‘कालनिर्णय’ ह्या दिनदर्शिकावर (१९९५, १९९६ आणि १९९८) प्रा. मे. पुं. रेगे ह्यांचे अनुक्रमे ‘मी आस्तिक का आहे?’, ‘परंपरागत श्रद्धा’ आणि ‘देवाशी भांडण’ हे तीन लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या लेखांमधील विषयाशी संबंधित आजचा सुधारक (एप्रिल, १९९१) या मासिकात प्रसिद्ध झालेला ‘विवेकवादाच्या मर्यादा’ हा लेख असे एकूण चार लेख माझ्या डोळ्यांसमोर आहेत. ह्या लेखांमधून रेगे सरांची ईश्वरविषयक भूमिका स्पष्टपणे व्यक्त झालेली आहे. कोणत्याही श्रद्धाळू व्यक्तीला जेवढ्या स्वच्छ शब्दांत स्वतः स्वीकारीत असलेली भूमिका मांडता आली नसती तेवढ्या स्पष्ट शब्दांत रेगेसरांनी ती मांडलेली आहे. सर्वे श्रद्धाळू व्यक्तींचे प्रतिनिधित्व करणारे म्हणून मी रेगे सरांच्या भूमिकेचा विचार करणार आहे.
प्रा. रेगे तत्त्वज्ञानामध्ये अधिकारी व्यक्ती आहेत, किंबहुना आज भारतात जे थोडे मान्यताप्राप्त तत्त्वज्ञ आहेत त्यांत रेगे सर अग्रणी आहेत. तत्त्वज्ञानाची एकही शाखा अशी नाही की जिच्यावर सरांचा अधिकार नाही. ते माझे गुरु आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. तरीही वरील लेखांमधून सरांनी व्यक्त केलेली विचारसरणी कुठेतरी पटत नाही, मनाला अस्वस्थ करते म्हणून हा लेखप्रपंच!
सुरुवातीलाच सांगितले पाहिजे की मी रेगे सरांना प्रामुख्याने विश्लेषक तत्त्वज्ञान व सांकेतिक तर्कशास्त्र शिकविणारे म्हणून जाणते. ह्या वर्गामध्ये विद्यार्थिनी या नात्याने बसताना माझ्या मनात सरांची एक वैचारिक प्रतिमा तयार झाली होती. ती कोणती? तर सर विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि नास्तिक असतील. ही प्रतिमा माझी मीच निर्माण केली होती. ती प्रतिमा मी निर्माण करावी हे सरांनी मला सांगितलेले नाही. ह्या प्रतिमेला पहिल्यांदा तडा गेला तो काही वर्षांपूर्वी गोव्याला झालेल्या P.P. Project मध्ये सहभागी होण्यासाठी मी गेले होते तेव्हा. शांतादुर्गेच्या मंदिरासमोरून मी व सर बोलत बोलत जात होतो. मंदिरासमोर आल्यावर सरांनी पायातल्या वहाणा काढल्या, नमस्कार केला व मग तुटलेला संवादाचा धागा पकडून पुढे संवाद चालू ठेवला.
दुसऱ्यांदा तडा गेला तो वाई येथे सर्वधर्म-अध्ययन केंद्रातर्फे आयोजित केलेल्या अभ्यासवर्गाला मी उपस्थित होते त्यावेळी. त्या वर्गात सरांनी ‘मॅक्सम्युलरची धर्मविषयक भूमिका’ ह्या विषयावर व्याख्यान दिले. ते ऐकताना मात्र मी पार हादरून गेले. मला स्वतःलाच विश्लेषक तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र शिकविणारे सर आणि धर्मविषयक मते मांडणारे सर ह्या दोहोंचा समन्वय एकाच व्यक्तिमत्त्वात घालता येईना.
