माननीय संपादक
आजचा सुधारक,
आ. सु. मध्ये बर्याच महिन्यांपूर्वी एका वाचकाने व्रतबंध समारंभाविषयी; त्याला आस्था नसताना, उपस्थित राहावे काय म्हणून पृच्छा केली होती. त्यानंतर अलीकडे दुसन्या वाचकांनी विवाह समारंभाविषयी त्याच स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. या दोन्ही वाचकांना आपण ‘‘आ.सु., १९९८, ८:११’ मध्ये वेगवेगळी उत्तरे दिली आहेत व त्यात विश्वास नसेल तर अशा समारंभांमध्ये सहभागी होऊ नये, परंतु आपले मत सौम्य शब्दांत कळवून, समारंभानंतर यथावकाश संबंधितांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस करावी असे उत्तर दिले आहे. या विषयावर मलाही काही सांगावयाचे आहे.
मी नागपूरसारख्या विस्तीर्ण खेड्यात व अलीकडे महानगर होण्याच्या दिशेने झपाट्याने प्रगती करू पाहणार्याख गावात, आतापर्यंत आयुष्याची उणीपुरी ४० वर्षे काढली व तेथेच माझा पूर्ण व्यवसाय, संसार, मुलांचे जन्म, शिक्षणे व विवाह पार पडले.आयुष्याच्या प्रारंभी मी काहीसा श्रद्धाळू होतो व धार्मिक व्रतवैकल्यांमध्ये भागही घेत असे. परंतु आयुष्यात जसजसे दुःख व अन्याय भोगावे लागले तसतशी माझी श्रद्धा नाहीशी होत गेली व गेली कित्येक वर्षे मी पूर्णतः नास्तिक आहे. आत्मा/परमात्मा या कल्पनांवरील माझा विश्वास संपूर्णपणे नष्ट झालेला आहे. ईश्वर नावाची सर्वांचे भले करणारी काही वस्तु आहे यावर मला मुळीच विश्वास नाही. विश्वात जे काही घडते ते अगदी साध्या निसर्ग-नियमांना अनुसरूनच घडते यावर माझा ठाम विश्वास आहे.
माझी पत्नी मात्र अजूनही श्रद्धावान आहे, त्यामुळे मुलेही काहीशी श्रद्धाळू आहेत. प्रत्येक व्यक्तीला आचारविचारांचे स्वातंत्र्य असावे, विशेषतः स्त्रियांना हा अधिकार निश्चितपणे असावा या ठाम विश्वासामुळे मी माझ्या कुटुंबात होणार्याव किरकोळ धार्मिक कृत्यांकडे निर्विकारपणे दुर्लक्ष करतो. माझी भूमिका कुटुंबाला पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, परंतु अरेरावी करीत नाही. माझा स्वतःचा व्रतबंधसंस्कार मी नोकरीत लागल्यावर, मातापित्यांच्या आदेशामुळे करून घेतला होता परंतु तेव्हाही माझी भूमिका सर्वस्वी त्रयस्थाची होती. माझ्या मुलाचा व्रतबंध संस्कार अर्थातच आम्ही केला नाही. अलीकडे त्याचा साधेपणाने विवाह झाला.
व्रतबंध हा पूर्णपणे कौटुंबिक संस्कार असून त्यास कोणतेही सामाजिक अधिष्ठान नाही असे माझे मत आहे. याखेरीज हा संस्कार मनुसंस्कृतीचा, सामाजिक विषमतेचा असल्यानेही माझा त्यावर आक्षेप आहे. परंतु जगात अनेक सनातनी धर्मामध्ये व्रतबंधासमान संस्कार निष्ठेने होतात. उदाहरणार्थ यहुदी (Jew) मुलांचा वयाच्या १३व्या वर्षी होणारा ‘‘बार मित्झवा’ हा किंवा झोरेस्त्रियन (पारशी) मुलामुलींचा ‘‘नवज्योत”संस्कार. जर हिंदु समाजातील उच्चवर्णीयांना धार्मिक संस्कारांची कर्तव्यपूर्ती करावयाचीच असेल (हज यात्रेप्रमाणे!) तर व्रतबंध संस्कार शिक्षणास प्रारंभ करण्यापूर्वी, मुलामुलींच्या वयाच्या ५ व्या ६ व्या वर्षी घरगुती पद्धतीने करावेत व त्यासाठी कुटुंबाबाहेरच्या कोणत्याही . व्यक्तीला आमंत्रण देऊ नये. आणि असे आमंत्रण मिळालेच तरी इतरांना त्याची मुळीच दखल घेऊ नये. सौम्य शब्दांत आपले विरोधी मत कळविण्याची तसदी घेण्याच्या भानगडीत तर मुळीच पडू नये. समजणारे आपोआप समजून जातील. समाजधुरीणांनी व सन्मान्य जबाबदार प्रौढांनी अशी आमंत्रणे दुर्लक्षित करण्यास प्रारंभ करून त्यात सातत्य ठेवले तर आपोआपच कालांतराने पहिल्या वाचकास पडलेल्या प्रश्नाचे निराकरण होईल.
