संपादक, आजचा सुधारक
श्री. गो. पु. देशपांडे व श्री. निरंजन आगाशे यांची पत्रे वाचली. स. ह. देशपांडे यांचा लेखही वाचला होता. मला श्री. गो. पु. देशपांडे व श्री. निरंजन आगाशे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत.
१) राष्ट्रवाद म्हणजे काय व तो नेहमीच आवश्यक असतो असे आपल्याला वाटते
काय?
२) भारतीय नागरिक राष्ट्रवादी नाही व चिनी आहे हे गृहीतक कशाच्या आधारे मांडायचे?
३) विवेकी राष्ट्रवाद वा प्रगमनशील राष्ट्रवाद कोणता हे कोणी व कसे ठरवायचे?
चीनविषयक तपशिलात जाऊन मूळ मुद्दे बाजूला पडू नयेत अशी विनंती आहे. भारतावर चीनने आक्रमण केले. त्या अगोदर तिबेट गिळंकृत केला हे सर्व माझ्या मते चिनी राष्ट्रवादाच्या दृष्टीने योग्य आहे. तसेच सिक्कीमला भारतात सामील करणे व भूतानला मदत करणे भारताच्या दृष्टीने योग्य व आवश्यक आहे. चीन कम्युनिस्ट आहे वा भारत लोकशाहीवादी आहे वा अमेरिका लोकशाहीवादी आहे यावरून त्या देशांची परराष्ट्र धोरणे ठलेली नाहीत. त्यामुळे ती राष्ट्रे इतरांशी कशी वागला ह्यापेक्षा ती उत्क्रांत कशी झाली हे बघणे राष्ट्रवादीच्या अभ्यासाच्या दृष्टीने उद्बोधक ठरावे.
आपल्या अंकातील माध्यमिक शिक्षणाशी दुरवस्था हा लेख आवडला. माध्यमिक शाळेच्या आर्थिक गरजा व त्यांच्या पूर्तीची साधने हा भाग जर लक्षात घेतला तर कदाचित इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या येथील माध्यमिक शिक्षणाचे खुपच साधले असे म्हणावेसे वाटेल. असो.
किरण बर्वे
संपादक, आजचा सुधारक, यांस
१८९१ सालच्या आगरकरांच्या काही अग्रलेखांचा गोषवारा—आरोग्य संदर्भातील- पाठवीत आहे. हेतु हा की वाचून विचार-कलह (ऊहापोह) व्हावा. १०० वर्षांनंतरही—आज आपण त्याबाबतीत कोठे आहोत यासंबंधी एक चर्चा व्हावी.
काही लक्षणीय मुद्दे –
१. आज देश महाराष्ट्र याबाबत किती सुधारला आहे?
२. सरकार, ज्ञान, द्रव्य कोठे कमी/मुबलकता आहे?
३. तरी ही स्थिती ? अग्रलेखाचा पुनर्विचार का करावासा वाटला? आत्मपरीक्षण हवे. उपाय ?
४. दैनंदिन जीवनात बालपणापासूनच घरातील तसेच सार्वजनिक स्वच्छतेबाबत धडे देऊन शिक्षणात हा विषय अत्यावश्यक करावा. बालवाडी/बालमंदिरापासून एस्. एस्. सी. पर्यंत पहिला टप्पा समजावा. पाचदहा वर्षांनी पडताळा घ्यावा. सुधारणा जारी ठेवाव्यात. मात्र, सौजन्यससाहासारखा दिखाऊपणा नको. सातत्य हवे. अणुसंशोधनात बाजी मारणाच्या भारतास यापुढे स्वावलंबन, काटकसरी द्वारा भरारी मारावयाची असेल तर स्वच्छतेची कास। प्रथम (सर्वच क्षेत्रांत) धरावयास हवी.
या विषयात स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना होणार असे कळते. अंमलबजावणी हवी.
सुनीता गणपुले
९/१४२, कन्नमवार नगर विक्रोळी (पूर्व) मुंबई- ४०००८३
आमचे आरोग्यरक्षण कशाने होईल?