ह्या सर्व पार्श्वभूमीवर मी सरांचे लेख वाचले तेव्हा त्यावर प्रतिक्रिया नोंदवावी असे तीव्रतेने वाटले, आणि ते केवळ व्यक्तिगत कारणांसाठीच नव्हे तर त्याला एक सामाजिक संदर्भही आहे म्हणून. रेगे सर आज विचारवंत म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्याकडे इतर व्यक्ती मार्गदर्शक म्हणून पाहतात. तेव्हा ह्या लेखांमधून व्यक्त केलेले विचार ते जेव्हा मांडतात तेव्हा त्यांच्यावर समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्याची सामाजिक जबाबदारी ही आपोआप येऊन पडते. कारण सरांसारख्या व्यक्ती ह्या केवळ खाजगी, व्यक्तिगत जीवन जगूच शकत नाहीत. त्या समाजाची ‘संपत्ती’ असतात. त्यामुळे आयुष्यात कुठे थबकलो तर पुन्हा वाटचाल करण्याचे बळ ह्या व्यक्तीच पुरवीत असतात.
एक गोष्ट मान्य केली पाहिजे की रेगे सर प्रामाणिक आहेत. त्यांनी स्वतःची भूमिका ती तुम्हाला पटो किंवा न पटो–स्वच्छ शब्दांत मांडलेली आहे. मला एवढेच वाटते की रेगे सरांनी प्रथमच ह्या लौकिक दृष्टीने व तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर आपली भूमिका इतक्या निःसंदिग्ध शब्दांत मांडलेली आहे. ती ‘कालनिर्णय’ सारख्या दिनदशिकिच्या मागच्या पानांवर छापण्याचे प्रयोजन काय? ‘कालनिर्णय’ भिंतीवर लावणारी असंख्य घरे असतील; पण त्यांतील किती व्यक्ती प्रत्येक महिन्याच्या मागील पानांवरील छापलेला मजकूर
वाचतात? कितीजण त्याची दखल घेतात? त्यापैकी किती जणांना तो समजतो? ह्यापेक्षा नवभारत, समाज प्रबोधन पत्रिका, परामर्श, आजचा सुधारक ह्या व ह्यांसारख्या इतर काही वैचारिक मासिकांमधून हे लेख प्रसिद्ध व्हायला हवे होते असे वाटते.
मी सरांनी लेखांमधून व्यक्त केलेल्या मतांचा, भूमिकेचा प्रतिवाद करणार नाही कारण ‘भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला मतस्वातंत्र्य दिले आहे. जोपर्यंत तुम्ही राज्यघटनेतील तरतुदी आणि कायदे ह्यांना अनुसरून वागत आहात तोपर्यंत तुम्ही कोणतेही मत स्वीकारायला मांडायला आणि त्याचा प्रचार करायला मोकळे आहात. (‘देवाशी भांडण, कालनिर्णय, १९९८) हे मला मान्य आहे. हे लेख वाचून मला पडलेले काही प्रश्न मी मांडणार आहे.
(१) ‘मी शुद्ध अंतःकरणाने जगले पाहिजे, प्राणिमात्राला आपले मानले पाहिजे, स्वार्थ, अहंकार सोडून दिले पाहिजेत, केवळ उपकारासाठी उरलो अशी स्थिती साधली पाहिजे’. असे जगणे म्हणजे देवाच्या सांनिध्यात जगणे.’ (‘देवाशी भांडण, कालनिर्णय, १९९८). ही जर ईश्वर मानणाऱ्या प्रत्येक श्रद्धाळू माणसाची भूमिका असेल तर हे जग नंदनवनच व्हायला हवे. कारण आजही श्रद्धाळू व्यक्तींची संख्या ही विज्ञाननिष्ठ नास्तिकांपेक्षा कितीतरी जास्त आहे. जग नंदनवन होणे तर दूरच राहिले, पण येथे हिंसाचार, क्रौर्य, खून, मारामारी इ. अपप्रवृत्ती आपल्याला आढळतात. श्रद्धाळू व्यक्तींना ईश्वराने घालून दिलेल्या नियमांचा विसर पडतो की काय? विचार आणि आचार ह्यांतील दरीचे स्पष्टीकरण श्रद्धाळू व्यक्ती कसे करील?
ह्या ठिकाणी कदाचित असे म्हटले जाऊ शकेल की ईश्वराने मी कसे जगावे म्हणजे जास्तीत जास्त सुखी आयुष्य मी व्यतीत करू शकेन हे सांगितले, पण त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करणे हे मात्र ज्याचे त्याच्यावर अवलंबून राहील.
