ग्रीस हा देश अनेक बेटांचा, उंच डोंगर व खोल दन्यांचा आहे. ह्या देशाला वेडावाकडा समुद्रकिनारा आहे. परिणामी जरी ग्रीक स्वत:ला “एकच विशिष्ट जमात’ असे मानत असले तरी सगळ्या ग्रीसला एकाच राजवटीच्या अंमलाखाली आणणे कुणाला जमले नाही. ख्रिस्तपूर्व ५०० सनाच्या सुमाराला ग्रीसमध्ये फक्त एकाच शहराचा देश (city state) असे ३०० देश स्थापन झालेले होते.
ह्या सर्व देशांत स्पार्टा (Sparta) व अथेन्स (Athens) हे सर्वांत प्रसिद्ध आहेत. त्यांत स्पार्टा ह्या देशाचे पायदळ (land force) सगळ्या राष्ट्रांत बलाढ्य होते. स्पार्टा हे अक्षरशः लष्करी राष्ट्र होते.
जन्मल्यापासून स्पार्टाच्या नागरिकांचे जीवन त्यांना उत्तम सैनिक बनवण्याच्या दृष्टीने सरकारने आखून दिलेले होते.
जन्मलेले मूल रोगट असल्यास त्याला डोंगरावर ठेवून मारून टाकले जात असे.
मुली व मुलगे सात वर्षांपर्यंत आईकडे राहत असत. सातव्या वर्षी त्यांच्या व्यायाम, कवायत अश्या धर्तीच्या शारीरिक शिक्षणाला सुरुवात होत असे.
मुलीचे शारीरिक सामर्थ्य भावी पिढीच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे म्हणून स्पार्टाच्या मुली मुलांच्या बरोबरीने कवायती, व्यायाम, स्पर्धा, खेळयांत भाग घेत असत.
मुलगे तेरा वर्षांचे झाले की कडक तपश्चर्या केल्यासारखे त्यांचे शारीरिक शिक्षण सुरू व्हायचे. आईवडिलांना सोडून समवयस्क मुलांबरोबर मुलगे राहत असत.
थंडीत व उन्हाळ्यात एकच वस्त्र, लाकडी बिछाना, अपुरे जेवण, कष्टाची कामे, अर्धपोटी व्यायाम, कसरत व शिस्त मोडल्यास कडक शिक्षा असे त्यांचे जीवन असे.
ह्या सगळ्या शिक्षणामागचा उद्देश त्या मुलांना टणक, काटक व सहनशील करायचे असा होता. खायला तर एवढे कमी मिळायचे की पोट भरण्यासाठी मुलांना चोरी करणे भाग पडायचे. चोरी करताना मुले पकडली गेली तर शिक्षा होत असे.
अशा एका मुलाची दंतकथा आहे : त्या मुलाने खाण्यासाठी चोरून छोटा कोल्हा आणला. तो त्याने वस्त्राआड छातीशी धरला होता. तो मुलगा पहारेक-यांनी पकडला व त्याला ते प्रश्न विचारू लागले. त्या मुलाच्या छातीला तो कोल्हा चावू लागला. मुलगा शांतपणे मरून कोसळेपर्यंत उत्तरे देत राहिला. थोडक्यात त्याने आपली अब्रू (honour) वाचवली.
ह्या मुलांचे शिक्षण अर्थात सरकारतर्फे होत असे. मुलींचे शिक्षण त्या वयात येईपर्यंत चालू राहत असे.
अठरा वर्षांचा झाला की मुलगा लष्करी शाळेत दाखल होत असे. तेथे त्याला युद्धकलेचे शिक्षण दिले जाई. स्पार्टन सैनिकांना कडक शिस्त पाळावी लागे. युद्धकलेत ते निपुण होते व ग्रीक नगरराष्ट्रांमध्ये त्यांच्याशी तुल्यबल अशी दुसरी सेना नव्हती.
