ज्ञान म्हणजे वस्तुस्थितीविषयी यथार्थ माहिती, ‘ज्ञान’ या शब्दाचा हा एकमेव अर्थ नाही. कारण संज्ञा किंवा जाणीव या अर्थानेही या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थी कोणतीही जाणीव ज्ञानच आहे. त्यामुळे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, यथार्थ आणि अयथार्थ, किंवा सत्य आणि मिथ्या ज्ञान असेही म्हणतात. पण या लेखात ‘ज्ञान’ हा शब्द सत्यज्ञान या अर्थानेच वापरला आहे.
ज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत. त्यांना प्रमाणे म्हणतात. उदा. ज्ञानेंद्रिये ही एक प्रकारची प्रमाणेच आहेत, कारण त्यांनी आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या संवेद्य गुणांचे ज्ञान होते. ज्ञानेंद्रियांनी आपण कधी फसविले जात नाही असे नाही. प्रकाश अपुरा असला, किंवा वस्तू दूर किंवा सूक्ष्म असली तर तिचे ज्ञान स्वच्छ आणि स्पष्ट होत नाही. कानांनी अनेकदा एखादा शब्द जसाच्या तसा ऐकू येत नाही, वेगळाच शब्द कानांवर पडला असे वाटते. असेच इतर इंद्रियांचेही होते. पण अशी फसगत शक्य असली तरी तिच्यावर उपाय फिरून डोळा, कान इत्यादि इंद्रियांचा उपयोग अधिक काळजीने करणे एवढेच आपण करू शकतो. कित्येकदा इंद्रियांनी मिळालेले ज्ञान दुरुस्त करून घ्यावे लागते. उदा. पाण्यात अर्धवट बुडालेली सरळ काठी पाण्याच्या पृष्ठभागाखाली वाकलेली दिसते, पण स्पर्शाला तसे जाणवत नाही. एका इंद्रियाला अन्य इंद्रियांचे साह्य घेऊन ऐंद्रिय ज्ञान परिष्कृत करून घ्यावे लागते. पण महत्त्वाची गोष्ट ही की इंद्रियांची जागा घेऊ शकेल असे दुसरे साधन नाही. आंधळ्याला रंगाच्या ज्ञानावाचून जन्मभर वंचित राहावे लागते.
दुसरे ज्ञानसाधन किंवा प्रमाण म्हणजे बुद्धि किंवा तर्क, व्याघात म्हणजे एकच गोष्ट खरी आहे आणि त्याच वेळी खोटीही आहे हे शक्य नाही हे आपल्याला बुद्धीने कळते. म्हणजे जर एक विधान खरे असेल तर त्याचे व्याघाती विधान खरे असू शकत नाही, तसेच एक विधान खरे असेल तर इतर अनेक विधानेही खरीच असू शकतात हेही आपल्याला बुद्धीने किंवा तकने कळते. उदा. सर्व माणसे मर्त्य आहेत हे विधान जर खरे असेल तर एखादा मनुष्य, उदा, अश्वत्थामा, अमर असेल हे संभवत नाही, आणि जर कोणी मनुष्य असेल तर तो मर्त्य असला पाहिजे हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नसते.
इंद्रियांनी मिळणार्याा ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान (किंवा नुसतेच प्रत्यक्ष) म्हणतात. प्रत्यक्ष आणि तर्क किंवा अनुमान यांच्या साह्याने आपल्याला जगाचे पुष्कळ ज्ञान होते. विज्ञानाची विराट इमारत त्याच दोन प्रमाणांच्या साह्याने उभारली गेली आहे.
