भाषांतर मीमांसा, सं. कल्याण काळे व अंजली सोमण, प्रतिमा प्रकाशन, पुणे, पृ. ४१५, किं. रु. २६०/-.
वेगवेगळ्या भाषांमध्ये नित्यनव्याने विकसित होणार्याव ज्ञानक्षेत्रांची ओळख करून घ्यावयाची, त्यांचा उपयोग करायचा. त्यांमधील वाङ्मयीन समृद्धतेचा आस्वाद घ्यायचातर भाषांतराला पर्याय नाही. कधी व्यावहारिक गरज म्हणून तर कधी केवळ आंतरिक ऊर्मी म्हणून भाषांतरे केली जातात. भाषांतर म्हणजे काय?भाषांतर कसे करायचे?कुणी करायचे?असे वेगवेगळे प्रश्न या संदर्भात अभ्यासकांच्याच नव्हे तर सामान्य वाचकांच्याही मनात उभे राहात असतात. या सगळ्यांचा परामर्श घेणारे एक चांगले पुस्तक नुकतेच वाचनात आले. डॉ. कल्याण काळे व डॉ. अंजली सोमण या दोघांनी मिळून संपादन केलेल्या‘भाषांतरमीमांसा’ या ग्रंथामध्ये भाषांतर व भाषांतरविद्या या विषयावरचे वेगवेगळे पंचवीस लेख समाविष्ट आहेत. भाषांतराचा सांकल्पनिक व उपयोजित अभ्यास मराठीमध्ये मांडणारे एक पुस्तक म्हणून या पुस्तकाने मोलाची भर घातली आहे. पुस्तकातील काही लेख केवळ सैद्धान्तिक स्वरूपाचे आहेत, तर काहींमध्ये सिद्धान्त, त्यांचे उपयोजन यांचा सोदाहरण ऊहापोह केलेला आहे. काहींमध्ये केवळ व्यावहारिक गरजा-समस्या-उपाय यांचे विवेचन आहे.
‘भाषांतरमीमांसा-एकदृष्टिक्षेप’ हा कल्याण काळे यांचा पहिला लेख संपूर्ण पुस्तकात हाताळल्या गेलेल्या विविध क्षेत्रांची धावती तोंडओळख करून देणारा आहे. ‘भाषांतर-संकल्पनेचा विकास’ या लेखामध्ये अंजली सोमण यांनी ‘भाषांतर’ ही संकल्पना कालानुक्रमे कश्सकशी बदलत गेली, विकसित झाली त्याचा इतिहास दिला आहे. मिलिंद मालशे यांच्या रोमान याकबसनची भाषांतरकल्पना’ या लेखाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात भाषाविज्ञानाचा आधुनिक शिल्पकार रोमान याकबसन (१८९६१९८२) यांच्या चौफेर कार्याच्या महत्त्वाच्या पैलूंचे थोडक्यात दर्शन घडते. लेखाच्या दुसर्या१ भागात, रोमान याकबसन यांच्या ‘भाषांतराचे भाषावैज्ञानिक पैलू’ या लेखाचे भाषांतर दिलेले आहे. याकबसन यांचा हा लेख नव्या संकल्पनांची मूलभूत चर्चा करणारा आहे. कल्याण काळे, अंजली सोमण व मिलिंद मालशे यांचे हे तिन्ही लेख सैद्धान्तिक स्वरूपाचे आहेत.
