पत्रव्यवहारे

शेरशहा ते अटलबिहारी
जवळ जवळ रोज आपल्याला अशी बातमी वाचायला मिळतेः- “समोरून येणा-या वाहनाला चुकवताना बसगाडी रस्ता सोडून बाजूला गेली व झाडावर आदळली. ड्रायव्हर मृत व इतर ७ अत्यवस्थ.” फरक इतकाच की कधी बस, कधी ट्रक किंवा कधी कार, किंवा रस्ता सोडून बाजूला जाण्याचे कारण बदलते. कधी टायर फुटल्याने, कधी वाहन चालकाला डुलकी लागल्याने, तर कधी चुकार पादचायाला किंवा सायकलस्वाराला वाचवताना गाड़ी रस्त्याबाहेर जाते.
हायवे शेजारी जर मोठे वृक्ष, मजबूत बांधकामे, मोठे मैलाचे दगड अशा गोष्टी नसल्या तर रस्ता सोडून बाजूला गेलेली गाडी शेतातील पिकांमध्ये किंवा माळावरील झुडुपांमध्ये घुसून हळू हळू थांबेल, फार तर उलटी होईल. तो एक सौम्य अपघात ठरेल, सहसा कोणी मरणार नाही. किंवा कोणाला गंभीर दुखापत होणार नाही.
रस्त्याशेजारी वडाची झाडे लावण्याची सुरुवात सम्राट अशोक, किंवा शहाजहान, किंवा शेरशहा यांनी केल्याचे शालेय इतिहासात वाचल्याचे अंधुक स्मरते. त्याकाळी लोक पायी, घोड्यावरून किंवा बैलगाडीने प्रवास करत, म्हणून त्यांना सावली देणाच्या झाडांची गरज होती. आता हायवेवरून प्रवास करणारे जवळ जवळ सर्व लोक साठ ते शंभर किलोमीटर ताशी वेगाने जाणान्या वाहनांचा उपयोग करतात. त्यांना आता सावलीची गरज नाही, तर निर्धाक वाहतुकीची गरज आहे. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी हायवेच्या दोन्ही बाजूस साधारण सपाट जमीन किंवा शेत असावे. त्यात मोठे वृक्ष, मोठे दगड, मजबूत भिंती, किंवा खोल खड्डे असू नयेत. पण झुडुपे, पिके, किंवा तीन इंचापेक्षा कमी जाड खोड असलेली लवचीक झाडे या जमिनीवर असली तरी चालेल.
या सर्वसाधारण नियमाला दोन अपवाद असावेत. जेव्हा हायवे नदीवरून किंवा मोठ्या कालव्यावरून जात असेल तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूस बरयाच अंतरापर्यंत, मजबूत भिंत व झाडे असावीत. म्हणजे बस पाण्यात पटण्याचा धोका कमी होईल. तसे घाटामधल्या रस्त्याच्या दरीकडील बाजूला मजबूत भिंत व मोठी झाडे असावी, म्हणजे वाहने कड्यावरून शेकडो फूट खाली पडण्याचा धोका कमी होईल.
कोणाही समंजस माणसाला ही सर्व विधाने मान्य व्हायला हरकत नाही. निसर्गसौंदर्याचाच विचार केला, तर हाय-वे पासून १००-२०० फुटांवर असलेली झाडांची रांग नजरेच्या टप्प्यात नीट येईल, व १० फूट अंतरावर झाडांपेक्षा अधिक सुंदर दिसेल. म्हणून माझी वाहतूक मंत्रालयाला व हायवे अथॉरिटी जना विनंती आहे की या बाबतीत विचारविनिमय करून धोरण बदलावे व हायवे शेजारी मोठी होणारी झाडे लावू नयेत, व असलेली झाडे काढून टाकावी.
वेस्टर्न इंडिया ऑटोमोबिल असोसिएशन, ट्रक वाहतूक करणाच्या संघटना, ३ महाराष्ट्र राज्य रस्ता वाहतूक प्राधिकरण (M.S.R.T.C.) याबाबत लक्ष घालून हा प्रश्न धसास लावतील काय?
