संपादकीय

आमची संस्कृती आणि परिस्थितिशरणता
आपल्या आचरणामध्ये श्रद्धामूलक वा संस्कारजन्य परिस्थितिशरणता आहे. विवेकाला परिस्थितिशरणतेचे वावडे आहे. विवेकवाद्यांचे कोणत्याही व्यक्तीशी भांडण नसून श्रद्धेशी आहे, संस्कारांशी आहे त्याचप्रमाणे श्रद्धा, संस्कार आणि आप्तवाक्यप्रामाण्य ह्यांत फरक नाही ह्याचा उल्लेख मागच्या अंकात केला होता. समाजातील विषमता काही व्यक्तींवर अतिशय अन्याय करणारी असल्यामुळे आणि विवेकवाद्यांना तिच्याशी लढा द्यावयाचा असल्यामुळे विषमतेची काही बटबटीत उदाहरणे ह्या स्तंभातून देण्याचा मानस आहे. त्यायोगे विषमता का नको ते पुन्हा स्पष्ट होईल आणि तीवर उपाय शोधणे शक्य होईल. अन्यायकत्र्या व्यक्तींना उपदेश केल्याने, त्यांना घेराव, मारहाण किंवा त्यांचे प्राण-हरण केल्याने प्रश्न सुटणार नाहीत तर अविवेकी लोकांच्या मनांत विवेकाचा उदय झाल्यासच ते सुटतील आणि शंभर टक्के लोक विवेकी झाले नाहीत तरी पंचावन्न टक्के होऊ शकतील, विवेकी नेहमीसाठी अल्पसंख्य राहणार नाहीत, असा विवेकवाद्यांचा विश्वास आहे. आजवर अविवेकी कृती करण्यासाठी वातावरण तापविण्याच्या पद्धती जितक्या सहजपणे माणसांना हाताळता आल्या आहेत तितक्या सहजपणे विवेकी कृती घडविता आल्या नाहीत त्या दृष्टीने उपदेशाचा उपयोग झालेला नाही म्हणून ह्या पद्धती प्रयत्न-प्रमाद (trial and error) करून सिद्ध कराव्या लागतील.
पुढे विषमतेच्या उदाहरणादाखल एक वृत्तान्त देत आहोत. हा वृत्तान्त P. Sainath ह्यांनी लिहिलेल्या Everybody Loves a Good Drought ह्या नावाच्या Penguin Books यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून घेतला आहे.
तामिळनाडूमधल्या रामनाङ जिल्ह्यात मीसल नावाचे खेडे आहे. हे कोठल्याही मोठ्या रस्त्यापासून पुष्कळ दूर, अंदाजे ४० किलोमिटर आत असे आहे. तेथे आजही गुलामगिरीसदृश प्रथा आहेत. ही ‘बंधुआ मजदूरी’ (bonded labour) मुख्यतः चक्किलियन् जातीच्या लोकांच्या वाट्याला येते. ही जात तेथल्या अस्पृश्यांमध्येही सर्वांत नीच मानली जाते व तिचा बाकीच्या अस्पृश्यांनाही विटाळ होतो. चक्किलियन् जातीचे लोक वंशपरंपरेने कातडी कमावण्याचे, चांभाराचे आणि वाजंत्री वाजविण्याचे काम करतात. त्यांनाच एकमेकांचे केस कापण्याचे काम करावे लागते कारण बाकी सगळ्याच जाती त्यांचे ते काम करण्याचे नाकारतात. मीसलमधल्या चक्किलियनांमध्ये ज्यांना सावकाराच्या घरी आयुष्यभराचे दास्य करावे लागते असे घरटी दोघे तरी असतात.