‘आपले घर स्वच्छ असले, अन्न कसदार व संवई स्वच्छपणाच्या असल्या म्हणजे आपण निरोगी राहून भयंकर साथींची धाड येणार नाही असा समज होणे चुकीचे आहे’. हिंदुस्थानातील वरिष्ठ दर्जातल्या स्त्रियांचे वा पुरुषांचे वागणे स्वच्छपणाचे आहे असे डॉ. कीर्तिकरांचे म्हणणे. परंतु … आमची स्वयंपाकगृहे, तेथील पाणी पिण्याची भांडी. दूधदुभते आणखी पायधुणी-तोंडधुणी, तिथल्या आंघोळी, दररोजची पोतेरी-सडे, उष्ट्यास शेण लावणे वगैरे… जी स्वच्छता राखली आहे तिच्या अध्र्याइतकीही स्वच्छता निर्मळतेबद्दल ऐट मिरवणाप्या पण या देशात प्रखर थंडी ही सबब नसूनही कनिष्ठ प्रतीचा देहधर्म करताना पाण्याचा उपयोग न करणा-या युरोपीय बाबर्जीखान्यात सापडेल की नाही शंका. मेजावर खाना स्वच्छ दिसला म्हणजे झाले. तयार करण्याच्या जागी ? बुटलेराकडून किती घामटपणा होत असतो याचा विचार साहेबास नसतो. हे विलायत साहेबास लागू नसेल. तेथे त्यांच्याच जातीचे बुटलेर, त्यामुळे तिकडील मड़मांस ‘किचेन मॅनजमेंट’ वर चांगली नजर ठेवण्यास कमीपणा येतो, असे सहसा वाटत नाही. किंवा संभव नसल्याने ज्याप्रमाणे इतर कामांत पाश्चात्य लोकांची स्वच्छता अनुकरणीय, त्याप्रमाणे या तरी बाबत असे अनुमान करणे उचित. मात्र, येथे त्यांच्या पाकसिद्धीचे काम ओंगळ पद्धतीने वागणाच्या हलक्या जातीकडून. अशांशी संघटन ठेवण्याचा कंटाळा मेमसाहेबांस सहजच. त्यामुळे येथील पाकगृहे तिकडील पाकगृहांइतकी स्वच्छ असणे संभवत नाही. या शिवाय साहेब ४/२ गोष्टींत आम्हांपेक्षा कमी स्वच्छ, पण हर एक गोष्टीत त्यांची स्वच्छता स्पृहणीय. विशेषतः सार्वजनिक स्वच्छता. तशी या खंडात कोठेही दृष्टीस पडेल असे वाटत नाही.
घरांतील स्वच्छता व स्त्रीआरोग्यरक्षण याचा निकट संबंध असून पाण्यापेक्षा घरातील घाणीने त्यास उपद्रव होतो असे आम्हास वाटते. आमच्यातील श्रीमंतापासून गरिबापर्यंत कोणालाही गृहस्वच्छतेची व ग्रामस्वच्छतेची हौसही नाही व ज्ञानही नाही. साहेबांच्या गुरांचे तबेले जितके स्वच्छ तितकी आमची स्वयंपाकगृहे, ओट्या, माजघरे ? संशय आहे. बहुतेक घरांत पाणी मुरते. स्वयंपाकघरात, मोरीत भांडी घासण्याने, आचवण्याने, बायकांच्या अंगधुण्याचे पाणी सांडत असायचेच. अशांपासून दमटपणा, ओल राहून विषारी वायु घरात शिवाय डांस, बुंगरटी इ. किड्यांचा उपद्रव होतो.