नवीन होऊ घातलेल्या मुंबई-पुणे द्रुत गति मार्गावरदेखील दोन्ही बाजूला झाडे लावणार असे आत्ताच जाहीर झाले आहे. या मूर्खपणाला काय म्हणावे ? की मानवी जीवनाला आपल्याकडे किंमत शून्य आहे ? आमच्या सर्व मंत्र्यांनी, सचिवांनी व चीफ इंजिनियर यांनी परदेशच्या वाप्या केलेल्या असतात. तेथील महामार्गावर दोन्ही बाजूला किती अंतरापर्यंत झाडे असत नाहीत हे सर्वांनी पाहिलेले नाही काय? की डोळ्यांना दिसले तरी मेंदूत शिरत नाही ? परदेशांना, विशेषतः पाश्चात्त्य देशांना, महामार्गाचा अधिक अनुभव आहे. व त्यांच्यापासून चांगल्या गोष्टी शिकण्यात कमीपणा वाटण्याचे कारण नाही. महामार्गाशेजारील वृक्षांच्या बाबतीत (व अन्य सर्व मजबूत अडथळ्यांच्या बाबतीत) शेरशहाची परंपरा चालवण्यापेक्षा नवीन बुद्धी चालवायला हरकत नसावी.
महामार्गाच्या अगदी जवळ झाडे असल्याने वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होते असे काहींना वाटते. ते खरे नाही. प्रदूषण तीन प्रकारचे –
१) कण-प्रदूषण – यामध्ये झाडांचा उपयोग नाही.
२) वायु-रूप प्रदुषण – उदा. कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायॉक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड. वायुरूप प्रदूषणाचे परमाणू अत्यंत वेगाने हवेत पसरतात त्यामुळे झाडे जवळ असणे लांब असणे याने काही फरक पडत नाही. शिवाय झाडे काही प्रयत्नपूर्वक (actively) प्रदुषण शोषून घेत नाहीत. योगायोगाने जेवढे परमाणू झाडाच्या पानांच्या छिद्रांतून आत शिरतील तेवढेच परमाणु झाडे नष्ट करतात. तसेच प्रदुषणाच्या दृष्टीने पानांचे एकत्रित क्षेत्रफळ महत्त्वाचे आहे. झाडे मोठी आहेत, का लहान आहेत, का गवत आहे का पिके आहेत याने काही फरक पडत नाही.
३)ध्वनिप्रदूषण–महामार्गाशेजारी वस्ती जवळ असता कामा नये. त्यामुळे ध्वनिप्रदूषण विचारात घेण्याचे कारण नाही.
वर दिलेले अपवाद वगळता, महामार्गाशेजारची सर्व मजबूत झाडे कापून टाकावी, व नवीन मजबूत (massive) झाडे महामार्गापासून किमान १०० फूट अंतरापर्यंत लावू नयेत असे राष्ट्रीय धोरण असावे व महामार्ग-विषयक कायद्यात तसा बदल करावा, यासाठी आजचा सुधारकच्या वजनदार (influential) व्यक्तींनी प्रयत्न करावे अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे.
