उपयोगितावादाच्या टीकाकारांच्या आक्षेपांपैकी एक आक्षेप असा आहे की सुख ही एकमेव गोष्ट स्वतोमूल्यवान आहे असे उपयोगितावाद्यांचे प्रतिपादन आहे; पण त्यांच्या अनुभववादाशी सुसंगत राहायचे तर ते स्वतोमूल्याची (intrinsic value) कल्पना वापरू शकत नाहीत. कारण स्वतोमूल्याची कल्पना आनुभविक (empirical) कल्पना नाही.
या आक्षेपाला उत्तर देण्यापूर्वी प्रथम स्वतोमूल्य म्हणजे काय ते पाहिले पाहिजे.
प्रथम मूल्य या कल्पनेविषयी. मूल्य म्हणजे अशी गोष्ट की जी आपल्याला हवीशी, महत्त्वाची वाटते, आणि तिच्या प्राप्तीकरिता आपण कष्ट करायला, विविध प्रकारची किंमत द्यायला तयार असतो. उदा. अन्न, वस्त्र, निवारा इत्यादि. या गोष्टी प्राप्त करणे इतके अनिवार्य असते की त्याकरिता आपण मोठी किंमत मोजायला तयार असतो. म्हणजे त्या गोष्टी । मूल्यवान आहेत असे आपण मानतो.
मूल्य दोन प्रकारचे असते. (१) स्वतोमूल्य आणि (२) परतोमूल्य. एखादी गोष्ट आपल्याला तिच्या साह्याने आणखी काही प्राप्त करता येईल म्हणून नव्हे, तर केवळ तिच्याकरिताच हवी असते म्हणजे ती प्राप्त झाल्यावर अन्य काही साध्य व्हावे अशी आपली अपेक्षा नसते, आणि अन्य काही मिळाले नाही तरी आपली काही तक्रार नसते. उलट काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला त्यांच्या स्वतःकरिता नको असतात, पण अन्य इच्छित गोष्टींचे साधन म्हणून हव्या असतात. पहिल्या प्रकारच्या वस्तूंना स्वतोमूल्यवान आणि दुसन्या प्रकारच्या मूल्यांना परतोमूल्यवान वस्तू म्हणतात, किंवा त्यांना अनुक्रमे साध्यमूल्य आणि साधनमूल्य असते असे म्हणतात, ज्यांना साधनमूल्य आहे अशा गोष्टींची हवी तितकी उदाहरणे देता येतील. उदा. अन्न, कपडे, औषधे इत्यादि. आपल्याला जर भूक नावाची गोष्ट नसती, तर आपण अन्नाकडे ढुंकूनही पाहिले नसते, आणि जर आपल्याला आजार नसते तर औषधाच्या वाटेला कोणी गेले नसते. पण ज्यांना स्वतोमूल्य किंवा साध्यमूल्य आहे अशाही वस्तू आहेत हे सहज दाखविता येईल. भुकेल्या मनुष्याला क्षुधाशान्ति हवी असते, तिच्या साह्याने आणखी काही मिळविण्याकरिता नव्हे, तर केवळ क्षुधाशांतीकरिता. तसेच आरोग्य अन्य इच्छित गोष्टी मिळविण्याचे साध्य असेल; पण ते त्याच्या स्वतःकरिताच आपल्याला हवे असते.
अनेक वस्तूंना स्वतोमूल्य असते असे आपण मानतो हे आपण प्रत्यक्ष उदाहरणांच्या साह्याने दाखविले. पण ते दुस-या एका प्रकाराने आणखी पक्केपणाने दाखविता येते. एखादी वस्तू परतोमूल्यवान असण्याकरिता काहीतरी स्वतोमूल्यवान असले पाहिजे. जर काहीही स्वतोमूल्यवान नसेल तर काहीही परतोमूल्यवान असू शकणार नाही. परतोमूल्यवान वस्तूचे मूल्य ती अन्य कशाचे तरी साधन असल्यामुळे तिला प्राप्त झालले असते. म्हणजे हे अन्य साध्य जर मूल्यवान नसेल, तर त्याचे साधन असलेली वस्तू परतोमूल्यवान असू शकणार नाही हे उघड आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की या साध्याचे मूल्य स्वतोमूल्य आहे की परतोमूल्य ? स्वतोमूल्य असेल तर त्याच्या साधनाचे परतोमूल्य उपपन्न होते. पण जर ते साधनमूल्य असेल तर ? तर ज्या साध्यामुळे त्याला साधनमूल्य प्राप्त झालेले असते ते साध्य मूल्यवान असले पाहिजे हे उघड आहे. साध्याचे मूल्य परतोमूल्य असेल तर ते त्याच्या साध्यामुळे प्राप्त झाले असले पाहिजे. परंतु ही साध्यसाधनांची शृंखला कितीही मोठी असली तरी ती कुठेतरी संपवावी लागेल, आणि जे अंतिम साध्य असेल त्याचे मूल्य स्वतोमूल्य असावे लागेल. हे एका वेगळ्या क्षेत्रातील उदाहरणाने स्पष्ट करता येईल. पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवर जो मनोहर प्रकाश पडलेला असतो, तो पृथ्वीचा स्वतःचा प्रकाश नसतो, तो चंद्राचा असतो. परंतु चंद्राचाही प्रकाश त्याचा स्वतःचा नसून तो सूर्याचा असतो. सूर्याचा प्रकाश मात्र त्याचा स्वतःचा असतो. जर काहीही स्वप्रकाश नसते तर परप्रकाशित काहीच असू शकले नसते. म्हणजे काहीतरी परप्रकाशित असण्याकरिता काहीतरी स्वप्रकाश असावे लागते. मूल्यांचेही असेच आहे.
