प्रिय वाचक,
तुमचे पत्र आल्याला फार दिवस झाले. ते गेले दहा महिने अनुत्तरित राहिले याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे. या ना त्या कारणामुळे उत्तर लांबणीवर पडत गेले हे मात्र खरे आहे. जानेवारी ९८ च्या अंकात आणखी एका वाचकाचे पत्र आल्यामुळे पत्रोत्तराला आणखी विलंब लावणे अक्षम्य होईल ह्या जाणिवेने तुमच्या पत्रास उत्तर देत आहे.
आपल्यापुढे असलेला पेच सुधारकी मतांच्या सर्वच लोकांसमोर उद्भवत असला पाहिजे यात शंका नाही. मुंज या संस्कारात तुम्ही दाखविले ते दोष आहेतच, आणि त्यामुळे त्या समारंभास हजर राहू नये असे वाटणे साहजिक आहे. पण आप्तेष्टांचे गैरसमज होतातआणि त्यांचे मन दुखावते हेही खरेच आहे.
परंतु या स्थितीतून मार्ग काढला पाहिजे. तो असा असू शकेल असे मला वाटते. ज्यांच्या घरी कार्य आहे त्या आप्तेष्टांना किंवा इष्टमित्रांना सविस्तर पत्र लिहून त्या समारंभात सामील न होण्याची कारणे स्पष्टपणे सांगावीत. केवळ ब्राह्मणांतच, आणि त्यातही फक्त पुरुषांचाच हा संस्कार होऊ शकतो हे त्याचे मोठे विषमतादर्शक वैगुण्य आहेच; पण मौजीबंधनाचे उद्दिष्ट केव्हातरी जे काही असेल ते आज राहिलेले नाही हे निश्चित. इतके सांगू झाल्यावर आपण त्या समारंभात का सामील होऊ शकत नाही ते सांगावे. पण त्याचबरोबर हेही स्पष्ट करावे की असे करण्यात आपला कोणताही दुष्ट हेतू नाही. स्वतःची प्रौढी मिरवायची नाही की कर्तव्यातून माघार घ्यायची नाही. आपले प्रेमाचे संबंध पूर्वीसारखेच चालू राहावेत अशी आपली तीव्र इच्छा आहे; पण आपल्या मतांशी प्रामाणिक राहायचे तर मुंजीला हजर न राहणे अपरिहार्य आहे. मुंजीनंतर आपले जुने संबंध पूर्ववत कायम ठेवावेत. त्यात आपल्याकडे मोठेपणा घेऊ नये, आणि आपला खरोखरच नाइलाज झाला हे त्यांना पटेल अशी आपली वागणूक ठेवावी. असे केल्यासआरंभी जर नातेवाईक मंडळी किंवा इष्टमित्र नाराज झाले तरी तुमचा प्रामाणिकपणा पाहून । तो ते सहन करतील असे मानायला जागा आहे असे मला वाटते.
कळावे. आपला
संपादक
दुसर्या वाचकास उत्तर
प्रिय दुसरे वाचक,
आपण करता ती तक्रार खरीच आहे यात शंका नाही. लग्न समारंभ म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन असे निदान जे धनवान लोक आहेत त्यांच्या बाबतीत खरे आहे; आणि त्यांचे पाहून धनवान नसलेल्या लोकांनाही लोकलज्जेस्तव पुष्कळ खर्च करावा लागतो. त्याकरिता बहुधा कर्जही काढावे लागते. त्यातही जेवणाच्या बाबतीत आपण दाखविता ती वस्तुस्थिती आहे हेही मान्य करावे लागते. त्यामुळे थोडीतरी सुधारकी मते असणार्याव मंडळींना लग्नसमारंभाला जाऊ नये असे वाटते.
लग्नसमारंभ साधे करावेत, खर्च आवश्यक तेवढाच करावा, त्यात एरवी होणारा खर्च वाचवून तो वधूवरांना द्यावा इत्यादि सुधारणा पुष्कळदा सुचवून झाल्या आहेत. पण त्यांचा परिणाम जवळजवळ शून्य होतो हे खरे आहे. त्यामुळे या एकूण प्रकारापासून दूर राहावे असे वाटणे साहजिक आहे. पण ते कसे करता येईल ते सांगणे सोपे नाही. पहिल्या वाचकांना मुंजसमारंभाला न जाण्यासंबंधी जो सल्ला दिला तसाच आपल्यालाही द्यावा असे वाटते. अशा समारंभांना जाऊच नये. मात्र आपण कोणत्या कारणाकरिता त्याला जात नाही हे सौम्य आणि मृदू शब्दात, पण निक्षून तोंडी किंवा लिहून कळविल्याशिवाय राहू नये. आपण समारंभापासून अलिप्त राहतो याचे कारण कोणाचा अपमान करण्याची इच्छा अजिबात नाही, उलट तो निर्णय आपण बर्यारच कष्टाने घेत आहोत; आपले मैत्रीचे आणि प्रेमाचे संबंध पूर्वीसारखेच कायम राहावेत अशी आपली मनापासून इच्छा आहे; आणि निमंत्रकांनी आपल्याला क्षमा करावी अशा आशयाचे स्पष्टीकरण द्यावे. लग्नानंतर वधू-वरांना भेटून आपुलकीने आणि मैत्रीने विचारपूस करावी. असे केल्यास प्रथम जरी गैरसमज झाला तरी तो हळूहळू दूर होईल, आणि आपण केवळ विरोध करण्याकरिता असे वागत नसून त्यात आपला नाइलाज आहे अशी त्यांची खात्री होईल, अशी माझी कल्पना आहे.
कळावे.