सुभाष आठले
२५ नागाळा पार्क, कोल्हापूर

संपादक, आजचा सुधारक,
सुनीती देव यांनी प्रा. रेगे आणि ईश्वर हा लेख लिहून प्रा. रेग्यांच्या कालनिर्णय दिनदर्शिकत वारंवार येणा-या लेखांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याचे धैर्य दाखवल्याबद्दल अभिनंदन. कारण रेगे सरांसारख्या विचारवंताला या लेखासंबंधी प्रश्न विचारण्याचे धाडस गेल्या २-३ वर्षात कुणीही केले नव्हते. आमच्यासारखी सामान्य माणसे अशा प्रकारचे लेख वाचताना गोंधळतात. उदाहरणार्थ १९९६ च्या कालनिर्णयातील ‘परंपरागत श्रद्धा हा प्रा. रेग्यांचा लेख वाचल्यानंतर अशीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती,
एकीकडे रेगे सर म्हणतात, “अंधश्रद्धेच्या एका प्रकाराचा अवलंब केला की अंधश्रद्धेच्या सबंध पसायालाच बळकटी मिळते. पशुबळी देणे, नरबळी देणे ह्यांसारख्या अघोरी प्रथाही अधिक दृढ व्हायला साहाय्य होते. कारण श्रद्धेने श्राद्ध करणारे आपल्या श्रद्धेचे समर्थन ज्या प्रकारे करतात त्याच प्रकारे ह्या इतर प्रथांवरील श्रद्धेचेही समर्थन होते. अशा प्रकारची विचारधारणा असलेली व्यक्ती कधीच श्राद्ध करणार नाही व त्याचे समर्थनही करणार नाही असे या परिच्छेदावरून वाटले होते. परंतु पुढे जेव्हा आपण लेख वाचत जातो तेव्हा मात्र या विचारांच्या विरुद्ध टोकाला जाऊन श्राद्धासारख्या विधीचे समर्थन केलेले जाणवते. हे समर्थनसुद्धा अनिवार्यता किंवा अगतिकतेमधून आलेले नसून उघड्या डोळ्यांनी व स्वच्छ मनाने स्वीकारलेले दिसते. कारण ‘श्राद्ध हा विधी आहे. आणि विधी हे एक प्रकारचे काव्य आहे. पितरांशी संपर्क साधण्याचा तो प्रतीकात्मक मार्ग आहे, ह्या शब्दांत श्राद्ध या विधीची भलावण तेथे केली गेली आहे. माझ्या मते श्राद्ध या विधीतील काव्याचे व उल्हासाचे ‘गूढ अनुभवण्यासाठी रेगेसरांइतकी विचाराची उच्च पातळी गाठायला हवी. नाहीतर श्राद्ध हे एक न टाळता येणारे कर्मकांडच आहे.
श्राद्ध विधीची प्रतीकात्मकता योग्य असेल तर पशुबळी व नरबळी या विधींचाही प्रतीकात्मक स्वरूपात आपण स्वीकार करणार आहोत का ? प्रत्यक्ष नरबळीच्या ऐवजी मातीची मूर्ती बनवून नरबळीचा विधी करणारे जर म्हणाले की त्यातून काव्याची व उल्हासाची प्रचीती मिळते तर त्यास उत्तेजन द्यावे का?
विधी संस्कारित होत असताना अनैतिक, अभद्र गोष्टी वगळल्या जातात असा प्रा. रेगे उल्लेख करतात. याच्याही पुढे जाऊन मला असे वाटते की अनैतिक व अभद्र गोष्टींबरोबरच विधीमधील असंबद्ध गोष्टी पण वगळल्या जाव्यात. श्राद्धविधीचा गाभा असलेला भाग म्हणजे पूर्वजांबद्दल आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी मंत्रोच्चार, सव्यापसव्य. ब्राह्मणांना जेवण ह्यांसारख्या असंबद्ध लौकिक क्रियांनासुद्धा स्थान देता कामा नये. ती विवेकाशी प्रतारणा ठरेल.
– प्रभाकर नानावटी
ई ६, ४, आर्मामेंट कॉलनी गणेशखिंड, औंध रोड, पुणे – ४११ ००७

संपादक, आजचा सुधारक यांस,
नरेन तांबे यांच्या पत्राला ( आ. सु. एप्रिल १९९८) हे उत्तर.
स्पार्टाची लोकशाही ही स्पार्टाच्या मूठभर नागरिकांपुरतीच होती.
ग्रीसच्या ३०० शहरी राष्ट्रांत अथेन्सची लोकशाल्ले तेव्हा व आजही आदर्श मानली जाते. ह्या लोकशाहीत फक्त वयात आलेल्या पुरुषांना मतदानाचा अधिकार होता. अथेन्सची लोकसंख्या इ. स. पूर्व ३०० च्या सुमारास साधारणतः २,६०,००० होती. त्यातले १,००,००० गुलाम, १,००,००० स्त्रिया व मुले यांना मतदानाचा अधिकार नव्हता. थोडक्यात ६०,००० पुरुष नागरिक ही लोकशाही चालवत होते. ही कितपत खरी लोकशाही मानायची?
