श्रीमती कोठाऱ्यांना उत्तर

श्रीमती कल्पना कोठाऱ्यांचा ‘ब्रेन-ड्रेन’ वरील लेख (आ.सु. डिसें. ९७) वाचून सुचलेले काही मुद्दे नोंदत आहे. मुळात या महत्त्वाच्या विषयावर अशी तुकड्या-तुकड्याने चर्चा होण्याने फारसे साध्य होत नाही याची पूर्ण जाणीव ठेवून हे वाचावे.

(१) कोठाऱ्यांची समजूत दिसते की GREv TOEFL (TOFFEL नव्हे) या परीक्षा गुणवत्ता ठरवण्याच्या फार उच्च प्रतीच्या कसोट्या आहेत. कोठाभ्यांनी IIT चा उल्लेख करून उदाहरण अभियांत्रिकीचे दिले आहे. IIT व इतर अभियांत्रिकी संस्थांच्या पदवीधरांना पुढे शिकायचे झाले तर त्यांना भारतातच ‘गेट’ (Graduate Aptitude Test in Engineering) ही परीक्षा देऊन भारतीय संस्थांमध्ये पुढे शिकता येते. अशा शिक्षणात शिष्यवृत्तीही जवळपास निरपवादपणे मिळवता येते. पण GATE पार करणे GRE च्या वाटेने बहुसंख्य अमेरिकन विद्यापीठांमध्ये जाण्यापेक्षा कैक पटींनी अवघड आहे! भारत हा अमेरिकेपेक्षा गरीब देश असल्याने इथे शिक्षणाची साधने कमी आहेत, हे उघड आहे. पण यामुळे का होईना, Gate पास होणे हे GRE च्या बहुतांश ‘यशस्वितेपेक्षा’ वरचेआहे.

‘गेट’ मध्ये वशिलेबाजी व इतर गैरव्यवहार झाल्याचे आजवर तरी ऐकिवात नाही. आय्.आय्.टी. च्या पदवीच्या अभ्यासक्रमासाठी द्याव्या लागणार्या्JEE या परीक्षेचीही अशी ख्याती होती, की अमेरिकन विद्यापीठेही त्या परीक्षेचे निकाल मानतात. मध्यंतरी मात्र या परीक्षेत भ्रष्टाचाराचा असफल प्रयत्न झाल्याची बातमी होती. तसे गेटचे न होवो.

(२) गुणवंत विद्यार्थ्यांची ज्ञानपिपासा केवळ पाश्चात्त्य वाचनालये पूर्ण करू शकतात, हे कोठाऱ्यांचे मतही आजच्या इंटरनेटच्या जमान्यात अर्धसत्यच आहे. श्रीमंत देशांमधील वाचनालये जास्त ज्ञानसाठा बाळगणारी असणार, हे उघड आहे. पण संशोधनाला पुरेशी वाचनालये भारतातही अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. संशोधकांना इंटरनेद्वारे परकी वाचनालयेही (जरा महाग का होईना) उपलब्ध होऊ शकतात. बहुतांश संशोधक भारतीय वा पाश्चात्त्य वाचनालयांचा ‘तळ गाठू शकत नाहीत, हेही लक्षात घ्यावे.

जर कोठाऱ्यांनी वाचनालयांऐवजी प्रयोगशाळांचा मुद्दा उचलला असता, तर ते जास्त योग्य ठरले असते. संशोधनाला वाचनालयापेक्षा प्रयोगशाळांची गरज जास्त असते.

(३) पण मुळात परदेशात जाणारे भारतीय खरे संशोधन किती करतात, हेही कोठारे सांगतात तितके ‘गुलाबी’ नसावे. आकडेवारी न देताच हे विधान करावे लागते, पण सौ. चितळ्यांसारखी आयुष्यभर व्रती वृत्तीने संशोधन करणाऱ्यांची संख्या सर्वच समाजांमध्ये ‘नगण्य असते. भारतातही असे लोक आहेत, परदेशातही. संशोधनापेक्षा उपयोजनातच जास्त माणसे गुंततात, आणि हेच स्वाभाविक आणि सार्वत्रिक आहे. आठले व कोठारे यांच्या मध्ये कुठेतरी सत्य असावे!