हा जो बंधुआ मजदूर असतो त्याला जमीनमालकाकडून किंवा सावकाराकडून ‘पगार मिळतो इतकेच नव्हे तर पगाराच्या वर काही लाभ (perquisites) मिळतात असे त्यांचा मालक सांगतो. बघा ते सारे कसे चातुर्याने केलेले आहे ! अशा नोकराला वर्षाला एक हजार रुपये पगार आणि मालकांचे रात्रीचे जेवण झाल्यावर जे काय उरेल ते सगळे अन्न मिळते. अशा मजुरांचे मालक मोठ्या आग्रहाने, ठासून, सांगतात की त्यांचे आणि त्यांच्या नोकरांचे संबंध स्वामी आणि त्याचा दास असे नसून ते सर्वसामान्य घरमालक आणि घरगडी असे आहेत. पण त्यात मेख अशी आहे की हे नोकर त्यांची नोकरी सोडून कोठेच जाऊ शकत नाहीत. जयमणी आणि अरुमुखम् ह्यांना त्यांच्या मुलीच्या जयाराणीच्या लग्नासाठी काही रोख रकमेची गरज होती. आमच्याजवळ गहाण टाकण्याजोगे फक्त आमच्या मुलाचे श्रम होते असे जयमणीने सांगितले. सावकाराकडून रकमेची उचल करताना त्यांनी कर्ज फिटेपर्यंत आमचा मुलगा तुमच्याकडे कामाला येईल अशी त्याच्याशी बोली केली आणि दुस-या दिवशी सकाळी ८ वाजता जयाराणीचा भाऊ सावकाराकडे हजर झाला. त्याला रोज सकाळी ८ पासून रात्री ९ वाजेपर्यंत काम करावे लागते. तो घरातली सगळी कामे करतो तशी शेळ्यामेंढ्या चारण्याची, शेतात निंदण खुरपण करण्याची कामेदेखील करतो. बारा महिने असे काम केल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षासाठी त्याला बांधून घेतले जाईल कारण त्याच्या आई-वडिलांनी घेतलेल्या रकमेवरचे व्याजच त्याच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त होईल आणि ते फेडणे त्यांना शक्य होणार नाही. हे दुष्टचक्र चालूच राहणार ! ते व्याज दरमहा दरशेकडा रुपये १० इतके असले तर ते द.सा.द.शे. १२० रुपये इतके पडते. काही ठिकाणी हा दर द.सा.द.शे. ३२० पर्यंत जातो. मुदलापोटी मुलगा आणि व्याजापोटी त्याचा बाप असे दोघेही एकाच सावकाराला बांधून पडल्याची उदाहरणे आहेत. व्याजाचा दर १२० टक्के आहे की। ३२० टक्के आहे ह्याचे पुढे महत्त्व राहत नाही कारण त्यापैकी कोणताही दर ऋणकोला सारखाच चिरडून टाकतो.
वयाची साठी उलटलेला पुच्चि हा चक्किलियनापैकी एक ज्येष्ठ नागरिक, पुच्चि ह्या नावाचा अर्थ आहे कीटक म्हणजे मच्छर किंवा चिलट, त्या जातीतले दुसरे प्रचलित नाव आदिमयी असे आहे. त्याचा अर्थ आहे गुलाम, अशा नावांनी त्यांचे मालक ह्या थरातल्या लोकांना पिढ्यानुपिढ्या हाक मारत आले आहेत आणि त्यांनी ती नावे स्वीकारून आत्मसात् । केली आहेत. त्यांच्या रेशनकार्डवर त्यांचे उत्पन्न मासिक रु. २५०/-असे नोंदलेले आहे. पण त्या आकड्याचा त्यांच्या प्रत्यक्ष उत्पन्नाशी अर्थाअर्थी संबंध नाही. त्यांना रेशनकार्डासाठी भराव्या लागणाच्या प्रश्नावलीमध्ये ‘तुमच्याकडे दोन गॅस सिलिंडर्म आहेत काय अशांसारखे प्रश्न आहेत ! त्यांच्या संपूर्ण परिवाराचे एकूण वार्षिक उत्पन्न ती गॅसची शेगडी आणि तिची दोन सिलिंडर्स ह्यांच्या किमतीपेक्षा कितीतरी कमी भरेल.
काही ‘दास’ थोड्या बन्या घरी पडले आहेत. अरुमुखमला त्याचा मालक दिवसातून तीनदा जेवू घालतो. पण षण्मुखमची मुलगी चित्रावल्ली (वय १२ वर्षे) ही तिच्या मालकाकडे अन्नावारी राबते. तिला पगार नाही, पण उरलेसुरले घरी घेऊन जाण्याची मुभा आहे. वेलूला
वार्षिक १४०० रुपये पगार आहे पण तो सगळाच्या सगळा मूळ मुद्दल आणि त्याचे व्याज ह्यातच कापला जातो. वेलु गेली पाच वर्षे त्याच्या मालकाकडे राबतो आहे आणि त्याचा पगार कागदोपत्री १००० चा १४०० पर्यंत वाढला आहे.
