कालनिर्णय दिनदर्शिकच्या १९९८ च्या अंकामध्ये प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचा ‘देवाशी भांडण’ हा लेख आला आहे. आम्हा विवेकवाद्यांना त्याची दखल घेणे, त्याचा परामर्श घेणे भाग आहे. तेवढ्यासाठीच मागच्या अंकामध्ये श्रीमती सुनीति देव ह्यांचा लेख प्रकाशित केला आहे. आज आमचे देवाशी भांडण आहे की नाही व असल्यास का हे येथे आणखी एका दृष्टिकोनातून मांडत आहे.
प्रा. रेग्यांचा पूर्ण लेख ‘कालनिर्णय’मध्ये आला नसावा, पानाच्या मांडणीसाठी त्याची काटछाट झाली असावी अशी शंका येते, पण वाचकांच्या समोर फक्त मुद्रित भाग असल्यामुळे त्यावरच आपले मत मांडणे भाग आहे.
‘… (विवेकवाद्यांचे) ईश्वराशी असलेले भांडण हे लटके भांडण आहे’ ह्या वाक्याने प्रा. रेग्यांनी आपल्या लेखाचा शेवट केला आहे. एका अर्थाने हा त्यांचा आमच्यावरचा आरोप खरा आहे. आमचे भांडण देवाशी नाही. ते श्रद्धेशी आहे. देव असता तर आम्ही त्याच्याशी भांडलो नसतो. आम्ही त्याचे ऐकले असते. त्या कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् अचिन्त्यसामर्थ्यवान चण्डप्रतापी शक्तीशी भांडून काहीच साधणार नाही हे ओळखण्याइतका विवेक आमच्यापाशी
आहे.
प्रा. रेग्यांचा प्रस्तुत लेख वाचून असे वाटले की ते स्वतःची बाजू मांडण्यापेक्षा श्रद्धालु। माणसांची वकिली करीत आहेत, त्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत, ते स्वतः कट्टर श्रद्धालु नाहीत, कारण त्यांचे वाक्य आहे: ‘श्रद्धालु माणसाला ईश्वराचे अस्तित्व, त्याचे सांनिध्य
आतून जाणवते.
येथे प्रश्न असा पडतो की श्रद्धालु माणसांना जसा ईश्वर आतून जाणवतो, त्याचा साक्षात्कार होतो तसे भूतही आतून जाणवते. काहींना ते प्रत्यक्ष दिसतेही. कालपर्यंत भूतपिशाच्चादि मानवेतर योनींवर आणि त्यांच्या अतीन्द्रिय शक्तींवर बहुतेक सगळ्यांचीच श्रद्धा होती. आमची पंचाईत अशी की एकदा आपण श्रद्धा स्वीकारली की भुतेखेते कशी नाकारणार? फक्त देव आहे आणि भुते मात्र नाहीत हे आपण कशाच्या भरवशावर सांगणार ? ह्याला प्रमाण काय ? श्रद्धा प्रमाण मानण्यामध्ये मला ही अडचण जाणवते. श्रद्धालु व्यक्तीला भूतप्रेतसमंधादि पिशाच्चे ईश्वरासारखीच खरी वाटतात. आणि हे सारे, ईश्वर जाणवणे काय किंवा भूत जाणवणे काय, त्याच्यावर झालेल्या संस्कारांमुळे घडते.
