व्हॉल्तेर प्रमाणेच दीदरोलाही पाट्यांची चीड येत असे. व्हॉल्तेरने एके ठिकाणी म्हटले आहे. लोकांची श्रद्धा हेच त्यांचे ज्ञान’, दीदरो म्हणतो, त्यांच्या (पाद्रयांच्या) धंद्यामुळे त्यांच्या अंगात ढोंग, असहिष्णुता आणि क्रूरता हे गुण उत्पन्न होतात. पायांची शक्ति राजापेक्षाही अधिक, कारण राजा सामान्य लोकांना पदव्या देऊन बडे लोक बनवतो, पण पाद्री देवांना उत्पन्न करतो. पाढ्यापुढे राजालाही मान वाकवावी लागते. काही देशांत धर्मोपदेशक रस्त्यात नग्न हिंडतात आणि स्त्रियांना त्यांच्या दर्शनाला जाऊन त्यांच्या X X X चे चुंबन घ्यावे लागते. फ्रान्समध्ये होत नसले तरी पाद्री वाटेल तेव्हा ईश्वराला आकाशातून पाचारण करू शकतो आणि स्वत:पुढे तो इतरांना कस्पटासमान लेखतो. तो आपल्यास ईश्वराचा प्रतिनिधी समजतो, आणि स्वर्गाची द्वारे त्याच्या अनुमतीने उघडतात किंवा मिटतात. पॅरेंग्वे येथे जेझुइटांचे राज्य होते, तेथील लोकांना ते कसे वागवीत ते पाहावे. काबाडकष्ट करूनही त्यांना काहीच फायदा नाही. एखाद्याने काही बारीकशी चूक केली तर पाद्री त्याला बोलावतो आणि ठरीव खूण करतो. त्याबरोबर तो आपली विजार काढतो आणि जमिनीवर उपडा पडतो. त्याला चामड्याच्या वादीने फटके मारतात, नंतर तो विजार घालतो आणि पायाला लवून मुजरा करून आणि त्याच्या अस्तनीचे चुंबन घेऊन निघून जातो. असे लोक अधिकारास पात्र आहेत काय, हे वाचकांनीच ठरवावे.