झेरकिज (Xerxes) ह्या पर्शियन राजाने ग्रीक राष्ट्रांवर स्वारी केली होती. तेव्हा झालेल्या एका युद्धात ग्रीक हरले. तेव्हा इतर ग्रीक सैनिक पळून गेले. पण ३०० स्पार्टन सैनिक शेवटचा सैनिक धारातीर्थी पडेपर्यंत लढत राहिले, अशी दंतकथा आहे (ख्रिस्तपूर्व ४७९).
तीस वर्षांचा झाला की स्पार्टन पुरुषाला स्वतःचे शेत मिळायचे व त्याला स्पार्टामध्ये मत देण्याचा अधिकार प्राप्त व्हायचा. थोडक्यात तो मत देऊ शकणारा स्पार्टाचा नागरिक (citizen) व्हायचा. त्याच्या शेताची व त्याची सगळी कामे त्याचे गुलाम किंवा हिलॉटस् (helots) करीत असत. तिसाव्या वर्षांनंतर स्पार्टाचा नागरिकत्याच्या पत्नीमुलांसह शेतावर घरी राहायचा, पण साठ वर्षापर्यंत तो लष्करातला सैनिकचअसे.
थोडक्यात स्पार्टाचे नागरिक फक्त सैनिक होते. स्त्रिया व गुलाम इतर सर्व व्यवहार सांभाळत.
स्पार्टाने आसपासची अनेक राष्ट्रे काबीज केली होती व त्या राष्ट्रांच्या नागरिकांना गुलाम केले होते.
स्पार्टामध्ये गुलाम व नागरिक यांचे प्रमाण एवढे विषम होते (१ नागरिक: ५ गुलाम) की सैनिक नागरिकांची बरीच शक्ती गुलामांना काबूत ठेवण्यात खर्च होत असे. गुलामांच्या बंडाचा धोका स्पार्टाच्या नागरिकांना सतत होता. म्हणून त्यांनी गुलामांचे व्यक्तिमत्त्व ठेचून त्यांना बंधनात ठेवण्याचे मार्ग शोधून काढले.
स्पार्टाचे गुलाम सतत कुत्र्याच्या चामडीची टोपी घालत असत. मधूनमधून विनाकारण त्यांना फटके मारण्याची शिक्षा होत असे. अगदी लहानसहान चुकींसाठीही त्यांना अनेक फटके मारण्याची शिक्षा होई. त्यांना अर्धपोटी काबाडकष्ट करायला लावण्याची पद्धत होती. एखादा गुलाम शारीरिकदृष्ट्या बलवान् अथवा गुलामांत लोकप्रिय होत आहे किंवा इतर गुलामांना फितवीत आहे असे वाटले तर त्याला देहान्ताची शिक्षा होत असे. एवढेच नव्हे, तर गुलामांना चांगली वागणूक दिलीच तर नागरिकांना शिक्षा होई.
स्पार्टामध्ये गुलाम व अधिकृत नागरिक सोडून पेरिऑयसी म्हणून एक शख्ने, लाकडी आयुधे, मातीची भांडी वगैरे बनवणारी जमात होती. त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. पण गुलामांपेक्षा त्यांची परिस्थिती बरी होती. जीवनावश्यक वस्तू बनवण्यासाठी ह्या जमातीची समाजाला गरज होती. ह्या लोकांच्याबद्दल इतिहासात फार माहिती उपलब्ध नाही. पण जरूर पडल्यास त्यांना लष्करात भरती केले जात असे.
ख्रिस्तपूर्व ६०० च्या सुमारास ग्रीसमधले इतर देश यांच्यात आपसात व आशिया युरोपमधल्या देशांशी व्यापार सुरू झाला. परिणामी एक नवा व्यापारी श्रीमंत वर्ग समाजात निर्माण झाला. स्पार्टन लोकांना नागरिकांत विषमता नको होती. म्हणून त्यांनी सोने, चांदी एवढेच नव्हे तर काही अत्यावश्यक वस्तू सोडून आयातनिर्यातीवरच बंधने घातली.