प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्याखेरीज तिसरे एखादे प्रमाण आहे काय?असेल असे वाटत नाही. पण एक साधन आहे असे काही तत्त्वज्ञ मानतात. ते म्हणजे शब्दप्रमाण किंवा आप्तवचन. एकदोन दर्शने सोडून दिली तर अन्य सर्व भारतीय दर्शने आप्तवचन किंवा शब्दप्रमाण प्रमाण म्हणून मान्य करतात. ती म्हणतात की वेदांचा शब्द सत्य असतो, असत्य असू शकत नाही. पश्चिमेत सुद्धा बायबलचा शब्द चुकीचा किंवा असत्य असू शकत नाही असे बर्याआच प्रमाणात अजूनही मानतात. या मताचे प्रतिपादन असे आहे की काही शब्द (म्हणजे वाक्ये) निःसंदेह सत्य असतात, असत्य असू शकत नाहीत. ही वाक्ये कोणती?तर आप्ताने उच्चारलेली. आप्त म्हणजे यथार्थवक्ता, अशी त्याची व्याख्या केली जाते. पण मुळात, ज्ञान असेल तर त्याचा उच्चार तो करील. ते त्याला कोणत्या मार्गानी मिळते?ते जर प्रत्यक्ष आणि अनुमान या साधनांनी त्याला मिळाले असेल, आणि नंतर ते शब्दाने त्याला तो अन्य लोकांना पुरवीत असेल, तर शब्दप्रमाण प्रमाण राहिले नाही. पण प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्याहून भिन्न मार्गाने ते होत असेल, तर तो मार्ग कोणता असा प्रश्न निर्माण होतो.
या ठिकाणी शब्दप्रमाणाने मिळणारे ज्ञान आणि प्रत्यक्ष व अनुमान या लौकिक प्रमाणांनी मिळणारे ज्ञान यांत एक महत्त्वाचा भेद केला जातो. शब्दप्रमाणाने जे ज्ञान मिळते ते प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या क्षेत्राबाहेर असते, आणि जे ज्ञान प्रत्यक्ष व अनुमान यांनी होते ते शब्दप्रमाणाने होऊ शकत नाही. त्यांची क्षेत्रेच वेगळी आहेत. शब्दाचे किंवा आप्तवचनाचे क्षेत्र म्हणजे परलोक, मरणोत्तर अस्तित्व, पुनर्जन्म, ईश्वर, स्वर्ग, नरक, मोक्ष इत्यादि लौकिक प्रमाणांच्या आटोक्यात नसलेल्या विषयांचे. लौकिक विषयांवर जर आप्तवचन बोलू लागले त्याच्या वचनांची शहानिशा करता येईल, आणि प्रसंगी ते चुकीचे आहे असे सिद्ध होऊ शकेल ही भीति असणार. परलोकाविषयी बोलताना ते खोटे पडण्याची भीति नसते, कारण परलोकाविषयी लौकिक प्रमाणे काहीच सांगू शकत नाहीत.
तेव्हा आप्तवचन प्रत्यक्ष आणि अनुमान या प्रमाणांनी खोटे ठरू शकेल ही भीति नसल्यामुळे ते पूर्ण सुरक्षित असते हे त्याचे मोठे बळ आहे. पण ते त्याचे एक मोठे दौर्बल्यही आहे. ते खरे आहे की खोटे हे आपल्याला कदापि कळू शकत नाही. पण या परिस्थितीत असे म्हणणे स्वाभाविक आहे की जे आप्तवचन खरे आहे की खोटे हे आपल्याला कळू शकत नसेल त्यावर विश्वास ठेवणे कितपत शहाणपणाचे आहे?