(४) कोठाऱ्यांचा सर्व दृष्टिकोन व्यक्ती हेच केंद्र मानून घडलेला आहे. त्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन सुचते : पण व्यक्तीची समाजाप्रत जबाबदारी सुचत नाही. एक काहीसा(च) भावनिक प्रश्न सुचतो – शंभर मजली इमारत बांधण्यात समाधान जास्त, की तुटपुंज्या साधनांनी एका दरिद्री गावाला स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवण्यातले समाधान जास्त?भारतातले, खूपसा खर्च गरीब शासनाने उचललेले, शिक्षण घ्यायचे, आणि नंतर मात्र परतफेडीचा, समाजोपयोगितेचा विचार न करता जॉब सॅटिस्फंक्शन मिळवायला परदेशी जायचे हे कोठाऱ्यांना अनैतिक वाटत नाही का?जॉर्ज वॉशिग्टन कारचे कौतुक करताना श्रीपाद अ. दाभोलकरांकडे दुर्लक्ष का होते?नाही. कोठारे मांडतात तो प्रश्न एका मोठ्या प्रश्नातला भागच फक्त आहे; आणि आठल्यांचा त्रागा गैर नक्कीच नाही.

(५) बरे, भारतातले बुद्धिवान विद्यार्थी आपली गुणवत्ता प्रमाणित करवून घेऊन पाश्चात्त्य ज्ञानसागरात आनंदाने पोहत आयुष्यक्रम गुजारतात, हेही पूर्ण सत्य मानू. पण मग सुसंस्कारांच्या यादीत ‘शुभं करोति’ आणि ज्ञानेश्वरीपेक्षा खूप काहीतरी नोंदायला हवे. त्यात डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्सही हवे आणि (हो!) कम्यूनिस्ट मॅनिफेस्टोही हवा. मूल्ये हवीत, ‘उपचार नकोत. मूल्ये तपासून घ्यायची यंत्रणा हवी. भारतीय ‘प्रवासी परदेशीसुद्धा गणपती ‘बसवतात’ याचे कौतुक टाळायला हवे. त्याऐवजी लेनिन (हो!) म्हणाला होता त्याप्रमाणे जगातले सर्व काही चांगले, ते माझेच आहे, हे म्हणता यायला हवे. नाहीतर अनेकवार प्रमाणित झालेली बुद्धिमत्ताही शंकास्पदच नव्हे, व्यर्थ आहे.

चढा सूर लावल्याबद्दल माफी मागतो, पण ज्यांची मुले-नातवंडे परदेशात स्थाईक झाली आहेत त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी ‘नजर तयार करणे योग्य नाही.ती मुले-नातवंडेही आपलीच. इथला भ्रष्टाचारही आपलाच. त्या गुणी मुला-नातवंडांनी इथल्या भ्रष्टाचाराकडे पाठ वळवणे आणि मग इथल्या बरबटलेपणावर शेरेबाजी करणे ही त्यांच्या वर्तणुकीतली चूकच आहे. त्या मायभूमीच्या दूर राहिलेल्या ‘बिचाऱ्यांना कसे दुखवायचे, असा विचार करून त्यांना त्यांची चूक न सांगणे, हेही चुकीचेच आहे.

शेवटी परदेशी न गेलेल्या IIT विद्यार्थ्यांबद्दल. डॉ. वसंत गोवारीकरांनी काही वर्षांपूर्वीपासून आजवरचा सर्वांत भरवशाचा हवामानाचे, मॉन्सूनचे भाकित वर्तवणारा कार्यक्रम घडवलेला आहे. आणि तो वापरून मॉन्सूनचा अंदाज घेतला जात असतो. या कार्यक्रमाचे पहिले दूरदर्शन-प्रक्षेपण डॉ. गोवारीकरांनी ‘‘IIT विद्यार्थी—जे मागे राहिले (Those who stayed back)” यांना अर्पण केले होते. याबाबतचे समाधान हरगोविंदखुरानांच्या ‘नोबेल’ पेक्षा कमी
कसे?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.