१. अग्नी ते अणुशक्ती : मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक प्रवासाच्यापाऊलखुणा
(स.मा. गर्गे : समाज, विज्ञान आणि संस्कृती, समाजविज्ञान मंडळ, पुणे; जानेवारी १९९७, पृष्ठे : ११५, किंमत : रु. ८०)
इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र वगैरे विषयांवरील विपुल लेखनामुळे आणि विशेषतः भारतीय समाजविज्ञान कोश या सहा खंडात्मक संदर्भसाहित्याच्या संपादनामुळे स.मा. गर्गे हे नाव मराठी वाचकांना ठाऊक आहे. त्यांनी आपल्या या छोटेखानी पुस्तकात मुख्यत्वे पाश्चात्त्य देशांतील घडामोडींच्या आधारावर मानवी समाजाची जडणघडण व सांस्कृतिक वाटचाल यांचा मागोवा घेतला आहे. पाश्चात्त्य देशांत जे घडले त्याचा प्रभाव जगात सर्वत्र झाला असून आज जग इतके जवळ आले आहे की पौर्वात्य-पाश्चात्त्य अशी तफावत संपलीच आहे अशी लेखकाची भूमिका आहे. प्राथमिक गरजांची परिपूर्तता करण्याच्या अधिकाधिक श्रेयस्कर मार्गाच्या अव्याहत शोधाच्या कामात मानवाने आपल्या प्रज्ञा, प्रतिभा व परिश्रम यांच्या बळावर जे यश संपादन केले त्याचा अद्ययावत आलेख सादर करून आजच्या मानवी समाजापुढील आव्हानांचे स्वरूप लेखकाने वाचकांसमोर ठेवले आहे.
वन्यजीवन, कृषिजीवन आणि औद्योगिक क्रांत्युत्तर आधुनिक जीवन या तिन्ही अवस्थांमधील प्रेरणा, प्रवृत्ती व पद्धती यांची तोंडओळख या पुस्तकातून होते. त्यापैकी प्रत्येक अवस्थेची सामाजिक आर्थिक गुणवैशिष्ट्ये जशी लेखकाने सांगितली आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्याचे आधीच्याशी तौलनिक स्वरूपाचे वर्णनही त्याने केले आहे. तांत्रिक प्रगती, ज्ञानात्मक विकास आणि प्रत्यक्ष प्रयोगांतून सुधारणा यांमधून माणसांच्या जगण्याचा गुणात्मक पोत कसा बदलला, त्यांचे सामाजिक-आर्थिक व्यवहार कसकसे अधिकाधिक गुंतागुंतीचे व बहुआयामी होत गेले आणि त्याच्या सामाजिक व राजकीय संस्थांचा कसकसा विकास झाला याचे संक्षिप्त विवरण लेखकाने केले आहे. त्याचबरोबर माणसांच्या धार्मिक जीवनाच्या प्रेरणा, विधिसंरचना व संस्था, धार्मिक संस्था व राजकीय सत्ता यांच्यातील ताणतणाव, वैज्ञानिक शोध आणि व्यापारविनिमयाचा विस्तार या घटितांचे एकूण मानवी जीवनशैलीवर झालेले परिणाम इत्यादी विषयांनाही येथे स्पर्श करण्यात आला आहे.
औद्योगिक क्रांतीतून निर्माण झालेले विविध शक्तिप्रवाह आणि त्यांचे सर्वांगीणपरिणाम, प्रबोधनकाळ आणि धर्मसुधारणा चळवळ, धार्मिक सत्तेपासून राजकीय सत्तेचे अलगीकरण, प्रातिनिधिक लोकशाहीसोबतच झालेला साम्राज्यशाही प्रवृत्तींचा विकास या घडामोडींनी पुस्तकाची बरीच पाने व्यापली आहेत. आधुनिक मानवी जीवनाच्या संस्थात्मक बाजूसोबतच सामाजिक-राजकीय विचारांची मीमांसाही लेखकाने केली आहे. उदारमतवाद, परंपरावाद व क्रांतिवाद यांची मांडणी करून विसाव्या शतकातील गांधी व माक्र्स यांचे चिंतन, तसेच कम्युनिझमची सर्वाधिकारशाही, फॅसिझमला अभिप्रेत असलेली अतिरेकी एकतंत्री राज्यसत्ता, नाझी तत्त्वज्ञानात अनुस्यूत असलेली आक्रमक व वंशविद्वेषी जुलूमशाही यांचाही परिचय येथे वाचकास घडतो.