स्नानाच्या मोरीपाशी अशीच व्यवस्था असून एखादी खाच असेल तर बायका काय काय आणून टाकतील. मागे पुढे अंगण असल्यास त्यांतच उकिरडा साठवण्याची सोय होते. गोमय, गोमूत्र, दुर्गंधी तरी पापक्षालनार्थ सर्वत्र वापर होतोच, यातच घराचा दरवाजा पश्चिमेस असल्यास व जुना शौचकूप असल्यास पहावयास नको, म्हणजे आमच्या मासलेवाईक हिंदु घराचे चित्र पूर्ण झाले. खरे तर त्यास नरकगृह म्हणणे वावगे नव्हे.
आम्ही निष्ठरपणे लिहीत आहो खरे. परंतु पुण्यात हिंडून पहावे. तात्पर्य, आमची शारीरिक स्वच्छता जरी बरीच आहे तरी घरे अतिशय घाणेरडी. मोठ्या समाजात शेपन्नास तशी असणे ठीक. परंतु …
घरांची अवस्था शोचनीय. त्यामुळे गावेही त्याच मासल्यांची, भंगी नाही. शौचकूप ? नसेल तर त्या ठिकाणी हे काम ओढ्याच्या, नदीच्या काठी, घराजवळ वा परसात कोठेही, प्रौढ़ स्त्री पुरुषांस दिवसा असर मात्र रात्री ज्यास वाटेल तेथे. आमच्या देशातील अपत्यवत्सल आईबापे मुलांना–पुण्यासारख्या शहरी देखील-जवळच खुद्द सोबत उभे राहून रस्त्यावर उरकतात. दुष्परिणामांची क्षिती स्वप्नातही येत नाही.
पाणी, घरे निर्मळ स्वच्छ असल्याशिवाय प्रकृति सुदृढ कशी राहणार, सामाजिक सुधारणा संबंधात तुम्ही वेगळी जात का करत नाही असा प्रश्न करता येतो. परंतु या । संबंधात, दुर्धारक सुधारक सर्व सारखेच.
सार्वजनिक स्वच्छतेसाठी सरकारने म्युनिसिपालिट्यांच्या नेमणुका करणे आवश्यक. लोकांच्या माथी दोष ? लोक बिचारे ज्ञान नाही, द्रव्य नाही, उद्योग नाही. एकूण हयगयच… कमिट्या नेमून अंमलबजावणी हवी.. आरोग्यरक्षणासाठी तत्त्वे राखण्यास लागणारा पैसा ? फायदा होईलसे वाटत नाही.”
संदर्भ : सुधारक : अग्र. १८९१ ऑक्टो. १९,
संकलन : ‘सुधारक : स्त्री अभ्यास : सारसूचीमधून
जीवनातील यशाचे कारण
संपादक, आजचा सुधारक यांस
फलज्योतिष्यास कोणताही वैज्ञानिक आधार नसून तो एक ठिसूळ समजुतीवर आधारलेला अविवेकी उपद्व्याप आहे असेच आम्ही सर्व विवेकी (rationalist) ठामपणे मानतो. जोपर्यंत आधुनिक वैज्ञानिक परीक्षणपद्धतींचा वापर करून या ‘‘शास्त्राची तपासणी होऊन त्यातील वैज्ञानिक सत्य सिद्ध होत नाही, तोपर्यंत आम्ही या शास्त्रा’’स मान्य अथवा अमान्य करू शकत नाही अशी आमची भूमिका आहे व ती आम्ही वेळोवेळी जाहीरपणे मांडलेली आहे. (अनेक वर्षांपूर्वी नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाच्या गडकरी सभागृहात झालेल्या एका चर्चासत्रात प्रस्तुत लेखकाने अशा आशयाचा निबंध वाचला होता). परंतु दुर्दैवाने (?) फलज्योतिष्यांनी अथवा त्यांच्या विरोधकांनीही याविषयी वैज्ञानिकपद्धतीने परीक्षण करण्याकडे मुळीच लक्ष दिलेले नाही. या विषयावर उलटसुलट चर्चा (आणि प्रसंगी भांडण तंटे; निदर्शने वगैरे होतच असतात. फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार नाही हे जोवर संख्याशास्त्राच्या निकषावर सिद्ध होत नाही तोवर या शास्त्रावर टीका करणे अविवेकीपणाचे आहे असे आम्हास वाटते.