पुच्चीच्या दोन मुली, मण्यपुष्पम् (२० वर्षे) आणि साम्यद्रल (१९ वर्षे), अन्नावारी सावकाराकडे बांधून पडल्या आहेत. त्यांना कोणताही पगार नाही. मुलींना पगार देण्याची तिकडे प्रथाच नाही. चक्किलियनांमध्ये साक्षरता साहजिकच नाममात्र आहे. मीसल मधल्या चौघांनी हायस्कूलचे कधीकाळी तोंड पाहिले होते, पण आज ते सगळेच लिहिणे वाचणे विसरून गेले आहेत. त्यांचे अन्न कोणते असते ते बघितले तर मन विषण्ण होऊन जाते. सावकारांच्या घरच्या अवशिष्ट अन्नावर गुजराण करणारी अनेक कुटुंबे आहेत. इतके थोडे अन्न खाऊनसुद्धा त्यांना केवळ पोटात काटे भरण्यासाठीच पुनःपुन्हा कर्ज काढावे लागते.
रामनाङ जिल्ह्यात विभिन्न जातींतील उच्चनीचभाव इतका तीव्र आहे की एखादा चक्किलियन जर स्वच्छ दाढी केलेला आणि ब-यापैकी कपड़े केलेला उच्चवर्णीयांना आढळला तर त्यावरून अगदी अलीकडेपर्यंत दंगा पेटत असे. कनिष्ठ जातींनी कपडे कोणते घालावयाचे ते वरिष्ठ जाती ठरवून देत. कोणी कोणते कपडे घालावे त्याबद्दल १८५० च्या सुमाराला मद्रासच्या गवर्नरने नियम घालून दिले. त्यांमध्ये त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या अस्पृश्यांच्या स्त्रियांना आपले स्तन झाकण्याची मुभा दिली. तोपर्यंत अस्पृश्य स्त्रियांनी तसे करणे हे वरिष्ठ वर्णीयांचा अवमान केल्यासारखे ते मानीत. १९५० आणि ६० च्या दरम्यान पुष्कळ चक्किलियनांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला पण तरीदेखील त्यांच्या सामाजिक दर्जात फरक पडलेला नाही.
मीसलच्या चक्किलियनांची परिस्थिती सुधारावी ह्यासाठी सरकारने थोडी खटपट केली आहे. १९८१ मध्ये त्यांच्यासाठी घरे बांधण्यासाठी तेथील थोडी जमीन शासनाने अधिगृहीत केली पण तेथल्या वरिष्ठ जातींनी लढा देऊन ८६ सालापर्यंत ती जमीन सरकारच्या ताब्यात जाऊच दिली नाही. त्या भूमीच्या अधिग्रहणानंतर आता तेथल्या ६०६५ परिवारापैकी ३० परिवारांना स्वतःचा म्हणण्याजोगा भूखंड किंवा घर झाले आहे. पण अजून तितकेच परिवार बेघर आहेत.
रामनाङ जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या १८% जनता अस्पृश्य आहे. त्यांच्या पैकी ९०% लोक मीसलच्या चक्रिलियनांच्या परिस्थितीत आहेत. बहुतेक सगळे अस्पृश्य हे। भूमिहीन मजूर आहेत. काही बटईने (हिस्सा ठेवून) शेती करणारे आहेत किंवा अगदी थोड्याश्या शेतीचे धनी आहेत. त्या जिल्ह्यात काम करणाच्या एका तरुण आय.ए.एस. प्रोबेशनर अधिका-याने रामनाडच्या आसपासच्या ८० खेड्यांचा अभ्यास केला असता त्याला तेथल्या ५० टक्के अस्पृश्यांच्या जवळ काही थोडीशी शेतीची अवजारे सोडल्यास त्यांची इतर सर्व एकत्रित संपत्ती शंभर रुपये किंमतीचीही नाही असे आढळून आले आणि त्याच्या मनात विषाद दाटून आला.
१८७१ सालच्या जनगणना आयुक्तांनी त्यांच्या अहवालात एक गोष्ट नमूद केली आहे ती अशी–“येथले अस्पृश्य, ज्यांत चक्किलियन आणि परिया यांचा समावेश होतो, निरपवादपणे वरिष्ठ जातींचे गुलाम आहेत. आज सव्वाशे वर्षांनंतर त्यांच्या परिस्थितीत, कागदोपत्री त्यांपैकी काहींच्या नावावर पगार दाखविण्याव्यतिरिक्त कसलाही फरक पडलेला नाही.
