प्रा. मे.पुं. रेगे यांचे इहवाद आणि सर्वधर्मसमभाव हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी पहिल्या प्रकरणात ‘इहवाद म्हणजे काय?’ या शीर्षकाचा उपोद्घात लिहून पूर्वपक्ष केला आहे. त्यातील इहवादाचे निरूपण सामान्यपणे न्याय्य आणि वाजवी आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्यात फक्त एकच दुरुस्ती सुचवावीशी वाटते. पान दोन वर ते म्हणतात: ‘प्रत्यक्ष प्रमाणाने वस्तूंच्या अंगी असलेल्या ज्या गुणधर्माचे आणि शक्तींचे ज्ञान आपल्याला होणे शक्य आहे तेवढेच काय ते गुणधर्म आणि शक्ती वस्तूंच्या ठिकाणी असू शकतात. जे काही आहे त्याचे संपूर्ण स्वरूप अशा गुणधर्माचे आणि शक्तींचे बनलेले असते’ (तिरका ठसा माझा). असे काही इहवादी म्हणाले असतील; पण हे म्हणण्याची गरज नाही असे मला वाटते. इहवाद्याने फक्त एवढेच म्हणणे पुरे की ‘प्रत्यक्षप्रमाणाने वस्तूंच्या अंगी असलेल्या ज्या गुणर्धाचे आणि शक्तींचे ज्ञान आपल्याला होणे शक्य आहे ते गुणधर्म आणि शक्ती त्यांच्या ठिकाणी आहेत असे समजण्याचा आपल्याला अधिकार आहे. वस्तूंच्या ठिकाणी अन्यही गुणधर्म आणि शक्ती असू शकतील. ज्या प्राण्यांना कान हे इंद्रिय नसते ते वस्तूंच्या ठिकाणी आवाज नावाचा गुण नाही असे जर म्हणू लागले तर ते जसे चुकेल तसेच हेही आहे. इहवादी असे म्हणू शकतो की ज्याअर्थी अन्य गुण जाणणे आपल्या आटोक्याबाहेर आहे, त्याअर्थी आपल्या दृष्टीने ते जणू नाहीतच, आणि ते काय असतील याची उठाठेव करून काहीच साध्य होणार नाही.
पण हा मुद्दा किरकोळ आहे, आणि रेगे तो बहुधा मान्यही करतील. उपोद्घातात रेग्यांनी फक्त पूर्वपक्ष मांडला आहे, त्यामुळे इहवादावरील आक्षेप त्यात आलेले नाहीत.मात्र त्यांचे सूतोवाच त्यांनी या उपोद्घाताच्या शेवटी पान सात वर केले आहे. ते म्हणतात: ‘तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ह्या विशिष्ट दार्शनिक सिद्धान्ताला कोणी ‘‘इहवाद’ म्हणणार नाहीत, “अनुभववाद’ म्हणतील; इहवाद हा अनुभववादापासून निष्पन्न होणारा तार्किक निष्कर्ष आहे. अनुभववादाविषयी ते म्हणतात की ‘अनुभववाद हे निर्विवादपणे सत्य ठरलेले तत्त्वज्ञान नाही. ह्यूमच्या अनुभववादी तत्त्वज्ञानाविरुद्ध कांटचे तत्त्वज्ञान ठाकलेले आहे. हा इतिहासात विरून गेलेला वाद नाही. हा वाद आजच्या तत्त्वज्ञानात अनेक बाजूंनी अटीतटीने लढला जात आहे.’
तेव्हा आता कांटचे अनुभववादाविरुद्ध काय आक्षेप आहेत ते पाहणे जरूर आहे.