“परदेशी संस्कृतीचा स्पर्शही समाजाला नको म्हणून त्यांनी परदेशी नागरिकांना थोड्या अवधीसाठी सुद्धा स्पार्टात राहाण्यास बंदी घातली”. मधून मधून गावांच्या झडत्या घेऊन कुणी परदेशी माणूस सापडलाच तर त्याला ते हाकलून लावत असत. ह्या धोरणाचा परिणाम स्पार्टा हे राष्ट्र मागासलेले व शेतीप्रधान राहाण्यात झाला. वाङ्मय, कला, शास्त्र यांचा अभ्यास तेथे बंद पडला. झापड लावलेल्या घोड्यासारखे स्पार्टाचे नागरिक एकाचलष्करी चाकोरीतून फिरत राहिले.
अॅरिस्टॉटलच्या मते “स्पार्टन् युद्ध जिंकत असतीलही, पण नंतर मिळवलेल्या साम्राज्याचे काय करायचे याचे त्यांना ज्ञान नव्हते. इतर ग्रीक राष्ट्रीयांपेक्षा स्पार्टन् युद्धात शूर असले तरी इतर बाबतींत अप्रगत होते. त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ नव्हती.”
स्पार्टन लोकांच्याच आसपास अथेन्ससारखे साहित्य, कला तत्त्वज्ञान यांचे आगर असलेले लोकशाही तत्त्वांवर आधारलेले राष्ट्र नांदत होते. पण स्पार्टा आपल्या कोशात गुरफटून पडले होते. स्पार्टाच्या मूठभर उच्चवर्गीय नागरिकांसाठी, त्यांच्या सुखासाठी, यशासाठी उरलेली माणसे कष्ट करीत आपआपले जीवन कंठत होती. ह्या कष्टक-यांत मी स्पार्टाच्या नागरिकांच्या तरुण मुलग्यांचाही समावेश करते.
स्पार्टाच्या जमिनी, गुलाम, संपत्ती ही सर्व राज्याची (स्टेटची) किंवा सरकारची होती. तिचा उपभोग घेण्याचा अधिकार फक्त सैनिकी नागरिकांना होता.
स्पार्टाच्या नागरिकांना (पुरुष) इच्छा असो वा नसो, सैनिक होणे भागच होते.
जन्मल्यापासून स्टेट अथवा सरकार त्यांच्या आयुष्याची नाडी आपल्या हातांत घेऊन बसलेले होते. आपल्या आयुष्याची दिशा ठरवण्याचे स्वातंत्र्य स्पार्टाच्या नागरिकांना नव्हते.
हे असे का घडले?
स्पार्टाची मूळची राजवट पाहिली तर ती उच्च दर्जाची लोकशाही असल्यासारखी होती.
थोडक्यात, स्पार्टाचे दोन आनुवंशिक राजे होते. साठ वर्षांवरच्या नागरिकांनी निवडून दिलेल्या कौन्सिलर्सची सभा किंवा कौन्सिल होते. हे कौन्सिलर्स कायदे करण्यासाठी ठराव मांडत असत. दर महिन्याला सगळे स्पार्टाचे नागरिक एकत्र येत असत. तेथे राजा किंवा कौन्सिल यांना मांडलेल्या ठरावाबद्दल हो किंवा नाही असे मत देता येत असे. स्पार्टाचे कायदे पास करण्याचा अधिकार या नागरिकांच्या सभेला होता. त्यांना ठराव मांडण्याचा मात्र अधिकार नव्हता. शिवाय या राज्यात ५ इफोरस् होते. ह्या इफोरसुना राजासारखाच मान होता. जिथे राजा जायचा तिथे दोन इफोर त्याच्याबरोबर जात. त्यांना राजाला व जनतेला शिस्त लावायचा अधिकार होता. तसेच राजे व जनता राज्यघटना पाळत आहेत याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांची होती.