हा सर्व वृत्तान्त लिहून पी. साईनाथ त्याला एक ताजा कलम जोडतात. ही ‘गुलामगिरी’ तामिळनाडूमध्येच नव्हे तर इतरही राज्यांत प्रच्छन्न स्वरूपात आढळते. आपल्या सरकारचे तिच्याकडे एकूण दुर्लक्षच आहे. तामिळनाडू राज्य म्हणते की त्यांच्या राज्यात अश्या गुलामगिरीच्या तुरळक घटना (stray cases) आढळतील पण सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या आयोगाने १९९६ च्या आरंभी राज्य सरकारचा हा तुरळक घटनांचा दावा फोल ठरवून एकट्या तामिळनाडूमध्ये दहा लाखांच्या वर लोक गुलामगिरीत खितपत पडले आहेत असा आपला अधिकृत अहवाल दिला आहे. (अर्थात् ह्या गुलामगिरीच्या मुळाशी तेच जुनेपुराणे कारण आहे – कर्ज !)
तामिळनाडूमधल्या तेवीस जिल्ह्यांची आणि तेथील वीस व्यवसायांची पाहणी करून आयोगाने वरील निष्कर्ष काढला व शेवटी राज्यशासनाची मख्ख अशी वृत्ती वर्णन करून असे म्हटले आहे की राज्यशासनाने दिलेले तपशील आपल्या निरीक्षणांशी जुळत नाहीत इतकेच नव्हे तर ते कपोलकल्पित (fabricated) आहेत.
आता आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू
वर लिहिलेली हकीकत आमची म्हणजे आमच्या देशातील लोकांची, सांस्कृतिक पातळी दाखविते. आपली ही परिस्थिती इंग्रजांनी नोंदल्यानंतरसुद्धा सव्वाशे वर्षे टिकून राहते ह्यात आमचा सर्वांचा निढवलेपणा दिसतो. हा निढवलेपणा, ही संवेदनशून्यता आम्हा सर्वांमध्ये असल्याशिवाय असे प्रघात टिकू शकत नाहीत. ही परिस्थितिशरणता केवळ ऋणकोची नाही. ती धनकोची, इतकेच नव्हे तर आपणा सर्वांची आहे. हा आमच्या मनावरच्या संस्कारांचा परिणाम आहे. आमच्या मनांनी जणू गेंड्याचे कातडे पांघरले आहे. त्यांना अन्यायाची टोचणीच लागत नाही. ही आमच्या भारतीय समाजातील प्रामुख्याने उच्चवर्णीयांनी जपलेली परंपरा आहे. कारण ती अद्यापि अखंड आहे. उद्या आमच्या हयातीत जर ती खंडित झाली तर तिला आपण रूढि म्हणू शकू. (क्वचित् शास्त्राद्रूढिर्बलीयसी असे म्हणून आपण तिचे सर्मथनही करू.) ती रूढि तामिळनाडूमधल्या कोठल्या तरी कोप-यात आहे असे म्हणून आम्हाला तिला सोडून देता येत नाही. आम्ही बहुसंख्य, स्वतः जरी इतका अन्याय करीत नसलो, तरी तो झालेला पाहून आमचे मन पेटून उठत नाही. हे असे होणारच असे आम्ही धरून चालतो तेव्हा आम्ही त्या घटनेला मूक पाठिंबाच देत असतो. त्यामुळे आम्हीही तेवढेच गुन्हेगार आहोत. गुन्हा माझ्या भावाने केल्यानंतर मी त्याच्यावर पांघरूण घातले तर मीही त्या गुन्ह्यात भागीदार होतो. म्हणजेच गुन्हेगाराची आणि माझी संस्कृती एकच होते. माझ्या संस्कृतीत चोरी, भ्रष्टाचार ह्या सा-यांना जागा आहे. (येथे संस्कृती हो शब्द सर्वसमावेशक आहे आणि संस्कार हा केवळ सुसंस्कार ह्या परिमित अर्थाने घेतलेला नाही.) जोपर्यंत आमचे केन्द्र सरकार आणि आमची राज्य सरकारे अन्याय चालू देतात, त्यांकडे डोळेझाक करतात, तोपर्यंत ते अन्याय आम्ही सारेच करतो असे मानले पाहिजे. आमचे सर्वांचे संस्कार काही बाबतीत समान असल्यामुळे अशा अन्यायकारक घटना घडतात हे मान्य केले पाहिजे. एवढ्यामुळेच आमचे, विवेकवाद्यांचे, भांडण कोणा व्यक्तींशी नाही. ते आमच्या सर्वांच्या मनोविश्वात विवेकाच्या कसोटीवर जे जे त्याज्य ठरते त्याच्याशी आहे. ज्याला मानसशास्त्रामध्ये अभिसंधीकरण (conditioning) म्हणतात त्याच्याशी आहे. आमचे सर्वांचे मनोविश्व जर ह्या बाबतीत समान नसते तर आम्ही असे परिस्थितिशरण झालो नसतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.