आजच्या समाजासमोरील समस्यांचे स्वरूप कसे अंतर्विरोधी आहे हे सांगताना लेखक एकीकडे आढळणारे अमाप वैफल्य आणि दुसर्याक बाजूने कमी न होणारी वंचितता व असमाधान, वैज्ञानिक संशोधन आणि विज्ञान वेठीला धरण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा, स्वातंत्र्याच्या ऊर्मी आणि स्वातंत्र्याचा संकोच करणाच्या विविध शक्तींचे प्राबल्य अशी अनेक उदाहरणे लेखकाने नमूद केली आहेत.“बुद्धिप्रामाण्याला महत्त्व देणारे मागचे शतक आणि मानसिक द्विधावस्था झालेला अलीकडचा काळ याची सुसंगती लागत नाही. स्वातंत्र्याच्या विचाराला प्राधान्य देणारे मागचे शतक आणि निरनिराळ्या हुकूमशाही प्रवृत्तींना शरण जाण्याची या शतकातील परिस्थिती असे विचित्र चित्र दिसू लागते (पृ. ९५)” अशा शब्दांत आपली संभ्रमावस्था लेखकाने नमूद केली आहे. पण त्याचबरोबर विज्ञानसंस्कृतीशी एकनिष्ठ राहूनच आणि तिच्यातील त्रुटी -उणिवा दूर करूनच माणसालाया कोंडीतून सुटता येईल असा विश्वासही लेखकाने व्यक्त केला आहे.
या छोट्याशा पुस्तकातील प्रतिपादनाने व्यापलेला कालपट हजारो वर्षांचा आहे, तरीही पुरेशा साक्षेपाने लेखकाने विषयाला न्याय दिला आहे. पुस्तकाची भाषा सोपीसुलभ तरीही प्रतिपाद्य विषयाचा काटेकोरपणा नेमकेपणा पेलणारी अशी आहे. मुद्रण व निर्मिती नेटकी आहे. पण पुस्तकाच्या आकाराच्या मानाने मुद्रणदोषांची संख्या जरा जास्तीची आहे. आणि तो भूमीच्या वास्तव्यात स्थिर होऊ लागला (पृ. ३६)” अशा प्रकारची वाक्यरचना किंवा “लोकसंख्येची गणिती श्रेणीने होणारी वाढ आणि अन्नधान्याची भूमितिश्रेणीने होणारी वाढ यातील प्रचंड तफावत वाढत जाईल’ या विधानातील तथ्यात्मक गफलत गर्गे यांच्यासारख्या कसलेल्या लेखकाच्या पुस्तकातआढळायला नको होती.
२. समाज-संस्कृती-साहित्य-संबंधाचे अतिस्थूल परिशीलन
(मोतीराम कटारे : दलित कवितेतील हिंदुत्व, सुगावा प्रकाशन, पुणे: मे १९९७. पृष्ठे : ७२, किंमत : रु. ३०)
‘दलित कवितेतील हिंदुत्व’ हे मोतीराम कटारे यांच्या नव्या पुस्तकाचे नाव ‘ आकर्षक असून विचारात टाकणारे आहे. विशेषत: दलित चळवळीचे अग्रणी एकमेकांवर ‘समरसतावादी’ व ‘हिंदु-परंपराभिमानी’ असल्याचे आरोप-प्रत्यारोप वारंवार करत असल्यामुळे हे पुस्तक पाहताच त्यात नेमके काय असावे असे कुतूहल वाचकाच्या मनात निर्माण झाल्यावाचून रहात नाही. आणि ते संपूर्ण वाचल्यानंतर एका गोष्टीची गंमत वाटते की एकमेकांवर ‘भगवेपणाचा आरोप करणार्याा आंबेडकरी वाङ्मयीन परंपरेच्या जवळपास सर्वत्र प्रवाहांतील कवींना मोतीराम कटारे यांनी एकाच दावणीला बांधून त्यांच्यावर हिंदुत्वप्रणीत स्थितिवादी, वर्णवादी, पुराणमतवादी, अंधश्रद्धधर्माधिष्ठित व आंबेडकर विचारद्रोही मानसिकता टिकवून ठेवल्याचे आरोपपत्र त्यांच्या कवितांतील शब्द, कल्पना, संकल्पना, प्रतीके, प्रतिमा, मिथके व गृहीतके यांच्या आधारे ठेवले आहे. या आरोपांच्या पुष्ट्यर्थ लेखकाने अनेकानेक प्रभावी युक्तिवादही केलेले आहेत.
