Preparing for the Twentyirst Century हे पॉल केनेडी या अमेरिकेतील येल विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापकाचे अतिशय लक्षणीय आणि महत्त्वाचे पुस्तक १९९३ साली प्रकाशित झाले. त्यात एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मानवजातीपुढे कोणत्या समस्या वाढून ठेवल्या आहेत, कोणती भयस्थाने आणि कोणती आशास्थाने तिच्यापुढे उभी राहणार आहेत, यांचे अत्यंत विचारप्रवर्तक आणि समर्थ विवेचन लेखकाने केले आहे. लेखक अतिशय विद्वान असून आपल्या विषयात निष्णात आहे. पुस्तकातील विषयाशी संबद्ध शेकडो ग्रंथ, जन्ममृत्यूची कोष्टके, जगात होत असलेले संपत्तीचे उत्पादन आणि तिचा उपभोग याविषयीचे तक्ते (charts) पुस्तकात सर्वत्र विखुरलेले आहेत. मानवाची चालू शतकातील कामगिरी आणि त्याच्यापुढे उभ्या ठाकलेल्या समस्या यांचा त्याने सविस्तर आणि अनेकांगी विचार केला आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात विषयांशी संबद्ध अशी अंगे म्हणजे लोकसंख्याशास्त्र (demography), शेती आणि जीवतंत्रातील क्रांती, यंत्रमानवविद्या आणि स्वयंचलन (robotics and automation) आणि औद्योगिक क्रांती, पर्यावरणशास्त्र आणि प्रदूषणाचे धोके, राष्ट्रवादाचे भवितव्य या सर्व अंगांचा त्याने विस्ताराने विचार केला आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात हे केल्यानंतर दुसन्या भागात विकसित आणि विकसनशील सर्व राष्ट्रांची वर्तमान अवस्था वर्णिली असून ती आपल्यापुढील समस्यांना कसे तोंड देणार आहेत याचा विचार केला आहे. हे पुस्तक वाचल्यावर आजचा सुधारकच्या वाचकांना त्याचा परिचय करून देता आल्यास बरे होईल असे वाटल्यामुळे त्याचा प्रयत्न करीत आहे. पुस्तकाची सुरुवात लोकसंख्येच्या प्रस्फोटाने केली आहे.
या ग्रहावर आधीच मानवाची गर्दी झालेली आहे आणि तिच्यात वाढत्या वेगाने नव्या जीवांची भर पडत आहे. अशा प्रकारच्या लोकसंख्येच्या प्रस्फोटाच्या ब्रिटनमध्ये दोनशे वर्षांपूर्वी उद्भवलेल्या प्रसंगाचा प्रा. केनेडी उल्लेख करतात. १६५० साली १० कोटी असलेली युरोपची लोकसंख्या १७५० साली १७ कोटी, आणि १९०० मध्ये वीस कोटी झाली होती. म्हणजे दीडशे वर्षांत दुप्पट झाली होती. या लोकसंख्यावाढीची अनेक कारणे होती. एक कारण होते जेनरच्या शोधामुळे देवीला आळा बसला होता. आणि अन्यही साथीच्या रोगांविरुद्ध प्रतिबंधक लसी टोचण्याची सुरुवात झाली होती. बालकांच्या पहिल्या वर्षात होणा-या मृत्यूचा दर एकदम कमी झाला होता, आणि आधुनिक वैद्यकामुळे लोकांचे आयुष्यही वाढले होते. लोकसंख्येत होत असलेली लक्षणीय वाढ विचारी लोकांना चिंता वाटायला लावणारी होती. त्यातच मॅल्थसचा An Essay on Population प्रसिद्ध झाला. त्यात मॅल्थसने म्हटले होते की लोकसंख्येची वाढ भूमितिश्रेढीने होते. पंरतु अन्नाची वाढ केवळ गणितश्रेढीने होते; आणि जरी अधिक जमीन लागवडीखाली आणली तरी पृथ्वीवरील जमीन वाढू शकत नाही. मॅल्थस म्हणतो की लोकसंख्येचे बळ पृथ्वीच्या अन्न निर्माण करणा-या बळापेक्षा अत्यंत जास्त आहे. त्यामुळे मानवापुढे वाढती उपासमार, दारिद्रय, रोगराई आणि मृत्यु हे भविष्य अटळ आहे.