आपला
संपादक
संपादक “आजचा सुधारक’ यास
स.न.
आ.सु. च्या गेल्या कित्येक अंकांत राष्ट्रवाद’ या विषयावर विस्तृत चर्चा होत आहे. अनेक विद्वान अभ्यासकांनी राष्ट्रवाद असावा की नाही, त्यामुळे जगाच्या व मानवी संस्कृतीच्या प्रगतीवर काय परिणाम होतो यावर भरपूर ऊहापोह केला आहे. अगदी ऐतिहासिक कालापासून आधुनिक काळापर्यंत जगातील विविध राष्ट्रांमधील राष्ट्रवादाच्या स्वरूपावर लिहिले गेले आहे. राष्ट्रवादामध्ये धर्माचे स्थान, नीतिमत्ता, विवेक यांची भूमिकाही विशद झालेली आहे. या सर्व चर्चेतून “राष्ट्रवाद” हा जगाच्या अंतिम भल्याच्या मार्गातील अडसर
(an-Teutonic) आहे असे मानणारा पक्ष प्रबल झाल्याचे दिसते. आ.सु.च्या संपादकांचीही हीच भूमिका स्पष्ट झाली आहे.
एक सामान्य नागरिक आणि आ.सु. मधील लेखांचा काळजीपूर्वक वाचक म्हणून माझेही मत व अनुभव थोडक्यात सांगावेसे वाटतात.
जगातील प्रत्येक देशात, विशेषतः पुढारलेल्या देशांत राष्ट्रवाद अतिशय प्रखरपणे अस्तित्वात आहे हे मला अमेरिका (U.S.A.), क्युबेक, इंग्लंड, फ्रान्स, इस्राएल व इराण या देशांमधील वातावरणावरून जाणवले. युरोपातील राष्ट्रे एकीकरणाची भाषा बोलत आहेत व संपूर्ण युरोपाची एकच नाणेव्यवस्था (single currency = Euro) लवकरच अस्तित्वात येणार आहे व युरोपियन पार्लमेंट तर कधीपासूनच कार्यरत आहे. परंतु युरोपातील कोणत्याही राष्ट्रातील राष्ट्रवाद यत्किंचितही कमी झालेला नाही. या मुद्दयावरून इंग्लंडमध्ये तर सरळसरळ लोकमताचे विभाजन झाल्याचे दिसते. युरोपचे एकीकरण ही जर्मनीची स्वार्थी चाल आहे व अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाविरुद्ध (hegemony) हा सुप्त लढा आहे आणि अन्य पर्याय नाही म्हणून फ्रान्स व इतर लहान देश या वरातीत (band-wagon) सामील झाले आहेत. परंतु पॅरिसमध्ये दुसरी भाषा बोलता येत असूनही फ्रेन्च लोक फ्रेन्चरखेरीज इतर भाषेत संभाषण कटाक्षाने टाळतात याचा अनुभव येतो!
अमेरिकेचा (U.S.A.) राष्ट्रवाद तर पदोपदी ओसंडून जात असतो. वस्तुतः अमेरिका हे तरुण राष्ट्र आहे व त्यातील बहुसंख्य लोकांची पाळेमुळे इतर देशांतच आहेत. परंतु एकदा अमेरिकन नागरिकत्व स्वीकारल्यावर या नागरिकांमध्ये ‘‘Americana” ही भावना केवढी प्रबल असते हे पदोपदी जाणवते.
तत्त्वज्ञ आणि विचारवंत काहीही म्हणोत, सामान्य जनता, व्यापारी वर्ग, राजकारणी व राज्यकर्ते हे सर्व घटक कट्टर राष्ट्रवादीच असतात. एक मजेदार गोष्ट आठवते. काही प्रौढ अमेरिकन विद्याथ्र्यांना भारतातील उत्कृष्ट आंब्यांचा पाहुणचार केल्यावर यजमानांनी विचारले “काय, आवडले ना तुम्हाला आंबे?’ यावर उत्तर मिळाले ‘‘हां ठीक आहेत, पण उत्तम रसाळ अमेरिकन सफरचंदापुढे जगातील सगळी फळे फिकी आहेत!”
तेव्हा “राष्ट्रवाद हा सर्वत्र आणि सदैव राहणारच. ते एक essential evil जुरी मानले तरी, भारतीयांनी सुद्धा राष्ट्रवादी असणे आवश्यकच आहे. अन्यथा भारतीय म्हणूनआपले अस्तित्वच संपुष्टात येण्यास फार काळ लागणार नाही!
र. वि. पंडित
१०२, उत्कर्ष-रजनीगंधा
खरे टाऊन, धरमपेठ नागपूर -४४० ०१०
आजचा सुधारक
आपल्या भारतीय समाजात एक तत्त्वज्ञान प्रचलीत आहे. ते म्हणजे मुलांचे आपले लग्न वयाच्या पंचविसाव्या वर्षी करावे कारण काय तर तो मुलगा जेव्हा रिटायर्ड होतो किंवा वयाच्या पंचावनाव्या वर्षापर्यंत येतो तेव्हा त्याचा मुलगा हाताशी येतो-आलेला असतो. मला हे तत्त्वज्ञान म्हणजे पळपुटेपणा आहे किंवा स्वतःची जबाबदारी दुसर्यायवर ढकलण्याचा प्रकार वाटतो. या विषयावर आजचा सुधारक मधून साधकबाधक विचार यावेत अशी अपेक्षा आहे.
आपला
प्लॉट नं. ४१, संजय सहस्रबुद्धे
सहस्रबुद्धे ले आऊट, भरतनगर, नागपूर – ४४० ००१