नामदेव ढसाळ, केशव मेश्राम, त्र्यम्बक सपकाळे, यशवंत मनोहर, हिरा बनसोडे, शिवा इंगोले, शरणकुमार लिंबाळे, ज्योती लांजेवार, वामन निंबाळकर, प्रज्ञा लोखंडे, ज.वि. पवार, अरुण कांबळे अशा अनेक नव्याजुन्या दलित कवींच्या कवितांमधील उद्धरणे देऊन त्यात स्वर्ग-नरक, पापपुण्य, प्रारब्ध, दैव, देव-दानव, दैववाद, कर्म, ब्रह्मांड, शकुन, संजीवनी, हडळ, श्राद्ध, पुनर्जन्म, अवतार वगैरे ‘हिंदू’ कल्पना, संकल्पना, मिथके, प्रतिमा व प्रतीके कशी वारंवार येतात हे कटारे यांनी परिश्रमपूर्वक दाखवले आहे. एकलव्य, कर्ण, शंबूक, द्रौपदी, अश्वत्थामा ही पौराणिक पात्रे तसेच पावित्र्य अमृत, पूजा, आरती वगैरे समजुती व कर्मकांडे त्यांच्या मते आंबेडकरी जाणिवेला छेद देणारी आणि म्हणून त्या जाणिवेतून लेखन करत असल्याचा दावा करणा-यांसाठी वर्ण्य ठरतात. डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्याक्षणी पूर्वास्पृश्य समाजाने आपले हिंदुत्व, आपली जात, आपले पूर्वसंस्कार, गुलामीची मानसिकता व हिंदू संस्कृती या सर्व गोष्टींना जाहीर सोडचिट्ठी दिली असताना दलित कवींच्या रचनांमधून त्र जातिमुक्त माणसाचे भावविश्व प्रगट होण्याऐवजी अजूनही जातिवशिष्ट जीवनानुभवच मांडले जातात अशी खंत लेखकाने व्यक्त केली आहे.
बौद्ध धम्माच्या स्वरूपात जो नवा विचार, नवी संस्कृती, पर्यायी प्रतिमासृष्टी, मिथके व प्रतीके, साहित्य समीक्षेचे नवे निकष पूर्वीच्या दलित समाजाला उपलब्ध झालेआहेत त्याचे प्रत्यंतर दलितांच्या लेखनातून कोठेच आढळत नाही; त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, समाजरचनेविषयीच्या धारणा, भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळ याबद्दलचे परिप्रेक्ष्य यात कोणताही गुणात्मक फरक पडलेला नसावा याचेही लेखकास आश्चर्य वाटते. दलित साहित्याची समाजशास्त्रीय समीक्षा व्हावी, केवळ आस्वादक समीक्षा त्या साहित्यातील त्रुटी-विकृतींकडे नुसताच कानाडोळा करते असे नाही तर ती त्यांचेप्रत्यक्षाप्रत्यक्षपणे समर्थन करून त्यांना प्रोत्साहन देते असे लेखकास वाटते. प्रतिगामीजाणिवांच्या आक्रमणापासून आंबेडकरी जाणिवेच्या चारित्र्याचा बचाव करण्याची निकड त्याला प्रकर्षाने जाणवते. त्याच्या मते, बौद्ध आदर्शाबरहुकूम समाजरचना निर्माण करण्यास हातभार लावणे, त्यासाठी बौद्धांची गुणात्मक वाढ आणि वैचारिक समृद्धी वाढेल असा प्रयत्न करणे, जाणीवपूर्वक पूर्वसंस्कार पुसणे ही दलित लेखकांची कर्तव्ये व दायित्व आहे.
