१३ एप्रिल १९९८ चा टाईम साप्ताहिकाचा अंक हा संग्राह्य असा विशेषांक आहे. २० व्या शतकाच्या ह्या संधिकालात गेल्या १०० वर्षांत होऊन गेलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर आणि त्यांचा सहभाग असलेल्या महत्त्वाच्या घटनांवर एक प्रकाशझोत टाकून १०० वर्षांच्या इतिहासाचा दस्तऐवज वाचकांसमोर मांडण्याचा टाइमच्या संपादकमंडळाचा विचार आहे. असे एकंदर सहा विशेषांक निघणार आहेत. हा पहिला विशेषांक जगातील प्रभावी राजकीय पुढा-यांवर विशेष भर असलेला आहे. पण त्यात स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या मागरिट सँगर आणि निग्रोंच्या नागरी हक्कांसाठी लढा देणारे मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनि.) यांचाही समावेश आहे. असे २० नेते, क्रांतिकारक ह्यात आहेत. उरलेले पाच विशेषांक वैज्ञानिक आणि विचारवंत, प्रेरक नेते आणि योद्धे, कलेच्या आणि मनोरंजनाच्या क्षितिजावर चमकलेले तारे आणि विविध क्षेत्रांत स्वतःच्या कर्तृत्वाने साम्राज्य उभारणारी कर्तबगार माणसे यांच्याकरता राखून ठेवले आहेत. १०० वर्षांच्या इतिहासावर ठसा उमटवणारी १०० माणसे टाइम निवडणार आहे.
जी २० माणसे येथे निवडली आहेत त्यावरून उरलेल्या १०० माणसांचा अंदाज येऊ शकतो. निवड प्रामाणिकपणे प्रातिनिधिक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रत्येकाच्या वैयक्तिक यादीत ३-४ माणसे बदलली जाऊ शकतात. ह्या पहिल्या यादीत आपल्याला हिटलर, चर्चिल, फ्रेंक्लिन रूझवेल्ट वगैरेंसारखे दुस-या महायुद्धातील महत्त्वाचे राजकारणी नेते भेटतात; पोप, खोमेनीसारखे सौम्य आणि कडवे धार्मिक पुढारी भेटतात; समृद्ध पाश्चात्त्य राष्ट्रांमधील अन्याय्य शक्तींच्या विरोधात आपल्या तत्त्वांची शस्त्रे करून लढणारे मोहनदास गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग, हो चि मिन्ह यांच्यासारखे नैतिक मार्गदर्शक भेटतात. रॉनल्ड रीगन, थिओडोर रूझवेल्ट, एलेनॉर रूझवेल्ट हे अमेरिकन आहेत म्हणून भेटतात. लेनिन, माओ त्से तुंग, लेक वालेसांसारखे क्रांतिकारक भेटतात. १९१७ साली संपूर्ण रशियाला साम्यवादाच्या छत्राखाली एकत्र आणून त्याची USSR ह्या नव्या नावाने आणि नव्या सामथ्यनिने जगाला ओळख करून देणारा लेनिन आणि ह्याच USSR ला साम्यवादाच्या भ्रष्टं विळख्यातून मुक्त करून त्याचे पुन्हा नव्याने रशिया हे नामाभिधान करायला मदत करणारा गोर्बाचेव्ह हे पण अमेरिकेच्या नजरेतून आपल्यासमोर येतात. ‘अमेरिकेच्या नजरेतून ही या प्रकल्पाची स्वाभाविक मर्यादा आहे. कधी कधी ती खटकते. दारिद्रय, अज्ञान आणि वेगाने वाढणारी लोकसंख्या ह्यांसारख्या संकटांनी वेढलेल्या भारतासारख्या नवजात लोकशाहीला २७ वर्षे तरून नेणारे जवाहलाल नेहरू या यादीत नाहीत, पण रॉनल्ड रीगन आहे. फॉकलंड बेटे जिंकून घेणारया मागरिट थेंचर आहेत पण बांगला देशच्या निर्मितीत मदत करणा-या इंदिरा गांधी नाहीत. पाश्चात्त्य देशांना मिळणारे हे झुकते माप अपेक्षितच आहे.
