जागतिक कृषि आणि जैवतंत्रशास्त्र (Bio-technology)
नवीन वैज्ञानिक शोधांनी जागतिक कुपोषणाची समस्या हाताळली जाऊ शकणार नाही काय?
अगदी अलीकडेपर्यंत कृषिउत्पन्न समाधानकारकपणे वाढते आहे असे दिसत होते. १९५० ते १९८४ या काळात शेतीचे उत्पन्न २.६ पटींनी वाढले. ही वाढ जागतिक लोकसंख्यावाढीपेक्षा जास्त होती. लक्षावधि एकर जमीन नव्याने लागवडीखाली आणली गेली, आणि नवीन यंत्रे, अधिक खते, अधिक फलप्रद सिंचन (irrigation) आणि पिकांची फेरपालट यांचा जगभर उपयोग केला गेला.
आशिया खंडात धान्यांच्या नवीन जैवतंत्रशास्त्रीय प्रजननामुळे प्रगतीचे मोठे टप्पे गाठले गेले. संकरज जातींच्या वनस्पती अधिक टिकाऊ असून रोगांचा प्रतिकार अधिक समर्थपणे करू शकतात आणि अधिकृत उत्पन्न देऊ शकतात असे दिसून आले. त्याचबरोबर या नवीन धान्यजातींचे बी आंतरराष्ट्रीय कृषि अन्वेषण केंद्राद्वारे विकसनशील देशांत सर्वत्र पुरविले गेले. याचा परिणाम असा झाला की जगाचे तांदळाचे उत्पन्न जे १९६५ साली २५७ दशलक्ष टन इतके होते ते वीस वर्षांत ४६८ दशलक्ष टन इतके झाले. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यात आपण यश मिळविले, आणि गरीब देशांना धान्य आयात करण्याची गरज न राहून राजकीय स्थैर्यही आले.
मात्र १९८४ पासून वाढीचा दर कमी झाला. त्याचे मुख्य कारण अमेरिकेत आणि इतरत्रै १९८८ मध्ये झालेले अवर्षण. १९८४ ते १९८९ या काळात धान्योत्पादनाची वाढ ३% वरून १% पर्यंत उतरली. शिवाय काही पिकांची वाढ आता थांबली आहे. नवीन संकरज जातींची रोग आणि कीड यांचा प्रतिकार करण्याची क्षमता १० ते १५ वर्षेच टिकते असे दिसते. आणि नवीन जातींचे प्रजनन करावे लागते.
एकूण धान्योत्पादन अजून वाढते आहे, पण हळूहळू १% वार्षिक या दराने. पण जागतिक लोकसंख्या १.७% या दराने वाढते आहे. आफ्रिकेत १९७६ ते १९८६ या दहा वर्षात लोकसंख्यावाढीने धान्योत्पादनवाढीला मागे टाकले, आणि दरवर्षी अन्नोत्पादन ८% इतके कमी झाले. म्हणजे अर्धपोटी राहणा-या लोकांची संख्या वाढत होती, आणि आता ती ५० कोटी इतकी झाली आहे.
औद्योगीकृत राष्ट्रांत भरपूर संरक्षक मदतीमुळे जरूरीपेक्षा जास्त धान्य उत्पन्न झाले
आहे. पण ते विकत घ्यायला गरीब राष्ट्रांजवळ पैसा नाही. धान्य साठे कमी झाल्यामुळे किंमती वाढल्या आहेत, तर विकसनशील राष्ट्रातील चलनांचे मूल्य घसरले आहे. बरेचसे’ अन्न दान म्हणून दिले जाते हे खरे, पण ते पुरेसे नसते.