मोतीराम कटारे यांचे आरोप निराधार आहेत किंवा त्यांच्या अपेक्षा अनाठायी आहेत असे म्हणता येणार नाही. खुद्द डॉ. आंबेडकरांनीही साहित्याला वैचारिक क्रांतीचे एक प्रमुख साधन मानले होते. साहित्यातून जुन्या विचारांची छाप पुसणे व नव्या विचारांचे संस्कार करणे असे दुहेरी कार्य घडावे, कारण आधी विचारांत परिवर्तन झाल्याखेरीज आचारात परिवर्तन होणे दुरापास्त असते अशा आशयाचे प्रतिपादन बाबासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या एका नाटकासंबंधी ‘जनता’ पत्रात प्रतिक्रिया देताना केले होते.
तरीही काही प्रश्न या संदर्भात विचारात घ्यावेच लागतील. समाजात संस्कृती कशी रुजते, कशी टिकते आणि कशी बदलते? साहित्य आणि समाज यांच्यातील आंतरसंबंध कसा असतो? समाजातील भाषिक व्यवहाराचे स्वरूप कसे असते?आणि पर्यायी सामाजिक-सांस्कृतिक जडणघडण कोणत्या प्रक्रियेद्वारे केली जाऊ शकते?असे चार प्रश्न मुख्यत्वे उभे करता येतील. दलित साहित्याच्या संदर्भात हे प्रश्न उपस्थित करून चिंतनाला चालना दिल्याचे श्रेय कटारे यांना निश्चितच द्यावे लागेल.
हिंदू संस्कृतीची संदर्भचौकट सोडून बौद्ध संस्कृतीची संदर्भचौकट दलित कवींनी स्वीकारावी ही कटान्यांची अपेक्षा रास्त असली तरी ती कशी पूर्ण होऊ शकेल?या प्रश्नाचे उत्तर संस्कृतीचा आशय आणि सांस्कृतिक स्थित्यंतराची प्रक्रिया समजावून घेऊन शोधता येईल. एडवर्ड टेलर या मानववंशशास्त्रज्ञाने संस्कृतीची व्याख्या करताना म्हटले आहे की “ज्ञान, श्रद्धा, कला, नीतिनियम, कायदे, रूढी आणि समाजाचा घटक या नात्याने माणसाने संपादित केलेल्या अन्य सर्व क्षमता व सवयी यांचा संच म्हणजे संस्कृती होय.” याचा अर्थ संस्कृती या संज्ञेखाली अंतर्भूत होणार्या् भौतिक आणि अभौतिक गोष्टींचा पसारा अक्षरश: अमर्याद आहे. तिचा व्यक्त भाग हा अव्यक्त भागाच्या तुलनेत खूपच लहान असतो. संस्कृतीचे मानसिक वास्तव्य अत्यंत विस्तृत, क्लिष्ट व चिवट असते. संस्कृती बदलते, कालक्रमाने आपोआप बदलते, तशीच जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांनीही बदलते. पण सांस्कृतिक वास्तवाची विराटता व व्यामिश्रता बघता ती एका झटक्यात बदलणे केवळ अशक्य असते. त्याज्य भाग टाकून नव्याचा स्वीकार करण्याच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेद्वारेच सांस्कृतिक बदल घडतो. त्यामुळेच अडीच हजार वर्षापूर्वीच्या प्रतिक्रांतीने या देशातून हद्दपार झालेल्या क्रांतिकारक बौद्ध विचाराचीसांस्कृतिक संदर्भचौकट धर्मातराच्या निर्णयासरशी अमलात येणे अशक्य आहे आणि?तशी अपेक्षाही भोळसटपणाची आहे.