सारांश, कशाच्याही प्राप्तीकरिता होणाय्या प्रयत्नात प्रत्येक मनुष्याचे काहीतरी स्वतोमूल्य असते.
इथे एक बारकावा लक्षात घ्यायला हवा. भुकेला मनुष्य अन्नाला स्वतोमूल्य मानतो असे आपण वर म्हणालो, पण ते परमार्थाने खरे नाही. स्वतोमूल्य अन्नाला नाही, तर ते खाण्याला, खाण्याच्या अनुभवाला आहे. कोणतीही इच्छा पूर्ण झाली की आपल्याला सुख होते, संतोष होतो. अनेकदा आपण एखाद्या गोष्टीकरिता पुष्कळ धडपड़तो, पण ती प्राप्त झाल्यावर आपले समाधान होत नाही. म्हणजे आपल्याला हवी असलेली गोष्ट ती नाही हे आपल्याला कळते. सुख किंवा संतोष हे इच्छापूर्तीचे गमक आहे. म्हणून उपयोगितावादी इच्छांच्या भाषेत न बोलता सुखाच्या भाषेत बोलतात. सुख हे एकमेव स्वतोमूल्य आहे असे ते मानतात. इच्छा असंख्य आहेत, पण कोणतीही इछा पूर्ण झाली की आपल्याला सुख होते. याच अर्थाने सर्व इच्छांचे अंतिम साध्य सुख, संतोष किंवा समाधान आहे असे उपयोगितावादी म्हणतात.
आता आपण टीकाकारांच्या आक्षेपांकडे वळू शकतो. ते म्हणतात की उपयोगितावादी स्वतोमूल्याची कल्पना वापरू शकत नाहीत. पण आपण आताच पाहिले की ते शक्य आहे, एवढेच नव्हे तर ते पूर्ण निःसंदेह खरे आहे. कुठल्याही साध्याकरिता साधन वापरणारा प्रत्येक मनुष्य स्वतोमूल्याची कल्पना वापरतो हे आपण पाहिले आहे.
यावर टीकाकार म्हणतील की ‘आम्हाला अभिप्रेत असलेली स्वतोमूल्याची कल्पना ही नव्हे. ही कल्पना नीतिशास्त्रीय नाही, केवळ वस्तुस्थितिनिदर्शक (positive) आहे. तुम्ही फक्त एवढेच दाखविले की स्वतोमूल्य म्हणजे अशी गोष्ट की जी आपण केवळ तिच्याकरिताच इच्छितो पण आम्हाला अभिप्रेत कल्पना ही नव्हे. जे आपण केवळ त्याच्याकरिताच इच्छितो ते नव्हे, तर जे आपण केवळ त्याच्याकरिताच इच्छावे ते स्वतोमूल्य. ‘Desired’ आणि ‘desirable’ यापैकी दुसरी स्वतोमूल्याची कल्पना आहे. एखादी गोष्ट वांछित असेल, पण ती वांछनीय असेल तरच नीतिशास्त्रीय अर्थाने तिचे मूल्य स्वतोमूल्य होते. या अर्थाने उपयोगितावादी ती कल्पना वापरू शकणार नाही.
यावर उपयोगितावादी उत्तर देईल की अमुक करावे, इच्छावे, इ. क्रियापदांची विध्यर्थी रूपे आपण केव्हा वापरतो ते पाहू. सामान्यपणे असे दिसते की एखादे इष्ट प्राप्त करण्याचे साधन सांगण्याकरिता आपण विध्यर्थी क्रियापद वापरतो. धूम्रपान करू नये, किंवा ‘नेमाने व्यायाम करावा असे सल्ले आरोग्याचे साधन म्हणून आपण देतो. टीकाकारांना हे मान्य होणार नाही. ते म्हणतील की ‘सत्य बोलावे’, ‘अहिंसा पाळावी हे। विधी केवळ अन्य इष्टाचे केवळ साधन म्हणून अभिप्रेत नाहीत, ते साध्य म्हणून अभिप्रेत आहेत. कांटने विधींमध्ये hypothetical आणि categorical असा भेद केला होता; त्यांचे अर्थ औपन्यासिक आणि निरुपाधिक असे आहेत. अमुक गोष्ट आपले साध्य आहे असे गृहीत धरले, तर तुम्ही अमुक कर्म करावे हा औपन्यासिक विधी; परंतु ‘सत्य बोलावे’ मग तुमचे साध्य काहीही असो, हा विधी निरुपाधिक, साध्यनिरपेक्ष आहे.
