ज्या मूर्ख मतांमुळे सार्वजनिक जीवनाला अपाय होण्याचा संभव नसेल त्याबद्दल कोणाला तुरुंगात घालणे मला अर्थशून्य वाटते. जर हा नियम टोकापर्यंत ताणला तर फारच थोडे लोक त्याच्या तडाख्यातून वाचतील. शिवाय अश्लीलतेचा बंदोबस्त कायदा आणि तुरुंगवास यांनी करण्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याचा संभव आहे. जे केवळ मूर्खपणाचे किंवा दुष्कर्म असेल त्याला मोहक वलय मात्र प्राप्त होते. राजकीय बंद्यांविषयी तर माझ्या भावना अधिक तीव्र आहेत. केवळ राजकीय मतांमुळे एखाद्याला तुरुंगात घालणे कितीही आकर्षक वाटले तरी त्याने त्या मतांचा प्रसार होण्याचाच संभव जास्त असतो. ते मानवी दुःखात भर घालण्यासारखे असून त्याने हिंसेला उत्तेजन मिळते यापलीकडे काही नाही.