याला उत्तर म्हणून शब्दप्रमाणाला साक्षात्काराची जोड दिली जाते. साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष दर्शन. डोळ्यांनी आपल्याला रंग दिसतात किंवा कानांनी आवाज ऐकू येतात हेही साक्षात्कारच होत, कारण रंग प्रत्यक्ष दिसतात आणि आवाज प्रत्यक्ष ऐकू येतात. हे साक्षात्कार अर्थात् लौकिक साक्षात्कार झाले. पण त्याच प्रकारचे अलौकिक साक्षात्कारही आहेत असे साक्षात्कारवाद्यांचे म्हणणे आहे. या अलौकिक साक्षात्कारानेलौकिक जगाहून अगदी वेगळ्या अशा परम सताचा परिचय होतो. आणि शब्दप्रमाणाची शहानिशा करण्याचे एक साधन उपलब्ध होते असे म्हणतात. ते साधन म्हणजे साक्षात्काराची साधना. प्राणायाम, योगासने इत्यादींच्या साह्याने साधना करून ते ज्ञान कोणालाही प्राप्त करून घेता येते असे साक्षात्कारवादी म्हणतात. साक्षात्काराची साधना दीर्घ असते, आणि तिच्या शेवटी आपल्याला परम सताचा अनुभव येतो. ते दिव्य दर्शन असते. आणि त्यात मानवाचे पूर्ण समाधान होते. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून त्यांचे सर्व संशय फिटतात अशी ती अवस्था असते. साक्षात्कारवाद्यांना जर आपण विचारले की तुमचे म्हणणे खरे कशावरून? तर ते उत्तर देतील, ‘तुम्हीही साधना करून पाहा. तुम्ही जर ती पुरी केलीत तर तुम्हालाही साक्षात्कार होईल. मग शब्दाने मिळणारे जे ज्ञानआहे ते सर्व खरे आहे अशी तुमची खात्री पटेल.
हे म्हणणे प्रथम दर्शनी सयुक्तिक दिसते. त्यानुसार आवश्यक ती साधना केल्यावर साक्षात्कार होतो, आणि त्यांना सर्व संशयांची उत्तरे मिळून कसलाही प्रश्न शिल्लक राहात नाही असे जे म्हणतात ते खरे असू शकेल. पण ते खरे आहे असे म्हणता येण्याकरिता सर्व साक्षात्कार एकाच आशयाचे असावे लागतील. जर मला एक प्रकारचा साक्षात्कार झाला, आणि तुम्हाला वेगळाच साक्षात्कार झाला तर कोणाचे म्हणणे खरे मानायचे असा प्रश्न उद्भवेल, आणि त्याला उत्तर देणे अशक्य होईल.
परंतु साक्षात्कारात एकवाक्यता आढळत नाही ही वस्तुस्थिती आहे. अद्वैत वेदान्त तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवणाच्याला एक प्रकारचा साक्षात्कार होतो, तर विशिष्टाद्वैती मनुष्याला वेगळ्याच आशयाचा साक्षात्कार होतो. रामभक्त आणि कृष्णभक्त यांना रामाचा आणि कृष्णाचा साक्षात्कार होतो, तर खिस्त्याला येशू आणि मेरी यांचा होतो. म्हणजे ज्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी साधकाला असते त्यानुसार साक्षात्काराचा आशय तयार होतो. याला साक्षात्कारांची एकवाक्यता म्हणता येणार नाही. उलट त्याच्यावरून असे दिसून येते की काही तीव्र भावनांच्या व्यक्तींना आपला पूर्वेतिहास आणि परिस्थिती यांनी तयार झालेल्या अतींद्रिय गोष्टींचा साक्षात्कार होतो.