अशोक केळकर यांच्या अनुवाद : शास्त्र की कला?ह्या लेखात सैद्धान्तिक चर्चेसोबतच भरपूर उदाहरणे देऊन विवेचन केलेले आहे. सुरुवातीलाच केळकर हे शास्त्र व विज्ञान, तसेच कला व ललितकला यांतील भेद दाखवून देतात व सांगतात की, अनुवादपद्धती शास्त्र ठरली तरी विज्ञान नाही आणि कला ठरली तरी ललितकला नाही. अनुवाद करणे हा व्यवसाय म्हणून स्वीकारणान्यांनी किंवा हौस म्हणून अनुवाद करणा-यांनी ज्याचे मनन करावे असा हा लेख आहे. अनुवादकासाठी धोक्याची वळणे, होणारे अपघात, उपाय व पथ्ये त्यांनी सांगितली आहेत. मूळ पाठ्यातील शब्दांचा अर्थ समजून घेणे, समजलेला अर्थ अनुवादभाषेत समजून घेणे व समजलेला अर्थ अनुवादभाषेत मांडणे ही तीन वळणे अनुवादकासाठी धोक्याची. चौथ्या वळणावर काळजी घ्यायची आहे ती अनुवादग्रहणकयने! अनुवादभाषेत मांडलेला अर्थ समजून घेताना त्याने अगदीचजांभूळलोट्या असता कामा नये. अनेक उदाहरणे देत देत केळकरांनी हे सर्व स्पष्ट केले आहे. अनुवाद कशासाठी करायचा, कोणासाठी करायचा या बाबींवर अखेरचे अनुवादाचे स्वरूप कसे ठरते याचेही विवेचन त्यांनी केले आहे. लेखाच्या अखेरीस मूळ शीर्षकप्रश्नाचे त्यांनी दिलेले उत्तर मुळातूनच वाचण्याजोगे आहे. लेखाच्या शेवटी जोडलेली पारिभाषिक संज्ञांची सूची, मूळ प्रकाशनसंदर्भ ही वैशिष्ट्येही नमूद करायला हवीत.
न्यायविषयक मराठी अनुवादाबाबत दोन लेख आहेत. न्यायालयीन कामकाजातील भाषांतराचे स्वरूप’ या लेखात राजाभाऊ गवांदे म्हणतात, चांगले भाषांतर करण्यासाठी भाषेवर प्रेम हवे व भाषेचे—विषयाचे पुरेसे ज्ञानही हवे. न्यायाधीश व वकील यांना ते कायद्याचा अभ्यास करीत असतानाच भाषांतरविद्येचा परिचय करून दिला पाहिजे असेही ते सुचवतात. सत्त्वशीला सामंत यांनी कायद्याचे मसुदे व भाषांतर’ या लेखात कायद्याच्या भाषांतरातील प्रत्यक्ष अडचणी, त्यांची कारणे व उपाय यांचा ऊहापोह केला आहे. इंग्रजी-व्याकरणदृष्ट्या वाक्यरचनेचे ज्ञान, इंग्रजी मसुद्यातील विचारक्रमाचे आकलन व त्याचबरोबर अनुवादभाषेच्या प्रकृतीच्या जडणघडणीचे भान असल्याखेरीज कायद्याचा यथार्थ अनुवाद करता येणार नाही असे त्या स्पष्ट करतात.
‘भाषांतर’: एक टिपण’ या अनिकेत जावरे यांच्या लेखात भाषांतर म्हणजे काय? भाषांतर व अर्थनिर्णयन यातील संबंध काय?या प्रश्नांचा विचार केलेला आहे. ललित साहित्यकृतीचे भाषांतर : गरज, प्रश्न व मर्यादा’ हा ह.श्री. साने यांचा लेख, कवितेचे भाषांतर: काही विचार हा सुधाकर मराठे यांचा लेख, ‘नाटकाच्या भाषांतरातील समस्या हा माया पंडित यांचा लेख यांमध्ये त्या त्या वाङ्मयप्रकाराविषयी सोदाहरण विवेचन केले आहे. प्राचीन मराठी वाड्यातील भाषांतराचे स्वरूप (माधव ना. आचार्य) या लेखात ज्ञानेश्वर, एकनाथ, वामनपंडित, मोरोपंत, मुक्तेश्वर अशा प्राचीन मराठी संतांच्या/कवींच्या विविध वाङ्यकृतींबद्दल चर्चा केलेली आहे.