आज सबंध जगापुढे तोच प्रसंग उभा राहिला आहे. ब्रिटिश लोकांनी मॅल्थसच्या भविष्यापासून आपली सुटका मुख्यत: तीन साधनांनी केली. लोकसंख्येचे देशांतर, शेतीतील सुधारणा आणि औद्योगिक क्रांती. लोकसंख्येचा रेटा जसा वाढला तसे मोठ्या प्रमाणावर देशांतर झाले. १८२० या वर्षात २ लक्ष, १८५० साली २५ लक्ष, १८५० ते १९४० या काळात २ कोटी माणसे उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडात गेली. शेतीतही पुष्कळ सुधारणा झाली. उदा. पिकांचे पर्यायण (rotation), लागवडीची नवीन तंत्रे, आर्द्र जमिनीचे रेचन, शेतीची सुधारलेली अवजारे, बटाट्याची लागवड, इ. तिसरे म्हणजे नेमक्या याचवेळी औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली, आणि यांत्रिक शक्तीचा उपयोग, यांत्रिक उपकरणाचा उपयोग, इ. यांचा आरंभ झाला. १९ व्या शतकांत ब्रिटनची लोकसंख्या चौपट वाढली, पण राष्ट्रीय संपत्ती चौदापट झाली. लोकसंख्येच्या बळाला पृथ्वीच्या बळाने नव्हे, तर यंत्रविद्येच्या बळाने उत्तर दिले.
दर पंचवीस वर्षांत लोकसंख्या दुप्पट होत राहिली तर उत्पादन आणि उपभोग यांत शर्यत लागेल हे मॅल्थसचे म्हणणे पूर्ण बरोबर होते. पण विज्ञान आणि तंत्रविद्या यांचे सामर्थ्य त्याच्या लक्षात आले नाही.
राहणीमानात सुधारणा झाल्याबरोबर सामाजिक बदल झाले. शाळेत अधिक वर्षे शिकत राहणे, स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा होणे, त्यांना शिक्षण मिळाल्यामुळे त्यांचे व्यक्तित्व जागे होणे, इत्यादि कारणांमुळे उशीरा लग्न झाल्यामुळे हळूहळू मुलांची संख्या कमी होत गेली. सुमारे १०० वर्षानंतर ब्रिटनची लोकसंख्या स्थिर झाली.
आज सबंध जगापुढे लोकसंख्येच्या प्रस्फोटाचा राक्षस उभा आहे, विकसित देशांत नव्हे तर आफ्रिका, मध्य अमेरिका आणि मध्यपूर्वेतील दरिद्री देशांत, भारत आणि चीन या खंडप्राय देशांत कोट्यवधि नव्हेत तर अब्जावधि लोक आहेत. आज जगाच्या लोकसंख्येत दर तीन वर्षांत २५ कोटींची भर पडत आहे. पुन्हा एकदा मॅल्थसचा प्रश्न आज जगापुढे उभा आहे.
पुढील शतकात २०२५ आणि २०५० या वर्षापर्यंत जगाची लोकसंख्या किती असेल? उपलब्ध आकडे भयभीत करणारे आहेत. १८२५ साली जगात एक अब्ज लोक होते, आणि त्या संख्येपर्यंत यायला हजारो वर्षे लागली होती. परंतु औद्योगीकरण आणि नवे वैद्यकशास्त्र यांच्या साह्याने सतत चढत्या वेगाने लोकसंख्या वाढू लागली. नंतरच्या शंभर वर्षांत लोकसंख्या दुप्पट, म्हणजे २ अब्ज झाली. पुढील अर्ध्या शतकात ती आणखी दुप्पट, म्हणजे ४ अब्ज झाली. १८९० साली ती संख्या ५.३ अब्ज झाली. वाढीचा दर थोडा कमी झाला आहे हे खरे आहे. लोकसंख्याशास्त्रज्ञांची अपेक्षा अशी आहे की कुटुंबाचा आकार भविष्यात हळूहळू लहान होईल, परंतु जगाची लोकसंख्या स्थिर होण्याकरिता २०४५ सालापर्यंत थांबावे लागेल असे United Nations चे अधिकारी सांगतात. २०२५ साली जगात ८.५ अब्ज लोक असतील. जागतिक बँकेच्या एका हिशेबानुसार जगाची लोकसंख्या १० किंवा ११ अब्जांवर स्थिर होईल.