त्याचप्रमाणे साहित्य आणि समाज यांच्यातील संबंधही एकमार्गी असूच शकत नाही. साहित्य ही समाजजीवनाला वळण लावणारी शक्ती असते, तद्वतच ती सामाजिक जीवनव्यवहाराची निष्पत्तीही असते. साहित्य हे निर्धारक असते, तितकेच निर्धारितही असते. साहित्य हे सामाजिक कारणाचे कार्य असते, तसेच सामाजिक परिणामांचे कारणही असते. असा हा दुहेरी व द्वंद्वात्मक आंतरसंबंध असतो. त्यामुळेच साहित्य हे जसे सामाजिक अंतःसत्त्वाच्या (इथॉस) निर्मितीचे काम करू शकते, त्याचप्रमाणे ते सामाजिक अंतःसत्त्वाचे निदर्शकही असते. त्यामुळे साहित्याद्वारे होणारी वैचारिक क्रांती खरे पाहता साहित्य-समाज-आंतरक्रियेची फलनिष्पत्ती असते. मानवी जीवनाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक वगैरे वास्तवांतील तपशील पूर्ववत असताना साहित्यातील प्रतिमा, प्रतीके, कल्पना, संकल्पना वगैरेंना मात्र कटाक्षपूर्वक बदलून या संदर्भात काहीच साधणार नाही हे उघडच आहे. संवेदनशील लेखक समाजातील स्थितिगतीचे भारमापन करतो, समकालाची स्पंदने टिपून त्यांना कलात्मक प्रतिसाद देत असतो. साद-प्रतिसाद-नवे साद असे निर्मितीचे चक्र त्यातून निर्माण होते. जाणीवपूर्वक काही अंशी नवे पेरण्याची प्रेरणा साहित्यनिर्मितीमागे असली तरी बवंशी सर्जनाची प्रक्रिया नेणिवेतूनच घडते. ही नेणीव समाजजीवनाच्या प्रत्यक्षानुभवातून साकार व सक्रिय होत असते. कवितेबद्दल तर हे अधिकच खरे आहे. मोतीराम कटारे म्हणतात ती दक्षता, दायित्व आणि निवड कवी करायला लागले तर कदाचित त्यांची कविता हिंदुत्वमुक्त होईल पण ती कविता उरेल काय?तिचे स्वरूप स्वाभाविक आविष्काराचे असेल काय?ती कलात्मक निकषांवर टिकेल काय?या प्रश्नांची उत्तरे नक्कीच नकारात्मक मिळतील, आणि ते प्रश्न आपल्याला डावलताच येणार नाहीत.
प्रस्थापित मराठी भाषा वर्णव्यवस्था व पुराणव्यवस्था प्रतिबिंबित करणारी आहे, दलित लेखकांना आपला नवा आशय व्यक्त करण्यासाठी नवी भाषा घडवावी लागेल असा एक मुद्दा बाबुराव बागूल यांचा हवाला देऊन कटारे यांनी मांडला आहे. अर्थात हा मुद्दा मांडतानाच, “या साहित्याचा भाषिक व्यवहार स्वतंत्र असू शकतो काय?’ असा प्रश्न वाचकाला पडेल अशी शंका लेखकाने स्वतःच नोंदवून ठेवली असून ती खरीच आहे. भाषा हा संस्कृतीचा अन्वर्थक घटक, संवादमाध्यम व आविष्कार असतो. लिखित-मुद्रित अभिव्यक्ती हा एकूण भाषिक व्यवहाराचा अगदीच मर्यादित, आनुषंगिक व दुय्यम भाग असतो. विशेषत: आपल्यासारख्या बवंशी निरक्षर असलेल्या समाजाबाबत तर हे अधिकच खरे असते. व्यापक समाजातील संवाद, सहकार्य व आंतरक्रिया यांचा कितीतरी विस्तृत पट भाषिक व्यवहाराने व्यापलेला असतो. प्रत्येक व्यक्ती भाषेच्या विश्वात जन्मघेते, भाषिक सवयींमधून जगाकडे पाहते आणि भाषेद्वारेच संस्कृतिविषयक अभिवृत्तीही आत्मसात करते. भाषेद्वारेच विचार करते, विचारांची देवाणघेवाण करते आणि ज्ञान व संस्कृती यांचे जतनसंवर्धन करते. अर्थात हे खरे आहे की भाषा हे काही स्थिर व अपरिवर्तनीय वास्तव नसते. भाषा बदलते, पण संपूर्ण सामाजिक व्यवहारांतील बदलांसोबत बदलते. काही लेखक-कवींनी ठरवून “स्वत:ची भाषा कशी असावी वा असू नये असे ठराव वा निर्धार करून ती बदलत नसते. ‘खाजगी भाषा'(मग ती एका कवीची असो की कविगटाची असो) हा वदतोव्याघातच असतो; कारण भाषा सामाजिक आणि समाजनिर्मित असते आणि त्यामुळेच तिला अर्थवत्ता असते. दलितांच्या सामाजिक-मानसिक विश्वातून ‘‘हिंदुत्व” जर आणि जेव्हा नाहीसे होईल तर आणि तेव्हा तो बदल भाषेतूनही प्रतिबिंबित होईल. पण तोपर्यंत नरकयातना, आत्मशोध, स्वर्गसुख, सुदैवाने-दुर्दैवाने इत्यादी असंख्य शब्द किंवा ‘आकाशपाताळ एक करणे’ असे कित्येक वाक्प्रचार हद्दपार करून दलित कवींनी काव्यलेखन करावे असा अट्टाहास धरणे योग्य होणार नाही. कटारे तसा तो धरतात. त्यांचे म्हणणे शब्दशः अंमलात आणायचे तर दलित लेखकांना मराठी भाषेत लिहिताच येणार नाही. कदाचित पाली भाषेत लिहिता येईल! पण तिचेही काही ना काही आंबेडकरी विचारांच्या चौकटीत न बसणारे सांस्कृतिक संचित खचितच असणार! तेव्हा मग पंचाईतच आहे.