यातून उद्भवणारा दुसरा मुद्दा असा की साक्षात्कार किंवा समाधि हा अनुभव-प्रकार घडून येतो हे नाकारता येत नाही. पण त्या अनुभवाचे विश्लेषण करून त्याचे स्वरूप काय आहे ते निश्चित केले पाहिजे. हा अनुभव ज्ञानदायी (cognitive) अनुभव आहे काय हे निश्चित करणे अवश्य आहे. सर्वच अनुभव ज्ञानदायी नसतात. इंद्रियांनी येणारे अनुभव ज्ञानदायी असतात असे आपण समजतो, पण पोटदुखी किंवा डोकेदुखीचा अनुभव वेगळा असतो. किंवा आपल्याला परीक्षेत पास झाल्याचा आनंद झाला, किंवा ती गमावल्याने आपण दु:खी झालो, तर हे अनुभव ज्ञानात्मक नाहीत असे आपण म्हणतो. कारण त्यांनी आपल्याला वस्तुस्थितीचे ज्ञान होत नाही. म्हणजे अनुभव आणि त्याचा ज्ञानात्मक आशयअसा भेद करावा लागतो. असा भेद केल्यावर असे लक्षात येते की ज्ञानात्मक अनुभव खरा किंवा खोटा असू शकतो. जागेपणी आपल्याला जो अनुभव येतो, तसाच झोपेत असताना स्वप्नातही येऊ शकतो; पण त्यांपैकी जागेपणीचा अनुभव खरा, आणि स्वप्नातील अनुभव भ्रामक असे आपण समजतो. म्हणजे प्रत्येक ज्ञानात्मक अनुभव खरा किंवा खोटा, यथार्थ किंवा अयथार्थ असतो. अनुभव आणि त्यापासून मिळणारे ज्ञान हा भेद जर साक्षात्काराला लावला तर साक्षात्काराचा अनुभव आणि त्याचा विषय यांत भेद करता येईल. पण तो केल्यावर पुढील प्रश्न उद्भवेल : ‘साक्षात्कारात किंवा समाधीत आपल्याला वास्तवाच्या सामान्यपणे अज्ञात असलेल्या अंगाचा अनुभव येतो असे साक्षात्कारवादी म्हणतात. पण तो अनुभव जसा खरा असू शकेल तसाच तो भ्रामकही असू शकेल. तसे असेल तर साक्षात्कार भ्रामक आहेत असे म्हणावे लागेल. आणि भिन्न साक्षात्काराच्या विषयात आढळणाच्या तफावतीमुळे तो ज्ञानात्मक नसावा, निदान तो खरा नसावा, अशी शंका येणे रास्त आहे.
हा अनुभव ज्ञानात्मक नसावा असे मानण्याचे आणखी एक कारण म्हणजे असे अनुभव धार्मिक साक्षात्कारातच येतात असे नसून, अन्य क्षेत्रांत सुद्धा ते येतात, आणि तिथे ते ज्ञानदायी नसतात हे स्पष्ट असते. उदा. laughing gas मुळे अशा प्रकारची भावनात्मक स्थिती निर्माण होते असे विख्यात मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ विल्यम जेम्सने म्हटले आहे.
या सर्व कारणास्तव साक्षात्कार हा अनुभव ज्ञानात्मक अनुभव आहे ही कल्पना त्याज्य मानली पाहिजे.
श्रद्धा हे प्रमाण आहे काय?
माझ्या मित्राची एक मुलगी मला म्हणाली की संतोषी मातेवर माझी श्रद्धा आहे. या श्रद्धेचे समर्थन काय आहे या प्रश्नाला उत्तर देण्याची जरूर नाही असे तिचे मत होते. श्रद्धा आहे एवढे म्हणणे तिच्या समर्थनार्थ पुरे आहे अशी तिची समजूत होती. आणि तिचेच नाही तर अनेक विद्वान लोकांचेही असेच म्हणणे असावे असे दिसते. त्यांच्यापैकी तर काही स्पष्टच म्हणतात की श्रद्धा हे ज्ञानसाधन आहे, प्रमाण आहे. जसे इंद्रियांनी रंग, आवाज, इत्यादींचे ज्ञान होते, किंवा जसे एक विधान खरे असेल तर अनेक दुसरी विधाने खोटी असू शकत नाहीत हे ज्ञान तर्काने होते, तसेच श्रद्धेने इंद्रिये आणि अनुमान यांना आध्यात्मिक विषयांचे ज्ञान होते असे ते म्हणतात. म्हणूनच गुरूवर श्रद्धा ठेवा, वेदांवर श्रद्धा ठेवा असा आग्रह धर्मात केला जातो.