ह्या शतकापर्यंत यु.एस्. मध्ये स्त्रियांना व काळ्या जनतेला मतदानाचा अधिकार नव्हता. पूर्ण लोकसंख्येतले गोरे पुरुष मतदार (२५ ते ३० टक्के नागरिक) राज्य चालवीत होते. अथेन्सपेक्षा किंवा स्पाटपिक्षाही ही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती.
“स्पार्टाची पाश्चात्त्य इतिहासात हुकूमशाहीसाठी प्रसिद्धी आहे’ असे नरेन तांबे म्हणतात. ३० वर्षांवरच्या स्पार्टाच्या नागरिकांनी मतदान करून चालवलेले ते राज्य होते. स्पार्टाच्या असंख्य गुलामांना (हिलॉटस्) व स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. पेरिऑयसी ही गुलाम व नागरिक ह्यांच्यामधली कारागीर जमातही मतदान करू शकत नव्हती.
म्हणून स्पार्टा ही मूठभर नागरिकांची लोकशाही होती. (किंवा हुकूमशाही होती.)

संपादक, आजचा सुधारक
थाटामाटाने होणारी लग्ने ही माझ्या माहितीप्रमाणे काळ्या पैशाच्या जोरावर चाललेली आहेत. ही माहिती जर खरी असेल तर समाजाला जडलेल्या काळ्या पैशाच्या आजाराचे ही लग्ने हे एक चिह्नच मानायला हवे.
ही उधळपट्टी फायद्याची आहे. रोषणाई, जेवण, दागिने व कपडे ह्यांवर खर्च होणा-या पैशांमुळे ब-याच लोकांना काम मिळते. ही लग्ने बंद पडली तर काळा पैसा परत तिजोरीत बंद होईल व कारागीर बेकार होतील.
काळ्या पैशांमुळे दागिने, छानछोकी कपडे व प्रवासकंपन्या यांचीही भरभराट झाली आहे असे मी ऐकते.
काळा पैसा जर असेलच तर तो सामान्यांच्या खिशात गेला तर निदान वाटला तरी जाईन.
पाश्चात्त्य देशांत व दक्षिण अमेरिकेत काळ्या पैशाने श्रीमंत झालेले “ड्रग लॉर्डस असेच महाल, यॉट्स यांत पैसे उधळतात नाहीत.
ही थाटामाटाची लग्ने थांबवायची असतील तर काळ्या पैशाच्या किडीवर उपाय केला पाहिजे. मूठभर लोकांनी निषेध व्यक्त करून किंवा लग्नाला न जाऊन ती बंद पडणार नाहीत.

ललिता गंभीर
65 Oxford Rd Newton, MA (02154 U.S.A.

श्री. संजय सहस्रबुद्धे यांच्या पत्रावर प्रतिक्रिया:
फेब्रुवारी १९९८ च्या अंकात श्री. संजय सहस्रबुद्धे यांचे पत्र वाचले.
आपल्याकडील मुलांनी आपले लग्न पंचविसाव्या वर्षी करावे म्हणजे ती स्वतः जेव्हा रिटायर होतील किंवा वयाच्या पंचावन्नाव्या वर्षापर्यंत येतील तेव्हा त्यांचे मुलगे हाताशी येतील अशा विचाराला श्री. सहस्रबुद्धे पळपुटेपणा किंवा स्वतःची जबाबदारी दुस-यावर ढकलण्याचा प्रकार असे म्हणतात. त्यांच्या त्रोटक पत्रावरून यात पळपुटेपणा कोणता याचा बोध होत नाही. फक्त ही सर्वसाधारणपणे रूढ पद्धत त्यांना योग्य वाटत नाही एवढेच लक्षात येते.
