मला केवळ नकारात्मक भावनिक वृत्तीचा उपदेश करायचा नाही. सर्व बलेवान भावनांचा उच्छेद करावा असे मी सुचवीत नाही. ही भूमिका मी फक्त ज्या भावनांवर सामूहिक उन्माद आधारलेले असतात त्यांच्याच बाबतीत घेतो, कारण सामूहिक उन्माद युद्ध आणि हुकूमशाही यांना पोषक असतो. शहाणपणा केवळ बौद्धिक असण्यात नाही. बुद्धी वाट दाखविते आणि मार्गदर्शन करते; पण ज्यातून कृति निर्माण होते ते बळ तिच्यात नाही. हे बळ केवळ भावनांमधूनच मिळवावे लागते. ज्यांतून इष्ट सामाजिक परिणाम घडून येतात त्या भावना द्वेष, क्रोध आणि भय यांच्या इतक्या सहज निर्माण होत नाहीत. त्यांच्या निर्मितीत बाल्यावस्थेत प्राप्त झालेल्या अनुभवाचा मोठा भाग असतो; तसाच आर्थिक परिस्थितीचाही असतो. परंतु ज्याने चांगल्या भावनांचे पोषण होते, आणि ज्यांनी मानवी जीवनाला मूल्य प्राप्त करून देणारी वृत्ति निर्माण होते असे साधारण शिक्षणातही बरेच करण्यासारखे आहे.