पण मग दलित साहित्याने बौद्ध दर्शनाचे अधिष्ठान स्वीकारावे असे जेव्हा राजा ढाले म्हणतात, किंवा बौद्ध दर्शनावर आधारित नवे मराठी धर्मग्रंथ व पुराणे तसेच प्रतीके व मिथके दलित लेखकांनी निर्माण करण्याचे आवाहन रा.ग. जाधव करतात, किंवा दलित साहित्याला नवे क्रांतिविज्ञान ठरवणारे बाबुराव बागूल जेव्हा नवी भाषा घडवण्याची भाषा करतात तेव्हा त्यांना काय म्हणायचे असते?कटान्यांसारखे लेखक या मान्यवरांचीआव्हाने व आवाहने फारच शब्दश: घेताना दिसतात, आणि त्यानुसार दलित कवींनाविशेषत: विद्रोही म्हणवणार्यार कवींना धारेवर धरतात. ‘समुद्राचे पाणी खारट असले तरी लाटांची चव मात्र गोडच लागायला हवी अशी काहीशी विचित्र अपेक्षा ते मनाशी बाळगताना दिसतात. त्यामुळेच अनेकदा जीर्ण प्रतिमा-प्रतीकांचा उपयोग कोण, कोणत्या संदर्भात, कोणत्या हेतूने आणि कशा स्वरूपात करतो याचेही तारतम्य न ठेवता ते सरसकट सर्वांनाच बडवून काढतात. अनेक ठिकाणी त्यांनी काही कवितांचा जो अन्वयार्थ लावला आहे त्यापेक्षा वेगळा अर्थ लावून कवींनी वापरलेल्या कथित “आक्षेपार्ह प्रतिमाप्रतीकांची योजना आवश्यक, अर्थपूर्ण व हेतुपोषक ठरवणे सहज शक्य आहे. पण त्या तपशिलांत येथे शिरण्याची गरज नाही.
पृ. २७ वरील दुसर्याा परिच्छेदातील पहिल्या वाक्यातील गफलत अनवधानाने राहिलेली दिसते. ती मात्र दुरुस्त करायला हवी.
३. शौरींच्या लेखनावर क्ष-किरण
(विलास वाघ (संकलक) : ब्राह्मणी आक्रोश, सुगावा प्रकाशन, पुणे : सप्टेंबर १९९७,
पृष्ठे : १०४, किंमत रु. ३०)
अरुण शौरी नामक शोधपत्रकाराने वर्शिपिंग फॉल्स गॉड नामक सातशेपानी अगडबंब ग्रंथ लिहून स्वतःच छापला. तो छापून बाहेर येण्यापूर्वीच त्याच्यावर बंदी येणार असल्याची आवई उठवली. ठिकठिकाणी पुस्तकातील प्रदीर्घ उतारे आधीच छापवून आणून वातावरण तापवले. मुद्दामच आक्रमक, चुरचुरीत आणि भडकवणार्याघ भाषेत लिहून आंबेडकरी विचाराच्या प्रचंड मोठ्या वाचकवर्गाला डिवचण्याची योजना त्यांनी करूनच ठेवली होती. वरकरणी संशोधनाचा आभास व्हावा अशा गाडाभर तळटिपा जोडल्या असल्या तरीपण लेखकाचा अंतस्थ हेतू मात्र डॉ. आंबेडकरांच्या चारित्र्यहननाचा आहे. त्याचे तात्कालिक साध्य हे रग्गड पैसा हडपणाराचे आहे हे तथ्य मुळीच लपून राहत नाही. डॉ. आंबेडकरांची भूमिका कोठेही न मांडता पूर्वग्रहदूषित दृष्टीने एकांगी, अर्धवट आणि पक्षपाती पुराव्यांची रास रचून विपर्यस्त निष्कर्ष काढण्याचा हा एक खोडसाळ, उद्धट आणि हेतुगर्भ उपद्व्यापच म्हणावा लागेल.
