“मी मनोराज्यात ज्या स्थितीची इच्छा करीत होते ती मला प्रत्यक्षात प्राप्त झाली. बहुरूप्याची अनेक रूपे धारण करून त्यात जी जी कामे मी केली तसे आपल्या राज्यात नियम केले –
१. सुरतेच्या लोकांना अन्न-वस्त्र-व्यापारासाठी नियम केले.
२. हत्यारांचा कायदा रद्द केला. वारली-कोळी-भिल्ल यांना हत्यारे बक्षिसे म्हणून दिली. गुरांना आधार म्हणून गोशाळा बांधल्या. मुलांसाठी रमणीय गृहे व शाळा बांधल्या. मुलांना वयाच्या चार वर्षांपासून शिक्षण-स्वच्छता शिकवली. अभ्यासक्रमात फेरफार केले. (मुले म्हणजे मुलगे व मुली दोन्ही समजावयाचे).
३. सगळे चालू कर बंद केले. सोन्याचे नाणे चालू केले. कागदाच्या नोटा समुद्रात फेकल्या.
४. कायद्यातही बदल केले –
नवरयाने फिर्याद करून एखाद्या गाई-म्हशीसारखे कोर्टाच्या बेलिफाकडून बायको ताब्यात घेण्याचा कायदा बंद करून बायकोला नवरा आवडला नाही तर खडी फोडायला पाठवावा’ यावर वाद होऊन स्टेट सरकारकडे जाऊन कायदा नामंजूर झाला. तरी दुसरा कायदा केला त्यावर वाद होऊन कायदा पास झाला.
विधवा कोणत्याही वयाची असो वपन करू नये, २० पुरुष १५ स्त्रिया असे प्रमाण असल्याने त्यांची लग्ने व्हावीत. म्हारा-पोरांपासून विद्या प्रत्येकाला हवी. हुंडा नाही, लग्नाच्या दागिन्यांवर मुलीचा हक्क सर्वस्वी, पण ती वाईट चालीची असेल तर नाही; राष्ट्रीय सभेच्या मागण्यांचे एक पत्रक पार्लमेंटकडे पाठवावे; आगगाड्या, तारायंत्रे विकत घ्यावीत; दारूबंदी करून कायदा मोडणारास ‘काळेपाणी द्यावे. मुलाचा वा मुलीचा विक्रय केल्यास ‘काळेपाणी’ द्यावे. सार्वजनिक कामात पैसे खाणायास जन्मभर अंधारकोठडी द्यावी. इंग्रज नेटींव पगारात अंतर असू नये. दुस-यांकडे पक्वान्ने झोडून घरच्यांची निंदा करणा-या भटास भिक्षा घालू नये. लग्नकार्याचा प्रश्न माजवू नये. धट्टे-कट्टे, आळशी यांना दानधर्म करू नये.
माझ्याने करविले तितके बंदोबस्त मी केले. देशस्थ-कोकणस्थ-क-हाडे विवाह सुरू केले. पुनर्विवाहाला प्रतिबंध वा बहिष्कार राहिला नाही. शेतक-यांना शाळा, मासिक पुस्तके, वर्तमानपत्र फुकट पुरविले.
देशात सुधारणा व्हावी म्हणून राजेरजवाड्यांना स्वतंत्रता दिली, पण रयतेला गांजण्यासाठी नाही हो. म्युनिसिपालिटीत, कायदे-कौन्सिलात मत देण्याचा, सभासद होण्याचा माझ्या राज्यात स्त्रियांना अधिकार मिळाला. पुरुष-स्त्री दोन्ही सारखेच अशी नोटीस काढली. याप्रमाणे एक की दोन सुधारणा केल्या. सारांश, कालिदासाच्या द्वारकेसारखा हिंदुस्थान दिसू लागला आणि… जागी होताच स्वप्नातील कायद्यांच्या पावसाचे हसू आले.”