परंतु हे म्हणण्याचे स्वातंत्र्य श्रद्धाळू व्यक्तींना नाही कारण जगातील प्रत्येक गोष्ट ईश्वरेच्छेनेच घडून येते ही त्यांची ठाम श्रद्धा आहे. मग त्याने केलेले दुर्वर्तन हेही ईश्वरेच्छेचाच भाग मानायचे काय?
ह्या ठिकाणी ईश्वराची कल्पना ओलीस ठेवल्यासारखी वाटते. मला हवे तसे मी वागणार, इतरांना दुःख झाले तरी हरकत नाही, चुकलो तरी हरकत नाही. तो ईश्वर क्षमाशील आहे, त्याची मनापासून करुणा भाकली तर तो मला क्षमा करायला सदैव तयारच आहे. ही भूमिका स्वतःची गैरवर्तनाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी शोधून काढलेली पळवाट नाही का वाटत?
ह्यापेक्षा मी एक माणूस आहे, माझ्याच सारखी दुसरीही व्यक्ती माणूस आहे. ज्या ज्या गोष्टींनी मला आनंद, सुख होते त्या त्या गोष्टींनी त्यालाही होत असणार; ज्या गोष्टींनी मला दुःख होते त्या गोष्टींनी इतरांनाही दुःख होत असणार त्यामुळे मी त्याप्रकारचे वर्तन इतरांप्रती करू नये हे माझे कर्तव्य ठरते ही भूमिका समजण्यासारखी वाटते. माझे कर्तव्य कोणते ? मी कसे जगावे ? हे कोणत्या तरी काल्पनिक शक्तीने मला सांगण्याची गरज नाही. ते मला निरीक्षणाने, अनुभवाने समजू शकते.
(२) ‘श्रद्धेचे तार्किक समर्थन करणे म्हणजे जे घडते ते भल्यासाठीच घडते हे पुराव्याच्या आधारे दाखवून देणे. हे माझ्या शक्तीबाहेरचे आहे. ते माझ्या अधिकाराच्या कक्षेत. येत नाही.’ (‘देवाशी भांडण’, कालनिर्णय, १९९८)
मी बाळगीत असलेल्या श्रद्धांचे समर्थन करणे हे माझ्या अधिकाराच्या कक्षेत येत नसेल तर कोणाच्या अधिकाराच्या कक्षेत येते? हे काम माझ्याखेरीज अन्य कोणाचे कसे असेल? मुख्य मुद्दा हा की “जे घडते ते भल्यासाठीच घडते’ हे वस्तुस्थितीच्या निकषावर सिद्धच करून दाखविता येत नाही. माझ्या श्रद्धेचे समर्थन करणे… माझ्या शक्तीच्या बाहेर आहे’ असे म्हणणे म्हणजे समर्थनाची जबाबदारी ढकलण्याचा प्रकार नाही का वाटत?
(३) “जगात माणसांना जे बरे-वाईट अनुभव येतात ते केवळ यदृच्छेने त्यांच्या वाट्याला येत नाहीत, त्यांच्यामागे काही प्रयोजन असते”. पारंपरिक हिंदु श्रद्धेप्रमाणे त्यांच्या पूर्वजन्माच्या कर्माची फळे म्हणून ते अनुभव त्यांना लाभलेले असतात.’ (‘देवाशी भांडण’, कालनिर्णय, १९९८)
ह्या विधानाला आधार नाही. असे असतानाही श्रद्धाळू माणूस ही गोष्ट ठाम श्रद्धेने स्वीकारतो. ह्यात काहीच गैर वाटत नाही का? एखादी गोष्ट मी कितीही ठामपणे स्वीकारली म्हणून ती सत्य आहे असे मला म्हणता येईल का ? २+२= ५ होतात असे मला ठामपणे वाटते ही गोष्ट मी ठाम श्रद्धेने स्वीकारतो असे म्हटले तर चालेल का? गणिताची सर्व मारतच कोसळेल किंवा व्यक्ती तितक्या प्रकृती’ ह्याप्रमाणे ‘व्यक्ती तितकी गणिते’ असे म्हणावे लागेल.