आपल्याकडील शिक्षणपद्धतीमध्ये किमान १२ वी पर्यंतचे शिक्षण घेईपर्यंत मुलगे। मुली १७ ते १८ वर्षांचे होतात. त्यानंतर कोणत्याही शाखेचा पदवीधर होण्यासाठी किमान तीन वर्षे आणि इंजिनिअरिंग किंवा मेडिकल शाखेचा पदवीधर होणार असल्यास चार ते साडेसहा वर्षे म्हणजेच तोवर मुलांच्या वयाची २० किंवा २१ ते २३ वर्षे होतात. सलग पदव्युत्तर शिक्षण घ्यावयाचे झाल्यास पुढची दीड ते दोन वर्षे त्यात खर्च होतात. म्हणजेच इतर शाखांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करून वयाची तेविशी आलेली असते. तर वैद्यक शाखेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणा-यांची पंचविशी (किंवा त्यापेक्षा जास्त) आलेली असते. मुलामुलींचे शिक्षण ही आईवडिलांची जबाबदारी असल्याने या वयापर्यंत ती मुले पूर्णपणे आईवडिलांवर अवलंबून असतात. नोकरीचा शोध. योग्य नोकरी मिळून त्यात स्थिरस्थावर होणे यामध्ये पुढची आणखी १, २ वर्षे सहज जातात. नोकरीनंतर थोडे स्थैर्य येण्याचा काळात. मुलगा जर परगावी नोकरी करत असेल तर राहण्याची खोली जागा मिळविणे. थोड्याफार नित्य गरजेच्या वस्तु घेणे. बँकेत थोड़ी शिल्लक टाकणे अशा गोष्टींसाठी गृहीत धरला जातो. बहुतांश वेळेस परगावी जागा घेण्यासाठी लागणारी रक्कमही परिस्थित्यनुरूप आईवडील मुलाला देतात. एकंदरीत आपल्याकडे शिक्षण घेऊन नोकरीत स्थैर्य येईपर्यंत म्हणजे वयाची सत्ताविशी अट्टाविशी गाठेपर्यंत मुले आईवडिलांवरच अवलंबून असतात. आणि आईवडीलही मुलांचे पालनपोषण, शिक्षण, त्यांचे लग्न. मुलीचे, सुनेचे पहिल्या वर्षातील सणसमारंभ, त्यांची बाळंपतणे इतकेच काय तर मुलगी, सून नोकरी करणारी असल्यास सोयीनुसार त्यांच्या मुलांची देखभाल करणे आदि बाबींना स्वत:च्या जबाबदा-या समजूनच पार पाडीत असतात. आपल्याकडे मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा प्रचलित शिक्षणपद्धतीप्रमाणे शिक्षण आणि नोकरी ते लग्न या टप्प्यावर येईपर्यंत आपसूकच पंचविशी किंवा त्याहीपुढचे वय गाठतो. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये या सर्वच गोष्टी आधी झाल्यास त्याचे लग्नही लवकर होते. केवळ पंचविशी गाठली नाही म्हणून लग्न करून दिले जात नाही असे घडत नाही. तसेच नोकरी मिळेपर्यंत थांबण्याचेही कारण म्हणजे लग्नानंतर मुलाला आणि त्याच्या नवपरिणीत वधूला स्वतःची हौसमौज स्वतःच करता यावी असा उद्देश दिसून येतो. सहस्रबुद्धे म्हणतात त्याप्रमाणे जबाबदारी टाळणे’ असे आईवडिलांचे विचार कुठेही दिसून येत नाहीत. एकूण पाहता, आपल्याकडे लग्न ही बाब घडताना बरोबरीचा सहचर/सखा/सखी मिळणे, भावनिक जवळीक, शारीरिक सुख या गोष्टींकडे प्राधान्याने पाहण्याऐवजी स्थैर्य आल्यावर लग्न करावे किंवा करून द्यावे असा विचार जास्त असतो. बोलभाषेत ‘बायको पोसण्याची क्षमता’ आल्यानंतरच लग्न करावे असाच दृष्टिकोन असतो. श्री. सहस्रबुद्ध्यांना हे वय खटकते आहे असे जाणवते. मात्र त्यांना ते पंचविशीच्या आधी असावे की, नंतर असावे असे वाटते याचा उलगडा होत नाही.
मला स्वतःला मात्र या वयाविषयी विचारमंथन होऊन यात काही बदल घडावे असे वाटते.