संघपरिवारातील कोणीतरी क्षीण आवाजात असा खुलासा केला असला की शौरींशी त्यांचा काहीही संबंध नाही तरी तो संबंध किती घनिष्ठ आहे हे सत्य लपवूनही लपवता येणारे नाही. डॉ. आंबेडकरांविषयी दलित जनतेचा बुद्धिभेद करण्याचे ‘समरसता’ उद्योग संघपरिवाराकडून नाना परींनी सुरूच आहेत. डॉ. आंबेडकरांना प्रातःस्मरणीयांच्या यादीत टाकणे, त्यांचे विचार आणि डॉ. हेडगेवारांचे विचार सारखेच असल्याचा भ्रम निर्माण करणे, डॉ. आंबेडकरांचे हिंदुकरण करणे व त्यांना हिंदसुधारक ठरवणे, त्यांची जयंती साजरी करणे आणि त्यावेळी आवर्जून दलित विचारवंतांना पाचारण करून त्यांच्यावर ‘समरसतावादी’ असा शिक्का पडण्याची व ते आपल्या समाजापासून तुटून एकाकी पडतील याची व्यवस्था करणे, डॉ. आंबेडकरांनी मुस्लिमविरोधी प्रतिमा उभी करणे असे उपद्व्याप ‘परिवार’ सतत करतो. डॉ. आंबेडकरांचे अपहरण जर जमत नसेल तर त्यांचे मूर्तिभंजन व चारित्र्यहनन तरी करावे असे त्या परिवारातल्या काही जणांना वाटते. शौरी हे अशा गटाचे ‘थिंक टैंक’ आहेत. सामाजिक समतेच्या लढ्याची तीव्रता वाढू नये, त्याला शह बसावा म्हणून कधी नामांतरावरून ठोकपीट, कधी रिडल्सप्रकरणी आक्रमकता, तर कधी शौरींच्या ताज्या पुस्तकातल्याप्रमाणे बाबासाहेबांची वैचारिक प्रतिमा विद्रूप करण्याचे खटाटोप असे प्रकार केले जातात. इतरही दलितविरोधी शक्ती निरनिराळ्या प्रेरणांनी अशा प्रसंगी एकवट होतात असा अनुभव आजवर अनेकदाआला आहे.
त्यामुळेच शौरींच्या पुस्तकाचे हे व्यापक समाजविघातक संदर्भ लक्षात ठेवूनत्यातील प्रतिपादनाचा समर्थ प्रतिवाद करणारे जे महत्त्वाचे लेखन मराठीत झाले त्याचे संकलन ब्राह्मणी आक्रोश नावाने प्रकाशित झाले ही घटना स्वागतार्ह ठरते. १) डॉ. आंबेडकरांचा स्वातंत्र्य लढ्यास विरोध होता, ते ब्रिटिशधार्जिणे होते आणि त्यांची राष्ट्रभक्ती कमअस्सल होती. २) त्यांनी व्यक्तिगत लाभांखातर इंग्रज राज्यकर्त्यांशी हातमिळवणी केली होती. ३) भारतीय संविधानाची निर्मिती करण्यात त्यांचा फारसा वाटा नव्हता, आणि ४) त्यांनी दलितांना दिलेली बौद्ध धर्माची दीक्षा हा केवळ राजकीय संधिसाधूपणाचा भाग होतार्या, शौरींनी केलेल्या चारही आक्षेपांचे साधार-सप्रमाण खंडन करणारे य.दि. फडके, गोविंद तळवलकर, प्रफुल्ल बिडवई यांचे सविस्तर लेख या संग्रहात आहेत. शौरी कसा सत्यापलाप करतात, तथ्येही दडपतात, खोटे लिहितात, ते आंबेडकर-साहित्यातील प्रस्तुत अवतरणे देणे कसे शिताफीने टाळतात, आणि त्यांचे संशोधन कसे आधी काढलेल्या निष्कर्षांना सोयिस्कर ठरतील तेवढेच व तितकेचे पुरावे देणारे आहे हे त्यांनी अनेक उदाहरणांनी दाखवून दिले आहे.