लोकसंख्यावाढीकडे दुसरया प्रकाराने पाहता येईल. १९५० मध्ये जागतिक लोकसंख्येत दरवर्षी ४.७ कोटी इतकी भर पडत होती. १९८५ ते ९० या काळात ती वाढ ५.८ कोटी इतकी होती. १९९५ ते २००० पर्यंत ती ११.२ कोटी असेल.
ही लोकसंख्यावाढ विकसनशील देशांत होत आहे. जागतिक लोकसंख्यावाढीपैकी ९५% वाढ विकसनशील देशांत होईल. १९५० साली आफ्रिकेची लोकसंख्या युरोपच्या अर्थी होती. १९८५ मध्ये ती युरोप इतकी झाली. आणि २०२५ पर्यंत ती युरोपच्या तिप्पट होईल.
काही देशांच्या लोकसंख्या इतक्या वेगाने का वाढत आहेत ? शेतीप्रधान समाजात जननप्रमाण आधीच जास्त असते, परंतु पाश्चात्त्य आरोग्यसाधनांमुळे, विशेषत: रोगप्रतिबंधक उपाय आणि अँटीबायोटिक्सचा उपयोग, मलेरिया हटविण्याकरिता DDT चा वापर यांच्यामुळे मृत्युदर पडले. आफ्रिका हे सर्वांत दरिद्री, आणि जन्मदर जास्त असलेले खंड आहे. त्यात आता ६५ कोटी लोक आहेत. ते २०२० पर्यंत तिप्पट होतील (१.५ अब्ज). तीच गोष्ट चीन आणि भारत यांचीही आहे. चीनची लोकसंख्या आज १.१ अब्ज आहे, ती २०२५ मध्ये १.५ अब्ज होईल. भारताचे ९० कोटी २०२५ मध्ये चीनच्या बरोबर होतील. या निर्जीव आकड्यांमागे भयानक वास्तव आहे. माणसाला रोज दोन ते तीन हजार कॅलरीज अन्न आणि ४।। पौंड पाणी लागते. पण यापेक्षा कितीतरी कमी मिळणारे देश आहेत.
दारिद्रय खेड्यांत आणि शहरांत दोन्हीकडे दिसून येते. त्यापैकी शहरातील दारिद्रय अधिक चिंताजनक आहे. तरुण आणि ज्यांना शक्य असेल असे अन्यही लोक शेतकी करणारे समाज सोडून शहरांत येतात. १९८५ मध्ये ३२% लोक शहरांत राहात. तो आकडा २००० साली ४०% आणि २०२५ मध्ये ५०% होईल. या शतकाच्या अंताच्या सुमारास जगात २० बृहन्नगरे १.१ अब्ज किंवा अधिक लोकसंख्या असलेली असतील. त्यांच्यापैकी १७ विकसनशील देशांत असतील. सर्वांत मोठे शहर मेक्सिओ सिटी असेल. त्याची लोकसंख्या २.४ कोटी असेल, अन्य बृहन्नगरे अशी : साओ पाओलो २.३ कोटी, कलकत्ता १.६ कोटी , मुंबई १.५ कोटी, शांघाय १.४ कोटी उदा. लेगॉस (नायजेरिया) येथे दर चौरस मैलात १,४३,००० इतकी लोकसंख्येची घनता असेल, जकार्ता (इंडोनेशिया) येथे १,३०,००० इतकी घनता असेल. उलट न्यूयार्कमधील लोकसंख्या दर मैलाला ११४ इतकीच असेल. जुन्या युरोपीय नगरांतील सुखसोयी या नव्या नगरांत मिळणे दुरापास्त आहे.