‘ललित साहित्याचे भाषांतर-एक’ यक्षप्रश्न या लेखात लीला अर्जुनवाडकर यांनी संस्कृत-मराठी ललितसाहित्याच्या अनुवादाच्या संदर्भात विवेचन केले आहे. वाड्यामध्ये “काय सांगितले?याबरोबरच ‘कसे सांगितले?यालाही महत्त्व असते व म्हणूनच त्याचे भाषांतर अधिक कठीण असे त्या म्हणतात. तर ‘ललितेतर वाङ्याचा अनुवाद या लेखात विजया देव म्हणतात की, ललितेतर अनुवादात, मूळ पाठ्यात काय सांगितले याला निःसंशय अधिक महत्त्व,पण कसे सांगितले याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. अशा अनुवादाला ‘व्यावहारिक गरज’ अधिक कारणीभूत असते; पण अनुवाद सुवाच्य व्हावयाला मात्र अनुवादकाची आंतरिक निकड्च गरजेची असते.
‘भाषांतर आणि वाङ्येतिहास (दत्तात्रय पुंडे) या लेखातभाषांतरप्रक्रियेमुळे निर्माण होणारे वाङ्येतिहासकारापुढचे वेगवेगळे प्रश्न व त्यांची व्यवस्था याचे विवेचन आहे.‘अनुवाद आणि समीक्षा (विरूपाक्ष कुलकर्णी) यात सोदाहरण दाखवून दिले आहे की अनुवादित कादंब-यांच्या समीक्षेमध्ये गफलतीची ठरलेली विधाने बर्यारचदा अनुवादकाच्या गफलतीमुळे आलेली असतात. ‘तौलनिक साहित्याभ्यास आणि भाषांतर या लेखात यशवंत कळमकर यांनी दोन भाषांतील साहित्याचा किंवा प्रत्यक्ष दोन भाषांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी भाषांतरांचा कसा उपयोग होतो ते नमूद केले आहे.
‘बांगला-मराठी भाषांतराच्या निमित्ताने (वीणा आलासे), हिंदी-मराठी भाषांतरातील प्रश्न’ (श्रीरंग संगोराम), ‘भाषा-भूगोल आणि भाषांतर’ (नीती बडवे), ‘कन्नड-मराठी अनुवाद – एक अनुभव’ (उमा कुलकर्णी) ‘हिंदी-मराठी व्यतिरेकी अभ्यासाचे भाषांतरकार्यातील महत्त्व’ (श्रीरंग संगोराम) ह्या लेखांत त्या त्या दोन भाषांच्या संदर्भात येणार्याी अडचणी, समस्या, त्यांचे निवारण यांचे सोदाहरण विवेचन केले गेले आहे.
‘वृत्तपत्रे आणि भाषांतरप्रक्रिया’ या लेखात ल. ना. गोखले यांनी वृत्तपत्रातील भाषांतरित मराठीबाबत काही मूलभूत मुद्दे मांडले आहेत. वेळेच्या बंधनाचे-घाईगर्दीचे जे एक बंधन संपूर्ण वृत्तपत्रीय लेखनालाच पडलेले असते त्यामधून भाषांतरप्रक्रियादेखील सुटत नाही. वृत्तपत्राची भाषांतरामधील मराठीतील इंग्रजी वळणाची दीर्घ वाक्यरचना, चुकीची शब्दयोजना, व्याकरणदोष यांचे सोदाहरण व सचित्र विवेचन त्यांनी केले आहे.
‘अनुवाद- एक व्यवसाय’ (वि. गं. नेऊरगावकर) व – ‘मौखिक अनुवाद : एक व्यवसाय व व्यवहार’ (य. चिं. देवधर) हे दोन लेख तुलनेने थोडे हलकेफुलके आहेत. हौस म्हणून नव्हे तर व्यवसाय म्हणून अनुवाद करताना कोणते अनुभव येतात. मोबदला कितपत मिळतो, काळजी कोणती घ्यायची अशा गोष्टींची चर्चा या दोन लेखांत आहे.
