संपादक, आजचा सुधारक यांस,
चीनचा उल्लेख आला म्हणून का होईना, श्री. गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांनी राष्ट्रवादावरील चर्चेत भाग घेतला, याचा आनंद झाला (आ.सु. जाने. ९८). नोव्हेंबरच्या अंकात माझे जे टिपण प्रसिद्ध झाले आहे, त्यातील काही मुद्द्यांवर जाता जाता बरीच शेरेबाजी श्री. गो. पु. देशपांडे यांनी केली आहे, पण त्यांचा प्रमुख आक्षेप आहे, तो अमेरिकी अभ्यासकाचा हवाला देऊन चीनमधील राष्ट्रवादाविषयी लिहिले हा. वास्तविक, गो. पु. देशपांडे यांनीच जर आम्हाला चीनमधील राष्ट्रवाद समजावून सांगितला असता तर इंग्रजी लिहिणारया देशांतील राष्ट्रवाद अधिक चांगल्या रीतीने समजावून घेता येईल, हा मुद्दाही काही वाईट नाही. “पण म्हणून श्री. देशपांडे यांच्याच चष्म्यातून चीनकडे पाहिले पाहिजे, असा अट्टहास का? तो चष्मा अमेरिकी साम्राज्यवाद्यांप्रमाणेच पूर्वग्रहदूषित आहे, असे मी म्हणणार नाही, तसे करणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. पण चीनच्या जडणघडणीत राष्ट्रवादाचेही स्थान महत्त्वाचे आहे, हे सत्य त्यांची लेखणी मोकळेपणाने स्वीकारू शकत नाही, हे नक्की – म्हणूनच हा अभिनिवेश.
लीसा इसमान या अमेरिकी प्राध्यापिका प्रबंधासाठी चीनच्या काही भागात राहिल्या. तेथील लोकांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या. हे सगळे करूनही धडधडीत खोटे लिहिता येऊ शकते, हे खरेच. पण तसे ते खोटे आहे, हे साधार स्पष्ट करावे लागेल. ‘हान यू’ हा शब्दप्रयोग बदलून ‘को यू’ झाला म्हणून चीनमधील राष्ट्रवाद देखील एका प्रदीर्घ परंपरेवर आधारित आहे. या वस्तुस्थितीत काहीच फरक पडत नाही. अल्पसंख्यक भाषकांच्या प्रदेशात हान-यू किंवा को-यू भाषकांचे पद्धतशीररीत्या स्थलांतर घडवून आणण्यात आले, हा इसमानबाईंनी केलेला उल्लेख गो. पु. देशपांडे यांच्या रागास कारणीभूत झाला असावा. पण चीनमधील गटोपगट व त्यांचा भूतकाळ आणि त्यांचे निरनिराळ्या कालखंडातील संख्याबळ याबाबत त्यांचे ज्ञान संशयास्पद मानले पाहिजे’, एवढाच संदिग्ध प्रतिवाद श्री. देशपांडे करतात. स्थलांतराची ही बाब काय, अल्पसंख्य भाषक प्रांतातील विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये China is our magnificent Fatherland’ असा संदेश देऊन लहान वयातच राष्ट्रभावना बिंबविण्याचा प्रयत्न काय, किंवा देशापासून फुटून निघण्याच्या अधिकाराची घटनेतील तरतूद वगळण्याचा चीनचा निर्णय काय, या सर्व बाबी ‘सिनिस्टर’ आहेत का, हा स्वतंत्र चर्चेचा विषय होईल. माझ्या लेखात मी तसे मत कुठेच व्यक्त केलेले नव्हते. पण चीनचा राष्ट्रवाद प्रगमनशील आणि परंपरेची केंद्रे उज्जीवित केली पाहिजेत असे सांगणारा भारतातील