गरीब राष्ट्रांना आपल्या लोकांची पोटे भरण्याकरिता मदत करण्याचा एक उपाय म्हणजे अधिक जमीन लागवडीखाली आणणे, पण अशी जमीन आता कुठे आहे? आशियातील लागवड शक्य असलेल्या जमिनीपैकी ८२% जमीन आधी वापरली गेली आहे. दक्षिण अमेरिकेत मोठाली क्षेत्रे लागवडीलायक आहेत, पण ती प्रमुख पिकांना चालण्यासारखी नाहीत. ब्राझीलमध्ये जंगले खूप आहेत; पण ती टिकविली पाहिजेत, त्यांचा नाश करून चालणार नाही. नवीन जमीन लागवडीखाली आणायची तर जंगले तोडावी लागतील; पण त्याने जागतिक उष्णता वाढेल, विकसित राष्ट्रांत, विशेषतः अमेरिकन संयुक्त संस्थानांत, बरीच जमीन आहे. पण जिथे अन्नाकरिता अधिक शेतीची गरज आहे त्या विकसनशील राष्ट्रांत शिल्लक जमीन नाही.
शेतीच्या तंत्रात सुधारणा करणे हा आणखी एक उपाय आहे. पूर्व आशियातील भातशेतीत ४०% खतांची नासाडी होते. आफ्रिकेतील शेतकरी सरासरीने ६०० किलो धान्य दरवर्षी पिकवितो, तर अमेरिकन शेतकरी वर्षात ८०००० किलो इतके उत्पन्न काढतो. त्याची परिस्थिती अर्थातच वेगळी आहे. अमेरिकन शेतक-याच्या मालकीचे शेत म्हणजे शेकडो एकरांची विस्तीर्ण जमीन असते. त्याला अधिक चांगले हवामान आहे. तो आधुनिक साधने, उत्तम बियाणे आणि खते वापरतो. त्याची आणि विकसनशील देशांतील शेतक-याची तुलनाच होऊ शकत नाही.
पर्यावरणाला धोके
उत्तर गोलार्धातील श्रीमंत समाजांनी विकसनशील राष्ट्रातील लोकसंख्या प्रस्फोटाची आणि वाढत्या गरिबीची पर्वा का करावी ? टी. व्ही. वर दिसणाच्या दारिद्रयाची दृश्ये पाहून काही लोक मदत देतात; ते अर्थात् कौतुकास्पद आहे. पण याहून जास्त अपेक्षा का करावी?
वर्तमान मदत अपुरी आहे हे जाणविण्याकरिता अधिक परिणामकारक कारणांची गरज आहे. असे एक कारण म्हणजे लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर (migration). दुसरे कारण म्हणजे विकसनशील राष्ट्रांतील उत्पादनाचे उद्योग कोट्यवधि शेतक-यांचे काम असो, किंवा नवीन कारखान्यातील काम असो – जागतिक पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत; आणि या राष्ट्रांत पर्यावरणाला झालेले अपाय त्यांच्यापुरते मर्यादित न राहता, ते जगभर पसरतात. सबंध जग एक आहे. दक्षिण गोलार्धात जे घडते त्याचे परिणाम उत्तर गोलार्धावरही होतात.
निसर्गावर होणारे अत्याचार ही जुनीच गोष्ट आहे. सगळीकडे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. हजारो मैल पसरलेली जंगले तोडण्यात आली आहेत. दगडी कोळशाच्या धुराने वातावरण काळवंडले आहे. मोठ्या प्रमाणावर जलचर, आणि माणसे यांचे मृत्यू ओढवले आहेत.
परंतु पर्यावरणाचे जे संकट आज आपल्यापुढे उभे आहे ते गुणाने आणि मात्रेने दोन्ही प्रकारे वेगळे आहे. जगाचे पूर्ण पर्यावरण आता संकटात आले आहे, त्याचा एखादा दुसरा भाग नव्हे. १९०० च्या सुमारास जगात सुमारे १.६ अब्ज माणसे होती. शतकाच्या मध्याच्या सुमारास ती संख्या २.५ अब्ज इतकी झाली. औद्योगीकरणाचा उद्योग वाढला आहे. पूर्व युरोप, सोव्हिएट संघ, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि आशियाचे इतर भाग यांत कोळशाच्या जोडीला तेलाचा इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला आहे. विमाने, जहाजे, कोट्यवधि मोटारी आपले उत्सर्ग वातावरणात सोडत आहेत.