पण निरुपाधिक विधी आहेत हे कशावरून ? सत्य, अहिंसा, इ. गोष्टी केवळ साध्ये आहेत हे कसे ठरवायचे ? ज्याला त्या गोष्टी आवडत असतील त्याची ती साध्ये असू । शकतील. पण बाकीच्यांनी त्यांना आपली साध्ये का मानावे ? निरुपाधिक विधींची कल्पना पटण्यासारखी वाटत नाही. अमुक विधीनुसार वागणे आपले कर्तव्य आहे असे कोणी म्हणाले तर त्यावर कां ? कशाकरिता? असे प्रश्न विचारणे स्वाभाविक आहे. पण कशाकरिता’ या प्रश्नाला उत्तर नाही. कारण ते विधी साधनरूप नाहीत, साध्य सांगणारे आहेत असे टिकाकार म्हणतात. पण एखादा विधी आपण पाळावा असे सुचविताना त्याने आपले एखादे इष्ट सिद्धीस जाणार अशी आपली अपेक्षा असते. सारांश, निरुपाधिक विधीतील विध्यर्थी क्रियापदाने एकतर आपल्या कोणत्यातरी इष्ट साध्याचे साधन निर्दिष्ट होते, किंवा तो विधी निरर्थक असला पाहिजे, असे म्हटले आहे.
पण टीकाकारांचे आक्षेप अजून संपलेले नाहीत. ते म्हणतात, ‘तुम्ही म्हणता की सुख हे प्रत्येक मनुष्याचे वांछित असते. हे ठीक आहे. पण तुम्ही असेही प्रतिपादता की जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख हे मनुष्याचे नैतिक साध्य आहे. हे सिद्ध करण्याकरिता तुम्ही असे दाखविले पाहिजे की सर्वसुख हेही प्रत्येक मनुष्याचे वांछित आहे. पण हे तर उघड उघड असत्य आहे.
यावर उपयोगितावाद्याचे उत्तर असे असेल की सर्वसुख हेही प्रत्येक मनुष्याचे वांछित असते. ते सामान्यपणे आपल्या लक्षात येत नाही. पण ते पुढीलप्रमाणे दाखविता येईल. कोणीही मनुष्य निर्भेळ स्वार्थी नसतो. निदान आपल्या कुटुंबातील लोक, मित्रमंडळी यांचेही सुख त्याच्या इच्छेचा विषय असतो. त्याचप्रमाणे निर्दोष, निरपराध मनुष्य, किंवा प्राणीही, जर मोठ्या दुःखात असेल तर ज्याचे मन द्रवत नाही असा मनुष्य सापडणे कठीण
आहे. जेव्हा संत म्हणतात की सर्वांसि सुख लाभावे, कोणी दुःखी असू नये’ तेव्हा हे ज्याला पटत नाही असा मनुष्य विरळा. सामान्यपणे आपण ज्याला व्यवहारीपणे वागणे म्हणतो तो आपल्यावर लोक कुरघोडी करतील या भयाने स्वीकारलेला पवित्रा असतो. प्राचीन काळी मनुष्य जेव्हा टोळ्या करून राहात असे तेव्हा प्रत्येक टोळी अन्य टोळ्यांविरुद्ध बचावाचा पवित्रा घेऊन वागत असे, आणि आजच्या सुधारलेल्या काळातही राष्ट्रे परस्परांकडे संशयाने पाहात असतात, आणि त्यामुळे त्यांच्या सहानुभूतीला मर्यादा पडतात. हळूहळू मनुष्याच्या हे लक्षात आले आहे की संघर्षापेक्षा सहकार्य हे सुखाचे समर्थ साधन आहे.
इतिहासात आपल्याला दिसते की मनुष्य हळूहळू कमी स्वार्थी आणि अधिक परार्थी झाला आहे. जंगली मानवापेक्षा नागर मानव कमी स्वार्थी आहे. आणि तसेच प्राचीन मानवापेक्षा अर्वाचीन मानव अधिक सर्वार्थवादी झाला आहे. गुलामांची प्रथा नष्ट झाली आहे. स्त्रियांची स्थिती पुष्कळ सुसह्य झाली आहे. एकाधिकारशाही जाऊन लोकशाहीचा जग स्वीकार करीत आहे. समाजवादी राष्ट्रे किंवा संस्था निर्माण झाल्या आहेत. या सर्वांवरून असे दिसते की जसे स्वसुख मनुष्याचे ईप्सित असते तसे सर्वसुखही असते. फक्त ते भयामुळे, अज्ञानामुळे, किंवा गैरसमजांमुळे फारसे व्यक्त होत नाही.
त्यामुळे स्वतोमूल्याची कल्पना उपयोगितावाद्याला वापरता येण्यात काहीच अडचण नाही असे म्हणता येते.