अलीकडे पर्यायी वैद्यकाचा अथवा पारंपारिक उपचार पद्धतींचा बराच गवगवा होऊ लागला आहे. गेल्या २०-२५ वर्षांत आधुनिक पाश्चात्त्य वैद्यकामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. मॉल्यिक्यूलर बायॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायो-इंजिनियरिंग ही विज्ञानाची नवी दालने विकसित झाल्यामुळे, लुई पास्टरचे जंतुशास्त्र आणि अलेक्झांडर फ्लेमिंगने पाया घातलेले जंतुविरोधक (antibiotics) औषधशास्त्र यापुढे आधुनिक वैद्यकाने फार मोठा पल्ला गाठला आहे. गुणसूत्रे व जीन्स, नैसर्गिक प्रतिकारसंस्था (immuno-system); रोगनिदानासाठी विविध प्रकारची साधने व पद्धती, उदाहरणार्थ क्ष-किरण, अल्ट्रासाऊंड, कॅटस्कॅन, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, पॉइस्ट्रान इमिशन टोमोग्राफी इत्यादी, तसेच लेसर किरणांचा वाढता वापर या सर्वांमुळे मानवी शरीराच्या रोगांची व बिघाडाची कारणे शोधणे सहजसुलभ झाले आहे. त्यामुळे आधुनिक वैद्यकपद्धतीत औषधयोजना करणे अधिक , सोपे, निश्चित व नेमके झाले आहे. परंतु त्याचबरोबर दुर्दैवाने डॉक्टरमंडळींची आपली बुद्धिमत्ता व अनुभवात्मक प्रशिक्षण ह्यांचा वापर करण्याची प्रवृत्तीही खालावत चालली आहे. मानवी शरीर हे एक यंत्र असून त्यास रसायनशास्त्राचे व भौतिकीचे सर्व नियम लागू होतात व ज्याप्रमाणे एखाद्या वाहनाचे इंजिन चालते तसेच मानवी शरीरही काम करते हीच भावना प्रमुख पायाभूत सिद्धान्त (dogma) म्हणून रूढ होत आहे. ज्याप्रमाणे इंजिनातील इंधनवाहक नलिका अथवा नळकांडी (cylindar) स्वच्छ करावी लागतात; त्याचप्रमाणे हृदयातील रक्तवाहिन्या नळ्या घालून खरवडणे अथवा फुगे घालून मोकळ्या करणे हे सामान्य झाले आहे. एवढे करूनही या रक्तवाहिन्या मोकळ्या झाल्या नाहीत तर इंजिनातील नळ्या काढून टाकून त्याठिकाणी पर्यायी वाहिन्या बसविणे (bypass surgery) ही सुद्धा एक सामान्य उपचारपद्धती झालेली आहे! ज्याप्रमाणे इंजिनातील पिस्टन, पिस्टन रिंगा, स्पार्क प्लग, झडपा (valves) बदलून नवे भाग (spare parts) बसवितात, त्याचप्रमाणे हृदय, यकृत, पांथरी (pancreas), मूत्रपिंड, अस्थिजोड, डोळ्याचे भाग, त्वचा यासारखे अवयव बदलून शरीरास पुन्हा कार्यक्षम करण्याचे तंत्र रूढ होऊ पाहत आहे.
ज्याप्रमाणे इंजिनात वापरले जाणारे इंधन अधिकाधिक कार्यक्षम करणे, वंगणाच्या वेगवेगळ्या तन्हा वापरणे, त्याचप्रमाणे मानवी शरीरक्रियांमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी calcium blockers, beta blockers सारखी हृदयरोगावरील औषधे वअधिक मूत्रनिस्सारणासाठी diuretics वापरली जातात. यामागील भूमिकाही मानवशरीरास यंत्र मानण्याचीच आहे. मानसिक रोगांसाठी विजेचे झटके (shock). देण्याची पूर्वापार पद्धत ही तर अतिशय क्रूर आहे. कपडे धुताना कपड्यातील मळ काढण्यासाठी लाकडी धोपटण्याने ठोकण्यासारखाच हा प्रकार आहे! या सर्व वैद्यकीय उपचारांमध्ये, मानवी शरीर हे एक यंत्र आहे व ते सुरळीत ठेवण्यासाठी, जुन्या इंजिनांना ज्याप्रमाणे सतत देखभाल (overhauling) आणि नवे भाग बसविण्याची (change of parts) आवश्यकता असते तसेच प्रयत्न आधुनिक वैद्यकशास्त्र करीत असते. परंतु मानवी शरीर हे खरोखरच एक यंत्र आहे काय?