या शतकाच्या शेवटच्या दशकात ही प्रवृत्ती आणखी वाढली आहे. १९५० नंतर लोकसंख्या दुपटीहून अधिक झाली आहे, आणि जगांतील आर्थिक उद्योग चौपट झाला आहे. शिवाय औद्योगिकीकरणाने ऊर्जेची (विशेषतः विजेची) मागणी वाढत आहे, ट्रक्स, मोटरवाने, अन्न, कागद, सीमेंट, पोलाद इ. सर्वांमुळे पर्यावरणाची मोठी हानी वाढली आहे. पूर्ण प्रदूषित नद्या, धुरांनी आच्छादित शहरे, औद्योगिक विषारी अवशेष, जमिनीची धूप, आणि उद्ध्वस्त जंगले यांचे प्रमाण फार वाढले आहे. १९५० नंतर जगातील शेतजमिनीच्या वरच्या थरापैकी १/५ भाग, १/५ विषुववृत्तीय जंगले, आणि हजारो वनस्पती आणि प्राणी यांच्या जाती नष्ट झाल्या आहेत.
पण हे सारे चिंताजनक असले तरी ते थांबवायचे कसे ते सुचत नाही. उदा. पूर्व आफ्रिकेतील खेडूत आपल्या जनावरांवर विसंबून असतो. ती गवताळ प्रदेशात चरतात. पण जरी हे सुरवातीला असे असले, तरी मनुष्यांची आणि जनावरांची दोन्हींची संख्या वाढली आहे. १९५७ साली २३ कोटि आफ्रिकन २७ कोटी जनावरांवर अवलंबून होते. १९८५ पर्यंत माणसे ६० कोटी झाली आणि जनावरे ५४ कोटी. गवताळ प्रदेशाची सतत चराईमुळे झीज होत होती, आणि जमिनीची धूप वाढत होती. पर्यावरणाचा नाश होत होता आणि मानवी दारिद्र्यही वाढत होते. हे चक्र कसे थांबवायचे?
जगातील विषुववृत्तीय जंगले कटाईपासून कशी वाचविता येतील ? लोकसंख्यावाढीमुळे इंधन, अन्न आणि जमीन यांची मागणी वाढते, आणि त्या सर्वांतून वननाश होतो, आणि त्यापासून धूप वाढते.
जगातील एकूण जमिनीपैकी १/३ क्षेत्रात फारसा जैव व्यापार होत नाही (मरुभूमि, शहरे, इ.); १/३ क्षेत्र जंगल आणि गवताळ प्रदेश आहेत, १/३ शेतजमीन आणि चराई क्षेत्र, सतत चरण्यामुळे चराई क्षेत्राचे वाळवंट होते. शेतजमीनही कमी झाल्यामुळे, आणि कृषीतर उपयोगात (उदा. रस्ते, शहरे, विमानतळ) आल्यामुळे, आखडत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पर्जन्यवनांची कटाई भयानक वेगाने चालू आहे. दरवर्षी एक कोटी हेक्टर जंगलाचा नाश होत आहे.
विषुववृत्तीय जंगलांचा नाश पर्यावरणवाद्यांना अनेक कारणास्तव काळजी उत्पन्न करणारा आहे. या जंगलांत वनस्पति आणि प्राणी यांच्या जाती विशेष प्रमाणात आढळतात. त्यांच्या नाशाने धान्योत्पादनातील नवीन संकरज जाति निर्माण करण्यावर फार मोठा परिणाम होईल, २००० सालापर्यंत अमेरिकेतील पाऊण जंगले नष्ट झाली असतील आणि ५०% जाति सदाकरिता गमावल्या असतील. निसर्गाने जे अब्जावधि वर्षांत निर्माण केले ते मनुष्याने ४० वर्षांत नष्ट केले आहे.