स्पार्टाची राज्यघटना लायकरगस् ह्याने लिहिलेली होती. ती नुसती वाचली तर ही राज्यघटना उदारमतवादी लोकशाहीच वाटते. तेथे एक नव्हे दोन आनुवांशिक राजे होते. त्यांचा एकमेकाला शह होता. राजाच्या सत्तेवर इफोर्सच नियंत्रण होते. स्पार्टाच्या नागरिकांनी निवडलेल्या कौन्सिलला राजकीय अधिकार होते. कायदे नागरिकच बहुमताने पास करत असत. थोडक्यात जुलमी कायदे करण्याचा, अथवा अन्यायकरण्याचा अधिकार सत्ताधा-यांना नव्हता.
पण इतर ग्रीक लोकशाही देशांत आपसांत होणार्याा वादविवादात ‘‘स्पार्टाची राज्ययंत्रणा व लोकशाही कशी जनहिताला हानिकारक ह्याचे उदाहरण म्हणून तेथले पंडित देत असत. तसेच ३०० ग्रीक शहर-राष्ट्रांमध्ये स्पार्टाचे अनुकरण करणारे एकही। राज्य नव्हते. त्या काळच्या ग्रीक राष्ट्रांत राजेशाही लोपाला जात होती. ग्रीक लोक तेव्हा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्या काळच्या बहुतेक ग्रीक राष्ट्रांमध्ये सर्वसाधारण नागरिक व सरदार घराणी (nobles and royals) ह्यांना एकच कायदा लागू पडत होता. म्हणून समकालीन ग्रीक राष्ट्रीयांचा स्पार्टन् राज्याबद्दलचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
स्पार्टन् अशा रीतीने स्वतःहून आपल्याच राज्ययंत्रणेचे गुलाम का झाले?स्वतःलाच नव्हे तर स्वतःच्या कोवळ्या मुलांना त्यांनी हालअपेष्टा काढायला, एवढेच नव्हे तर मृत्यूशी सामना करायला क्रूर सरकारच्या हवाली का केले?स्वतःमधली कला, वाङ्मय यांच्यातला आनंद उपभोगण्याची वृत्ती त्यांनी ठेचून का टाकली?माझ्या मते या प्रश्नाचे उत्तर स्पार्टन् लोकांच्या मायसिनिया ह्या देशाबरोबर झालेल्या दोन युद्धांत व स्पार्टन् लोकांनी मायसिनियन् जनतेवर लादलेल्या गुलामगिरीत आहे.
स्पार्टाचा सुरवातीचा इतिहास नीटसा माहिती नाही. एवढे माहीत आहे की मायसिनिया या देशाशी स्पार्टन् लोकांची लढाई झाली ती लढाई खूप वर्षे चालली (ख्रिस्तपूर्व ७३५ ते ७१५) त्यानंतर स्पार्टन् लोकांची आपसांत यादवी झाली व मायसिनियाचे युद्ध परत सुरू झाले. या युद्धामुळे स्पार्टन् जनतेच्या एकीचा अंत पाहिला गेला, पण अखेरीस स्पार्टा जिंकले.
त्यांनी मायसिनियाच्या सुपीक जमिनी स्पार्टन नागरिकांना वाटून दिल्या व मायसनिय जनतेला गुलाम करून टाकले. ह्या घटनेनंतर स्पार्टाच्या जनतेचे कायमचे सैनिकीकरण झाले. माझ्या मते मायसिनियाच्या जनतेवर लादलेली गुलामगिरी ह्या सैनिकी परिवर्तनाच्या मुळाशी आहे. इतर ग्रीक देशांतही गुलाम होते. पण गुलामांच्या बाबतीत त्यांचे धोरण स्पार्टासारखे कडवे व क्रूर नव्हते.