एखाद्या व्यक्तीला भूत बाधले असे म्हणणे म्हणजे निसलेल्या भुताच्या ठिकाणी काही एका विशिष्ट शक्तीचा आरोप करणे आहे. भुतावर जसा हा आरोप करता येतो तसा ईश्वरावरही करता येतो. किंबहुना हवे तेवढे आरोप करता येतात. प्रा. रेग्यांनी त्यांच्या उपर्युक्त लेखात श्रद्धालु माणसाच्या भूमिकेतून ईश्वरावर पुष्कळ आरोप केले आहेत. ते त्यांच्या लेखात म्हणतात :
‘तो जगाचा निर्माता आहे, जगाची, सबंध विश्वाची घडी त्याने बसविली आहे, ज्या नियमांना अनुसरून जग चालते ते नियम त्याने घालून दिलेले नियम आहेत’. – [येथे प्रश्न असा पडतो की परमेश्वर सर्वत्र जर एकच आहे तर काल जे पापाचरण मानले जात होते ते आजही तसे का मानले जात नाही? पापपुण्याचे नियम हे दिक्कालाबाधित का नाहीत असा प्रश्न श्रद्धालूंच्या मनांत का येत नाही?]… हे माणसासाठी घालून दिलेले नियम आहेत. माणसांनी कसे वागावे त्याचे हे नियम म्हणजे आदेश आहेत. ह्या नियमांप्रमाणे जो वागतो त्याचे कल्याण होते. जो हे नियम मोडतो त्याची वरवर पाहता कितीही भरभराट झाली असे वाटले तरी अखेरीस त्याचे अकल्याण होते; त्याला दुःख सहन करावे लागते. ईश्वर सर्वसाक्षी आहे. तो आपला अंतर्यामी आहे. आपण जे कृत्य करतो त्याचे आंतरिक—खरेखुरे स्वरूप काय आहे, ती प्रेमाने, आपुलकीने केलेली कृत्ये आहेत की त्यांच्यामागे दडलेला राग आहे, द्वेष आहे, असूया आहे हे तो जाणतो. तो सर्वसाक्षी आहे तसा तो क्षमाशीलही आहे. आपण केलेल्या, आपणाकडून घडलेल्या पापांबद्दल आपल्याला खराखुरा पश्चात्ताप झाला, आपण त्याला शरण गेलो, त्याची करुणा भाकली तर तो आपल्याला क्षमा करतो, आपल्याला परत शुद्ध करतो. असा हा ईश्वर जगाचा एकमेव, सार्वभौम, न्यायी असा शासक आहे. अनेक देव आहेत व प्रत्येक देवाचे (व देवीचे) स्वतःचे व्यक्तित्व आहे. स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत असा एक समज होता आणि आहेपण…. पण हे विशिष्ट देव एकाच ईश्वराची विभिन्न रूपे आहेत. भिन्न शक्ति आहेत, अवतार आहेत … अशी ही श्रद्धा आहे.
त्या ‘अनाद्यनन्त भगवन्तावर’ जितके आरोप करावे तितके कमीच. असे एकतर्फी आरोप एखाद्या अचेतन, जड मूर्तीला हार घालत सुटावे तसे आपणाला हवे तितके करता येतात. अमके देवस्थान जागृत आहे आणि ते नवसाला पावते हाही आरोप त्यांच्यापैकीच. ईश्वर इतका सहनशील की ह्या अनन्त आरोपांचे खंडन करण्याच्या भरीला तो पडत नाही. [आणि तो असेल तर खंडन करील ना ?] प्रा. रेगे पुढे म्हणतात :
‘ह्या ईश्वराशी अनेकांचे भांडण आहे. ते का ? काही तत्त्ववेत्त्यांचे सर्वांचे नव्हे-ईश्वराशी भांडण आहे. कारण ईश्वर ह्या संकल्पनेत अनेक तार्किक अडचणी आहेत. तत्त्ववेत्त्यांनी ईश्वराविषयी अनेक तार्किक अडचणी दाखवून दिल्या आहेत आणि त्यांचा इतर काही तत्त्ववेत्त्यांनी उलगडा केला आहे. (आणि त्यावर इतर तत्त्ववेत्त्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत आणि इतर काही जणांनी त्यांचे निरसन केले आहे आणि …. हा बौद्धिक खेळ चालू आहे.) पण ईश्वराच्या कल्पनेविषयी ज्या ख-या भेडसावणा-या अडचणी उद्भवतात त्या तार्किक नसतात; त्या नैतिक असतात.
‘ह्या नैतिक अडचणींनाही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्या त्या परंपरेतील श्रद्धालु माणसे ही उत्तरे स्वीकारताना दिसतातही… केवळ तार्किक दृष्टीने पाहिले तर ही उत्तरे फारशी समाधानकारक वाटत नाहीत. अनेक माणसे ती श्रद्धेने स्वीकारतात आणि त्यांचे समर्थनही करतात ही गोष्ट वेगळी. श्रद्धालु माणसाचे उत्तर असे असते की “ईश्वराचे अस्तित्व मला जाणवते. शुद्ध भक्तीने त्याची प्रार्थना केली तर तो प्रसन्न होतो ही माझी अंतरीची खूण आहे.”
तत्त्ववेत्त्यांचे खेळ तिकडे चालू द्या. आम्ही सगळे विवेकवादी तत्त्वज्ञ वा तत्त्ववेत्ते नाही, तसेच आम्ही श्रद्धावान् व श्रद्धालुही नाही. आम्हाला तर्क हवा तसा पुरावाही हवा.