जगाच्या वातावरणाचे प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि जीवनाचे राहणीमान वाढविण्याच्या प्रयत्नांतून वाढते आहे. सोव्हिएट संघ आणि पूर्व युरोप यातील योजनाबद्ध अर्थकारण हे प्रमुख कारण होते. पोलंड आणि चेकोस्लोव्हाकिया यांतील मोठाले प्रदेश औद्योगिक उत्सर्गामुळे निळ्या धुक्याने आच्छादले गेले. डान्यूब नदीला गटाराचे स्वरूप आले. अनेक ऐतिहासिक शहरातील घरे काळी पडली. कोट्यवधि झाडांची कटाई झाली.
विकसनशील जगाच्या काही भागात असाच प्रकार विकसित जगाच्या बरोबर येण्याच्या प्रयत्नातून चालू आहे. WH0 (World Health Organization) च्या अनुसार सल्फर डायॉक्साइडचे आणि अन्य प्रदषकांचे अतिरेकी प्रमाण असलेल्या शहरांत नवी दिल्ली, बीजिंग, तेहरान यांचा समावेश होतो. नवजात बालकांच्या रक्तामध्ये शिशाचे प्रमाण अतिरिक्त आढळते, ताजमहालांसारख्या प्रख्यात स्मारकांना अपाय झाला आहे.
विकसनशील देशांतील सर्वच शहरांत औद्योगीकरणाची घौडदौड चालू आहे; पण त्यावर शुद्धीकरणाची यंत्रणा जवळ जवळ शून्याइतकी आहे. प्रदूषणावर नियंत्रण नाही, आणि सामाजिक आरोग्यापेक्षा भर औद्योगिक विकासावर आहे.
सिंचनाचा उपयोग वरदानासारखा झाला; पण त्याचेही काही मोठे तोटे आहेत. अतिसिंचनाने जमिनी क्षारयुक्त होतात आणि नापीक म्हणून टाकून द्याव्या लागतात.
पर्यावरणवाद्यांच्या मते सर्वांत मोठे भय जगाचे उष्णतामान वाढण्याचे आहे; आणि ते भय स्थानिक नाही, तर सर्वसमावेशक आहे. ते संकट सबंध जगावर ओढवणार आहे.
शेवटच्या हिमयुगात पृथ्वीचे सरासरी तापमान आजच्याहून ९° सेंटिग्रेड कमी होते, आणि CFCs (कार्बन, हैड्रोजन, क्लोरीन इत्यादींची ओझोननाशक संयुगे) ची पातळी १९० ते २०० भाग दर दशकोटी इतकी होती. १९ व्या शतकाच्या आरंभी मनुष्याने ऊर्जा आणि उष्णता मोठ्या प्रमाणावर वापरायला सुरवात केली, आणि त्यामुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढू लागले. वने जाळल्यामुळे ह्या प्रक्रियेला हातभार लागला. आणि त्याशिवाय प्रकाश संश्लेषणास (Photo-synthesis) आवश्यक असणारया वनस्पतिजीवनाची मोठ्या प्रमाणात घट झाली. गेल्या शतकात C0, चे प्रमाण ३५० भाग दर दशकोटी होते. ते सध्या दरवर्षी ४% दराने वाढले आहे. ते २०५० पर्यंत ५५० ते ६०० भागांइतके होईल. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की पृथ्वीचे तापमान एक शतकापूर्वी होते त्याहून .३ ते ७% नी वाढले आहे. ते असेच चालू राहिले तर सागराची पातळी वाढेल आणि तो जमिनीवर आक्रमण करील. त्याचबरोबर धुवांजवळील प्रदेशांतील बर्फ वितळल्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढेल. सागराचे खारे पाणी नदीमुखातून आत शिरेल, आणि किनारा आकुंचित होईल.