शहरी जीवनाविषयीच्या आपल्या कल्पना पार बदलाव्या लागणार आहेत. आतापर्यंत हजारो वर्षांपासून रोम, कॉन्स्टॅटिनोपल, व्हेनिस, न्यूयॉर्क, टोकियो ही नगरे संपत्तीची, सर्जकतेची आणि सांस्कृतिक उद्योगाची केद्रे होती. त्यांत उच्च आणि मध्यमवर्गीय लोक राहात. सुंदर घरे, स्मारके, बागा, संगीतगृहे बांधीत. काही युरोपियन शहरे अजूनही ते करीत राहतील. उदा. स्टॉकहोम आणि कोपनहागेन. पण आशिया, लॅटिन अमेरिका आणि मध्य अमेरिका यांतील बृहन्नगरे दारिद्रय आणि सामाजिक सन्निपात यांची केंद्रे असतील.
जिथे अगोदरच घरे, आरोग्यव्यवस्था, प्रवासाची साधने, अन्नवितरण आणि संज्ञापन व्यवस्था इ. सोयी अपु-या आहेत, तिथे लोकसंख्या दुप्पट आणि तिप्पट झाल्यावर काय होईल? या सर्व स्थितीवर परिणाम करणारी एक गोष्ट आहे AIDS ची साथ. HIV ची बाधा झालेल्या मनुष्यात AIDS ८ ते ९ वर्षे सुप्त असतो, मग मात्र मृत्यु १००% असतो. ज्यांना तो आजार आहे ते हिमनगाचा एक अल्पभाग फक्त असतात. WHO च्या प्रतिवृत्तात या रोगाची आतापर्यंत (१९९२ पर्यंत) एकूण लागण ४ कोटी झाली असल्याची नोंद आहे.
जर AIDS वर औषध सापडले नाही तर आफ्रिकेच्या जन्मदरावर AIDS चा मृत्युदर प्रतिबंधक राहील. आफ्रिकेची एकूण लोकसंख्या वाढत राहील, पण सगळीकडे मृत्यूचे थैमान चालू असेल.
कृषिप्रधान समाजाने लोकसंख्यावाढ कशी थोपवावी?
मॅल्थसचे उत्तर होते की शेवटी निसर्गच काम करतो, दुष्काळ, अन्नाकरिता संघर्ष, युद्ध आणि रोगराई. पण मॅल्थस आपला निबंध लिहीत असतानाच औद्योगिक क्रांतीने एक मार्ग सुचविला होता. औद्योगिक उत्पादन आणि शहरीकरण यामुळे उत्पन्न वाढले, आणि त्यामुळे राहणीचा प्रकार बदलला, आणि त्याने लोकसंख्येला लगाम बसला.
पूर्व आशियातील काही देशांनी ब्रिटिशांचा कित्ता गिरविला आहे. सिंगापूर, ताइवान, दक्षिण कोरिया, काही अंशी मलेशिया या देशांच्या स्वत:च्या पोलादाच्या गिरण्या, जहाज बांधणी उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स फार्स, विमानउद्योग, इ. असल्यामुळे त्यांचे राष्ट्रीय उत्पन्न वाढू लागले असून ते युरोपियन देशांच्या जवळ जात आहेत. काही देशांत तर लोकसंख्या वाढीला उत्तेजन देण्याची वेळ आली आहे.
मग हा उपाय नाही काय ? नाही. कारण नवीन उद्योजक देश सर्व लहान राष्टे आहेत. आणि शिवाय त्यांची जनता कुशल होती. आफ्रिकन देशांविषयी हे म्हणता येत नाही. विकसनशील देशांपुढील प्रमुख समस्या लोकसंख्येचा प्रस्फोट ही आहे, तर विकसित देशांपुढील लोकसंख्या -हासाची आहे. देशाची लोकसंख्या स्थिर होण्याकरिता प्रत्येक स्त्रीला २.१ अपत्ये असायला हवीत, पण बहुतेक विकसित देशांत जन्मदर याहून कमी आहेत. उदा. इटाली १.५, स्पेन १.७.