(४) श्रद्धाळू व्यक्तीची ईश्वराविषयीची भूमिका कोणती? ‘तर ईश्वर म्हणजे ह्या जगाचा, ह्या दृश्य विश्वाचा निर्माता’—तो सर्वशक्तिमान आहे, त्याची शक्ती, सामर्थ्य अनंत आहे. शिवाय तो परिपूर्ण आहे, सर्व सद्गुण त्याच्या ठिकाणी ओतप्रोत, अपरिमित प्रमाणात आहेत…. थोडक्यात ईश्वर दोन दृष्टींनी अनंत आहे. त्याचे सामर्थ्य अनंत आहे; आणि त्याचा चांगुलपणा अनंत आहे. (‘मी आस्तिक का आहे?’ कालनिर्णय, १९९५)
असे जर ईश्वराचे स्वरूप आहे तर मग जगात एवढे दुःख का आहे? ह्यावर उत्तर असे की ‘हा प्रश्न ईश्वराने माझ्या आकलनाच्या पलिकडे ठेवला आहे.’ (‘देवाशी भांडण’, कालनिर्णय, १९९८). असे म्हटल्याने श्रद्धाळू व्यक्ती कोणतेच समर्थन देत नाही. ‘आकलनाच्या पलिकडे ठेवला आहे म्हणजे काय? ईश्वराचा अनंत चांगुलपणा तसेच सर्वशक्तिमान असणे आणि जगातील दुःख, क्रौर्य ह्यांची संगती कशी लावावी? हाच तर खरे पाहता मुख्य प्रश्न आहे. ह्या बाबतीत जर श्रद्धाळू व्यक्ती हा प्रश्न ‘माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे’ ही भूमिका घेत असेल तर हे स्पष्टीकरण मानायचे का?
(५) ‘श्रद्धाळू माणसे ईश्वर ह्या कल्पनेचे गुलाम असल्यासारखी दिसतात. विज्ञाननिष्ठ नास्तिक निसर्गाचे आत्मघोषित गुलाम असतात. (‘देवाशी भांडण, कालनिर्णय, १९९८)
ह्या ठिकाणी ‘गुलाम’ हा शब्द वापरणे चूक ठरेल कारण गुलामाला आपण कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाकारतो. तसे स्वातंत्र्य आपल्याला नाही ही विज्ञाननिष्ठ नास्तिकांची भूमिका नाही. उलट मी जे करतो त्याला मीच जबाबदार आहे. त्याच्या अन्यावाईट परिणामांची जबाबदारी ही इतर कोणाच्याही खांद्यावर नाही, तर ती माझ्याच खांद्यावर आहे ही त्यांची भूमिका असते.
दुसरे असे की क्षणभर वादासाठी हे मानले की विज्ञाननिष्ठ नास्तिक निसर्गाचे गुलाम असतात, तरी अज्ञात, अदृश्य, काल्पनिक ईश्वरकल्पनेचे गुलाम असण्यापेक्षा जो निसर्ग मला डोळ्यांनी दिसतो, जो मी अनुभवतो, ज्याचा आस्वाद मी घेतो त्याचे गुलाम असणे ही भूमिका स्वीकरणीय आहे असे मला वाटते.
(६) हे खरे की ईश्वराची संकल्पना ही श्रद्धाळू व्यक्तींकडून तत्त्ववेत्त्याला मिळाली आहे. परंतु ही संकल्पना व्यक्तीच्या मनात निर्माण होण्याचे काय कारण असावे? ह्यासंबंधी वेगवेगळे युक्तिवाद दिले जातात. हे सबंध विश्व निर्माण करण्याचे काम एकट्या दुकट्या व्यक्तीचे नव्हे किंवा व्यक्तिसमूहाचेही नव्हे, तर कोणीतरी अपरिमित शक्तिमान असला पाहिजे ज्याने हे विश्व निमाण केले. मग हा जो कोणीतरी, त्याला कोणते तरी नाव द्यायचे म्हणून परमेश्वर, ईश्वर या नावाने संबोधणे सुरू झाले. त्याची पूजा अर्चा केली पाहिजे, त्याला प्रसन्न ठेवले पाहिजे तर तो आपल्या प्रार्थनेला उत्तर देईल इ. इ.