राष्ट्रवाद मात्र प्रतिगामी, पुच्छ गतीकडे नेणारा, हे समीकरण हे तर्कशास्त्र अनाकलनीय आहे. माझ्या प्रतिक्रियेचा हेतू या विसंगतीकडे लक्ष वेधणे हाच होता. टिपणाच्या सुरुवातीलाच तिस-या जगातील देशांना साम्राज्यवादाच्या कचाट्यातून स्वतंत्र होण्यात राष्ट्रभावनेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे मी म्हटले होते. पण त्याकडे श्री. देशपांडे यांचे दुर्लक्ष झालेले दिसते. वैचारिक चर्चेत कोणाचा तरी बंदोबस्त करण्याची दृष्टी असली की अशी सोईस्कर डोळेझाक होते. राष्ट्रवादाला गतिमान हे विशेषण मी लावले ते ही विचारसरणी कोणत्याही व्याख्येत बंदिस्त करणे अवघड आहे, या अर्थाने. पण भारतीय राष्ट्रवादाची विवक्षित व्याख्या आणि राष्ट्रवाद या दोन भिन्न गोष्टी आहेत असे पत्राच्या प्रारंभीच स्पष्ट करणारे गो. पु. देशपांडे माझे ते गतिमान’ हे विशेषण मात्र माझ्य भारतीय राष्ट्रवादाच्या विवक्षित कल्पनेला चिकटवून देतात. शिवाय त्याला ‘सबगोलंकार’ हे आणखी एक विशेषणही जोडतात, ते असो. राष्ट्रवाद या संकल्पनेचे विश्लेषण करणारे लेखन मुदलातच नसते, हे देशपांडे यांनीच म्हटले आहे. फक्त, असे का होत असावे, असाही प्रश्न मला पडतो. राष्ट्रवाद म्हणजे काहीतरी त्याज्य, संकुचित अशी प्रबळ धारणा आपल्याकडे दिसून येते. ती बरोबर नाही, सध्याच्या जागतिक राजकीय व्यवस्थेत तरी भारतासारख्या देशांना राष्ट्रवादाशिवाय तरणोपाय नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे. गो. पु. देशपांडे यांच्यासारख्या बुजुर्गाकडून शेलक्या विशेषणांचा आहेर सहन करीतही ते मत मांडत राहणे भाग आहे. कोणत्या लढाईवर जायचे नसल्याने वॉशिंग्टन-न्यूयॉर्क काय किंवा मॉस्को-बीजिंग काय सर्वच ‘पीठांकडून येणारे विचार तपासून घेतले पाहिजेत, असा माझा एक भाबडा समज
आहे!
निरंजन आगाशे
‘उषःकाल ३५ ब हनुमानगर, पुणे ४११०१६
* * *
श्री. संपादक, आजचा सुधारक यांस,
फेब्रुवारी ९८ अंकामध्ये श्री. संजय सहस्रबुद्धे ह्यांचे एक छोटे पत्र आले आहे, ते वाचले. श्री. सहस्रबुद्ध्यांनी एक शिथिल विधान केले. त्यांची तक्रार भारतीय समाजाविषयी आहे असे ते म्हणतात. पण भारतीय समाज फार मोठा आहे. त्यात विविध थर आहेत. ते ज्याला पळपुटेपणा म्हणतात ते ‘तत्त्वज्ञान’ थोड्या मध्यमवर्गीयांमध्ये इतकेच नाही तर ‘उच्चवर्णीयांमध्ये प्रचलित असावे. एवढ्या लहानशा समाजाला त्यांनी भारतीय समाज म्हणू नये अशी माझी त्यांना सूचना आहे. अशी अतिव्याप्त विंधाने केल्यामुळे मूळ मुद्द्याला उगीच फाटे फुटतात. अजून ६०-७० टक्के भारतीय समाज नोक-यांच्या (आणि त्यामुळे रिटायरमेंटच्या) बाहेरचा आणि मुलामुलींची लग्ने लवकर उरकून टाकण्याच्या विचाराचा आहे हे वेगळे सांगावयाची गरज नाही.