शहरीकरणामुळे कालांतराने जन्मदर घटतो हे खरे आहे. पण त्यात कालांतराने हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यापूर्वीच शहरात नोकरीच्या आशेने कोट्यवधी लोक जमा होतात.
जिथे विकसनशील देशांना १५ वर्षे वयाखालील कोट्यवधींना पोसावे लागते, तिथे विकसित देशांना ६५ हून अधिक वयाच्या वाढणाच्या संख्येला सांभाळावे लागते.
आफ्रिकेतील दरिद्री देशांत २ ते ३ टक्के लोक ६५ पेक्षा अधिक वयाचे आहेत, तर श्रीमंत आणि निरोगी देशात हे प्रमाण जास्त आहे. नॉर्वेत ते १६.५% आणि स्वीडनमध्ये १९.३% इतके आहे. २०४५ पर्यंत हे प्रमाण २२% होईल. एक दिवस वृद्धांची काळजी घ्यावी की बालकांची ही एक समस्या होऊन बसेल.
या संबंधात सांस्कृतिक आणि वांशिक चिंताही असतात. आपला वंश किंवा संस्कृती कमी प्रतीच्या लोकांच्या भाराखाली दबून जाईल अशी भीती वाटते. सामान्यपणे मातृत्वाला
उत्तेजन देणे हा यावर उपाय म्हणून वापरला जातो.
शेवटी देशांतरविषयी (migration). याचा एक प्रकार म्हणजे खेड्यांतून शहराकडे होणारे देशांतर. दुसरा प्रकार एका देशातून दुसन्या देशात. देशांतर म्हटले म्हणजे संपत्तीची वाटणी. कारण आलेली माणसे खाणार, पिणार, राहण्याला घरे वापरणार शिवाय मोठ्या प्रमाणावर देशांतर झाल्यास वंशसंकराची भीती मूळ रहिवाशांना वाटते.
पूर्वीची देशांतरे आणि वर्तमान देशांतरे यांतील मुख्य फरक हा आहे की पूर्वीची देशांतरे। विकसित देशांतून कमी विकसित देशांत होत, तर वर्तमान देशांतरे अविकसित समाजांतून विकसित समाजांत होतात.
देशांतर रोखण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, कारण जगाची लोकसंख्याच इतकी वाढते आहे की देशांतर अपरिहार्य आहे. १९५० साली औद्योगिक लोकशाही राष्ट्रांची लोकसंख्या जगाच्या १/५ होती. १९८५ पर्यंत ते प्रमाण १/६ झाले होते. आणि २०२५ पर्यंत ते १/१० इतके कमी होईल असा अंदाज आहे. औद्योगिक लोकशाह्यांच्या प्रमाणाची ही घट पुढील ३० वर्षांत त्यांच्यापुढील मोठी समस्या असेल. विकसनशील देश उत्पादन आणि राहणीमान वाढवू शकले, तर विकसित जगाचे आर्थिक उत्पादन, जागतिक सामर्थ्य आणि राजकीय प्रभाव केवळ संख्येमुळे कमी होत जाईल. एक प्रश्न उद्भवतो. प्राश्चात्त्य मूल्ये – उदा. उदार सामाजिक संस्कृति, मानवी हक्क, धार्मिक सहिष्णुता, लोकशाही, इ. चे स्थान कायम राहील काय ? ज्या समाजांत प्रबोधनाच्या विवेकवादी, वैज्ञानिक आणि उदारमतवादी धारणांचा अनुभव नाही त्यांची मोठ्या प्रमाणात समाजात मिसळ झाल्यानंतर त्या मूल्यांचे महत्त्व पूर्वीसारखे प्रभावी राहील काय ? परंतु जर विकसनशील जग आपल्या दारिद्रयात रुतून राहिले तर त्यातून कोट्यवधी लोकांचे देशांतर होऊन भरभराटलेल्या समाजाभोवती त्यांचा वेढा पडेल. याचे परिणाम सध्या जगाच्या ५/६ संपत्तीचा उपभोग घेत असलेल्या १/६ समाजावर क्लेशदायक होणार हे अपरिहार्य दिसते.