कांटचे तत्त्वज्ञान
कांटचा प्रमुख ग्रंथ Critique of Pure Reason हा आहे. त्याची उद्दिष्टे दोन: (१) ह्युमला उत्तर देणे, आणि (२) श्रद्धेला तत्त्वज्ञानात जागा करून देणे. कांटचे तत्त्वज्ञान फार गहन आहे; पण त्याचे निष्कर्ष थोडक्यात सांगणे शक्य आहे. तो म्हणतो की जे आपल्या अनुभवाला येते ते जग परमार्थाने सत् नाही. जे परमार्थाने सत् आहे त्याचे आपल्याला ज्ञान होऊ शकत नाही. शब्दस्पर्शादिमा जे जग आपण अनुभवतो ते वस्तुतः अवभासांचे (appearances) जग आहे. विशेष म्हणजे हे आवभासिक जग मोठ्या प्रमाणात आपणच निर्माण करतो. त्याची कच्ची सामग्री आपल्याला इंद्रियानुभवातून संवेदनांच्या रूपाने मिळते. या संवेदनांवर विविध संस्कार करून त्यांतून अवकाश आणि काळ यांत विस्तार असलेल्या, अंगी अनेक गुण असलेल्या आणि परस्परांवर क्रियाप्रतिक्रिया करणाच्या वस्तूंचे जग आपली प्रज्ञा (reason) निर्माण करते. एका अर्थाने अनुभवाचे हे जग काल्पनिकच आहे. खर्याज पारमार्थिक जगाचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. पण त्यामुळे आपण नाउमेद होण्याचे कारण नाही. कारण आपल्याला ज्ञान नसले, तरी श्रद्धाआहे. त्या श्रद्धेने आपण परमार्थाची, खया वास्तविक जगाची कल्पना करू शकतो. तिच्यामुळे आपल्याला कळते की ईश्वर आहे, तो स्थलकालापलीकडे आहे, ईश्वर न्यायीआहे, माणूस वस्तुतः अमर आहे, इ.
हा ग्रंथ कांटने छूमला उत्तर देण्याकरिता लिहिला हे वर सांगितलेच आहे. आपल्या अनुभववादी भूमिकेनुसार छूम म्हणाला होता की ज्याला आपण कार्यकारण संबंध म्हणतो त्याला तत्त्वज्ञ सामान्यपणे अवश्य किंवा अनिवार्य संबंध समजतात. पण अवश्यता (necessity) फक्त कल्पनांच्या संबंधांत असू शकते; आणि कार्य आणि कारण ह्या घटना असतात, कल्पना नाहीत. ‘अवश्य’ हा शब्द तत्त्वज्ञानात एका विशिष्ट पारिभाषिक अर्थाने वापरला जातो. तो अर्थ लाइब्नत्स या तत्त्वज्ञाने ह्यूमच्या काळी नुकताच स्पष्ट केला होता. तो असा: एखादी गोष्ट अवश्य आहे याचा अर्थ तिचा नकार अशक्य म्हणजे आत्मव्याघाती होतो. याचा अर्थ फक्त विधानेच अवश्य असू शकतात. कारण नकार फक्त विधानांचाच करणे शक्य आहे. प्रत्येक पित्याला अपत्य असते’ या विधानाचा नकार आत्मव्याघातीम्हणून अशक्य आहे; कारण अमुक मनुष्य पिता आहे, पण त्याला अपत्य नाही असे असू शकत नाही. परंतु प्रत्येक मनुष्याला अपत्य असते’ हे अवश्य नाही, कारण त्याचा नकार व्याघातमुक्त आहे. एखाद्या मनुष्याला अपत्य झालेच नाही असे असू शकते.
आता ह्यूमचे म्हणणे असे आहे की अमुक घटनेचे कारण अमुक आहे अशा विधानाचा नकार शक्य असतो, म्हणजे तो आत्मव्याघाती नसतो. उदा. जर एक बिलियर्ड चेंडू स्थिर चेंडूवर आदळला तर स्थिर चेंडूला चालना मिळते. पण या विधानाचा नकार व्याघातमुक्त म्हणून शक्य आहे. परीकथांमध्ये असे चमत्कार घडत असतात; म्हणजे त्यांची कल्पना आपण करू शकतो. सारांश, कारणकार्यसंबंध अवश्य संबंध नाही. एक चेंडू दुसन्यावर आदळला तर दुसरा हलेल ही आपली अपेक्षा असते, कारण असे नेहमी घडते असे आपण पाहिलेले असते, आणि एका घटनेनंतर दुसरीची अपेक्षा करण्याची आपल्याला सवय लागलेली असते. त्या दोन घटनांना एकत्र बांधणारा दुवा कोठेही सापडत नाही. त्यामुळे निसर्गाचा क्रम एकविध चालतो हे खरे; पण तो बदलू शकत नाही अशी शाश्वती नाही, म्हणजे निसर्गाचे अवश्य नियम नाहीत. म्हणून ह्यूमला संशयवादीम्हणतात.