हे असेच चालू राहिले तर पुढील शतकात अनेक विकसनशील देशांचे भयानक नुकसान होणार आहे. मालदीव बेटे पूर्ण पाण्याखाली बुडून त्यांची १७७००० लोकसंख्या बेघर होईल. ईजिप्त, बांगलादेश आणि चीनचा काही भाग यांनाही हा तडाखा बसणार आहे. सागराची पातळी एक मीटर वाढली तर १२ ते १५% शेतजमीन पाण्याखाली जाईल. बांगलादेशाची ११% जमीन नष्ट होईल, आणि तेथील रहिवासी जीवनातून उठतील.
यू.एन्. अहवालानुसार सागरपातळी वाढण्याची भीती पुढील देशांना आहे. गॅबिया, इंडोनेशिया, मोइँबिक, पाकिस्तान, सेनेगल, सुरीनाम आणि थायलंड, जमिनीचे क्षेत्र कमी झाल्यामुळे कोट्यवधि शरणार्थी शेजारच्या राष्ट्रात स्थलांतर करतील.
या सर्वांतून आपल्या प्रश्नांचे स्वरूप जागतिक आहे, स्थानिक नाही, हे स्पष्ट होते. जग एक आहे, आणि त्याच्या एका भागात झालेल्या बदलांचे परिणाम अन्य भागावरही अनुभवावे लागतात. त्यामुळे विकसनशील आणि विकसित दोन्ही राष्ट्रांनी लक्ष घालावे अशी समस्या निर्माण झाली आहे. तिच्यावर उपाय म्हणून नवीन परिस्थिती अनुसार आपल्यात बदल करण्याचे धोरण स्वीकारले जात आहे. दुसरा उपाय प्रतिबंधक आहे. १९८७ साली अनेक राष्ट्रांनी माँट्रियल येथे जमून विचारविनिमय केला आणि त्यांनी २००० वर्षांपर्यंत CFCs ची निर्मिती थांबविण्याचे, आणि श्रीमंत राष्ट्रांनी गरीब राष्ट्रांना नवीन तंत्रे स्वीकारण्याकरिता आर्थिक मदत करण्याचे ठरविले आहे.
कार्बनचा उत्सर्ग दरवर्षी ३% वाढतो आहे. तो तसाच वाढत राहिला तर त्याचे प्रमाण २०२५ पर्यंत दुप्पट होईल. ते नको असेल तर जगातील श्रीमंत आणि गरीब सर्व राष्ट्रांनी सहकार्य करावे लागेल. नाहीतरी जगाची उष्णता वाढण्यास सगळेच कारण झाले आहेत आणि होत आहेत. विकसित जगातील विमाने आणि कोट्यवधि मोटारी, कारखाने यांतील उत्सर्गामुळे आणि विकसनजगातील कोळशाच्या भयानक प्रमाणावर केलेल्या उपयोगामुळे, सर्वच राष्ट्रे जागतिक तापमान वाढण्यास जबाबदार आहेत. या परिस्थितीत काय करता येईल याविषयी पुष्कळ विचार झाला आहे. जागतिक स्तरावर वने पुन्हा निर्मिण्याचा प्रयत्न करायला हवा असे सुचविले गेले आहेत. तसेच पर्यायी (तापमान न वाढविणारी) ऊर्जा वापरण्याचेही उपाय सुचविले गेले आहे. उदा. सौर ऊर्जा, वायुऊर्जा, इ. विशेषत: अब्जावधि टन कार्बन वातावरणात ओतणे कमी केले पाहिजे.
याकरिता नवीन तंत्रे वापरावी लागतील. कार्बनविरहित औद्योगीकरणाचे मार्ग शोधावे लागतील आणि विकसनशील राष्ट्रांना ते स्वीकारण्यास मदत करावी लागेल. औद्योगिक राष्ट्रांना कार्बनची उत्पत्ति मोठ्या प्रमाणात कमी करावी लागेल.
पण असा प्रयत्न शक्य आहे काय? तो सर्वांनी मिळून करावा लागेल. काहींनी करून आणि बाकीच्यांनी न करून चालण्यासारखे नाही.