मुलांची लग्ने त्यांना नोकरी लागेपर्यंत अथवा ती नोकरीत स्थिर होईपर्यंत लांबविणे इष्ट नाही. मुलांचा त्यांना मिळणा-या नोकयांवर अजिबात ताबा नाही. नोक-या ह्या त्या त्या काळच्या समाजाच्या घडीवर अवलंबून असतात. कारखानदारी आणि सरकारी कचेप्या मोठ्या प्रमाणावर असल्याशिवाय नोक-या निर्माण होत नाहीत. आणि कारखानदारी तसेच सरकारी नोक-या निर्माण होण्यासाठी समाजाची एका विशेष प्रकारची वाढ होणे आवश्यक असते.
आपल्या ऐतिहासिक काळाकडे नजर टाकली तर पूर्वी सरकारी नोक-या अजिबात नव्हत्या असे लक्षात येईल. फडात १०-२० कारकून आणि महालात दासदासी एवढी सोडल्यास बाकीची सरकारी कामे वतने देऊन करून घेतली जात; आणि खेड्यापाड्यांतून बलुतेदारी होती. म्हणजे नोक-या नव्हत्याच. शाळासुद्धा तात्यापंतोजींच्या असत. नोक-या कश्या उपलब्ध होतात हे आमच्या बढ्श समाजाला अजूनपर्यंत अनाकलनीय आहे. इंग्रजांनी ‘ येथे आल्यावर येथल्या लोकांना अचंबित करणा-या दोन गोष्टी केल्या. बिनाबैलाने गाडी हाकली व नियमित उत्पन्न वेळच्यावेळी देणा-या नोकया स्थानिक लोकांना दिल्या. त्यामुळे कुंपणीसरकार हे प्रतिपरमेश्वरच ठरले. नोकरी कशी निर्माण होते ते न कळल्यामुळे आजही आपण ती लागल्यानंतर ईश्वरी कृपा म्हणून पेढ्यांचा नैवेद्य देवाला दाखवून ते वाटतो. पूर्वी एकेकाळी आमचे लोक आगगाडीसमोर नारळ फोडीत!
ज्या कामांमध्ये एका कुटुंबाच्या बाहेरची वेगवेगळ्या जातींची माणसे एकत्र राबत आणि पैशांच्या रूपाने ज्याचा मोबदला द्यावा लागे अशी कामे इंग्रजांच्या आगमनापूर्वी जवळजवळ नसावी. शाळेसाठी सोसायट्या आणि कापडाच्या गिरण्या ह्या सगळ्या गोष्टी इंग्रजांच्या आगमनानंतरच्या. एखाद्या समाजात सोसायट्या आणि गिरण्या निर्माण होण्यासाठी मनाच्या एक विशिष्ट प्रकारच्या बैठकीची आवश्यकता आहे. ती आपल्या समाजामध्ये पुरेशी झालेली नाही. त्यामुळे व तशी होईपर्यंत आपल्या येथली बेकारी नष्ट होणे शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जिच्यामध्ये नोक-या निर्माण होतील अशी योजना, अशी समाजाची रचना ही प्रौढांनी निर्माण करावयाची आहे. ते काम प्रौढ जोपर्यंत करीत नाहीत तोपर्यंत सगळ्या तरुणांना वेळच्यावेळी नोक-या लागणे शक्य नाही. तरी हे सर्व जाणून तरुण मुलामुलींना आर्थिक स्वावलंबनाच्या सबबीवर विवाहापासून वंचित ठेवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न आहे. विवाह हा तरुणपणी करण्यास समाजाने प्रोत्साहन द्यावे. आर्थिक स्वावलंबन आणि विवाह ह्या दोन गोष्टींची गल्लत करू नये. आर्थिक स्वावलंबन प्राप्त करणे खरोखरच तरुण मुलांच्या हाती नाही ही गोष्ट समजून घ्यावी. त्यातून अलिकडे जे AIDS चे भय निर्माण झाले
आहे त्यामुळेसुद्धा तरुण मुलामुलींची लग्ने लवकर उरकून टाकणे हरप्रकारे इष्ट आहे हा विचार समाजामध्ये प्रसृत करणे आवश्यक झाले आहे.