कांटने जेव्हा ह्यूमचा युक्तिवाद वाचला तेव्हा तो निःशंक झोपेतून खडबडून जागा झाला, आणि या संशयवाद्याला उत्तर द्यायला पाहिजे असे त्याने ठरविले. त्याकरिता अनेक वर्षे खपून त्याने आपला Critique of Pure Reason हा सातशे पानांचा ग्रंथ लिहिला. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कारण कल्पनेचे समर्थन करणारा त्याचा युक्तिवाद निर्णायक नाही असे सामान्यपणे मानले जाते. ह्यूम अजून निर्भीडपणे पाय रोवून उभा आहे.
कांटने छूमला दिलेले उत्तर त्याचे खंडन करण्यास असमर्थ आहे ही एक गोष्ट झाली. दुसरी अशी की त्याचे तत्त्वज्ञान अनेक कारणास्तव पटण्यासारखे नाही. ती कारणे सांगण्याचे हे स्थळ नव्हे. पण ज्या कारणांस्तव मनुष्याला परमार्थाचे ज्ञान अप्राप्य आहे असे कांट म्हणतो ती कारणेही बरोबर नाहीत. उदा. तो म्हणतो की आपल्याला ज्ञात काही विधाने अशी आहेत की जी संश्लेषक आणि अवश्य आहेत. ‘संश्लेषक’म्हणजे ज्यातील विधेय उद्देश्यात समाविष्ट असते. उदा. ‘सर्व पिते अपत्यवान् असतात. या विधानातील ‘अपत्यवान्’ हे विधेय ‘पिता’ या उद्देश्यात समाविष्ट आहे; कारण पिता म्हणजे ज्याला अपत्य आहे असा मनुष्य. त्यामुळे एखाद्या मनुष्याला पिता म्हणणे आणि तो अपत्यहीन आहे असे म्हणणे व्याघातमय आहे. आता दुर्दैवाची गोष्ट अशी की कांट म्हणतो तशी विधानेच नाहीत अशी वस्तुस्थिती आहे. आपल्या ज्ञानांपैकी जी विधाने अवश्य आहेत ती सर्व विश्लेषक आहेत, आणि जी संश्लेषक आहेत (म्हणजे ज्यांची विधेये उद्देश्यांत समाविष्ट नाहीत) ती अवश्य नसून आयत्त (म्हणजे ज्यांचे नकार शक्य आहेत) आहेत. त्यामुळे कांटच्या तत्त्वज्ञानाचा प्रधान आधार नाहीसा होतो. त्याने दिलेला दुसरा आधार म्हणजे जर आपले ज्ञान व्यावहारिक जगापुरते मर्यादित आहे असे मानले नाही आणि ते पारमार्थिक जगाचे ज्ञान आहे असे आपण समजलो, तर आपण अनेक आत्मव्याघातीद्वंद्वांमध्ये सापडतो, आणि त्यातून सुटण्याचा एकमेव उपाय म्हणजे कांटचे म्हणणे मान्य करणे. पण हाही आधार भक्कम नाही; कारण त्या द्वंद्वांचे निरसन कांटच्या उपन्यासा- (hypothesis) वाचूनही शक्य आहे असे दाखविता येते.