ज्यावेळी ज्ञानाचा स्फोट झाला नव्हता त्यावेळी विश्व, त्याची उत्पत्ती, मानवाची निर्मिती इ. इ. गोष्टी कुतूहलजनक वाटणे स्वाभाविक होते, व त्यांची कुवतीनुसार दिली गेलेली स्पष्टीकरणेही ठीक होती. पण आज एकविसाव्या शतकाच्या अनोख्या उंबरठ्यावर उभे असताना जर आम्ही विज्ञानाने पुरविलेली उत्तरे, स्पष्टीकरणे न स्वीकारता वडीलधाच्या व्यक्तींनी बाळगलेल्या त्याच स्वाभाविक श्रद्धांना कवटाळून बसत असू तर हे कितपत योग्य आहे?
(७) सर हे मान्य करतात की, ‘ईश्वराचे अस्तित्व न मानणारी व ह्या अर्थाने नास्तिक असलेली माणसे शुद्ध, सात्त्विक प्रवृत्तीची, अत्यंत सुशील असतात’. (‘मी आस्तिक का आहे?’ कालनिर्णय, १९२५). पण अशा व्यक्तीशी आस्तिक भांडण न करता फक्त एवढेच म्हणतील, ‘तुमचे बौद्धिक मत काहीही असो, ज्या रीतीने तुम्ही जगता त्यावरून तुम्ही तुमच्या खोल मनात ईश्वराला नकळत मानता असेच दिसून येते. आपण ईश्वराला नाकारीत आहोत असे तुम्हाला वाटते पण ईश्वराने तुम्हाला स्वीकारलेले आहे.’ (“मी आस्तिक का आहे?’ कालनिर्णय, १९९५)
हा केवळ एक शब्दविलास, कल्पनाविलास म्हणता येईल. विज्ञाननिष्ठ नास्तिक व्यक्तीच्या दृष्टिकोनातून ह्या शब्दांना, ह्या वाक्यांना काहीही अर्थ नाही.
(८) ईश्वराच्या अस्तित्वासाठी देण्यात येणारे युक्तिवाद व त्यांचे केले गेलेले खंडन हा मंडन खंडनाचा इतिहास सरांना उत्तम रीतीने ज्ञात आहे. तरीही त्यांचे आस्तिक्य टिकून का राहिले? ह्याचे सरांनी दिलेले उत्तर ही माझी स्वाभाविक श्रद्धा आहे. (‘मी आस्तिक का आहे?’ कालनिर्णय, १९९५) हे होय. वास्तविक ह्या स्वाभाविक श्रद्धेच्या विरुद्ध घेतल्या गेलेल्या तार्किक आणि वैज्ञानिक आक्षेपांमुळे ही श्रद्धा टिकवून ठेवण्याची काहीच गरज नाही पण सर ती टाकून देत नाहीत कारण त्यांच्या मते, ‘माझ्या वाडवडिलांची भोळी श्रद्धा हे त्यांचे एक सामर्थ्य होते. त्या सामर्थ्यांची जोपासना मी करू नये, असे काही घडलेले नाही. (‘मी आस्तिक का आहे?’ कालनिर्णय, १९९५)
हे स्पष्टीकरण आहे की स्पष्टीकरणाचा केवळ आभास?
सरांच्या दृष्टीने विज्ञाननिष्ठ नास्तिक व्यक्तींसमोर दोन प्रमुख समस्या आहेत आणि त्यांची उत्तरे त्यांना देता येत नाहीत. विवेकवादाच्या त्या मर्यादा आहेत. त्या दोन समस्या कोणत्या?