मुलांनी तरुण वयात आपल्या पायांवर उभे राहावे असा विचार करण्यात गैर काहीच नाही. आपल्या मुलांना राष्ट्रीय संपत्तीत भर घालण्याची संधी त्यांच्या योग्य वयात देणे आणि हा विचार त्यांच्या मनावर बिंबवणे ह्यात कसलाही पळपुटेपणा नाही.
* * *
मार्च ९८ च्या अंकात डॉ. र. वि. पंडितांचे संपादकांना उद्देशून लिहिलेले एक पत्र आले आहे. यज्ञोपवीत समारंभाला नको पण विवाहसमारंभाला जाणे इष्ट, नव्हे आवश्यक आहे ही बाजू त्यांनी मांडली आहे. दुस-या वाचकाला जो प्रश्न पडला होता तो मुख्यतः विवाहसमारंभात जी सुधारणा होणे आवश्यक आहे असे वाटते ती होत नाही आणि जोपर्यंत ती घडत नाही तोपर्यंत त्या समारंभात सामील होण्याची इच्छा होत नाही असा होता. सध्याच्या समारंभपद्धतीचा आपण निषेध करावा अशी तीव्र इच्छा असते. आपण समारंभांना हजर राहिल्याने आपला निषेध व्यक्त होत नाही ह्याची खंत दुस-या वाचकाने प्रकट केली होती.
विवाहसमारंभ हा सामाजिक समारंभ आहे, तेथे वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सगळे
आप्तस्वकीयस्नेही एकत्र जमल्यामुळे ती घटना सर्वांनाच आनंददायक आणि चिरस्मरणीय होते ह्याबाबत मतभेद नाही. मतभेद आहे तो थाटमाटाला, त्या जाडजूड कागदावर इंग्लिशमध्ये” छापलेल्या पत्रिकांना, ती बेगडी आरास, ते आहेर आणि त्या सर्वांचे भडक प्रदर्शन ह्या सर्वांना. आपण चारचौघांसारखे वागावे ह्या समजुतीमुळे विवाहसमारंभाचे स्वरूप पूर्वीसारखेच पुढेही चालू राहील. किंबहुना त्यात बेगडी थाटमाटाची भरच पडत राहिली तर, आणि ज्यांना तो थाटमाट आवडत नाही तेही हजर राहत गेले तर, सुधारणा होणार कशी हा मूळ प्रश्न आहे. तो मूळ प्रश्न श्री. पंडितांच्या पत्राने सुटला असे मला वाटत नाही.
मोहनी आणि दुसरा वाचक ह्यांच्या सूचनांमध्ये एक मोठा फरक आहे. (मी मोहनींचेही लेख वाचले आहेत.) मोहनींना आमच्या समाजामध्ये विवाहविधीला (त्याच्या समारंभाला नाही) जे महत्त्व प्राप्त झालेले आहे ते महत्त्व कमी व्हावे, अविवाहित मातृत्वाचे लांच्छन दूर व्हावे असे वाटते. (त्याच्या चर्चेला तर अजून सुरुवातच झाली नाही.) दुसन्या वाचकाची नापसंती ही समारंभामधल्या थाटमाटाविषयी, बडेजावाविषयी आणि त्या भपक्याविषयी होती. समारंभाच्या यजमानाला ती नापसंती कशी कळवावी, ती त्याच्या लक्षात कशी आणून द्यावी हा प्रश्न संपादकांच्या पद्धतीने पत्र लिहून सुटला तर सुटेल. पण बहुतेककरून पत्रलेखकाच्या पदरी कटुताच पडण्याची शक्यता अधिक.
– नारो दाजीबा
हल्ली मुक्काम द्वारा श्री. वि. भ. सावरकर
शिल्प सोसायटी, जी. ई. बी. नजीक,
बालिथा, वापी (वलसाड) ३९६ ११५