एखाद्या विधानावर विश्वास ठेवणे आणि ते खरे आहे असे मानणे एकच आहे. एखादे विधान खौटे आहे असे जर आपल्याला पटले असेल, तर त्याच्यावर विश्वास ठेवणे अशक्य असते. अमुक विधानावर माझा विश्वास आहे, पण ते खोटे आहे असे मला माहीत आहेअसे म्हणणे वदतोव्याघाताचे उदाहरण आहे. परंतु एखादे विधान आपल्याला खरे वाटते किंवा आपला त्यावर विश्वास आहे, म्हणून ते खरे असेलच असे नाही. विश्वास कितीही पक्का असला तरी त्याने ज्या विधानावर विश्वास आहे ते विधान खरे होत नाही. विश्वास पक्का किंवा डळमळीत असणे हा मनाचा गुण आहे; परंतु विश्वास खरा आहे की खोटा ते वस्तुस्थितीने ठरते. उदा. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे आपल्याला प्रत्यक्ष दिसते, आणि हजारो वर्षे मनुष्याचा विश्वास होता की ते खरे आहे. तो खोटा मानल्याबद्दल गॅलिलिओला तुरुंगात जावे लागले, आणि तिथेच त्याचा अंत झाला. पण पुढे विज्ञानाची प्रगती झाल्यानंतर तो विश्वास खोटा आहे हे सिद्ध झाले, आणि खुद्द चर्चलाही ते कबूल करावे लागले. तेव्हा विश्वास असणे किंवा तो पक्का असणे वेगळे, आणि तो खरा असणेवेगळे.
म्हणजे श्रद्धा (म्हणजे अर्थात् विश्वास) कितीही निःशंक असली तरी ती खरी आहे की नाही हा प्रश्न शिल्लकच राहतो, आणि त्याचे उत्तर ती भ्रामक आहे असे असू शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. भ्रामक श्रद्धेची उदाहरणे आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाची आहेत. आपण समजतो की अमुक महाराज ईश्वराचा अवतार आहेत आणि त्याचे बोल कधी खोटे ठरत नाहीत; परंतु केव्हा तरी महाराजांची लबाडी उघडी पडते. पण अशा वेळी देखील श्रद्धावान म्हणतो की हा मनुष्य लुच्चा होता. आमचे महाराज असे नाहीत. आणि अशा रीतीने हा व्यवहार चालू राहतो.
विश्वास किंवा श्रद्धा खरा नसेल तर ती ठेवणे चूक आहे हे उघड आहे; आणि ते चूक एवढेच नव्हे तर हानिकारकही असू शकेल. चुकीच्या विश्वासांचे विश्वासघात सर्वांच्या परिचयाचे आहेत. पण एखादी श्रद्धा चुकीची आहे हे आपल्याला कसे कळू शकेल?या प्रश्नाचे उत्तर बरेच गुंतागुंतीचे आहे. पण इतके निश्चित की विश्वास चुकू शकतो, आणि म्हणून श्रद्धा ज्ञानसाधन आहे हे असत्य आहे हे उघड आहे. लौकिक जीवनात कोणी जर एखादे विधान खरे असल्याचा दावा केला तर आपण स्वाभाविकच विचारतो की ‘कशावरून?’ आणि त्याने जर उत्तर दिले की ‘माझी तशी श्रद्धा आहे म्हणून, तर आपण ते वेडेपणाचे समजू. आणि तीच गोष्ट परलोकाविषयीच्या श्रद्धेचीही आहे. ती कधी चुकत नाही हे कदापि न पटणारे आहे.
म्हणून श्रद्धेलाही ती खरी आहे हे सिद्ध करावे लागेल. अशा स्थितीत श्रद्धा ज्ञानसाधन आहे, किंवा प्रमाण आहे. ते अमोघ ज्ञानसाधन आहे, हे म्हणणे वेडेपणाचेआहे हे सांगणे नकोच.