मानवी शरीर व त्यातील क्रिया-प्रक्रियांचा अभ्यास करणार्या इतरही अनेक वैद्यक पद्धती जगात प्रचलित आहेत, त्या म्हणजे आयुर्वेद, युनानी, तिब्बी, यिन व यांगवर आधारित चिनी उपचारपद्धती, सूचिवेघन (acupuncture), होमियोपॅथी, योगचिकित्सा इत्यादी. या सर्व वैद्यक पद्धतींना हल्ली पारंपारिक, पर्यायी अथवा स्थानिक वैद्यक पद्धती (traditional, alternate or ethnic systems of medicine) म्हणण्याचा प्रघात असून या सर्व वैद्यक पद्धतींमध्ये मानवी शरीर हे निसर्गाचे एक उत्क्रांत लेणे मानले जाते, आणि मानवी शरीर हे केवळ यंत्रवत् काम करीत नसून त्यामध्ये निसर्गाच्या विविध मूलतत्त्वांचा . व ऊर्जेचा मोठा सहभाग असतो असे मानले जाते. शरीर हे निसर्गाशी एकरूप आहे व ज्याप्रमाणे निसर्गाचे वर्णन कठोर शिस्तीचे नसते, त्याचप्रमाणे मानवी शरीरधर्म हेसुद्धा यांत्रिक चाकोरीमध्येच घडतात असे या वैद्यकपद्धती मानत नाहीत. या सर्व पारंपारिक वैद्यक पद्धतीत रोगनिदान करताना शरीराचा तुटक असा विचार न करता, शरीर हे संपूर्ण निसर्गाचा एक घटक समजूनच अभ्यास केला जातो, आणि शरीरात होणारे बिघाड हे या शरीराचे निसर्गाशी असणारे द्वंद्व असते असे मानले जाते. म्हणून शारीरिक पीडा व रोग यासाठी नैसर्गिक पद्धतीनेच उपचार केले पालिजेत असेच सर्व पारंपारिक वैद्यकपद्धती, मानतात. निसर्गापासून मिळणाच्या वनस्पती, प्राणिज व खनिज पदार्थ यांचाच औषधे म्हणून वापर करण्यात येतो. या सर्व पद्धती हजारो वर्षे टिकून आहेत,कारण त्या उपयुक्त आहेत हे सुद्धा आता सर्वमान्य होत आहे. नैसर्गिक पदार्थांपासून वेगवेगळ्या प्रक्रिया केलेली आयुर्वेदिक, युनानी, तिब्बी आणि चिनी औषधे, तसेच अशाच पदार्थांपासून परंतु वेगळ्या तत्त्वावर आधारलेली होमियोपॅथिक औषधे, तसेच आयुर्वेदिक शल्यक्रिया, पंचकर्म अथवा चिनी सूचिवेधन या सर्वांची उत्तम गुणवत्ता आहे याबद्दल आता शंका घेतली जात नाही.
आधुनिक पाश्चात्त्य वैद्यकाचे या पारंपारिक व पर्यायी उपचारपद्धतींकडे लक्ष आकृष्ट झालेले असून या सर्व उपचारपद्धतींचा पाश्चात्त्य देशात प्रसार होतो आहे. जगातील वेगवेगळ्या भूभागात व वातावरणात उपलब्ध असणार्याा वनस्पती, प्राणी,खनिजे व मृदाजैविके (fungi) यांचा अभ्यास होऊ लागला आहे व त्यापासून व्यापारी लाभ मिळविण्याच्या लोभापायी पेटंटविषयक वादही निर्माण होत आहेत. या सर्व पारंपारिक वैद्यक पद्धतींमध्ये व्यापारी लाभ व एकाधिकार प्राप्त करण्याची प्रवृत्ती नव्हती, व उपलब्ध ज्ञान सर्वांसाठी खुले होते; परंतु पाश्चात्त्यांच्या व्यापारी वृत्तीमुळे आता तणाव व विवाद निर्माण होऊ लागले आहेत.
आयुर्वेदिक औषधे विविध नैसर्गिक पदार्थांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून सिद्ध केली जातात. अशा तयार औषधांचे गुणधर्मही वैद्यांना चांगले माहीत असतात. परंतु या औषधांमधील महत्त्वाचे कार्यक्षम घटक कोणते याचे रासायनिक विश्लेषण झालेले आढळत नाही. त्याचप्रमाणे अशा रासायनिक घटकांचे (molecules) शरीरावर होणारे परिणाम आधुनिक संख्याशास्त्रीय (statistical) पद्धतीने प्रयोग करून निश्चित केले जात नाहीत ही एक मोठी त्रुटी आहे. अमुक एक काढा अथवा अमुक एक चूर्ण विशिष्ट रोगावर परिणामकारक आहे असे ग्रथित असते, पण त्या काढ्यात अथवा चूर्णात परिणामकारक मॉलिक्युल्स कोणते, तसेच या परिणामकारक द्रव्याच्या उपयुक्ततेवर औषध सिद्ध करण्याच्या पद्धतीनुसार बदल होतात काय व ते कोणत्या कारणास्तव याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. असे झाले तर आयुर्वेदिक औषधे अधिक शास्त्रशुद्ध होतील. याखेरीज जुन्या नैसर्गिक पदार्थांसोबतच नवनवीन नैसर्गिक पदार्थांचा सतत अभ्यास होत राहिला पाहिजे. प्राचीन काळापासून वापरात असलेल्या वस्तूंशिवाय, निसर्गात उपलब्ध असणान्या सर्वच पदार्थाचे परीक्षण होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ सेलेनियम, मॉलिब्डियम यांसारखी खनिजे, तसेच भारताच्या ईशान्येकडील प्रांतांत, आढळणारे अनेक अतिशय विषारी कीटक यांचा सर्वांगीण अभ्यास झाला पाहिजे.
