरुषाला जर असे ‘लक्ष्य’ बनविले असते तर काय प्रतिक्रिया झाली असती? समाज इतका ‘शांत’ राहिला असता का? की तो पेटून उठला असता? गांधींना ‘लक्ष्य केले जाते ह्याचे कारण मला वाटते त्यांना कितीही नावे ठेवली, दुषणे दिली तरी समाज ढिम्म असतो, तो पेटून उठत नाही. गांधींच्या पाठीशी मोठा जनसमुदाय नाही का?
मागे काही दिवसांपूर्वी असाच एक लेख गांधींच्या वैयक्तिक, खाजगी जीवनाविषयी एका संशोधकाने लिहिलेला होता. कोणत्यातरी दिवाळी अंकात तो प्रसिद्ध झाला. तो वाचला. त्यातही गांधींची प्रतिमा मलिन करण्याचाच प्रयत्न होता. गांधी जितक्या पारदर्शकपणे जनतेसमोर उभे होते तेवढा दुसरा कोणताही महापुरुष उभा होता असे मला वाटत नाही. त्यांचे सर्वच जीवन सार्वजनिक होते. त्यात खाजगी/सार्वजनिक हा भेदच नव्हता. त्यांनी स्वतःच स्वतःच्या आयुष्याबद्दल स्वच्छ शब्दांत लिहून ठेवले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वातील कोणत्या गोष्टींना आपण उजाळा देतो यावरून आपण स्वतःच स्वतःला व्यक्त करीत असतो. गांधींबद्दल व्यक्त केलेल्या मतांवरून आपण गांधींविषयी जितके बोलतो त्याहीपेक्षा जास्त स्वतःविषयी बोलत असतो. दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वातील चांगली बाजू अधोरेखित करण्यासाठी स्वतःत काही चांगुलपणा असावा लागतो.
जी ‘टीका’ गांधींवर केली जाते तिला इतर महापुरुष अपवाद आहेत का? मग त्यांच्या आयुष्याची चिरफाड करण्याचे व्रत हे इतिहाससंशोधक का घेत नाही? स्वतःच्या प्रसिद्धीला ओहोटी लागण्याची भीती वाटते? जनमानसात निर्माण होणा-या वादळाची भीती वाटते? काय कारण आहे त्यांना अपवाद म्हणून बाजूला ठेवण्याचे व केवळ गांधींना झोडपून काढण्याचे?
गांधींची हत्या झाली, एक भौतिक शरीर नष्ट केले गेले, पण विचार मागे राहिला. विचाराचा मुकाबला विचारानेच करायचा असतो. तो भ्याडपणे विचार मांडणाच्या व्यक्तीचा खून करून नव्हे!
आज ‘नथुराम जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांपैकी कितीजणांनी गांधी वाचला, खुद्द ‘नथुराम’च्या लेखकालाही माझा हा प्रश्न आहे. आज सर्वत्र हिंसाचार बळावत चाललेला असताना त्यात तेल ओतण्याचे पुण्यकर्म ह्या लेखकाने करू नये असे त्याला सुचवावेसे वाटते.