गेल्या कित्येक वर्षापासून सुमारे २० वर्षांपासून) आम्ही निरीक्षणाने व चिंतनाने एक अभ्युपगम उपन्यास (hypothesis) सिद्ध केला आहे व वैयक्तिक चर्चेत तो आम्ही अनेक मित्रमंडळींसमोर मांडत असतो, परंतु आजपर्यंत कोणत्याही सार्वजनिक माध्यमातून आम्ही प्रसिद्ध केलेला नाही. आता आयुष्याच्या शेवटच्या काळात हा प्रवाह आमच्या बरोबरच विरून जाऊ नये असे वाटते. नाहीतर कडुनिंबाचे, तोतापुरी आंब्याचे, हळदीचे, बासमती तांदुळाचे पेटंट अमेरिकनांनी बळकावावे आणि आम्ही भारतीयांनी हळहळत राहावे, असे होऊ नये म्हणून आमचा हा अभ्युपगम, आमची ही परिकल्पना (hypothesis) जाहीर करण्यासाठी ‘‘आजचा सुधारक’च्या संपादकांचे सहकार्य आम्ही मागत आहोत.
आमचा अभ्युपगम (hypothesis) मानवाच्या जीवनातील यशाच्या एका संभाव्य गमकासंबंधी आहे. “मानवाचा जन्म होण्याचा काळ (time in space) आणि त्याच्या जीवनातील यश ह्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे. माणूस वर्षातील कोणत्या कालखंडात (मग ग्रहांची स्थिती कोणतीही असो) जन्मला यावर त्याच्या जीवनातील यश बवंशी अवलंबून असते’ असा आमचा विश्वास आहे. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास किमानपक्षी भारतात १५ जून ते १५ सप्टेंबर या कालखंडात जन्मलेल्या व्यक्तींपेक्षा, अन्य ९ महिन्यांत अर्थात १५ सप्टेंबर ते १५ जून या दरम्यान जन्मलेल्या व्यक्ती अधिक यशस्वी होतात. या ९ महिन्यांच्या कालखंडात जन्मलेल्या व्यक्तींना स्वास्थ्य, समृद्धी, सत्ता व लोकप्रियता या सर्व परिमाणांमध्ये, पावसाळ्यात जन्मलेल्या व्यक्तींहून अधिक यश मिळते असा आमच्या ह्या परिकल्पनेचा सारांश आहे.
यासाठी आम्ही काही चाचण्या लावून पहिल्या. उदाहरणार्थ स्वार्जित लक्षाधीश/ कोट्यधीश, शासक, सामाजिक नेते, कवी, लेखक, कलावंत अथवा एक अगदी साधा निकष लावावयाचा झाला तर ज्यांचे नाव वृत्तपत्रांत वारंवार छापून येते अशा व्यक्ती या सर्व मंडळींची जन्मतारीख तपासली म्हणजे असे आढळते की त्यापैकी बहुसंख्य व्यक्ती १५ सप्टेंबर ते १५ जून याच कालखंडात जन्मलेल्या आहेत! अर्थात हे शतप्रतिशत खरे नसले तरी संख्याशास्त्रानुसार अधिक संभवनीय (statistically significant) आहे.
हे जर खरे असेल तर त्यापासून अनेक मुद्दे उद्भवतात. अशा जन्मतारीख अधिष्ठित यशस्वी व्यक्तीच्या यशामध्ये भ्रूणधारणेच्या (conception) वेळच्या भौतिक परिस्थितीचा (पर्यावरणाचा) परिणाम असतो अथवा भ्रूणविकासाचा अथवा जीवनातील प्रारंभिक महिन्यातील भौतिक परिस्थितीचा परिणाम असतो? जर भ्रूणधारणेचा काळ महत्त्वाचा असेल तर या गोष्टीचा सुप्रजननासाठी जाणीवपूर्वक उपयोग करता येईल काय ? असे अनेक विचार मनात येतात. यावर संबंधित विशेषज्ञांमध्ये चर्चा व्हावी व आमचा अभ्युपगम (hypothesis) खरा की खोटा याचे श्रेय आमच्या माथी अवश्य मारावे. आमची त्यासाठी तयारीच नाही तर आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत.
