आजचा सुधारकचा हा अंक आठव्या वर्षाचा शेवटचा अंक. या अंकाने आजचा सुधारकने आठ वर्षे पुरी केली आहेत. या आठ वर्षांत त्याने काय काय काम केले याकडे नजर टाकणे पुढील प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे होईल असे वाटते. म्हणून हे सिंहावलोकनआणि वाचकांशी हितगूज.
आठ वर्षांपूर्वी जेव्हा एप्रिल १९९० मध्ये आजचा सुधारक चा जन्म झाला तेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या समर्थनासाठी काही गोष्टी नमूद केल्या होत्या. त्यावेळी आपले सामाजिक जीवन अतिशय असमाधानकारक अवस्थेत आहे असे आमच्या लक्षात आले होते. अनेक दुष्ट रूढी आणि प्रवृत्ती जीवनात अनिबंध्रपणे थैमान घालत होत्या. आगरकरांनी सुधारक काढला तेव्हा जशी समाजांची स्थिती होती तशीच ती शंभर वर्षानंतरही कायम होती. श्रद्धा आणि धर्म यांचे साम्राज्य निर्वेधपणे चालू होते. साईबाबा, संतोषीमाता, सर्व प्रकारचे बुवा आणि महाराज यांचे पीक विलक्षण वाढले होते. विवेक कुठे नावाला शिल्लक राहिलेला नाही अशी स्थिती झाली होती. तिला खीळ घालणे जरी अशक्यप्राय दिसत असले तरी निदान तिच्याविरुद्ध आवाज उंचावणे अवश्य आहे ह्या जाणिवेने प्रेरित होऊन आम्ही आजचा सुधारक हे छोटेखानी मासिक सुरू केले. त्याची भूमिका पूर्ण विवेकवादी, समतावादी आणि व्यक्तिस्वातंत्र्यवादी अशी राहावी हा आमचा प्रयत्न होता. प्रस्थापित समाजाची घडी मुळापासून बदलून ती विवेकाच्या आधारावर घातल्यावाचून आपल्या जीवनात न्याय, मांगल्य आणि शहाणपणा येणे शक्य नाही अशी खात्री झाल्यामुळे जीवनाचे व्यापक परीक्षण करून पुढे काय करावे लागेल याचे दिग्दर्शन करण्याकरिता सतत वाङ्मय प्रसिद्ध केले.
प्रथम विवेकवादाचे सांगोपांग विवेचन करणारे लेख लिहून विवेकाचे स्वरूप आणि त्याचे सामर्थ्य हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. विवेकाचे क्षेत्र म्हणजे प्रामुख्याने सत्याचे, सत्यज्ञानप्राप्तीचे. ते सध्या प्रामुख्याने विज्ञानात होत असल्यामुळे वैज्ञानिक पद्धतीचा पाठपुरावा केला. धर्माचा आधार जी श्रद्धा तिचे अनर्थकारी स्वरूप दाखविण्याकरिता धर्माचे परीक्षण अनेक लेखांतून केले. धर्माचा पूर्ण बीमोड केल्याशिवाय कोणत्याही सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणे अशक्य आहे हे दाखविले. सर्व मानवांच्या, स्त्रिया आणि पुरुष यांच्या, आणि अवर्ण आणि सवर्ण यांच्या समतेचा पुरस्कार केला. समता तर महत्त्वाची आहेच; पण त्याहीपेक्षा स्वातंत्र्याची महती जास्त आहे. त्यामुळे मनुष्यमुक्तीचा आणि स्त्रीमुक्तीचा पक्ष घेतला. गेल्या आणि या शतकातील सुधारकांपैकी अनेक पुरुष आणि स्त्रिया यांची चरित्रे सांगितली. विज्ञानावर अनेक लेख लिहून धार्मिकांनी केलेल्या वैज्ञानिक सिद्धान्तांच्या विकृतीकरणाची परीक्षा करून त्यांचे अनिष्ट कार्य चव्हाट्यावर आणले.
या सगळ्याचा दृश्य परिणाम फारसा झाला असेल असे म्हणवत नाही. पण ज्यांच्या वाचनात हे मासिक आले असेल त्यांच्या विचारांत आणि मतांत थोडाबहुत तरी फरक झाला असावा असे समजणे चूक होणार नाही असे वाटते. निदान पूर्वीच्या श्रद्धा थोड्याफार डळमळीत करण्याइतपत कार्य या लेखांनी केले असावे. सध्या शाळाकॉलेजेस्ची आणि युनिव्हर्सिट्यांची ग्रंथालये धरून वर्गणीदारांची संख्या आठशेच्या घरात आहे, आणि वाचकांची संख्या पाहून नक्कीच जास्त असेल. हज़ारपाचशे लोक गंभीरपणाने विवेकवादी लेख वाचतात, आणि त्यांना ते महत्त्वाचे वाटतात ही गोष्ट फारशी प्रोत्साहक नसली तरी ती अगदीच निराशाजनक नाही. भविष्यात ही संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.
पण ती वाढो की न वाढो, आमचा प्रयत्न सुरूच राहणार हा आमचा निर्धार आहे.