२०व्या शतकाच्या रंगभूमीवरील ह्या वेचक पात्रांचा परिचय करून देणारे लेखकहीं काळजीपूर्वक निवडलेले आहेत. उदा. अमेरिकेत कुटुंब नियोजनाची चळवळ सुरू करून स्त्रीमुक्तीच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवणाच्या मार्गारेट सँगवरचा लेख त्याच चळवळीची सध्याच्या काळातील समर्थ मार्गदर्शक आणि ‘Ms’ ह्या नियतकालिकाची एक संस्थापक ग्लोरिआ स्टाइनेमने लिहिला आहे. ह्या पहिल्या २० जणांमध्ये सँगरचा समावेश हा सुखद धक्का आहे. हिटलरवरचा लेख शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या एली वाइझेल यांनी लिहिला आहे. In the Shadow.c of the Prophet ह्या पुस्तकाचे लेखक मिल्टन व्हिअर्ट हे मध्य आशियाई देशांच्या घडामोडींचा विशेष अभ्यास असलेले विद्वान आहेत त्यांनी आयातुल्ला खोमेनीवरचा लेख लिहिला आहे. पण गांधींवरचा लेख लिहिण्याकरता केलेली निवड मला चुकीची वाटली. सलमान रश्दींनी तो लेख लिहिलेला आहे. विश्लेषणात्मक लिहिण्याचा आव आणून रश्दी बौद्धिक निर्विकारपणे लिहितात. गांधींच्या स्वभावातील गहनता आणि वागण्यातील विसंगती, आधुनिक भारतात त्यांच्या विचारांचा आणि शिकवणीचा झालेला पराभव, त्यांच्या सत्याच्या प्रयोगातील ब्रह्मचर्याच्या प्रयोगांचा उल्लेख – ह्या सर्व गोष्टींची चर्चा ह्या जेमतेम २-२॥ पानी लेखात रश्दी करतात. पृथ्वीवर असा माणूस ह्या शतकात होऊन गेला ह्याच्यावर भावी पिढ्यांचा विश्वास बसणार नाही असे आइन्स्टाइन गांधींबद्दल का म्हणाला असेल ह्याचे कुठलेही स्पष्टीकरण रश्दींच्या ह्या लेखात सापडत नाही. लेख कशाच्या संदर्भात आणि कोणाकरता लिहीत आहोत ह्याचे भान रश्दी बाळगत नाहीत. कॅथेरीन मॅन्सफील्ड ह्या कथालेखिकेच्या डायरीतील एक नोंद ह्या दृष्टिकोनातून फार मजेशीर आणि महत्त्वाची पण आहे –
नोआला तीन मुलगे होते. शेम, हॅम आणि जॅफेट, हॅमला एवढेच जाणवले की त्याचे वडील दारुडे आहेत. नौका बांधून जगाला वाचविणा-या त्यांच्या दूरदर्शी बुद्धिमत्तेचा त्याला विसरच पडला.
लेखकाने हॅमसारखे वागू नये हे लक्षात ठेव. रश्दींना ही गोष्ट कुणीतरी सांगितली पाहिजे.
ह्या सगळ्या प्रकल्पाची ओळख करून देणारे प्रास्ताविक ‘टाइम’चे व्यवस्थापकीय संपादक वॉल्टर आयमॅक्सन यांनी लिहिले आहे. सुरवातीलाच शतकातील महत्त्वाच्या घटनांची स्वैर निवड करून ते वाचकांसमोर मांडतात —
अणूचे विभाजन, विमानाचा शोध, डीएनएची रचना, सापेक्षतावादाचा सिद्धान्त, ट्रांझिस्टर्स आणि मायक्रोचिप्स, चंद्रारोहण, फॅसिझम आणि कम्युनिझमचा पाडाव’, पेनिसिलिनचा शोध, सिनेमा आणि टेलिव्हिजनचा शोध, जाझ आणि रॉक सारख्या संगीतप्रकारांची निर्मिती, अस्तित्ववाद आणि आधुनिकतावाद, आणि हे सर्व करीत असताना बॉम्बने स्वतःलाच उद्ध्वस्त करून घेतले नाही ही एक मोठीच उपलब्धी. ह्या शतकाचे वर्णन करताना आयमॅक्सन त्याचे वेगवेगळे पैलू अधोरेखित करतात. स्वातंत्र्याकरता सगळ्यांत उग्र संघर्ष ह्या शतकात झाले म्हणून हे स्वातंत्र्याचे युग आहे. जगाची आर्थिक रचना मोठ्या प्रमाणावर भांडवलशाहीवर बेतली जायची चिन्हे असल्याने हे भांडवलशाहीचे युग आहे. खेडी, शहरे, देश यांच्या सीमा पार करून समाज वैश्विक बनत चालले आहेत. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या क्रांतिकारक बदलांमुळे आर्थिक, सांस्कृतिक आणि लष्करी क्षेत्रांतही जग वैश्विक बनत चालले आहे. अमेरिकेचे जगावरचे वर्चस्व हे तिच्या लष्करी सत्तेमुळेच नव्हे तर आदर्शवादामुळे, मूल्यविचारामुळे आहे असा भाबडा विचार ते मांडतात आणि आशियातील ‘टाइम’च्या वाचकांनी त्याच्यावर भाबड़ा विश्वास ठेवावा अशी अपेक्षा करतात. (‘टाइम एशिया’ सोडून टाइमच्या इतर एडिशन्समधे हेच प्रास्ताविक आहे का हे पाहायला मजा येईल.)
