अनुभव व स्वतंत्र विचार हेच ज्ञानाचे खरे साधन होय. ग्रंथ केवळ मार्गदर्शक आहेत व कित्येक वेळी तर भ्रामकही होतात. म्हणून कोणत्याही संशोधकाने स्वतःच्या अनुभवावरून स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. इतिहासात मात्र घडलेल्या गोष्टी ज्यांनी स्वतः पाहिल्या त्यांची वचने मुख्य प्रमाण मानली पाहिजेत. संशोधन करण्यात कितीही श्रम पडले तरी ते टाळू नका. असे करात्न तरच तुम्हास सिद्धी मिळेल. विचार करताना कोणताही अभिनिवेश धरू नका. आणि तुम्हास जे ज्ञान होईल ते कोणासही न भिता बोलून दाखवा. तुमची चूक झाली आहे असे दिसून आले तरी तीही बोलून दाखविण्यास कचरू नका.