आयुर्वेदाप्रमाणे होमियोपॅथीची सर्वच औषधे नैसर्गिक पदार्थापासूनच तयार करण्यात येतात. परंतु या औषधांची गुणवत्ता ठरविण्याचा हल्लीचा एकमेव प्रचलित मार्ग निरोगी व्यक्तींवर अशा औषधांचा परिणाम तपासून पाहणे (proving) हाच आहे, आणि असे करताना तौलनिक निरीक्षण (with controls) केले जात नाही. ही या वैद्यकातील मोठी त्रुटी आहे. आधुनिक वैज्ञानिक रीतीने प्रायोगिक प्राणी (laboratory animals), ऊमक व पेशीसंवर्धन तंत्र (tissue and cell culture techniques) यांचा वापर केला जात नाही. त्यामुळे होमियोपॅथिक औषधांच्या बाबतीत “बाबा वाक्यं प्रमाणम्’ असाच प्रकार आहे. होमियोपॅथीतील डॉ. हानिमान यांना गवसलेले तत्त्व केवळ गौडबंगाल राहून उपयोगी नाही. त्याचे आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण होणे आवश्यक आहे. काही होमियोपॅथिक औषधांचा जादुच्या कांडीसारखा उपयोग होतो हे खरे आहे, परंतु जीवभरण प्रसंगी जादूच्या कांडीवर विसंबून राहणे कितपत शहाणपणाचे ठरणार? होमियोपॅथीचे परिणामकारकत्व (effective principle) वैज्ञानिक रीतीने विशद झाले पाहिजे.
हल्ली पारंपारिक व पर्यायी वैद्यकावर संयुक्त राष्ट्रसंघ (UNO), तसेच विविध विद्यापीठे आणि गैरसरकारी संघटना (NGOs) चर्चासत्रे आयोजित करतात व नियतकालिके व ग्रंथ त्यांतून या विषयावर विस्तृत चर्चा होऊ लागली आहे. परंतु आमच्या शासकीय व खाजगी आयुर्वेद व होमियोपॅथी महाविद्यालयांनी तसेच डाबर, बैद्यनाथ, सांडू, झंडू, विको यासारख्या श्रीमंत औषधनिर्मात्यांनी आयुर्वेद व होमियोपॅथी वैद्यकास आधुनिक औषधिशास्त्राच्या (pharmacology) वैज्ञानिक शिस्तीत बसविण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत. असे झाले तरच या परंपरागत पर्यायी उपचारपद्धती अधिक तर्कशुद्धआणि विश्वासार्ह ठरतील.
औषधी गुणधर्म असलेल्या नैसर्गिक पदार्थांचा, विशेषतः वनस्पतींचा, झपाट्याने व्हास होतो आहे. अनेक वनस्पती पर्यावरणदूषणामुळे नष्ट होत आहेत. अनेक औषधी वृक्षांचा इंधनासाठी वापर होत आहे. वनस्पतींची ओळख असणार्याळ व्यक्तींची संख्या कमी होत आहे व वनस्पतींची वर्णने करणारे सचित्र कोश व संग्रह (herbarium) निर्माण करण्याचे प्रयत्न होत नाहीत त्यामुळे वनस्पतींबद्दल माहिती सुलभपणे उपलब्ध होत नाही. आणि सर्वांत चिंता करण्यासारखी गोष्ट म्हणजे हल्ली उपयुक्त औषधी वनस्पती दुर्मिळ व अपुर्याा होत चालल्या आहेत. गुग्गुळासारखा उपयुक्त पदार्थ शुद्ध स्वरूपात बाजारात मिळत नाही! या सर्व गोष्टी अंततः पर्यायी वैद्यक पद्धतीस घातक ठरू शकतात. यासाठी शासनाचे कृषिविभाग, भारतातील विविध हवामानांत कार्यक्षेत्र असलेली कृषिविद्यापीठे, सधन शेतकरी, आयुर्वेद-संस्था, व हौशी व्यक्तींनी सर्व ज्ञात औषधी वनस्पतींच्या विविध जाती, प्रजातींचे प्रजनन, संगोपन व मोठ्या प्रमाणावर लागवड करणे अतिशय महत्त्वाचे व निकडीचे आहे. आर्थिक लाभासाठी ऊस, चहा, सोयाबीन ही पिके घेण्यासोबतच औषधी वनस्पतींची पिके घेणेही आवश्यक आहे.