विवाहसमारंभाचे अधिष्ठान मात्र व्रतबंधाहून भिन्न आहे म्हणून या दोन्ही संस्कारांच्या इष्टतेबद्दल मुळीच गल्लत करू नये. कारण विवाह हा मनुप्रणीत विशिष्ट वर्गाचा संस्कार नसून तो धर्म व जाती ह्या पलीकडे जाणारा एक सामाजिक संस्कार आहे. यात दोन कुटुंबे एकत्र जोडली जात असून, लोकसंख्येतील जैनिक वारसा बदलला जातो. या वैज्ञानिक कारणाशिवाय, समाजाचे जे जाळे (Network) असते त्यातील प्रत्येक गाठ म्हणजे विवाह संस्कार होय. या महत्त्वाच्या कारणासाठी विवाहसमारंभावर बहिष्कार टाकणे हे एक असामाजिक (antisocial नसले तरी unsocial तर निश्चितच) कृत्य ठरते.
समाजात वावरत असताना प्रत्येक व्यक्तीस अनेक मंडळींशी सलोख्याचे संबंध ठेवावे लागतात. बरेच संबंध केवळ व्यावहारिक असले तरी अनेक भावनिक असतात.आपली मुले व परिचितांची मुले आपल्या डोळ्यांसमोर लहानाची मोठी झालेली असतात व विवाहानंतर त्यांच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होतो. धार्मिक नव्हे तर भावनिक दृष्टीने विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा असतो व त्याप्रसंगीआपले कौतुक व्हावे, आपणास शुभेच्छा व आशीर्वाद मिळावेत, अशी विवाहबद्ध होणार्यात मुलांची रास्त अपेक्षा असते. या मुलांच्या कुटुंबीयांनीही यशाशक्ति, यथामति उभ्या केलेल्या या आनंदसोहळ्यात आपल्या सर्व सुहृदांनी व परिचितांनी उपस्थित राहावे व असलेले सामाजिक, भावनिक अथवा व्यावहारिक संबंध दृढ करावेत अशी इच्छा असते व त्यात गैर काहीच म्हणता येत नाही.
अर्थात विवाहसमारंभात होणारा कर्मकांडाचा प्रपंच व आर्थिक सुबत्तेचा बडेजाव या घृणास्पद गोष्टी आहेत. सोने, हिरे, मोती या निरर्थक खनिजांचे अथवा भपकेदार पेहरावाचे प्रदर्शन, देणेघेणे, मानपान अहेर, वराती, बॅण्डबाजा, व्हिडियो शुटिंग, अतिशय महागड्या पाट्य व पंगती, सुंदर फुलांची प्रचंड नासाडी हे सगळे सर्वस्वी त्याज्य आहे व हे टाळले पाहिजे. परंतु कोणत्याही विवाह समारंभाचे आलेले आमंत्रण मात्र जबाबदार व्यक्तीने टाळू नये. आपण नेहमी समाजात वावरताना परिधान करतो तसाच पोषाख करून (कधी सूट न वापरणान्यांनी सुटाबुटांत अथवा रेशमी झब्बा, पायजामा व वर नक्षीदार बंडी असल्या दिखाऊ पोषाकात जाऊन आपलीच शोभा न करून घेता!) अशा समारंभाला रिकाम्या हाताने जावे. वधूवरांना शुभेच्छा आशीर्वाद द्यावेत, दोन्ही पक्षाच्या पालकांचेअभिनंदन करावे आणि आग्रहच झाला तर तेथील फराळपाण्याचा माफक आस्वाद घेऊन समारंभाच्या ठिकाणातून काढता पाय घ्यावा. आपले तोंड गोड केल्याचे त्या कुटुंबाला अतीव समाधान मिळते हे ध्यानात ठेवून फराळ स्वीकारण्यास आढेवेढे घेऊ नयेत, रुचेल ते व हवे तेवढेच घ्यावे. कोणताही अहेर, पैशाचे पाकीट, भेट वस्तु, पुष्पगुच्छ यांपैकी काहीही देऊ नये कारण आमंत्रितांनी झळ सोसून आणलेल्या या भेटींना मुळीच टिकाऊ मूल्य नसते. त्यातल्या अनेक भेटी तर अधेमधेच गडप होतात!
विवाहसमारंभावर बहिष्कार मुळीच टाकू नये किंवा केवळ उपकार करण्यासाठी अथवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपण उपस्थित आहोत असा अविर्भात मुळीच नसावा. केवळ प्रेम व आपुलकी यांचेच प्रदर्शन करावे.
संपादकांनी दोन्ही वाचकांना दिलेला सल्ला अयोग्य आहे असे माझे मत आहे.