कोणताही विश्वास बाळगणे, श्रद्धा बाळगणे आणि आप्तवचन प्रमाण मानणे हे एकच आहे. आप्तवचनप्रामाण्य खन्या, वास्तवा, यथार्थ ज्ञानाला बाधक असल्यामुळे ते त्याज्य आहे असे विवेकवादी मानतो. ईश्वराचे अस्तित्व सगळ्यांना आतून जाणवत नाही, त्याचे आम्हाला उपजत ज्ञान नाही. ते उपार्जित [acquired, learnt] आहे. थोरामोठ्यांनी आमचे कान भरल्यामुळे आम्ही देवाला मानतो. त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यय आम्हाला येत नाही.
एकदा श्रद्धा नको आणि उपार्जित ज्ञान तपासल्याशिवाय स्वीकार्य नाही असे म्हटल्याबरोबर, म्हणजेच ग्रंथप्रामाण्य किंवा आप्तवचन-प्रामाण्य नाकारल्याबरोबर स्वाभाविकच देवाचे अस्तित्व नाकारावे लागते. इन्द्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा, इन्द्राय तक्षकाय स्वाहा हा न्याय तेथे लागू करावा लागतो.
दुस-या शब्दांत सांगावयाचे म्हणजे यथार्थ ज्ञानप्राप्तीसाठी आपली नजर पूर्वग्रहदूषित असून चालत नाही. आपल्या मनाचे conditioning होऊ देऊन भागत नाही. [Conditioning साठी विश्वकोशात अवलंबीकरण, अवलंबन, अभिसंधान असे प्रतिशब्द वापरले आहेत पण ते सर्वपरिचित नसल्यामुळे वरील वाक्यात इंग्रजी शब्द वापरला आहे.] मनाचे अवलंबीकरण नष्ट करावयाचे असेल, त्याला [मनाला] पूर्वग्रहांच्या पकडीतून सोडवावयाचे असेल तर प्रत्येक आप्तवचनाविषयी शंका घेणे, ते पुन्हा पुन्हा तपासून घेणे अत्यावश्यक आहे. ह्याच प्रक्रियेप्रमाणे परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल आम्ही सतत शंका घेतो – आणि तद्विषक सर्व संकल्पना तपासून पाहण्याचा, त्याला पोषक वा बाधक पुरावे शोधण्याचा छंद किंवा चाळा आमच्या मनांना आम्ही लावतो. जोवर निरपवाद पुरावा हाती येत नाही तोवर देवाचे अस्तित्व आम्हाला गृहीत धरता येत नाही. आणि परिणाम किंवा फायदा असा होतो की अनेक घटनांच्या नवनवीन किंवा निराळ्याचे कारणमीमांसा आम्हाला सुचतात व त्यांतल्या काही ख्याही ठरू शकतात.
कोणती गृहीतके स्वीकारावयाची व कोणती नाही ह्याविषयी सश्रद्धांपेक्षा जास्त कठोर कसोट्या आम्ही लावतो. बरे, आम्ही सच्चे इहवादी आमच्या नैतिक कर्तव्यात चुकत नाही. देवाने सांगितलेले म्हणून नव्हे तर एकमेकांच्या हिताचे काय ह्या निकषावर तपासून आम्ही आमचे वर्तन ठरवितो. निसर्गनियम समजून घेतो. त्यांतले पाळावयाचे कोणते आणि मोडावयाचे कोणते व का (उदा. कामप्रेरणा व ब्रह्मचर्य) ह्याविषयी, तसेच पर्यावरण सांभाळण्याची गरज काय ह्याविषयी, आप्तवाक्यावर किंवा केवळ अंतःप्रेरणेवर अवलंबून न राहता विवेकाने निर्णय करण्याचा यत्न करतो. निसर्गनियमांना अनुसरून आमच्या बाबतीत यदृच्छेने जे काय घडेल ते बिनतक्रार स्वीकारतो. त्याचा बोल ईश्वराला लावीत नाही वा त्याला प्रसन्न करण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत नाही, म्हणजेच ईश्वराच्या प्रेमळ मिठीची गरज मनाला वाटू देत नाही. आणि अल्पसंख्यक असलो तरी आम्ही नाउमेद होत नाही.