र. वि. पंडित
३०४, अंबर इमारत इस्कॉन जवळ,
गांधीग्राम मार्ग जुहू, मुंबई- ४०० ०४९
संपादक आजचा सुधारक, यांस
डिसेंबरच्या अंकात आपण माझे जे पत्र छापले ती केवळ आठल्ये यांच्या ‘कावळे आणि कोकिळा’ या लेखावरील एक प्रतिक्रिया होती. त्यास ‘ब्रेन ड्रेन-दुसरी बाजू हे शीर्षक नको होते. यामुळे मूळ ‘माध्यम’ विषय बाजूस पडून, चर्चेस निराळेच वळण लागल्याचे श्री नंदा खरे यांच्या लेखावरून जाणवते. श्री. आठल्ये, श्री. खरे आणि श्री. नारो दाजीबा यांच्या तीन लेखांवरील माझी प्रतिक्रिया, आपल्या विनंतीवरून, ‘संक्षिप्तपणे सादर करण्याचे अवघड काम प्रस्तुत पत्रात करण्याचा प्रयत्न करीत आहे.
फेब्रुवारी अंकातील श्री आठल्ये यांचा ‘विकृत-संस्कार’ हा लेख उत्तम साधला आहे. इथे ते नेमक्या सामाजिक वैगुण्यावर बोट ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. लहानपणापासूनच, ‘तुला परेदशी जायलाच हवे’ अशी ‘परधार्जिणी’ वृत्ती जोपासणे, ही नक्कीच विकृती होय. मात्र, इंग्रजी बालवाडीत मुलास घालणे याला विकृती किंवा ‘वेडेपणा’ म्हणता येणार नाही. मी एका स्पॅनिश बेटास भेट दिली – (जिज्ञासूंनी १९ मे साप्ताहिक सकाळ, पुणे वाचावा.) तेव्हा मला लहान मुलांच्या सत्संगास-म्हणजे भजनास जाण्याचा योग आला. घरातील मातृभाषा सिंधी. शाळेत इंग्रजी व स्पॅनिश, आणि सत्संगाची हिंदी, अशा चार भाषानंदात पोहणारी ती मुले, बारा वर्षांखालील वयोगटांतील होती हे विशेष. मातृभाषा, राष्ट्रभाषा, स्थानिक भाषा आणि विश्वसंमत इंग्रजी यांचा उत्तम मेळ लहानपणापासूनच घालता येतो, याचे हे बोलके उदाहरण नाही काय?
श्री. नारो दाजीबा ह्यांनी, आम्हा भारतीयांना इंग्रजीची गरज का वाटते ? याची जी सहा कारणे दिली आहेत ती अपुरी आहेत. त्यांत पुढील दोन कारणेही अंतर्भूत करावयास हवी. (७) बहुतांश महाविद्यालयात, इंग्रजीच माध्यम असते. मराठी शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांची त्यामुळे तारांबळ उडते. परिणामी – (अ) वर्षे फुकट जाऊन, विज्ञानशाखेकडून कलाशाखेकडे वळणे, महाविद्यालयीन शिक्षणास रामराम ठोकणे आत्मघात असे प्रकार घडतात. (ब) इंग्रजीतून शिकावे लागणारे, शेक्सपियर, कालिदास वगैरे वाङ्य पुरेसे न समजताच, कामचलाऊ अभ्यासांत चार वर्षे आटोपतात. उत्तम साहित्यानंदास मुकावे लागते. इंग्रजी माध्यमवाले सहाध्यायी मात्र महाकवींची वचने निबंधातून उद्धृत करण्याइतपत यशस्वी होतात–सजग व हुशार ठरतात (८) मराठी माध्यमाच्या थोड्या महाविद्यालयांत, पुस्तके मराठीतून उपलब्ध नसणे, हे सततचे संकट विद्यार्थ्यांसमोर असते दाजीबांच्या लेखातील (४), (५) आणि वरील (७) (८) ही कारणे, मला ‘पोकळ न वाटता.. इंग्रजी माध्यम निवडण्याकरिता पुरेशी आणि रास्त वाटतात.