शेवटचा लेख ‘अनुवादकार्याची भारतातील दुरवस्था : कारणे व उपाय’ हा आहे. अशोक केळकर यांच्या मूळ हिंदी लेखाचा माधवी कोल्हटकर यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे. अनुवादाची व अनुवादकांची उपेक्षा, अनास्था व दुरवस्था ह्याची खंत केळकरांना वाटते आहे. लेखाच्या शेवटी त्यांनी सांगितलेली महत्त्वाची सूत्रे सर्वच अनुवादप्रेमींनी लक्षात ठेवण्यासारखी आहेत. ते म्हणतात, अनुवादकांना प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर योग्य ती पात्रता संपादन करूनच अनुवाद केले जावेत. अनुवादांची योग्य ती दखल घेतली जावी, त्यांचे विशिष्ट मानदंड-निकष निर्माण व्हावेत व नि:पक्षपाती अनुवाद-समीक्षा सिद्ध व्हावी,
पुस्तकाच्या अखेरीस भाषांतरविषयक लेखांची एक सूची जोडली आहे. ती सर्वसमावेशक नाही, पण उपयुक्त आहे. बर्यांचशा लेखांच्या शेवटी संदर्भसूची आहे. पूर्वी इतरत्र प्रकाशित झालेल्या लेखांचा मूळ संदर्भ सर्वत्र आहेच असे नाही. तसेच लेखकपरिचयामध्ये श्रीरंग संगोराम यांची काहीच माहिती आढळत नाही. लेखकपरिचयाच्या पृ. ४०७ ते ४१५ या भागात उजवीकडील पृष्ठांच्या तळाशी वृत्तपत्रेआणि भाषांतरप्रक्रिया’ हे शब्द का छापले आहेत ते समजत नाही. आणखी एक गोष्ट जाणवते ती अशी की सर्व लेख एकाच विषयातील असल्यामुळे त्यांतील बरेचसे सैद्धान्तिक विवेचन, व्याख्या अशा गोष्टी प्रत्येक लेखात आल्या आहेत व वाचकाला अशी पुनरावृत्ती कंटाळवाणी वाटू शकते.
जाता जाता एकदोन सूचना कराव्याशा वाटतात. सर्व लेखांचे प्रमुख सूत्र भाषांतर हेच आहे हे खरे. परंतु पुस्तक एका बैठकीत पूर्ण वाचून पचवण्यासारखे किंवा येता-जाता सहज वाचण्यासारखे हलकेफुलके नाही. पुस्तकातील लेखांची क्रमवारी मात्र त्यामुळे थोडी गैरसोयीची वाटते. सैद्धान्तिक विवेचन करणारे लेख आणि इतर विषयवार लेख (जसे : न्यायविषयक अनुवाद, ललितवाङ्याचा/ललितेतर वाङ्याचा अनुवाद, भारतीय भाषांमधून मराठीत अनुवाद, अनुवाद-व्यवसाय इत्यादी) अशी गटवारी करून लेखांची क्रमवारी ठरवली असती तर पुस्तकाची वाचनीयता थोडी अधिक झाली असती आणि वाचकांना एकेका उपक्षेत्राचे सलग दर्शन घडले असते. दुसरे असे की पुस्तकात कुठेतरी, कोणत्या विद्यापीठात भाषांतरविषयक अभ्यासक्रम आहेत, त्यांचे स्वरूप काय ते दिले गेले असते तर अभ्यासूंना निश्चित फायद्याचे ठरले असते. पुढील आवृत्तीत याचा विचार व्हावा.
एकंदरीत पहाता हा पंचवीस लेखांचा संग्रह अनुवादक्षेत्रात काम करणा-यांनी, अभ्यासकांनी, जिज्ञासूंनी, भाषाप्रेमींनी जरूर वाचावा, त्याचे मनन करावे असा आहे. प्रत्येक प्रतिष्ठित लेखकाच्या दोन-तीन तरी उत्कृष्ट कलाकृतींचा मराठीत अनुवाद करणे ही आपली जबाबदारी आहे असे मानावे हा अशोक केळकरांचा आग्रह पचनी पाडला जावा ही शुभेच्छा!
गीता सुभाष भागवत