लेखाच्या शेवटी २१ व्या शतकाबद्दल काही भाकिते मांडली आहेत. डिजिटल कॉम्प्युटरच्या क्षेत्रात आवाज ओळखणारी यंत्रे हा महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (artificial intelligence) क्षेत्रात क्रांतिकारक बदल होतील. कला, विज्ञान, व्यापार वगैरे कुठल्याही क्षेत्रातील माहिती, ज्ञान ताबडतोब आणि सहज उपलब्ध झाल्यामुळे बाजारपेठेचे ‘आम’ स्वरूप कमी होऊन विशिष्ट व्यक्तीकरता बनवलेले ‘खास स्वरूप त्याला येईल.
पण डिजिटल क्षेत्रातीलही क्रांती निष्प्रभ वाटेल अशी विलक्षण क्रांती जैविक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुरूही झाली आहे. गेल्या १०,००० वर्षात ज्या मानवी डिएनएमध्ये बदल झाले नाहीत ते येत्या १०० वर्षांत वैज्ञानिकांच्या कुतूहलापोटी होऊ शकतात. आधुनिक फॅकेन्स्टाईन बनून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात हवे ते बदल माणूस करू शकेल. स्वतःला हवी तशी मुले तो जन्माला घालू शकेल. अद्भुत चमत्कार घडवू शकेल किंवा किंचित चुकीमुळे भेसूर भुते निर्माण करू शकेल.
राजकारणात लोकशाहीला धार्मिक मूलतत्त्ववादापासून धोका निर्माण होईल. भांडवलशाहीतील नफेबाजीची हाव अनावर झाली तर पर्यावरणवादी पृथ्वीच्या आरोग्याकरता कडवी लढत देतील.
भौतिक भरभराट हे उद्दिष्ट न ठेवता माणसांचा आत्मसन्मान आणि मानवी मूल्ये जपली गेली तर लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकून राहील. २१ व्या शतकातील प्रमुख आव्हाने राजकीय, धार्मिक अथवा वैज्ञानिक नसतील तर नैतिक असतील,
आयमॅक्सनच्या ह्या प्रास्ताविकामुळे उरलेल्या पाच विशेषांकांची वाचक उत्सुकतेने वाट पाहतील यात शंकाच नाही.
१०० वर्षांचा विस्तार ही शेवटी मानवनिर्मित मर्यादा आहे. तुलना करण्यासाठी, मूल्यमापन करण्यासाठी असे टप्पे निवडणे आवश्यक असते. सिंहावलोकन करताना अगदी नजीकच्या भूतकाळाचा नीट अंदाज कदाचित् येणार नाही पण मागच्या दशकांचे तरी यथार्थ दर्शन घडू शकेल. घटनांमधले कार्यकारणभाव समजतील, अनपेक्षित नातेसंबंध उघडकीस येतील. जगातल्या घटनांची तुमची समज, तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या, स्थळाच्या मर्यादांनी बांधलेली असेल. उदा. प्रगत, प्रगतिशील किंवा अप्रगत राष्ट्रांच्या ज्या समूहात तुम्ही मोडत असाल त्याप्रमाणे तुमचा कल असेल. (जवाहरलाल नेहरूंचा समावेश न केल्याने जसे मला । दुखले तसे.) पूर्वग्रह पूर्णपणे बाजूला करताच येत नाहीत. पण इतिहासापासून शिकायचे असेल तर तसा प्रामाणिक प्रयत्न करायला लागेल.
जे टाइमने अनेकांच्या मदतीने, विचाराने केले तेच येत्या काही दिवसांत इंडिया टुडे, फ्रंटलाईन पण करतील, टेलिव्हिजनचे सगळे चॅनेल करतील. २० व्या शतकाचा उबग येईपर्यंत ते दिसेल आणि कानावर आदळेल. माणसे आणि घटना यांना त्यांच्या संदर्भापासून तोडून स्वतःच्या उपयोगासाठी हवे तसे वापरण्याचे प्रसारमाध्यमांचे कसब आता सर्वांना माहीत आहे. १०० वर्षांच्या ह्या ऐतिहासिक दस्तऐवजाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर जागरूक राहून हे संदर्भ सुटू न देणे हा एकच मार्ग आहे.