महत्त्वाकांक्षी मुलांसाठीही बालवाडीपासूनच इंग्रजी माध्यम हवे. केवळ दोन वर्षात जोराचा अभ्यास करून, ‘प्रत्यावाहून आणि अभिव्यक्तीच्या पातळीपर्यंत पोचू शकण्याचे महाकठिण काम एखादाच करू शकेल. स्पर्धायुगात, इंग्रजीसच विश्वमान्यता आहे. अर्थात जीवनातील यश हे केवळ इंग्रजी माध्यमावर अवलंबून आहे. अशी टोकाची भूमिकाही घेऊ नयेच! शेवटी, प्रेम, श्रद्धा, ज्ञान, यश, महत्त्वाकांक्षा, कीर्ति ह्यांची यथायोग्य सांगड घालणे महत्त्वाचे! यांतील कोणत्याही एकाचा अतिरेक झाल्यास, सुखसमाधानाचा घडा फुटून वाया जातो.
भाषामाध्यम गौण ठरविणारे संगणक-युग सुरू झालेले आहे. ‘इंटरनेट’ ही चमत्कृती सर्व जगाला एकत्र गुंफीत असताना ‘देशाकडे पाठ फिरविणारे’ म्हणून परेदशस्थ भारतीयांविरुद्ध डांगोरा पिटणे योग्य आहे काय ? प्रश्न आमच्या भावनिक गरजा भागविण्याचा नसून भावविवश न होता सद्यः परिस्थितीस सामोरे जाण्याचा आहे. वरती उल्लेखिलेल्या अनेक मुद्द्यांची सांगड घालताना होणारी येथील लोकांची धडपड आणि परदेशस्थ भारतवासीयांची धडपड वेगळी कशी?
इथे राहणारी एखादी मंगला गोडबोले, स्वतःचा धंदा उभारताना आलेल्या अनंत अडचणींचा पाढा दिवाळी अंकातून वाचते, “मेन ऑफ स्ट्रॉज’ मधून मूडी नामक निवृत्त आय. ए. एस. पदाधिकारी गेल्या पन्नास वर्षांतील भयाण वास्तव आपल्यासमोर मांडतात तशीच एखादी लेखिका ‘एकता’ (एप्रिल ९८) मधून भयाण अनुभव कथन करते, तिला दोषी का समजायचे ? सत्यजित रे सारख्या महान दिग्दर्शकांवरही ‘भारतातील गरिबीचे प्रदर्शन करणारे’ असा आरोप केला जाई! भारतवासीयांच्या देशप्रेमाचे गुलाबी चित्रच फक्त आपण पाहत नाही ना ? हा नंदा खयांनी प्रश्न अंतर्मनास विचारून पाहावा. के. जी. च्या अॅडमिशनवेळी मागण्यात येणारे डोनेशन, एन.आर.आय. ना नोकरी मिळविण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम, सुसज्ज धनाढ्य रुग्णालयातील डॉक्टरची पोस्ट मिळविण्यासाठी द्यावी लागणारी लाखो रुपयांची मागणी असे अनेक भ्रष्टाचाराच्या चिखलाचे शिंतोडे त्या गुलाबी चित्रावर उमटलेले त्यांना आढळतील. येथल्या वाढत्या ‘बिअरवादी संस्कृतीपेक्षा तेथे राहून नियमितपणे रुग्णालयांना, वाचनालयांना दान पाठवणान्यांची संस्कृती श्रेष्ठ ठरावी. विष्णुशास्त्री चिपळूणकर ज्या इंग्रजीस ‘वाघिणीचे दुध’ म्हणाले, ते पचवून सशक्तपणे एक पिढी परदेशात विखुरली आहे. त्यांचे भारतीयत्व त्यामुळे कमी कसे काय होते ? उदाहरणादाखल एकच नाव फक्त इथे घेते. मुंबई, पाचगणी येथे इंग्रजीतून शालेय शिक्षण घेतलेले, पवईचे आय.आय.टी. पदवीधर, एक महाराष्ट्रीयन श्री अतुल ईश्वरचंद्र विजयकर हे अमेरिकेच्या अनेक वर्षांच्या वास्तव्यानंतर, बंगलोर येथे ‘इन्टेल साऊथ ईस्ट एशिया’ चे सध्या डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत.