(१) …. विज्ञान निर्माण करणारा, नैतिक नियमांनी स्वतःचे नियमन करणारा, सौंदर्याचा आस्वाद घेणारा, सौंदर्य निर्माण करणारा माणूस विश्वाच्या स्वरूपाच्या ….. चौकटीत सुसंगतपणे सामावूच शकणार नाही. विज्ञानाच्या दृष्टीने माणूस एक गूढ ठरतो (‘मी आस्तिक का आहे? कालनिर्णय, १९९५)
पूर्वी कधीतरी हा माणूस गूढ राहिला असेल पण आज मात्र तो तसा राहिला आहे असे नाही. सर्व वैज्ञानिक पदार्थ आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या रचना आहेत. त्या कमी अधिक गुंतागुंतीच्या आहेत. माणूस त्यातलाच एक आहे ….? (‘विवेकवादाच्या मर्यादा’, आजचा सुधारक १९९१) ही भूमिका स्वच्छपणे माणसाविषयी घेता येते आणि ती घेणे रास्त आहे असे मला वाटते. ही भूमिका सरांना मान्य नाही.
(२) दुसरी समस्या ह्या विश्वात मानवाचे स्थान काय ?” ह्या प्रश्नाचे उत्तर देणे विवेकवादाच्या पलिकडे आहे.
ह्या समस्येलाही वरीलप्रमाणेच उत्तर देता येईल. विश्वात मानवाचे स्थान काय ? हा प्रश्नच खरे पाहता उपस्थित करण्याची गरज नाही. निसर्गात मानवाला मानव म्हणून काही खास स्थान आहे असे नाही. निसर्गातील इतर वस्तूंप्रमाणेच तोही एक आहे. फरक एवढाच की त्याच्याजवळ प्रगल्भ मेंदू असल्याने तो निसर्गाला जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो, त्याचा आस्वाद घेऊ शकतो, कुवतीनुसार त्यात भर घालू शकतो हे सर्व करीत असताना तो निसर्गाचा एक घटक म्हणूनच असतो.
हे विश्व त्याची उत्पत्ती, त्यातील मानवाचे स्थान ह्याविषयी विचार करताना एक गोष्ट लक्षात येते ती अशी की विश्वाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. (१) परंपरेने चालत आलेला दृष्टिकोन व (२) विज्ञाननिष्ठ विवेकवादी दृष्टिकोन. पहिला दृष्टिकोन श्रद्धाळू आस्तिकांचा तर दुसरा विज्ञाननिष्ठ विवेकवादी नास्तिकांचा! हे दोन्ही दृष्टिकोन समांतर रेषांप्रमाणे जातात, कुठेही एकमेकांना छेदत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या मानसिक सामर्थ्यानुसार (initial make up) त्यापैकी एका दृष्टिकोनाचा स्वीकार करतो. बहुधा सामान्यपणे पहिला दृष्टिकोन स्वीकारला जाताना दिसतो कारण तो स्वीकारणे सोपे आहे. ईश्वरावर हवाला ठेवून निश्चिंत होता येते. ह्या उलट दुसरा दृष्टिकोन स्वीकारणे कष्टदायक आहे कारण त्यासाठी मनाचा कणखरपणा आवश्यक आहे. तो कमावणे कठीण असले तरी ‘अशक्यप्राय’ नाही. आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत असताना तो कमाविण्याचा प्रयत्न अधिकाधिक व्यक्तींनी जरूर करावा असे मनापासून वाटते.
‘जे घडते ते कार्यकारण-नियमांना अनुसरून घडते, त्याचे नियम विज्ञानात शोधून काढता येतात आणि अशा ज्ञात नियमांचा वापर करून आपल्याला इष्ट ते घडविता येते, त्याचा दुसरा मार्ग नाही ही दृष्टी समाजात पसरविली पाहिजे. ह्यासाठी आपल्याला जे किमान करता येईल ते म्हणजे कधीही अंधश्रद्धेवर आधारलेल्या प्रथेप्रमाणे आचरण करायचे नाही. ह्यासाठी जवळच्या माणसांची कितीही अप्रीती सहन करावी लागली तरी समाजहितासाठी ही किंमत दिली पाहिजे.’ (‘परंपरागत श्रद्धा’, कालनिर्णय, १९९६) हा निर्धार जास्तीत जास्त लोकांनी करावा आणि सरांनी कधीकाळी असलेला ‘कच्चेपणा’ सोडायला हवा असे वाटते.