आपल्यापेक्षा लोकसंख्येने अधिक असलेल्या गुलामांना जुलमाने शृंखलाबद्ध ठेवण्यासाठी स्पार्टाला आपले सगळे नागरिक सैनिक म्हणून वापरावे लागले. अगदी लहानपणापासून मुलांच्या मनात गुलामांबद्दल तिरस्कार व स्वत:बद्दल अहंकार बिंबवण्याची आवश्यकता निर्माण झाली. स्पार्टा ह्या राज्याने दोन प्रकारची गुलामी निर्माण केली, व त्यामुळे गुलाम व मालक या दोघांचेही स्वातंत्र्य व माणुसकी हिरावून घेतलीगेली.
समाजामधली आर्थिक अथवा समाजात जन्मतः येणारी विषमता ही लोकशाहीला विषासारखी असते. (उदा. जातिभेद, वंशभेद, आर्थिक भेद). स्पार्टन् लोकांनी आपल्यानागरिकांची लोकशाही व स्वतःचे गुलामांवरचे वर्चस्व टिकवले. पण त्यासाठी त्यांनी दिलेले मोल देण्याजोगे होते का?त्यांच्या वेळच्या ग्रीक राष्ट्रांनीच या प्रश्नाचे उत्तर दिलेआहे.
स्पार्टाच्या पुरुष नागरिकांमधली समानता पण त्यांनी टोकाला नेली होती. परिणामी सगळे नागरिक अगदी एकसारखे राहत होते. त्यांच्या आकांक्षा, शिक्षण, त्यांच्याकडे असलेल्या वस्तू, त्यांची शेत करण्याची पद्धत, कपडे सारखेच असत. विविधतेचे, कलेचे, नावीन्याचे कोठेही नाव नव्हते. (सैनिकी शिक्षणात पारंगत होऊ न शकणारी मुले बहुतेक शिक्षणाच्या क्रौर्यानेच मारली जात असावीत.) ही खोटी अनैसर्गिक समानता म्हणजेही लोकशाही नव्हेच असे म्हणायला हवे. लोकशाहीत प्रत्येक मुलाला त्याचा कल असेल ती विद्या शिकण्याची संधी मिळायला हवी. एकाच प्रकारची विद्या सर्वांवर लादण्यात काय अर्थ आहे?लोकशाही खर्या अर्थाने टिकवण्यासाठी आवश्यक असणारे जागरूक नागरिकच स्पार्टाने नाहीसे केले. लोकशाही समाजात आर्थिक विषमता, शिक्षणाची विविधता, मतभेदांचा गलबलाट, समाजातले वर्ग यांच्यात समतोल असला पाहिजे. अर्थात ज्या वर्गाला कुठल्याही प्रकारच्या विषमतेचा फायदा होतो तो वर्ग आपली सत्ता किंवा आर्थिक सुबत्ता यांचा समाजासाठी त्याग करायला तयार नसतो.
याचे एक उदाहरण मी हल्लीच पाहिले. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत किमान वेतन (minimum wage) वाढवण्याचा प्रयत्न चालू होता. तेव्हा धंद्याची नुकसानी होईल”परवडणार नाही’ म्हणून धंदेवाईक ह्या वाढीला विरोध करीत होते. पण तो कायदा पास होऊन वेतनवाढ झालीच. त्यानंतर मला इकॉनॉमीत काहीच फरक दिसत नाही. गरीबश्रीमंतामध्ये विषमता वाढू नये म्हणून हे वेतन वाढवण्याचे प्रयत्न होते. कॉलेजमधील गरीब मुलांना स्कॉलरशिपस्, गरिबांना फुकट पाळणाघर, वैद्यकीय मदत हे पण विषमता कमी करण्याचे प्रयत्न आहेत.
लोकशाहीचा विपर्यास नागरिकांनाच शृंखलाबद्ध करण्यात होऊ शकतो हे स्पार्टाच्या उदाहरणावरून सिद्ध होते. भारताने स्पार्टापासून काय धडे घ्यावेत याचा विचार वाचकांनीच करावा.