आपले तत्त्वज्ञान श्रद्धा नाकारीत नाही, उलट तिला त्यात पुरेशी जागा करून दिली आहे, हा कांटला आपल्या तत्त्वज्ञानाचा गुण वाटतो. परंतु श्रद्धा ही गोष्ट सर्वथा असमर्थनीय असून तिला कांटच्या तत्त्वज्ञानात स्थान आहे, एवढेच नव्हे, तर अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. ही गोष्ट वस्तुतः अत्यंत दोषास्पद आहे. श्रद्धा जरी ईश्वरवाद्यांना अनर्थकारक वाटत नसली, तरी तिचा नीट अभ्यास केल्यास तो एका जुन्या युगाचा अवशेष आहे हे मान्य केले पाहिजे. मनुष्याला बुद्धी आहे, विवेकाच्या आधारे त्याला आपले सर्व ज्ञानविषयकआणि नीतिविषयक प्रश्न सोडविता येतात. त्याला आता या गतार्थ पांगुळगाड्याची मदत घेण्याचे कारण नाही. तिचा उपयोग करणे म्हणजे आत्मवंचना करणेच आहे. ती विवेकी मानवाला न शोभणारी अशी एक वृत्ती आहे. परमार्थाचे ज्ञान आपल्याला नसेल; पण म्हणून श्रद्धेने ते कसे मिळू शकेल? श्रद्धा म्हणजे एका अर्थी उत्कट इच्छा. सर्व इच्छांची पूर्ती शक्य नसते. श्रद्धेने काल्पनिक समाधान मिळू शकेल. पण तिने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळू शकत नाही.
कांटच्या मतानुसार मनुष्य व्यावहारिक आणि पारमार्थिक दोन्ही जगांचा रहिवासी आहे. त्याचा आत्मा अमर आहे. आवभासिक जगाचा नागरिक म्हणून तो पूर्णपणे कारणकार्याच्या नियमाने बद्ध आहे; पण पारमार्थिक जगाचा रहिवासी म्हणून तो कारणनियमातून मुक्त असतो. त्याचे निर्णय त्याने स्वतंत्रपणे घेतलेले असतात. आता ईहा-स्वातंत्र्याची (Freedom of Will) समस्या ही एक कठीण समस्या आहे हे खरे; पण तो सोडविण्याचा मार्ग कांटचा नव्हे. कांटने या समस्येची केलेली सोडवणूक खरोखर असमाधानकारक आहे. त्या मतानुसार मानवाच्या कृती एकाच वेळी कारणनियत आणि स्वतंत्र असतात असे मानावे लागते. दारूची तल्लफ ज्याला आली आहे असा दारुडा । जेव्हा दारूच्या अधीन होतो तेव्हा तो आवभासिक जगाचा रहिवासी म्हणून कारणनियमाने बद्ध असतो. पण त्याचे तेच कृत्य पारमार्थिकदृष्ट्या स्वतंत्र कृती असते असे कांटला म्हणावे लागते. पण हे सत्य असणे अशक्य दिसते.
मानवी आत्मा अमर आहे, आणि न्यायी ईश्वर आहे याविषयीचे कांटचे युक्तिवाद अतिशय दुर्बल आहेत. तो म्हणतो की मनुष्याची अपेक्षा अशी असते की नीतिमान आचरणाला सुखाची जोड मिळाली पाहिजे. परंतु आपल्या जगात तसे दिसत नाही. पुण्यवान माणसे अनेकदा जन्मभर दुःख भोगत असतात, आणि पापी माणसे मात्र सुखात लोळत असतात. त्यामुळे असे म्हणावे लागते की या जन्मात जरी सज्जनांना पुरेसे सुख मिळाले नाही तरी मरणोत्तर त्यांना ते मिळत असले पाहिजे. पण याकरिता ते शारीर मृत्यूनंतर अस्तित्वात असावे लागतील. आणि यातूनच ईश्वराचे अस्तित्वही सिद्ध होतेअसा कांटचा युक्तिवाद आहे. कारण मनुष्याला अमर करणे आणि त्याला सदाचाराच्या प्रमाणात सुख मिळेल अशी व्यवस्था करणे हे फक्त सर्वशक्तिमान ईश्वरालाच शक्य आहे. म्हणून ईश्वर अस्तित्वात असला पाहिजे. हे आत्म्याचे अमरत्व आणि ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारे कांटचे प्रसिद्ध नैतिक युक्तिवाद. ते किती दुर्बल आहेत हे विशद करण्याची जरूर नाही.
तेव्हा कांटचे तत्त्वज्ञान जरी उभे ठाकले, तरी ते निष्प्रभ आणि व्यर्थ आहे असे म्हणण्यावाचून गत्यंतर नाही. अनुभववाद, इहवाद, विवेकवाद यांना कांटचे तत्त्वज्ञानआव्हान देऊ शकत नाही.