अनेक वर्षानंतर अशीही देशसेवेची संधी मिळू शकते अशी अनेक उदाहरणे सापडतील. इंग्रजी कालबाह्य ठरावी अशी जपानी भाषा सिंहिणीसारखी पुढील पिढीसमोर येत आहे असा इशारा जाता जाता करावासा वाटतो.
जय हिंद! जय इंटरनेट!
११, मानस, बेझंट रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई – ४०००५४ सौ. कल्पना सुभाष कोठारे
इंग्लिश माध्यमामुळेच इंग्लिश भाषा मुलांना येऊ शकते हा श्रीमती कोठारे ह्यांचा भ्रम आहे. इंग्लिश माध्यमाच्या बहुसंख्य शाळांमधून कोणत्या लायकीचे इंग्लिश शिकविले जाते ह्याकडेही त्यांचे लक्ष नाही. खास इंग्लंडमधल्या सर्व नागरिकांना चांगले शुद्ध इंग्लिश का येत नाही, का येऊ शकत नाही, ह्याविषयी आपले मत त्या नारो दाजीबा ह्यांना सांगतच नाहीत. येथे इंग्लिश माध्यमाच्या हव्यासामुळे आम्ही ते एकजात सगळ्या मुलांवर लादू आणि त्यांचे कायमच नुकसान करून ठेवू हे, त्या, इंग्लिश भाषेच्या माध्यमाच्या अभिमानामुळे समजून घेताना दिसत नाहीत. कोठल्याशा स्पॅनिश बेटावरच्या सिंधी मुलांना English nursery rhymes गाता आल्याने त्यांचे इंग्लिश लेखनवाचन चांगले आहे हा समज त्यांनी टाकून देणे इष्ट. इंग्लिश चांगल्या प्रकारे येण ह्याचा अर्थ मनातला कोणताही भाव अर्थात् कोणताही विषय शुद्ध इंग्रजीमधून मांडता येणे. हे कौशल्य ज्यांना आत्मसात केलेच पाहिजे त्यांनी त्यासाठी मागाहून प्रयत्न करावे. बाकीच्यांनी इंग्रजी समजण्यापुरते शिकावे ही नारो दाजीबा ह्यांची सूचना विचारार्ह आहे. हा विषय येथे थांबविण्यात येत आहे.
— संपादक
संपादक, आजचा सुधारक यांस,
ज्यांची आजचा सुधारक या मासिकाची वर्गणी थकली असते त्यांच्याकडे खाना होणा-या प्रत्येक अंकासोबत वर्गणीसाठी एक विनंतीपत्र लावलेले असते. त्या विनंतीपत्रात आपण आपल्या वाचकांना ‘प्रिय ग्राहक असे संबोधन वापरता. आपणास नम्र विनंती आहे की, सुधारकाच्या वाचकांस आपण ग्राहक हे संबोधन न वापरता त्यांना ‘प्रिय सुधारक असेच संबोधावे. कारण आम्ही सुधारकामधून मोलाचे विचारधन घेतो आणि स्वतःलासुद्धा सुधारकच समजतो. किमान संपादकांनी त्यांचे वाचक सुधारक’ आहेत असे समजून चालावे ही विनंती.
– न. रा. सब्जीवाले