सर्वसाधारणपणे वयाच्या ११, १२ व्या वर्षापासून पौगंडावस्था सुरू होते. यात होणारे शारीरिक बदल मनातही मोठ्या प्रमाणावर उलाढाल घडवीत असतात. १४, १५ व्या वर्षापर्यंत हे बदल मनाने स्वीकारले जातात. (विशेषतः मुलींना हे बदल जास्त अवघड वाटतात. अत्यंत मानसिक खळबळीचा हा काळ असतो. भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण, बदलणान्या शरीराची लाज, शारीरिक सुख म्हणजे काय याबद्दलचे कुतूहल आणि विषयवासना वाईट असे बिंबवणारे सामाजिक जीवन या सर्व परिस्थितीमध्ये सुयोग्य मित्रमैत्रिणी (समलिंगी/भिन्नलिंगी) मिळाल्यास किंवा मन मोकळे करण्यासाठी बरोबरीचा, हक्काचा सखा किंवा सखी मिळाल्यास भावभावनांचा योग्य निचरा होऊ शकतो. तेव्हा पुन्हा एकदा शिक्षण, स्थैर्य या बाबींबरोबरच व्यक्तिगत सुखाला महत्त्व देऊन मुलामुलींचे १८ व्या वर्षानंतर लग्न करून दिल्यास पौगंडावस्थेतील वय ते प्रत्यक्ष शारीरिक सुख अधिकृतरीत्या प्राप्त होण्याचे लग्नाचे २८, ३० चे वय हा जो मधला मोठा काळ आहे तो बराच कमी होईल. व असा अनेक वर्षांचा मानसिक कोंडमारा टळल्याने आज जे मानसिक प्रश्न निर्माण होऊन बरीच व्यक्तिमत्त्वे खुरटतात तेही कमी होईल. योग्य वयात भावविश्वामध्ये बरोबरीचा सखा सखी सहचर मिळाल्याने व शरीरही ऐन तारुण्यात असताना साथीदार मिळाल्याने जीवनाचा आनंद जास्त चांगल्या पद्धतीने घेता येईल. जडणघडणीच्या काळात मुलीला नवीन घरची पद्धत (वळण) स्वीकारणे सहज शक्य होईल. (जे आजच्या वयाने विचाराने परिपक्व मुलींना कठिण जाते.) ज्याप्रमाणे मुलाचे लवकर लग्न होऊन सून घरी येईल, त्याचप्रमाणे मुलीचेही लग्न लवकरच होऊन तीही दुसन्या घरी गेलेली असेल. त्यामुले यात आर्थिक भार पडण्याची शक्यता नाही. मात्र यात पुन्हा सर्वांच्याच विचारांची पद्धत बदलण्याची आवश्यकता आहे. कारण लग्न होऊन आलेली मुलगी ही विद्यार्थिनी राहणार असूल्यामुळे तिच्याकडून लगेच सून म्हणून जबाबदा-या स्वीकारण्याची अपेक्षा ठेवता येणार नाही. तर तिला खरोखरीच स्वतःच्या मुलीसारखे वागवावे लागेल. इतकेच काय तर केवळ लग्न झाले म्हणून मिडीऐवजी साडी नेसावी किंवा पोषाखात बदल करावा असेही अपेक्षिणे योग्य होणार नाही, हे आत्ताच्या घटकेला कठिण वाटत असले तरी अशक्य मात्र नाही. समाजमन एकदा तयार झाले तर, हा बदल हळूहळू पण सहजपणे घडून येईल. हे सर्व लिहिताना माझ्या डोळ्यांसमोर फक्त मध्यमवर्गीय समाज आहे.
एखादी गोष्ट हवीहवीशी वाटत असताना मिळाली तर तिच्याबद्दल मिळेपर्यंत वाटणारा हव्यास, कौतुक नंतर निघून जाते त्याप्रमाणे योग्य वयात योग्य साथीदार जोडीदार मिळाल्यास त्यासाठीचा हव्यास कमी होऊन तरुणांची शक्ती विधायक गोष्टींकडे वळू शकेल. चंचलता, अस्थिरता कमी होऊन प्रगती करणे सोपे जाईल. अभ्यास करताना उत्तीर्ण होण्याची नैतिक जबाबदारी वाटेल. मात्र शिक्षण पूर्ण करीपर्यंत व दोघापैकी एकाला स्थैर्य येईपर्यंत संततीचा जन्म होऊ द्यायचा की नाही हे परिस्थितीप्रमाणे ठरेल.
वाचकांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
– उज्ज्वला अभ्यंकर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.