लोक अश्लील कशाला म्हणतात ते पाहिले तर असे दिसतें कीं परिचयाच्या गोष्टींना लोक अश्लील मानीत नाहीत. उदाहरणार्थ हिंदुस्थानांत उच्च वर्गातील स्त्रिया स्तन उघडे टाकून रस्त्याने जात नाहीत व बहुतेक ठिकाणीं घरींही उघडे टाकीत नाहीत तथापि हिंदुस्थानांतही कांही ठिकाणी घरीं स्तन उघडे ठेवतात व बाहेर जातांना मात्र वर पातळ आच्छादन असते. जाव्हा बेटांत गेल्यास तेथे ते बाहेर जातांनाही झांकीत नाहीत. अशी उदाहरणे दिसलीं असतां अश्लीलता ही केवळ सांकेतिक कल्पना आहे, यापेक्षा जास्त तथ्य त्यांत नाही, हे समजण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नीतीची गोष्ट. ‘अभिसार’ गोष्टींत फक्त नीतीचाच संबंध आहे. त्यांत कांही अश्लील आहे असे प्रामाणिक सनातनी देखील म्हणणार नाहीत. त्यांत सांकेतिक अनीति आहे, परंतु दुसरयाचे नुकसान करणे हीच अनीतीची सर्वमान्य व्याख्या आहे. तथापि बहुतेक लोक सांकेतिक व्याख्याच धरतात, म्हणजे रूढि असेल तीच नीति, आणि त्याव्यतिरिक्त अनीति म्हणतात. समंजस लोकांनी असे म्हणतां नये.