सावरकर—शामप्रसाद मुकर्जी–गोळवलकर यांनीही ‘भारत छोडो’ बद्दल आंबेडकरांसारखीच भूमिका घेतलेली असूनही त्यांना पाठीशी घालून फक्त आंबेडकरांनाच टीकेचे लक्ष्य करणार्याब शौरींची वैचारिक जातकुळी कशी ‘भगव्या रंगाची आहे आणि त्यांचे लेखन हे कसे व्यापक षड्यंत्राचा भाग आहे यावर भाई वैद्य व हरि नरके यांच्या निबंधातून प्रकाश पडतो. गोपाळ गुरू, भालचंद्र मुणगेकर आणि गेल ऑम्वेट यांचे लेख डॉ. आंबेडकरांच्या राष्ट्रवादाची मांडणी करून त्यांचे कार्य व विचार आधुनिक राष्ट्रवादाच्या उभारणीसाठी इतर राष्ट्रवाद्यांपेक्षाही कसे मौलिक महत्त्वाचे होते व आहेत याचा ऊहापोह करतात.
उक्त तीन गटातील लेखांप्रमाणेच आणखी एक गट या पुस्तकात आढळतो. तो दत्तोपंत ठेंगडी व देवेंद्र स्वरूप या संघपरिवारातील दोन अग्रणींच्या हिंदी लेखांचा आहे. त्यातही दत्तोपंतांनी फक्त गोळवलकर गुरुजींना बाबासाहेबांविषयी कसा आदर होता एवढ्यावरच विराम घेतला आहे, पण देवेंद्र स्वरूप यांची मजल मात्र ‘‘शौरी हे आज भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रात सत्यनिष्ठा आणि निर्भयता यांचे प्रकाशस्तंभ झाले आहेत असे शिफारसपत्र देण्यापर्यंत पुढे गेली आहे. शौरींना जेव्हा व जसे सत्य दिसते-समजते, ते ते भीडमुर्वत न ठेवता समोर मांडतात असे सांगून देवेंद्रस्वरूप म्हणतात की दलित चळवळ दिशाहीन भरकटलेली पाहून “उद्वेलित’ झालेल्या शौरींना तसे होण्याच्या कारणांचा शोध घेण्यास प्रारंभ केला आणि तो करता करता ते डॉ. आंबेडकरांपर्यंत पोचले आणि म्हणे त्यांना समजले की आंबेडकरांविषयी संपूर्ण सत्य सांगितलेच जात नाही, आपण ते दलित चळवळीच्या हितार्थ सांगावे! शौरींचे पुस्तक त्यांच्या मते या साक्षात्काराचा शब्दाविष्कार आहे! त्यावर कोणतेच भाष्य करण्याची गरज नाही.
जाता जाता हरि नरके यांनी य.दि. फडक्यांना दिलेल्या “आत्मपरीक्षण करण्याच्या सध्याविषयी मात्र लिहायलाच हवे. डॉ. आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही असे डॉ. फडके यांनी साधार विवेचन केले होते. त्यावर लिहिताना याच पुस्तकात सत्यरंजन साठे यांनी फडके आणि शौरी यांच्या भूमिकांमधील मूलभूत फरक स्पष्ट केला असून तो “दलित लेखकांनी समजून घेतला पाहिजे” (पृष्ठ – ४५) असे आवर्जून सांगितले आहे. नरक्यांना मात्र प्रतिगामी छावणीला रसद मिळणार असेल तर’ असे संशोधन करूच नये असे अभिप्रेत दिसते! वस्तुतः त्यांना हे प्रत्यक्ष प्रमाणाने माहीत आहे की फडक्यांच्या संशोधनाने प्रतिपक्षाला रसद पुरवल्याचे फारसे दिसले नाही; उलट फडक्यांच्या इतर ऋचा निःस्पृह बाणेदारपणामुळे ज्यांचे पितळ उघडे पडले होते अशा “स्वपक्षीयांनी फडक्यांचे ‘बाह्मण्य उद्धरून त्यांच्या संशोधनाविरुद्ध अकांडतांडव केले होते!